You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईचा 'बाप' कोण? 'मराठे' मुंबईत येऊ नयेत म्हणून खंदक खणला होता?
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
(हा लेख पहिल्यांदा 2020 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा लेख पुन्हा प्रसिद्ध करण्यात येत आहे.)
1930 ची गोष्ट... आता याला 90 वर्षं झाली. नौदलातले अधिकारी के. आर. यू. टॉड मुंबईत कुलाब्याला समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्यांच्या हाताला एक दगड लागला. हा दगड हातात येताच त्यांच्या डोक्यात अनेक विचार येऊ लागले. हा दगड साधा नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांना जे सापडत गेलं त्यानं मुंबईच्या इतिहासाचा कालपट समोर येणार होता.
एखाद्या प्रदेशाचं यश-अपयश, तिथला सध्यस्थितीतला विकास किंवा अधोगती ही सध्याच्या राज्यकर्त्यांशी जोडली जात असली तरी त्यामागे हजारो वर्षांचा इतिहास आणि अनेक राजवटींचा हात असतो हे विसरता कामा नये.
'मुंबई कुणाची?', 'मुंबई कुणाच्या बापाची?' मुंबईबाबत अशाप्रकारचे मुद्दे या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत येत असतात. सध्याची मुंबई कुणामुळे जन्माला आली आणि तिच्यासाठी कितीजणांनी मेहनत घेतली हे पाहणं गरजेचं आहे. मुंबईचा इतिहास सांगणारा हा लेख.
अश्मयुगातला मानव मुंबईत?
आज मुंबईत काही मीटर जागा घेणं श्रीमंतांच्याही आवाक्याबाहेरचं गेलं असलं तरी अनेक बेटांमध्ये विखुरलेल्या मुंबईचा इतिहास अश्मयुगापासून सुरू होतो असं सांगितलं तर?.. हो.
मुंबईत आलेला पहिला माणूस शोधायचा झाला तर 25 लाख वर्षं मागे जावं लागेल. त्यासाठी पुरावेही आहेत. नरेश फर्नांडिस यांच्या 'सिटी अड्रिफ्ट' या पुस्तकात याची माहिती मिळते.
1930 साली के. आर. यू. टॉड हे ब्रिटिश नौदल अधिकारी कुलाब्याला समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना त्यांना एक दगड सापडला. टॉड यांनी निरखून पाहिल्यावर हा दगड काही साधासुधा नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. हा दगड म्हणजे थेट अश्मयुगीन माणसाचं हत्यार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
या शोधानंतर त्यांना वेड लागायचीच पाळी आली ते. कुलाब्याचा किनारा ते पालथा घालू लागले. त्यांना असे 55 दगड सापडले. यात काही मध्यपाषाणयुगीन माणसाची हत्यारं होती. काही फॉसिल्सही होती.
या शोधानं झपाटून गेलेल्या टॉड यांनी 1932 साली 'प्रिहिस्टॉरिक मॅन अराऊंड बॉम्बे' नावाचा शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यानंतर 1939 साली रॉयल आर्किओलॉजिकल इन्स्टिट्यूटच्या जर्नलमध्ये 'पॅलिओलिथिक इंडस्ट्रिज ऑफ बॉम्बे' नावाने शोधनिबंध लिहिला.
1920 साली 'बॅक बे रिक्लमेशन' योजनेतून दक्षिण मुंबईत भराव टाकून जमिन तयार करण्यात आली. त्यातली सगळी माती- दगड आजच्या कांदीवलीमधील टेकड्या फोडून आणली होती. त्याच भागातून हे अवशेष दक्षिण मुंबईत आले होते. आजच्या मुंबईतल्या मच्छिमार कोळी बांधवांचा या अश्मयुगातल्या लोकांशी संबंध असल्याची शक्यता 'मुंबई शहर गॅझेट' पुस्तकात जयराज साळगावकर व्यक्त करतात.
