You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वेष बदल, उसळलेल्या समुद्रात बोटीतून प्रवास; नोबेल पुरस्कार विजेत्या मारियांना गुप्तपणे व्हेनेझुएलातून कसं बाहेर काढलं?
- Author, आयोनी वेल्स
- Role, दक्षिण अमेरिका प्रतिनिधी
व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरीना मचाडो यांना देशाबाहेर काढण्याचं रेस्क्यू ऑपरेशन खूपच गुंतागुंतीचं होतं.
यात वेष बदलणं, उसळलेल्या समुद्रात बोटीतून प्रवास आणि मग विमानानं प्रवास यांचा समावेश होता. या ऑपरेशनचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीनं बीबीसीला ही माहिती दिली.
'गोल्डन डायनामाईट' या नावानं हे ऑपरेशन पार पाडण्यात आलं. या मोहिमेचं नेतृत्व अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचे माजी सैनिक आणि ग्रे बुल रेस्क्यू फाउंडेशनचे संस्थापक ब्रायन स्टर्न यांनी केलं.
ते म्हणतात की, मारिया कोरीना मचाडो यांचा प्रवास थंडी, पाण्यानं भिजलेल्या स्थितीत आणि लांबलचक होता. मात्र मचाडो यांनी एकदाही त्याबद्दल तक्रार केली नाही.
ते म्हणाले, "समुद्र खूप खवळलेला होता. सर्वत्र प्रचंड काळोख होता. आम्ही बोलण्यासाठी टॉर्चचा वापर करत होतो. ते खूपच भीतीदायक होतं. त्यावेळेस बरंच काही चुकीचं घडू शकलं असतं."
या मोहिमेत इतका मोठा धोका असूनही कोणतीही अप्रिय घटना झाली नाही. मचाडो बुधवारी (10 डिसेंबर) मध्यरात्रीच्या अगदी आधी नॉर्वेतील ओस्लोला सुरक्षित पोहोचल्या. तिथे त्यांनी त्यांच्या नोबेल शांतता पुरस्काराचा स्वीकार केला.
व्हेनेझुएलामध्ये गेल्या वर्षी झालेल्या वादग्रस्त निवडणुकीनंतर मचाडो त्यांच्याच देशात लपूनछपून राहत होत्या. जानेवारीनंतर त्या सार्वजनिकरित्या दिसल्या नव्हत्या.
2 वर्षांपासून त्यांची आणि त्यांच्या मुलांची भेट झाली नव्हती. मचाडो यांचं स्वागत करण्यासाठी त्यांची मुलं ओस्लोमध्ये उपस्थित होते.
ऑपरेशनची तयारी कशी करण्यात आली?
ग्रे बुल रेस्क्यू फाउंडेशन, अशा प्रकारच्या बचाव मोहीम आणि सुटकेच्या मोहिमा पार पाडण्यात कुशल आहेत. मचाडो यांच्या टीमच्या एका प्रतिनिधीनं बीबीसीचे अमेरिकेतील माध्यम भागीदार असलेल्या सीबीएस न्यूजला पुष्टी केली की याच संस्थेनं हे रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं.
ब्रायन स्टर्न यांचं ग्रे बुल, व्हेनेझुएलामध्ये संभाव्य मोहिमांच्या तयारीसाठी अनेक महिन्यांपासून कॅरेबियन भागात, व्हेनेझुएलामध्ये आणि शेजारच्या देशात म्हणजे अरूबा या बेटावरील त्यांची उपस्थिती वाढवत होतं.
ते बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आम्ही व्हेनेझुएलामध्ये एक यंत्रणा उभारत होतो. जेणेकरून जर व्हेनेझुएलामध्ये युद्ध सुरू झालं, तर अमेरिकन, सहकारी, ब्रिटिश नागरिक आणि इतर लोकांना तिथून बाहेर काढता यावं."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्याकडे पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे. तसंच ट्रम्प यांनी मादुरो यांच्यावर अमेरिकेत अमली पदार्थ पाठवल्याचा आरोप केला आहे.
