निठारी हत्याकांड : लहान मुलांचे अपहरण, शोषण, हत्याकांड; देशाला हादरवून सोडणारे प्रकरण काय होते?

नोएडा येथे घडलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरिंदर कोलीला तुरुंगातून सोडण्यात आलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी कोलीला निर्दोष मुक्त करत त्याला त्वरीत तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी गुरुवारी (13 नोव्हेंबर) ही माहिती दिली.

सुरिंदर कोलीला ग्रेटर नोएडा येथील लुक्सर तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याला बुधवारी (12 नोव्हेंबर) सायंकाळी 7.20 वाजता सोडण्यात आल्याचे तुरुंग अधीक्षक ब्रिजेश कुमार यांनी सांगितलं.

निठारी हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं. हे प्रकरण अनेक वर्षांपासून चर्चेत होतं.

या प्रकरणात सुरिंदर कोली आणि मोनिंदर सिंह पंढेर या दोघांना मुख्य आरोपी बनवण्यात आलं होतं.

त्यांच्यावरील आरोपांचे भयंकर तपशील संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरले होते. यापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाने या दोघांना निर्दोष मुक्त केलं होतं.

प्रकरण काय होतं?

गाझियाबादच्या एका सीबीआय न्यायालयाने दोन्ही आरोपींना बलात्कार, हत्या, पुरावे नष्ट करणं आणि इतर आरोपांमुळे फाशीची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2023 मध्ये सुरिंदर कोलीला 2006 च्या हत्येशी संबंधित 12 प्रकरणांत निर्दोष ठरवलं होतं. मोनिंदर सिंह पंढेरविरुद्ध दोन प्रकरणं होती. दोन्ही प्रकरणात त्याला निर्दोष मुक्त केलं होतं.

कोली हा 10 प्रकरणांमध्ये एकटा आरोपी होता. तर दोन प्रकरणांत त्याला पंढेरसोबत सहआरोपी करण्यात आलं होतं.

नोएडा येथे मोनिंदर सिंह पंढेरच्या घरासमोरील नाल्यात 2006 मध्ये मानवी अवयव आणि मुलांचे कपडे सापडले. तेव्हा हे प्रकरण उजेडात आले होते.

किमान 19 मुली आणि लहान मुलांवर बलात्कार, त्यांची हत्या आणि नंतर त्यांच्या अवयवांचे तुकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

या हत्या पंढेरच्या घरात घडल्या. कोली तिथे नोकर म्हणून काम करत होता, असा आरोप पोलिसांनी त्यावेळी केला होता.

दरम्यान निठारी हत्याकांडाच्या तपासाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.

हे संपूर्ण प्रकरण सुरिंदर कोलीच्या कबुलीजबाबावर आधारित होतं. कोलीने 29 डिसेंबर 2006 रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसमोर कबुलीजबाब दिला होता.

प्रसारमाध्यमांनी पंढेरच्या घराला म्हटलं होतं 'हॉरर हाऊस'

कोलीने मुलांना मिठाई आणि चॉकलेट देऊन आपल्याकडे आकर्षित करून त्यांची हत्या केली, त्याचबरोबर मुलांचे अवशेष पिशव्यांमध्ये त्याने लपवून ठेवल्याचे आढळून आल्याचा आरोप पोलिसांनी केला होता.

कोलीने तो नरभक्षक आणि नेक्रोफिलियाची कबुली दिली होती. पण नंतर न्यायालयात त्याने कबुलीजबाब मागे घेतला आणि याबाबत आपल्याला मारहाण झाल्याचं त्यानं म्हटलं होतं.

निठारी हत्याकांडानंतर झालेल्या तपास आणि न्यायालयीन कामकाजादरम्यान, हे प्रकरण अवयवांच्या व्यापाराशीही संबंधित असू शकते, अशी चिंता अनेकवेळा व्यक्त करण्यात आली होती.

तपास संस्थांच्या म्हणण्यानुसार, आरोपी सुरिंदर कोलीला 29 डिसेंबर 2006 रोजी अटक करण्यात आली.

त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार नोएडातील सेक्टर-31 मधील डी-5 घराजवळील एका खुल्या जागेत कवटी, हाडं आणि सांगाडे सापडले होते.

कोलीला अटक करण्याच्या तारखेवरूनही 2023 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवलं होतं.

कारण कोलीला 29 डिसेंबरला अटक करण्यात आल्याचा फिर्यादीचा दावा होता. तर त्याला 27 डिसेंबर रोजी अटक केल्याचे बचाव पक्षाने म्हटलं होतं.

ह्या हत्येमुळे संपूर्ण देशात संताप निर्माण झाला होता. अनेकांनी पोलिसांवर दुर्लक्षाचा आरोप केला होता. या गुन्ह्यांच्या भयानक स्वरूपामुळे प्रसारमाध्यमांनी या घराला 'हॉरर हाऊस' असं नाव दिलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)