साळगावकर यांनी पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे हे कोळी आर्यपूर्व गुजरातमधून मुंबईत आले. येताना गुजरातमधून मुंबादेवीला मुंबईत आणलं आणि हेच मुंबादेवी मुंबईचं आद्य दैवत झालं.
'मुंबईला महाराष्ट्रापासून तोडलं जाणार', 'मुंबई केंद्रशासित होणार', 'मुंबई तोडण्याचा गुजराती नेत्यांचा डाव', असे वाद गेले 70-80 वर्षे गाजत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा इतिहास वाचला की कालचक्र पुन्हा फिरुन तिथंच आलं की काय असं वाटतं.
ते आले त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलंही
मुंबई शहराच्या आर्थिक, सामाजिक, धार्मिक जडणघडणीत अनेक टप्पे आहेत. अनेक सत्ताधारी इथं आले आणि त्यांनी इथं राज्य केलं. साधारणतः हिंदू कालखंड, मुस्लीम कालखंड, पोर्तुगीज कालखंड, ब्रिटिश कालखंड आणि स्वातंत्र्योत्तर कालखंड असे टप्पे केले जातात.
ख्रिस्तपूर्व 250 मध्ये उत्तर कोकणात मौर्य आले. त्यानंतर एकेका राजवटीचा मुंबईशी संबंध येऊ लागला. उत्तर कोकणावर मौर्यांपासून अनेक राजवटी राज्य करत असल्याचं मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधील एन्शंट इंडियन कल्चर विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता कोठारे सांगतात.
त्या म्हणतात, "कोकणावर राज्य करणाऱ्या मौर्यांना 'कोकणचे मौर्य' असंही नाव होतं. मौर्यांनंतर सातवाहनांच्या काळात अग्निमित्र नागपूरला आला होता. त्याचा उल्लेख कालीदासानं त्याच्या महाकाव्यांमध्ये केलेला आहे. सातवाहनांनंतर क्षत्रप आले. त्यापाठोपाठ अनेक व्यापारी येऊ लागले.
"मुंबईच्या परिसरामध्ये कल्याण, ठाणे, नालासोपारा ही बंदरं असल्यामुळे व्यापाऱ्यांची ये-जा वाढली. त्यांच्यानंतर कलचुरींच्या माध्यमातून राष्ट्रकूट, यादव, शिलाहार अशा राजवटी बदलत गेल्या. नंतरच्या काळात अरबही आले. याचाच अर्थ मुंबईच्या जवळचा परिसर व्यापारामुळे आधीपासूनच कॉस्मोपॉलिटन होता, असा होतो."
मुसलमान आणि पोर्तुगीज
मुंबईवर मुसलमान राज्यकर्त्यांचा थेट ताबा असण्याच काळ थोडासा धूसर आहे. माहिम बेटावर बिंब राजाचं राज्य आणि गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात मुंबई जाण्याच्या घटना इसवी सनाच्या 13 ते 15 व्या शतकात घडल्या.
गुजरातच्या सुलतानाने 1534 साली मुंबईचा ताबा पोर्तुगीजांना दिला. दीव, वसई, मुंबई असा प्रांत पोर्तुगीजांच्या हातामध्ये आल्यानंतर पोर्तुगीजांनी व्यापार आणि धर्म या दोन्हीचा प्रसार वाढवायला सुरुवात केली. मुंबईतली भातशेती, इथून होणारा व्यापार याचा सगळा कर पोर्तुगीज मिळवू लागले. नौदलाचा एक चांगला तळही इथं बनला. त्यानंतर इंग्रजांची नजर मुंबईवर गेली.
मुंबई शहर पहिला हुंडाबळी
1612 साली सुआलीचे (स्वाली) युद्ध झाल्यावर ब्रिटिश मुंबईत उतरले. त्यांना मुंबईचं महत्त्वही समजलं. त्यांना नाविक तळासाठी जागाही हवी होती. त्यामुळे मुंबई पोर्तुगीजांकडून घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले.
