हॉरर, सिक्वल, कॉमिडी आणि राजकीय, 2024 मध्ये प्रदर्शित होणारे हे 26 सिनेमे कुठले कुठले आहेत?

    • Author, सुप्रिया सोगळे
    • Role, बीबीसी हिंदीसाठी
शाहरूख खान

फोटो स्रोत, Getty Images

2023 हे वर्ष हिंदी सिनेमांसाठी चांगलं होतं. मोठ्या कलाकारांचे बिग बजेट सिनेमे आले आणि कोट्यवधींचा गल्ला त्यांनी जमवला. प्रेक्षकांनी भरभरून या सिनेमांना प्रतिसाद दिला. शाहरूख खानच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या दोन सिनेमांनी धुमाकूळ घातला. हिंदी सिनेमांमधील आपलं वर्चस्व कायम असल्याचंच जणू शाहरूखनं अधोरेखित केलं.

दुसरीकडे, सनी देओलने ‘गदर 2’ सिनेमाच्या माध्यमातून ‘ढाई किलो’च्या हाताची ताकद दाखवत बॉक्स ऑफिसचे विक्रम तोडले.

वर्ष संपता संपता चर्चेत आलेला सिनेमा म्हणजे ‘अॅनिमल’. संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीर कपूरसोबत बनवलेला हा सिनेमा हिंसेनं भरलेला होता. त्याची बरीच चर्चा सोशल मीडियावर झाली, टीका झाली. मात्र, बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं कमाई सुद्धा केली.

आता आपण 2024 या वर्षात पदार्पण केलंय. यावर्षी कोणते सिनेमे बॉक्स ऑफिसचे विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहेत, हे पाहूया.

जानेवारीत प्रदर्शित होणारे सिनेमे

मेरी ख्रिसमस

2024 या वर्षाची सुरुवात श्रीराम राघवन यांच्या ‘मेरी ख्रिसमस’ सिनेमाने होणार आहे. 12 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होईल. थ्रिलरसाठी श्रीराम राघवन प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांचे ‘अंधाधुन’, ‘एक हसीना थीं’ आणि ‘बदलापूर’ यांसारखे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

‘मेरी ख्रिसमस’ सिनेमात अभिनेत्री कतरिना कैफ आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपति यांच्या भूमिका असतील. विजय सेतुपति यापूर्वी शाहरूख खानच्या ‘जवान’ सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

फायटर

प्रजासत्ताकदिनी सिद्धार्थ आनंद यांचा ‘फायटर’ सिनेमा प्रदर्शित होईल. यात ऋतिक रोशन आणि दीपिका पादुकोन पहिल्यांदा एकत्र दिसतील.

सिद्धार्थ आनंद यांनी गेल्यावर्षी शाहरूख खानला घेऊन ‘पठाण’ सिनेमा दिग्दर्शित केला होता. ‘पठाण’चं यश ‘फायटर’ला मिळतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अक्षयकुमारचे चार सिनेमे

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरवर्षी किमान चार सिनेमे करणाऱ्या अक्षय कुमार साठी 2023 हे वर्ष तसं फारसं चांगलं गेलं नाही. मात्र, तरीही त्याचा उत्साह कमी झालेला नाहीय.

कारण 2024 मध्ये अक्षय कुमारचे चार-पाच सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. यात ड्रामा, देशभक्तीपर, अॅक्शन आणि कॉमेडी सिनेमांचा समावेश आहे.

सुरराई पोत्तरूचा रिमेक

अक्षयकुमार यंदा सर्वांत आधी दिसेल तो 2020 साली प्रदर्शित झालेल्या ‘सुरराई पोत्तरू’ या तमिळ सिनेमाच्या रिमेकमध्ये.

या मूळ तामिळ सिनेमाला पाच राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले होते. जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. फेब्रुवारीत अक्षय कुमारच्या भूमिकेतला हिंदी सिनेमा प्रदर्शित होईल.

बडे मियाँ छोटे मियाँ

या सिनेमात टायगर श्रॉफ आणि अक्षयकुमार यांची अॅक्शन जुगलबंदी दिसतील. दक्षिण भारतीय स्टार पृथ्वीराज देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.

अली अब्बास जफर दिग्दर्शित हा सिनेमा आधी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता. मात्र, प्रदर्शनाची निश्चित तारीख अद्याप ठरलेली नाही.

सिंघम 3

रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' सिनेमातून पोलिसांच्या विश्वाचा एक भाग बनलेला अक्षय कुमार ‘सिंघम 3’मध्ये अजय देवगणसोबत दिसेल. रोहित शेट्टी आणि अजय देवगणच्या 'सिंघम'चा तिसरा भाग मल्टीस्टारर असेल, हे आता स्पष्ट झालंय.

या हिट फ्रँचायझीमध्ये अजय देवगणसोबत अक्षयकुमार, करीना कपूर, टायगर श्रॉफ आणि दीपिका पादुकोन देखील दिसतील. या सिनेमाचं पोस्टर्स समोर आलं असून, ‘सिंघम’च्या चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला दिसून येतोय.

