चंपई सोरेन : हेमंत सोरेन यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्रिपदी, आता पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत

फोटो स्रोत, ANI
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यातच आता चंपई सोरेन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांची बाजू मांडली आहे.
चंपई सोरेन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "आजच्या बातम्या बघून तुम्हा सगळ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. पण असं नेमकं काय घडलं असेल की कोल्हानच्या एका छोट्याशा गावच्या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला या निर्णयापर्यंत यावं लागलं."
चंपई सोरेन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं की, "झारखंडचे 12वे मुख्यमंत्री म्हणून इंडिया आघाडीने 31 जानेवारीला त्यांची निवड केली होती. पण हूल दिवसानंतर मला कळलं की पुढच्या दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आलेले माझे सगळे कार्यक्रम पक्षाच्या नेतृत्वाने स्थगित केले आहेत. एका मुख्यमंत्र्यांचे नियोजित कार्यक्रम इतर कुणीतरी स्थगित करत असेल, तर लोकशाहीत याहून मोठा अपमान होऊ शकतो का?"
कार्यक्रमात सहभागी होण्यापासून त्यांना रोखणं हा त्यांचा अपमान असल्याचं चंपई सोरेन यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे लिहिलं की, "एवढा अपमान होऊनही मी म्हणालो की नियुक्ती पत्रांचं वितरण सकाळी आहे आणि त्यानंतर दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, तर मी आधी तिथे जाऊन बैठकीला येईल. पण मला यासाठी परवानगी देण्यात आली नाही."
चंपई सोरेन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हा त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षात सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी लिहिलं आहे की, "राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्व पर्याय खुले आहेत."
त्यांनी लिहिलं आहे की, "मी त्या बैठकीतच सांगितलं होतं की, आजपासून माझ्या आयुष्याच्या एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. आता माझ्याकडे तीन पर्याय होते. पहिला पर्याय राजकारणातून कायमचं निवृत्त होण्याचा, दुसरा पर्याय स्वतःची नवीन संघटना सुरु करण्याचा आणि तिसरा या मार्गात कुणाची साथ मिळाली तर त्यासोबत पुढचा प्रवास करण्याचा."
पायात साधी चप्पल, ढगळा शर्ट आणि पँट, डोक्यावर पांढुरके केस... हीच चंपई सोरेन यांची ओळख आहे. याच साधेपणासह त्यांनी आयुष्य काढलं आहे.
कोणी एखादी अडचण सोशल मीडियात त्यांना टॅग करुन मांडली की तात्काळ त्या समस्येवर समाधान काढायचं ही त्यांची कामाची पद्धत आहे. चंपई हे सगळं करतात.
हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर चंपई सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री बनले. मात्र, हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं. तेव्हापासूनच ते नाराज होते, असं म्हटलं जातं.
जाणून घेऊन चंपई सोरेन यांचा आजवरचा संपूर्ण प्रवास :
चंपई सोरेन कोण आहेत?
झारखंड मुक्ती मोर्चाचे हे 67 वर्षीय नेते पक्षाध्यक्ष शिबू सोरेन आणि त्यांचे पुत्र हेमंत या दोघांचेही विश्वासू मानले जात.
हेमंत यांच्या मंत्रिमंडळात ते परिवहन आणि अन्नपुरवठा खात्याचे मंत्री होते.
झारखंड राज्यनिर्मिती आंदोलनात ते शिबू सोरेन यांचे निकटचे सहकारी होते. ते सरायकेला मतदारसंघाचे आमदार आहेत. ते या मतदारसंघातून सातवेळा आमदार झाले आहेत. ते सरायकेला खरसांवा जिल्ह्यातील गम्हरिया भागातील जिलिंगगोडा गावचे आहेत.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH
त्यांचे वडील सेमल सोरेन शेतकरी होते. त्यांचं 2020 साली वयाच्या 101 व्या वर्षी निधन झालं.
चंपई सोरेन त्यांच्या आईवडिलांच्या 6 अपत्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे अपत्य आहेत. त्यांची आई माधो सोरेन गृहिणी होत्या.
चंपई यांचा लहान वयातच मानको सोरेन यांच्याशी विवाह झाला. या दाम्पत्याला सात अपत्यं आहेत.
1991मध्ये पहिला विजय
1991 साली सरायकेलामध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना पहिल्यांदा विजय मिळाला आणि तत्कालीन बिहार विधानसभेचे ते सदस्य झाले.
कृष्णा मार्डी यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. 1995 सालीही ते निवडणूक जिंकले मात्र 2000 साली ते पराभूत झाले.

फोटो स्रोत, RAVI PRAKASH
2005 च्या विजयानंतर ते कधीच पराभूत झाले नाहीत.
त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1956 रोजी झाला होता. त्यांचं दहावीपर्यंत शिक्षण झालं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