शेवटी 1661 साली इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरिन यांच्या विवाहाच्या निमित्ताने दोन्ही देशांमध्ये करार झाला. या विवाहाच्या करारात मुंबई ब्रिटिशांना देण्यात यावी असं निश्चित झालं आणि मुंबई ब्रिटिशांकडे आली.
ब्रिटिश राजवट
ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईचा ताबा घेतल्यानंतर इथल्या व्यापाराला आणि बेटांना आकार द्यायला सुरुवात केली. 1685 साली कंपनीनं आपला कारभार सूरतमधून मुंबईत आणला. 1715 साली चार्ल्स बूनने मुंबईत आल्यावर शहराभोवती तटबंदी बांधली. संरक्षणासाठी तोफांची वगैरे योजना केली.
पोर्तुगीजांबरोबरचे संबंध संपवून शहरातली पोर्तुगीजांची सर्व जागा जप्त केली. पोर्तुगीज धर्मगुरुंनांनी शहराबाहेर जाण्यास सांगितले. यानंतर मुंबईचा विकास झपाट्याने सुरु झाला. एका व्यापारी केंद्राचं रुपांतर शहरात होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
मराठ्यांची भीती आणि खंदक
ब्रिटिशांचे सर्व व्यवहार मुंबईच्या फोर्टमध्येच होत असे. या फोर्टभोवती त्यांनी तटबंदी बांधली होती आणि प्रत्येक कोपऱ्यावर फ्लॉवर ट्री, किंग्ज, चर्च, मूर, रॉयल असे बुरुजही बांधले होते. परंतु अजुनही ब्रिटिशांना पुरेसं सुरक्षित वाटत नव्हतं. याला आणखी एक कारण झालं ते म्हणजे मराठ्यांची वसईची मोहीम.
मराठ्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करुन वसई ताब्यात घेतल्यावर ब्रिटिशांना त्यांची धास्ती वाटू लागली. मुंबईच्या उंबरठ्यावर मराठे आल्याचं पाहून ब्रिटिशांनी आता संरक्षणासाठी काहीतरी करायला हवं याचा विचार सुरू केला. वसईनंतर मराठे वांद्रे आणि कुर्ल्यापर्यंत दक्षिणेस सरकले होते.
त्यामुळे कंपनीने सर्वांत आधी कॅ. जेम्स इंचबर्डला चिमाजीअप्पांची भेट घेण्यासाठी वसईला पाठवण्यात आले. चिमाजी अप्पांनी सांगितलेल्या 15 अटी घेऊन इंचबर्ड मुंबईला परतला असे गोविंद सखाराम सरदेसाई यांनी 'मराठी रियासत'च्या तिसऱ्या खंडात लिहून ठेवले आहे.
त्यानंतर कॅप्टन गोर्डननेही साताऱ्याला जाऊन छ. शाहू महाराजांची भेट घेतली. इंचबर्ड आणि पहिले बाजीराव यांचीही पुण्यात भेट झाली. पण ब्रिटिशांच्या मनातली भीती कमी झाली नाही. त्यांनी मुंबई फोर्टभोवती खंदक खणायला घेतला. तेव्हाच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या खंदकासाठी पैसे उभे केले. ही रक्कम 30 हजार इतकी हती. खंदक खणायला एकूण खर्च 2.5 लाख इतका झाला. मुंबईतले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे ते पहिले प्रकरण असावे.
1755 साली ब्रिटिशांनी सुवर्णदुर्ग जिंकणं आणि 1761 साली मराठे पानिपतच्या युद्धात पराभूत होण्याची घटना कंपनीच्या पथ्यावर पडली असं अ. रा कुलकर्णी 'कंपनी सरकार' या पुस्तकात म्हणतात.
19 वं शतक
मुंबईचा आणि ब्रिटिशांचा विचार केल्यास 19 वं शतक ब्रिटिशांसाठी सर्वात महत्त्वाचं ठरल्याचं दिसून येतं. हे शतक उजाडलं तेच मुळी 1803 च्या वसईच्या तहामुळे. 1803 सालच्या तहामुळे मराठी सत्तेला उतरती कळा लागली आणि 1818साली सगळी मराठी सत्ता संपून गेली.