अक्षय कुमार

फोटो स्रोत, Getty Images

स्काय फोर्स

देशभक्ती सिनेमांशी कायम जोडला गेलेला अक्षय कुमार ‘स्काय फोर्स’मध्येही दिसेल. या सिनेमात भारतीय वायूसेनेच्या इतिहासातील एक विजयगाथा दिसेल. अक्षयकुमार यात भारतीय वायूसेनेच्या कॅप्टनच्या रुपात दिसेल.

वेलकम टू जंगल

2024 च्या अखेरीस अक्षयकुमार ‘वेलकम टू जंगल’मधून प्रेक्षकांना गुदगुल्या करताना दिसेल. वेलकम फ्रँचायझीमधीलच हा पुढील सिनेमा असेल.

यात संजय दत्त, सुनील शेट्टी, दिशा पटानी, रवीना टंडन, लारा दत्ता, जॅकलीन फर्नांडिस, परेश रावल, अर्शद वारसी, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, श्रेयस तळपदे, दलेर मेहंदी, मिका इत्यादी कलाकार अक्षय कुमारसोबत दिसतील.

अजय देवगणचे सिनेमे

अजय देवगणही 2024 मध्ये अनेक सिनेमांमध्ये दिसून येणार आहे.

‘औरों में कहाँ दम था’

अजय देवगण दिग्दर्शक नीरज पांडे याच्यासोबत काम करताना दिसेल. रोमँटिक ड्रामा असलेल्या ‘औरों में कहाँ दम था’ या सिनेमात अजय देवगण आणि तब्बू या जोडीचा रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

हा सिनेमा हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होईल. 26 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

त्याशिवाय अजय देवगणचा ‘आझाद’ हा सिनेमाही यंदा प्रदर्शित होईल. यात रवीना टंडनची मुलगी राशा थडानी या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करेल.

आमीर खानचं पुनरागमन

2022 मध्ये आलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’च्या अपयशानंतर आमीर खाननं सोशल मीडियाही सोडलं होतं. त्याने सिनेमातून जवळपास ब्रेकच घेतला. मात्र, 2024 मध्ये आमीर खान नव्या उत्साहात पुनरागमन करताना दिसेल.

‘लाहोर, 1947’

2024 मध्ये आमीर खान प्रॉडक्शन राजकुमार संतोषी यांच्या दिग्दर्शनात ‘लाहोर, 1947’ सिनेमातून आमीर खान आणि सनी देओल ही जोडी समोर आणले. आमीर खान या सिनेमाचा निर्माता असेल.

27 वर्षांनंतर राजकुमार संतोषी सनी देओल आणि आमीर खान ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आणतील. राजकुमार संतोषी यांनी याआधी दामिनी, घातक आणि घायल यांसारखे सिनेमे केले आहेत.

आमीर खान

फोटो स्रोत, Getty Images

सितारे जमीन पर

2024 मध्ये आमीर खान दिग्दर्शक म्हणून कमबॅक करणार आहे. ‘सितारे जमीन पर’ हा सिनेमा आमीर खान दिग्दर्शित करेल, जो ख्रिसमसला रिलीज केला जाईल.

आमीर खानने आजवर ख्रिसमसमध्ये प्रदर्शित केलेल्या सिनेमांमध्ये गजनी, थ्रीड इडियट्स, पीके, तारे जमीन पर आणि धूम 3 यांसारखे सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.

लापता लेडीज

आमीर खानची पत्नी किरम राव सुद्धा दिग्दर्शक म्हणून यंदा दिसणार आहे. ‘लापता लेडीज’ या सिनेमाचं दिग्दर्शन किरण राव करणार असून, आमीर खान प्रॉडक्शनचा हा 11 वा सिनेमा असेल.

दक्षिण भारतीय सिनेमे

कल्की 2898 AD

दिग्दर्शक नाग अश्विनी यांचा ‘कल्की 2989 AD’ हा पुरणावर आधारित सायफाय सिनेमा असून, अभिनेता प्रभास यात मुख्य भूमिकेत दिसेल. त्यासोबतच, अमिताभ बच्चन, कमल हसन, दीपिका पादुकोन, दिशा पटानी आणि दुलकर सलमानही यात दिसेल.

पुष्पा 2

कोरोना महासाथीच्या काळात ‘पुष्पा 2’ या दाक्षिणात्य सिनेमानं प्रेक्षकांचं बरंच मनोरंजन केलं. भारतीय बॉक्स ऑफिसवर नवे विक्रमही प्रस्थापित केले.

2024 मध्ये या सिनेमाचा सिक्वेल ‘पुष्पा 2 : द रूल’ रिलीज होईल. 15 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होईल.

अल्लू अर्जुन

फोटो स्रोत, TWITTER/PUSHPAMOVIE

कांतारा - चॅप्टर 1

2022 मध्ये ‘कंतारा’ या कन्नड सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. या सिनेमाचा पुढील भाग 2024 मध्ये ‘कंतारा – चॅप्टर 1’ नावानं प्रदर्शित होईल.

