एम. एस. स्वामीनाथन : हरित क्रांतीचे जनक, ज्यांनी भारताला उपासमारीतून वाचवलं

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सुधा जी टिळक
ते 1965 साल होतं. रविवारचा दिवस होता.
जौंटी या दिल्लीजवळच्या भागातील एका छोट्याशा गावात एका मेहनती शेतकऱ्यानं कृषी क्षेत्रावर काम करणाऱ्या एका वैज्ञानिकाकडे हात पुढे केला आणि म्हणाला, 'डॉक्टरसाहेब, आम्ही तुमचं बियाणं वापरू."
ते वैज्ञानिक होते एम. एस. स्वामीनाथन. त्यांना नंतर जगप्रसिद्ध टाइम मासिकानं 'हरित क्रांतीचे गॉडफादर' म्हटलं. तसंच रवींद्रनाथ टागोरांसह त्यांची गणना 20 व्या शतकातील भारतातील सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये केली.
जास्त उत्पन्न देणारं गव्हाचं वाण स्वीकारण्यास का तयार झाला? असं स्वामीनाथन यांनी त्या शेतकऱ्याला विचारलं.
त्यावर त्या शेतकऱ्यानं उत्तर दिलं की, जो माणूस रविवारी या शेतातून त्या शेतात जात असतो, तो त्याच्या फायद्यासाठी नाही तर तत्वांसाठी काम करतो. विश्वास ठेवण्यासाठी एवढंच पुरेसं होतं.
त्या शेतकऱ्यानं दाखवलेला हा विश्वास भारताचं भवितव्य बदलणारा होता.
प्रियंबदा जयकुमार यांनी स्वामीनाथन यांचं 'द मॅन हू फेड इंडिया' हे नवं चरित्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, स्वामीनाथन यांचं आयुष्य म्हणजे भारतानं अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी घेतलेल्या झेपेची कहाणी आहे.
यामुळे अन्नधान्याच्या सुरक्षेसंदर्भातील भारतच नाही तर संपूर्ण आशियाचा दृष्टीकोन बदलला.
अनेक वर्षांच्या वसाहतवादी धोरणांनी भारताच्या शेतीची दुरावस्था झाली होती.
उत्पन्नातील घट, नापीक जमीन आणि कर्जात बुडालेले कोट्यवधी भूमिहीन शेतकरी हे सर्व घटक देशातील कृषी क्षेत्रातील मोठी समस्या होते.

फोटो स्रोत, Getty Images
1960 च्या दशकाच्या मध्यापर्यंत एक भारतीय व्यक्ती प्रतिदिन सरासरी फक्त 417 ग्रॅम अन्नावर जगत होता.
भारत अमेरिकेतून अनियमितपणे आयात होणाऱ्या गव्हावर अवलंबून होता. त्यावेळेस अन्नधान्याच्या जहाजांची वाट पाहणं हे राष्ट्रीय संकट बनलं होतं.
परिस्थिती इतकी गंभीर होती की, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लोकांना गव्हाऐवजी रताळं खाण्याचं आवाहन केलं होतं. तांदळासारख्या अन्नातील प्रमुख घटकांचाही गंभीर तुटवडा होता.
हरित क्रांतीमुळे नापिक पडलेल्या शेतांचं रुपांतर हिरव्यागार पिकांनी डोलणाऱ्या शेतांमध्ये झालं. देशातील गव्हाचं उत्पादन काही वर्षांमध्येच दुप्पट झालं. दुष्काळानं ग्रासलेल्या देशाचं रुपांतर आशियातील अन्नधान्याच्या शक्तीत झालं.
लोकांचं आयुष्य बदलण्यात विज्ञानानं मोलाची भूमिका बजावली होती. स्वामीनाथन या बदलाचं नेतृत्व करत होते.
बंगालमधील दुष्काळाचा परिणाम
1925 मध्ये तामिळनाडूतील कुंभकोणममध्ये स्वामीनाथन यांचा जन्म झाला होता. त्यांचं कुटुंब सधन शेतकऱ्याचं होतं. त्यांच्या घरात शिक्षण आणि सेवेला महत्त्व दिलं जायचं. अशा वातावरणात स्वामीनाथन वाढले.
ते डॉक्टर होतील अशी त्यांच्या कुटुंबाला त्यांच्याकडून अपेक्षा होती. मात्र 1943 साली बंगालमध्ये प्रचंड दुष्काळ पडला. परिस्थिती अत्यंत भयावह होती. या भीषण परिस्थितीनं स्वामीनाथन हादरून गेले.
त्या विनाशकारी दुष्काळात तब्बल 30 लाखांहून अधिक लोक मारले गेले.
स्वामीनाथन त्यांचं चरित्र लिहिणाऱ्या प्रियंबदा जयकुमार यांना म्हणाले, "मी ठरवलं की, मी एक वैज्ञानिक होणार जो पिकांचं 'चांगलं' वाण विकसित करेल, ज्यामुळे आपल्याला अन्नधान्याचं अधिक उत्पादन घेता येईल. औषधानं काहीजणांचा जीव वाचवला जाऊ शकतो, तर शेती लाखो लोकांचे जीव वाचवू शकते."
त्यांनी प्लांट जेनेटिक्समध्ये पीएचडी केली. केम्ब्रिजमध्ये शिक्षण घेतलं. नंतर नेदरलँड्स आणि फिलिपाईन्समधील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्थेत (आयआरआरआय) काम केलं.