त्यानंतर मुंबईत येणाऱ्या प्रत्येक गव्हर्नरने न्यायव्यवस्था, महसूल, शिक्षण यांचा पाया रचायला आणि त्यात काळानुसार बदल करायला सुरुवात केली. टाऊनहॉल, टांकसाळ, वस्तूसंग्रहालये अशा इमारती उभ्या राहिल्या.
1853 साली रेल्वे सुरू झाली. 1857 साली झालेल्या स्वातंत्र्ययुद्धाचे पडसाद मुंबईतही उमटले होते पण ब्रिटिशांनी तात्काळ पावले उचलून त्याला आळा घातला.
टाऊन हॉलच्या म्हणजेच आजच्या एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर राणीचा जाहीरनामा वाचून दाखवला गेला. 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापनाही झाली.
1862 साली मुंबईला आकार देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा हात लागला तो हेन्री बार्टल फ्रिअर यांचा. मुंबईतल्या अनेक इमारतींची पायाभरणी यांच्या काळात झाली.
मुंबईत नगरपालिका सुरू झाली. गिरण्यांमध्ये वाढ झाली आणि एकेक उद्योग वाढू लागले तशी लोकसंख्याही वाढू लागली. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात इमारतींचं बांधकाम, नवी हॉस्पिटल्स यांनी वेग घेतला आणि मुंबई तिच्या व्यापारी, सामाजिक, आर्थिक उत्कर्षबिंदूवर जाऊन पोहोचली. भाऊ दाजी लाड, जगन्नाथ शंकरशेठ अशा सामाजिक नेत्यांनीही मुंबईला आकार दिला.
स्वातंत्र्यपूर्व कालखंड
मुंबईमधून संपूर्ण मुंबई प्रांताचा कारभार चालवला जात होता. मुंबईची लोकसंख्या 20 व्या शतकात वाढत असली तरी हळूहळू स्वातंत्र्य चळवळीने वेग घेतला होता. मुंबई हे स्वातंत्र्य चळवळीचं आणि काँग्रेसच्या स्थापनेपासून अनेक घडामोडींचं केंद्र बनलं होतं. लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी यांनी त्याला चालना दिली.
त्याआधी फिरोजशहा मेहतांसारख्या जाणत्या दूरदृष्टीच्या व्यक्तीनं मुंबईत शिक्षण, आरोग्य, सांडपाणी व्यवस्थापन क्षेत्रात काम केलं होतं. सामाजिक, आर्थिक, राजकीय सुधारणांचे विचार बरोबर घेऊनच मुंबई स्वातंत्र्याच्या दिशेने पावलं टाकत होती.
स्वातंत्र्य आणि द्विभाषिक राज्य
1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. ब्रिटिशांनी मुंबईत पाऊल टाकण्याला 325 वर्षं उलटून गेली होती.
1956 साली राज्य पुनर्रचना आयोगाद्वारे मुंबई राज्याचे नवे क्षेत्र ठरवण्यात आले. यामध्ये सौराष्ट्र आणि कच्छ यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच मध्य प्रदेशातील नागपूर विभाग आणि हैदराबादमधील मराठी भाषिक मराठवाडा विभाग जोडण्यात आला.
मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिकांनी महागुजरात चळवळीतून ही मागणी लावून धरली आणि अखेर 1 मे 1960 रोजी या राज्याची विभागणी झाली.
गुजराती भाषिकांचे गुजरात व मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे राज्य तयार झालं.
मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी झाली. स्वातंत्र्यानंतरही महाराष्ट्राचा सर्व कारभार या मुंबईतून चालवला जातो. अनेक पक्षांची सरकारं इथं अस्तित्वात आली आहे. अनेक जाती धर्मांचे लोक शतकानुशतकं इथं राहात आहेत.
हिंदू, मुस्लीम, पारशी, शीख, ज्यू, जैन, बौद्ध सर्वांनी या शहराच्या विकासात आपापला हातभार लावला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)