या दुसऱ्या भागाचं दिग्दर्शनही ऋषभ शेट्टीच करणार असून, तोच मुख्य भूमिकेत दिसून येईल.

इंडियन – 2

एस. शंकर यांनी 1996 मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘इंडियन’ सिनेमाचा पुढील भाग 27 वर्षांनंतर ‘इंडियन - 2’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कमल हसन या सिनेमात पुन्हा एकदा ‘सेनापती’च्या भूमिकेत दिसेल.

सिक्वलची प्रतिक्षा

स्त्री 2

2018 मध्ये आलेला कॉमेडी हॉरर सिनेमा ‘स्त्री’चा दुसरा भाग 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यात येईल. अमर कौशिक या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून, यात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराणा एकत्र दिसतील.

मेट्रो इन दिनों

2007 मध्ये आलेल्या अनुराग कश्यपच्या ‘लाईफ इन मेट्रो’चा दुसरा भाग ‘मेट्रो इन दिनों’ 2024 मध्ये येईल.

या सिनेमात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अनुपम खेर, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, कोंकणा सेन शर्मा, ली फजल आणि फातिमान सना शेख दिसतील.

एलएसडी 2

दिबाकर बॅनर्जीचा 2010 साली आलेला ‘लव्ह, सेक्स और धोखा’ सिनेमातून राजकुमार राव समोर आला. आता दिबाकर बॅनर्जी निर्माती एकता कपूरसोबत ‘एलएसडी 2’ घेऊन येणार आहे.

निवडणुकीच्या वर्षात राजकीय सिनेमे

2024 हे राजकीयदृष्ट्या घडामोडींचं वर्ष असेल. कारण लोकसभा निवडणुका या वर्षात पार पडतील. त्याचवेळी हिंदी सिनेसृष्टीतही याचं प्रतिबिंब उमटताना दिसेल.

मैं अटल हूँ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते रवी जाधव यांचा ‘मैं अटल हूँ’ सिनेमा प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.

अभिनेते पंकज त्रिपाठी हे वाजपेयींची भूमिका यात साकारत आहेत. 19 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होईल.

अटल बिहारी वाजपेयी

फोटो स्रोत, Getty Images

स्वातंत्र्यवीर सावरकर

रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा यंदा प्रदर्शित होणार आहे. रणदीप हुडा या सिनेमात सावरकरांची भूमिका साकारताना दिसेल. अंकिता लोखंडे आणि अमित सियालही महत्त्वाची भूमिका साकारतील.

बस्तर – द नक्सल स्टोरी

‘द केरला स्टोरी’च्या यशानंतर निर्माते विपुल अमृतलाल शाह हे सुदीप्तो सेन यांच्यासोबत ‘बस्तार – द नक्सल स्टोरी’ सिनेमा आणत आहे. या संवेदनशील विषयावरील सिनेमात पुन्हा एकदा अदा शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.

नव्या जनरेशनच्या हिरोंचे सिनेमे

चंदू चॅम्पियन

कार्तिक आर्यन ‘चंदू चॅम्पियन’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा सिनेमा स्पोर्ट्स ड्रामा आहे. कबीर खान या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून, 14 जूनला प्रदर्शित होईल.

योद्धा

‘शेरशाह’मध्ये कारगील हिरो विक्रम बत्रा यांची भूमिका साकारणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा ‘योद्धा' सिनेमा 15 मार्चला प्रदर्शित होईल.

अॅटली

फोटो स्रोत, ATLEE/INSTAGRAM

वि डी 18

‘जवान’मध्ये शाहरुख खानला एका वेगळ्या रूपात सादर करणारे दिग्दर्शक अॅटली त्यांच्या पुढच्या 'वि डी 18' सिनेमात वरुण धवनला नवीन रूप देणार आहेत. वामिका गब्बी आणि कीर्ती सुरेश सुद्धा या सिनेमात दिसतील.

अभिनेत्रींची जुगलबंदी

द क्रू

दिग्दर्शक राजेश कृष्मन हे करिना कपूर, तब्बू आणि कृती सेनन यांना घेऊन ‘द क्रू’ सिनेमा आणणार आहेत. पहिल्यांदाच या तीन अभिनेत्री एकत्र येतील.

एअरलाईनची पार्श्वभूमी असलेला हा सिनेमा काहीसा विनोदी कथा असलेला असेल. या सिनेमात कपिल शर्मा आणि दिलजीत दोसांझही दिसेल.

करिना कपूर

फोटो स्रोत, Getty Images

बकिंगहॅम मर्डर्स

करिना कपूर सहनिर्माती म्हणून ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ सिनेमातून पदार्पण करणार आहे. हा थ्रिलर सिनेमा असून, हंसल मेहता या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.

या सिनेमाचं पोस्टर समोर आलं असून, यंदा सिनेमा प्रदर्शित होईल.

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)