फोटो स्रोत, Getty Images
मेक्सिकोमध्ये ते अमेरिकेतील कृषी वैज्ञानिक आणि नोबेल पुरस्कार विजेते नॉर्मन बोरलॉग यांना भेटले. त्यांचे अधिक उत्पादन देणारे छोट्या गव्हाचे प्रकार हरित क्रांतीचा पाया बनले.
1963 मध्ये स्वामीनाथन यांनी बोरलॉग यांना भारतात गव्हाचं सुधारित वाण पाठवण्यासाठी राजी केलं.
तीन वर्षांनी भारतानं संपूर्ण देशभरात प्रायोगिक स्तरावर वापरण्यासाठी म्हणून 18 हजार टन बियाणं आयात केलं.
स्वामीनाथन यांनी त्या वाणांमध्ये भारतीय हवामानानुसार बदल केले आणि अशा सुधारित जाती विकसित केल्या ज्या स्थानिक गव्हाच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट उत्पादन करायच्या. गव्हाच्या या नवीन जाती पिकांवरील रोग आणि किटकांच्या बाबतीत देखील प्रभावी होत्या.
शेतकऱ्यांचं मन वळवण्याचं आव्हान
जयकुमार यांनी लिहिलं आहे की त्यावेळेस बियाणं आयात करणं आणि ते संपूर्ण देशभरात वितरित करणं सोपं नव्हतं.
त्याकाळी अधिकारी परदेशी बियाणांवर अवलंबून राहण्यास घाबरत असत. जहाजाच्या वाहतुकीत आणि सीमाशुल्कासाठी वेळ लागायचा. गव्हाच्या पिकाचं पारंपारिक वाण सोडण्यास शेतकरी तयार नव्हते.
स्वामीनाथन यांनी हे आव्हान पेललं. त्यांनी आकडेवारी, चर्चा आणि वैयक्तिक प्रयत्नांनी त्यावर मात केली. ते त्यांच्या कुटुंबाबरोबर स्वत: शेतांमध्ये गेले आणि थेट शेतकऱ्यांनाच सुधारित वाण दिलं.

फोटो स्रोत, Pallava Bagla/Corbis via Getty Images
पंजाबात तर त्यांनी कैद्यांकडून बियाणांचे पॅकेज तयार करून घेतले. जेणेकरून पेरणीच्या मोसमात त्यांचं वेगानं वाटप करता यावं.
मेक्सिकन गहू छोटा आणि लाल रंगाचा होता. मात्र स्वामीनाथन यांनी भारतातील चपाती आणि नानची लोकप्रियता लक्षात घेऊन सोनेरी रंगाच्या जाती विकसित केल्या. गव्हाच्या या नव्या सुधारित जाती होत्या, कल्याण सोना आणि सोनालिका.
फक्त 4 वर्षांत झाला चमत्कार
गव्हाच्या या सुधारित जातींमुळे पंजाब आणि हरियाणा देशाच्या अन्नधान्याचे कोठार बनले. स्वामीनाथन यांच्या प्रयोगांमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत लवकरच स्वावलंबी झाला.
1971 मध्ये म्हणजे 4 वर्षांमध्येच दुष्काळाला तोंड देणाऱ्या भारतात अन्नधान्याचं अतिरिक्त उत्पादन होऊ लागलं. शेतीतील बदलाचा हा प्रवास म्हणजे एक चमत्कार होता.
जयकुमार यांच्या मते, 'आधी शेतकरी' हेच स्वामीनाथन यांचं मूलभूत तत्वज्ञान होतं.
स्वामीनाथन जयकुमार यांना म्हणाले, "तुम्हाला माहिती आहे का? शेतदेखील एक प्रयोगशाळा आहे? आणि शेतकरी हेच खरे वैज्ञानिक आहेत? त्यांना माझ्यापेक्षाही अधिक माहिती आहे."

फोटो स्रोत, Getty Images
ते कृषी वैज्ञानिकांना सांगायचे की, मार्ग काढण्याआधी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकणं आवश्यक आहे.
ते आठवड्याच्या शेवटी गावांमध्ये जायचे, मातीतील आर्द्रता, बियाणांची किंमत आणि किटकांबद्दल शेतकऱ्यांना विचारायचे.
ओडिशामध्ये त्यांनी आदिवासी महिलांबरोबर काम केलं आणि तांदळाच्या जाती विकसित केल्या. तामिळनाडूतील दुष्काळी भागात त्यांनी क्षारपट जमिनीत तग धरणाऱ्या पिकांना प्रोत्साहन दिलं.
पंजाबात त्यांनी जमीनदार, मोठ्या शेतकऱ्यांना सांगितलं की, फक्त विज्ञानामुळेच उपासमार दूर होणार नाही. "विज्ञानाबरोबjच करुणादेखील असली पाहिजे."