ट्रम्प यांच्या या मागणीनंतर व्हेनेझुएलाच्या विरोधात संभाव्य अमेरिकन लष्करी कारवाई होण्याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.
स्टर्न म्हणाले की, या प्रकरणात मारिया कोरीना मचाडो यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्तीला बाहेर काढणं हे सर्वात मोठं आव्हान होतं.
ते पुढे म्हणाले की, त्यांच्या फर्मनं व्हेनेझुएलामध्ये जी यंत्रणा उभी केली होती, "ही यंत्रणा जिवाचा धोका असणाऱ्या देशातील एखाद्या लोकप्रिय व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी उभारण्यात आली नव्हती."
स्टर्न म्हणतात की, जेव्हा पहिल्यांदा त्यांना मचाडो यांच्या टीमशी जोडण्यात आलं, तेव्हा सुरुवातीला त्यांची ओळख सांगण्यात आली नव्हती. मात्र त्यांनी अंदाज लावला होता.
त्यांच्या मते, डिसेंबरच्या सुरुवातीला एका कॉन्टॅक्टच्या माध्यमातून मचाडो यांच्याशी संवाद साधण्यात आला. हा कॉन्टॅक्ट मचाडोच्या टीमला ओळखत होता. व्हेनेझुएलातून त्यांना बाहेर काढण्याचा हा दुसरा प्रयत्न होता. कारण पहिली योजना 'यशस्वी ठरली नव्हती.'
कडाक्याची थंडी आणि उसळलेल्या लाटांमध्ये पार पडली मोहीम
या ऑपरेशनला 'गोल्डन डायनामाईट' असं नाव देण्यात आलं होतं. कारण "नोबेल यांनी डायनामाईटचा शोध लावला होता" आणि मचाडो यांना ओस्लो इथं जाऊन नोबेल शांतता पुरस्काराचा स्वीकार करायचा होता.
त्यानंतर वेगानं घडामोडी घडल्या. स्टर्न यांच्या मते, शुक्रवारी (5 डिसेंबर) टीमशी बोलणं झालं. रविवारी (7 डिसेंबर) टीम तैनात झाली आणि मंगळवारपर्यंत (9 डिसेंबर) मिशन पूर्ण झालं.
त्यांच्या टीमनं मचाडो यांना देशातून बाहेर काढण्यासाठी अनेक पर्यायांवर विचार केला. शेवटी उसळलेल्या सुमद्रातून प्रवास करण्याच्या योजनेवर एकमत झालं.
व्हेनेझुएलामधील भविष्यातील कामाच्या सुरक्षिततेसाठी स्टर्न म्हणाले की, ते मचाडोंच्या प्रवासाबद्दल मर्यादित माहितीच देऊ शकतात.
मचाडो ज्या घरात लपलेल्या होत्या, तिथून त्यांना जमिनीमार्गे काढण्यात आलं. मग त्यांना एका छोट्या बोटीच्या पिक-अप पॉईंटपर्यंत नेण्यात आलं. त्या बोटीतून त्यांना समुद्र किनाऱ्यापासून अंतरावर असलेल्या एका थोड्या मोठ्या बोटीपर्यंत नेण्यात आलं. तिथे त्यांची भेट स्टर्न यांच्याशी झाली.
स्टर्न म्हणाले की, 'अतिशय उसळलेल्या समुद्रातून' प्रवास सुरू झाला. समुद्रात 10 फूट म्हणजे जवळपास 3 मीटर पर्यंत उंच लाटा होत्या. सर्वत्र 'प्रचंड काळोख' होता.
ते म्हणाले, "हा प्रवास मजेशीर अजिबात नव्हता. कडाक्याची थंडी होती, ते सर्वजण पूर्ण भिजले होते, अतिशय भयावह लाटा होत्या आणि आम्ही याचाच फायदा घेतला. आम्ही त्यांना जमिनीपर्यंत घेऊन गेलो आणि तिथून त्यांचं विमान जिथे होतं, तिथे घेऊन गेलो. मग ते विमानातून नॉर्वेला गेले."
