साध्वीच्या मृत्यूचा 'त्या' व्हायरल व्हीडिओशी संबंध आहे का? पोलिसांनी काय सांगितलं?

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
- Author, मोहर सिंह मीणा
- Role, बीबीसी हिंदीसाठी
- Reporting from, जयपूरहुन
- वाचन वेळ: 6 मिनिटे
राजस्थानच्या मारवाड भागातील 23 वर्षीय साध्वी प्रेम बाईसा यांचा 28 जानेवारी 2026 रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
साध्वी प्रेम बाईसा यांचे वडील वीरमनाथ यांनी आरोप केलाय की, "सर्दी आणि घशात खवखव असताना चुकीचे इंजेक्शन दिल्यामुळे माझ्या मुलीची तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला."
नागौरचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी या प्रकरणात हत्येचा संशय व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, शवविच्छेदन प्रक्रियेनंतर 30 जानेवारी रोजी बालोतरा जिल्ह्यातील परेऊ गावात साध्वींना संत परंपरेनुसार समाधी दिली गेली.
या हाय-प्रोफाइल प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून त्यांनी तपास सुरु केला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नाही. पोलिसांनी व्हिसेरा अहवाल हाती आल्यानंतर तपासाची पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी माहिती दिली.
प्रकरण काय?
साध्वी प्रेम बाईसा यांचे मामा गंगाराम यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "साध्वी प्रेम बाईसा अजमेरहून मंगळवारी (27 जानेवारी) उशिरा रात्री जोधपूरला आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांना एका कथावाचनासाठी पुन्हा अजमेरला जायचे होते. दरम्यान, घशात खवखव आणि सर्दीची तक्रार केल्याने जवळच राहणाऱ्या एका कंपाउंडरला बोलावण्यात आले."
साध्वी प्रेम बाईसा यांचे वडील वीरमनाथ (वय 42) त्यांच्या गावी, परेऊ येथे होते. त्यांनी फोनवर बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, "जोधपूरच्या आरती नगर येथील आमच्या आश्रमापासून (घरापासून) सुमारे 200 मीटर अंतरावर कंपाउंडर देवी सिंह राहतो. 28 तारखेला संध्याकाळी त्याने साध्वींना दोन इंजेक्शन दिले."
"इंजेक्शन दिल्यानंतर लगेचच साध्वींना जोरात शिंका येऊ लागल्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्या धावत आश्रमाबाहेर आल्या आणि तातडीने रुग्णालयात नेण्याची मागणी केली. त्यांची तब्येत खूप बिघडल्याने तिला गाडीत बसताही येत नव्हतं. आम्ही त्यांना जोधपूरमधील प्रेक्षा रुग्णालयात नेले."
"वाटेत साध्वींनी म्हटलं की, 'पप्पा, मला न्याय मिळवून द्या, हीच माझी शेवटची आशा आहे.' त्यानंतर त्या काहीच बोलू शकल्या नाहीत."

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
वीरमनाथ यांच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षा रुग्णालयात पोहोचेपर्यंत साध्वींचा श्वास थांबला होता.
प्रेक्षा रुग्णालयाचे डॉक्टर प्रविण जैन बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाले की, "प्रेम बाईसा यांना रुग्णालयात आणल्यानंतर तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब आणि पल्स थांबले होते."
29 जानेवारी रोजी सकाळी जोधपूरच्या जिल्हा रुग्णालयात मेडिकल बोर्डाने साध्वींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. यावेळी शवागाराबाहेर गोंधळही उडाला.
वीरमनाथ म्हणाले, "आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करत आहोत. पोलिसांनी माझी सहमती मागितली, तिथे मी ती दिली. पोस्टमॉर्टेमदरम्यान काही स्थानिक लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र मी पोलिसांना सहकार्य करत होतो."
साध्वी प्रेम बाईसा कोण होत्या?
साध्वी प्रेम बाईसा यांचा जन्म बालोतरा येथील परेऊ गावात झाला. साध्वी त्यांच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. साध्वी सुमारे पाच वर्षांच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले.
त्यांचे मामा गंगाराम सांगतात, "लहानपणापासूनच प्रेम बाईसा यांचा धर्माकडे ओढा होता. त्यांचे अनुयायी आणि कथा ऐकणारे हजारो-लाखो लोक आज दुःखी आहेत."
साध्वींचे शिष्य असलेले 42 वर्षीय रेवतराम हे परेऊ गावातील त्यांच्या समाधी स्थळावर उपस्थित होते. फोनवर बोलताना ते म्हणाले, "मी साध्वीजींचा सुमारे 12 वर्षांपासून शिष्य आहे. त्यांचा स्वभाव अतिशय चांगला आणि नम्र होता. कोणत्याही परिस्थितीत त्या शांत राहत. त्या इतक्या प्रभावी कथा सांगायच्या की श्रोत्यांचे डोळे पाणवायचे."