फोटो स्रोत, The India Today Group via Getty Images
स्वामीनाथन यांना भारतातील शेतकऱ्यांच्या समस्यांची पूर्ण जाणीव आणि आकलन होतं.
2004 ते 2006 दरम्यान ते राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी कृषीवर पाच अहवाल तयार केले.
यात शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्या यामागची मूळ कारणांचा अभ्यास करण्यात आला होता. तसंच संपूर्ण देशासाठी एका राष्ट्रीय शेतकरी धोरणाची शिफारस करण्यात आली.
वयाच्या 98 व्या वर्षीदेखील स्वामीनाथन शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे होते. त्यांनी पंजाब आणि हरियाणामधील वादग्रस्त कृषी सुधारणांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.
अनेक देशांवर पडला स्वामीनाथन यांचा प्रभाव
1980 च्या दशकात ते आयआरआरआयचे पहिले भारतीय महासंचालक बनले. त्यांनी आग्नेय आशियात अधिक उत्पादन देणाऱ्या तांदळाच्या जाती वापरात आणल्या. यामुळे इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्समधील उत्पादन वाढलं.
मलेशियापासून इराणपर्यंत आणि इजिप्तपासून टांझानियापर्यंत विविध देशांच्या सरकारांना त्यांनी मार्गदर्शन केलं.
त्यांनी कंबोडियाला तांदळाची जीन बँक पुन्हा तयार करण्यास मदत केली. उत्तर कोरियातील महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं. इथिओपियाच्या दुष्काळाबाबत आफ्रिकेतील कृषी वैज्ञानिकांना मदत केली. संपूर्ण आशियातील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन केलं.

फोटो स्रोत, India Today Group via Getty Images
1987 मध्ये स्वामीनाथन जागतिक अन्नधान्य पुरस्काराचे पहिले विजेते ठरले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांनी उपासमारी संपवण्यातील स्वामीनाथन यांच्या योगदानासाठी त्यांना 'लिव्हिंग लिजेंड' म्हणत त्यांचा गौरव केला.
चेन्नईतील एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी नंतर जैव विविधता, समुद्र किनाऱ्यांची पुनर्उभारणी (कोस्टल रिस्टोरेशन) आणि 'गरीब, महिला आणि निसर्गा'च्या हिताच्या विकास मॉडेलला चालना दिली.
यशाबरोबरच आव्हानंदेखील
हरित क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात शेती झाल्यामुळे भूजल (ग्राऊंड वॉटर) पातळीवर अत्यंत विपरित परिणाम झाला. जमीन, मातीचा दर्जा खालावला आणि किटकनाशकांमुळे प्रदूषण वाढलं.
त्याचबरोबर विशेषकरून पंजाब आणि हरियाणासारख्या राज्यांमध्ये गहू आणि तांदळाच्या एकसारख्या शेतीमुळे जैव विविधतेवर प्रतिकूल परिणाम झाला. हवामान बदलाचं संकट वाढलं.
स्वामीनाथन यांनी हे धोके ओळखले. त्यांनी 1990 च्या दशकात 'एव्हरग्रीन रेव्होल्युशन'ची संकल्पना मांडली. ही अशी हरित क्रांती आहे ज्यामुळे पर्यावरणाचं नुकसान होणार नाही.
त्यांनी इशारा दिला की भविष्यातील प्रगती खतांवर नाही, तर पाणी, माती आणि बियाणं सुरक्षित ठेवण्यावर अवलंबून असेल.
सार्वजनिक आयुष्य जगणारी एक दुर्मिळ व्यक्ती म्हणून त्यांनी आकडेवारीला मानवी संवेदनांशी जोडलं.

फोटो स्रोत, Getty Images
1971 मध्ये त्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी बक्षीसाच्या रकमेतील मोठा भाग ग्रामीण शिष्यवृत्तीसाठी दान केला.
स्वामीनाथन यांनी नंतरच्या काळात लैंगिक समानता आणि डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा 'ॲग्री-टेक' हा शब्द प्रचलितदेखील नव्हता.
ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक स्वामीनाथन यांच्या प्रभावाबद्दल म्हणाले होते, "त्यांचा वारसा आपल्याला आठवण करून देतो की उपासमारीपासून मुक्ती हे सर्वात मोठं स्वातंत्र्य आहे."
स्वामीनाथन यांनी त्यांच्या आयुष्यात विज्ञान आणि करुणा यांचं मिश्रण करून कोट्यवधी लोकांना हेच स्वातंत्र्य दिलं.
2023 मध्ये वयाच्या 98 व्या वर्षी स्वामीनाथन यांचं निधन झालं. मात्र त्यांच्या योगदानानं शाश्वत आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या शेतीचा एक कायमस्वरुपी वारसा मागे ठेवला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