कठीण परिस्थितीतदेखील 'कणखर' होत्या मचाडो
स्टर्न म्हणाले की संपूर्ण प्रवासादरम्यान मचाडो यांचा चेहरा आणि डिजिटल ओळख लपवण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात आल्या. कारण त्या खूपच प्रसिद्ध व्यक्ती आहेत.
ते म्हणाले, "बायोमेट्रिकद्वारे ओळख पटवली जाण्याचा धोका खूप जास्त आहे." ते म्हणाले की मचाडो यांच्या फोनद्वारे त्यांचा माग काढता येऊ नये, याची खातरजमा करण्यासाठी पावलं उचलण्यात आली."
"परिस्थिती कठीण असूनदेखील मजादो 'खंबीर' होत्या. त्यांनी थंडीपासून संरक्षणासाठी एक स्वेटर घेतलं, मात्र याव्यतिरिक्त दुसरं काहीही मागितलं नाही."
स्टर्न म्हणाले, "त्या पूर्णपणे भिजलेल्या होत्या आणि थंडीनं थरथरत होत्या. मात्र त्यांनी एकदाही तक्रार केली नाही." स्टर्न मान्य करतात की, हे ऑपरेशन खूपच धोकादायक होतं. कारण पाणी "अजिबातच दया दाखवत नाही."
ते पुढे म्हणाले, "जर मी बोट चालवत असेल आणि इंजिन बंद झालं तर, मला पोहून व्हेनेझुएलाला परतावं लागेल."
त्यांना विचारण्यात आलं की ऑपरेशनमध्ये मदत करणाऱ्या व्हेनेझुएलातील लोकांच्या सुरक्षेची हमी कशी दिली जाऊ शकते. यावर स्टर्न म्हणाले की त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. "आम्ही (ग्रे बुल) लोकांची दिशाभूल करणारी अशी अनेक ऑपरेशन करतो."
ते म्हणाले की मदत करणाऱ्यांपैकी अनेकांना तर हेदेखील माहित नव्हतं की ते कोणासाठी काम करत आहेत. काहीजणांना वाटतं की त्यांनी 'सर्वकाही माहित आहे.' मात्र प्रत्यक्षात त्यांना काहीच माहित नसतं.
स्टर्न म्हणाले, "काहीजणांनी अशा कामांद्वारे मदत केली, जी त्यांच्यासाठी सामान्य होती. मात्र ती आमच्या मिशनसाठी अतिशय महत्त्वाची होती."
ते म्हणाले की या ऑपरेशनसाठी पैसा अमेरिकेच्या सरकारकडून नाहीतर देणग्या देणाऱ्यांकडून आला. ते म्हणाले, "अमेरिकन सरकारमधून कोणीही आमचे आभार मानले नाहीत किंवा त्यांच्याकडून आम्हाला पैसेही मिळाले नाहीत."
स्टर्न असंही म्हणाले की त्यांनी काही देश, त्यांच्या गुप्तहेर संस्था आणि डिप्लोमॅटिक सेवांशी ताळमेळ साधला होता. यात अमेरिकेला 'अनौपचारिक' पद्धतीनं माहिती देण्याचाही समावेश होता.
मचाडो यांनी सांगितलं की त्यांची व्हेनेझुएलाला परतण्याची इच्छा आहे. मात्र स्टर्न यांनी त्यांना तसं न करण्याचा सल्ला दिला आहे.
ते म्हणाले, "मी त्यांना सांगितलं की 'परत जाऊ नका. तुम्ही एक आई आहात. आम्हाला तुमची आवश्यकता आहे.' त्यांना जे करायची इच्छा असेल त्या तसंच करतील...मी समजू शकतो की त्यांना परत का जायचं आहे. कारण त्यांच्या माणसांसाठी त्या हिरो आहेत."
"माझी इच्छा आहे की त्यांनी परत जाऊ नये. मात्र मला वाटतं की त्या परत जातील."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)