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
वीरमनाथ सांगतात, "तिने वयाच्या सहाव्या वर्षी प्रवचनास सुरुवात केली आणि आठव्या वर्षी कथावाचन सुरू केले."
कथा आणि सत्संगाबरोबरच त्या जोधपूरच्या जय नारायण व्यास विद्यापीठातून पदवीच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षणही घेत होत्या.
वीरमनाथ पुढे म्हणाले, " तिला मोठमोठाले संत-महात्मे आणि शंकराचार्य यांचेही आशीर्वाद होते. ती नेहमी म्हणायची, 'मला निसर्गाने योगी म्हणून पाठवले आहे. मी प्रत्येक परीक्षेसाठी आणि कठोर परिश्रमासाठी तयार आहे. माझे एकमेव ध्येय म्हणजे पीडित लोकांना मदत करणे आणि सनातन धर्माचा प्रचार करणे."
गंगाराम सांगतात, "प्रेम बाईसांनी जोधपूरमध्ये स्वतःचा 'साधना कुटीर' आश्रम स्थापन केला होता. येथे त्या भक्तांसोबत धार्मिक कार्यक्रम करायच्या. सोशल मीडियाद्वारे त्यांचे भजन आणि कथांचा प्रचार केला जात असे. हजारो भक्त त्यांचे भजन आणि सत्संग ऐकायला येत असत. त्या राज्यात आणि देशातील अनेक ठिकाणी कथावाचनासाठी जात असत आणि लाखोंच्या संख्येने त्यांचे भक्त होते."
पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचला?
साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूने दुःखी झालेले त्यांचे भक्त मोठ्या संख्येने परेऊ गावात पोहोचत असून, त्यांच्या मृत्यूच्या निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहेत.
नागौरचे लोकसभा खासदार हनुमान बेनिवाल यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना हत्येचा संशय व्यक्त करत या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
ते म्हणाले, "जर एखाद्या साध्वीचा पाच मिनिटांत अचानक मृत्यू झाला, तर तो कशाने झाला, नेमकं कारण काय हे राज्याला जाणून घ्यायचं आहे. हा कट होता का, आत्महत्या होती का, की काही वेगळं घडलंय, या मागचं कारण राजस्थानला कळायला हवं."
ते पुढे म्हणाले, "मला वाटतं प्रेम बाईसांची हत्या झाली आहे. माझ्या मते हा शंभर टक्के खून आहे."
या प्रकरणाच्या तपासासाठी जोधपूर पोलीस आयुक्तांनी एसीपी छवी शर्मा यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन केली आहे.

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
एसीपी छवी शर्मा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "आम्ही प्रत्येक पैलूने तपास करत आहोत. डॉक्टरांच्या अंतिम मतानंतरच तपासाची दिशा ठरवली जाईल आणि मृत्यूचे खरे कारण समोर येईल."
साध्वीच्या वडिलांनी कंपाउंडरने इंजेक्शन दिल्यानंतर लगेच मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.
कंपाउंडरच्या चौकशीत काय निष्पन्न झाले? या प्रश्नाला उत्तर देताना एसीपी शर्मा म्हणाल्या, "कंपाउंडरने एक नॉर्मल इंजेक्शन दिल्याचं सांगितलंय. तो नोंदणीकृत नर्सिंग स्टाफ आहे आणि इंजेक्शन कसे द्यायचे हे तो जाणतो. मात्र, डॉक्टरांच्या परवानगीशिवाय इंजेक्शन देण्याचा त्याला अधिकार आहे की नाही, याची आम्ही तपास करत आहोत."
परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल एसीपी शर्मा म्हणाल्या, "बालोतरा येथील परेऊ गावात काल मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. गावात परिस्थिती शांत आहे आणि कायदा-सुव्यवस्था सामान्य आहे."

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
दरम्यान, जोधपूर रुग्णालयातील एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी हिंदीला सांगितलं की, "साध्वीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोणतीही दुखापत किंवा इतर कोणतेही कारण समोर आलेले नाही. व्हिसेरा रिपोर्टनंतरच नेमके कारण कळेल."
पश्चिम जोधपूरचे डीसीपी विनीत बन्सल यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, "आम्हाला कालच व्हिसेरा नमुने मिळाले आहेत. ते लॅबमध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्हिसेरा तपास अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल."
दरम्यान, एफएसएल राजस्थानचे संचालक अजय शर्मा यांनी बीबीसी हिंदीशी फोनवरून बोलताना सांगितलं की, "आमच्याकडे अद्याप व्हिसेराचे नमुने आलेले नाहीत. व्हिसेरा नमुने वैद्यकीय महाविद्यालयातून थेट आमच्याकडे येत नाहीत; पोलिसांमार्फत येतील. जर आम्हाला प्राधान्याने नमुना चाचणीसाठी सरकारकडून पत्र मिळाले तर आम्ही आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करू."
गेल्या वर्षी झाला होता वाद
2025 मध्ये साध्वी आपल्या वडिलांना मिठी मारतानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्या वेळी साध्वीने एका तरुणावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता.
त्या व्हीडिओचा साध्वीच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? या प्रश्नावर डीसीपी बन्सल म्हणाले, "त्या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले होते. त्याचाही या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याची तपासणी आम्ही करत आहोत."

फोटो स्रोत, Mohar Singh Meena
साध्वीच्या मृत्यूनंतर सुमारे तीन तासांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली होती. यावरून वाद झाल्यानंतर वीरमनाथ यांनी ही पोस्ट आपणच टाकायला सांगितल्याचे मान्य केले.
या प्रकरणात सध्या कोणालाही ताब्यात घेण्यात आलं नसल्याची माहिती डीसीपी बन्सल यांनी दिली. तपासात जे तथ्य समोर येतील, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











