मधु दंडवते : क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत आलेला मुलगा देशाचा रेल्वेमंत्री झाला...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नामदेव काटकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
1971 च्या निवडणुकीवेळी इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेची प्रचंड लाट होती. 1971 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ती लाट दिसूनही आली. काँग्रेसविरोधी अनेक नेते पराभूत झाले.
महाराष्ट्रात तेव्हा लोकसभेच्या 45 जागा होत्या. त्यातील 42 जागांवर इंदिरा काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. मात्र, नागपूर, पंढरपूर आणि राजापूर अशा तीन जागांवर काँग्रेस पराभूत झाली.
राजापूरमधून पराभूत होण्याचं एकमेव कारण म्हणजे ‘प्राध्यापक मधु दंडवते’.
1971 पासून पुढची दोन दशकं लोकसभेचं सभागृह देशभरातील गोरगरिबांच्या आवाजानं दणाणून सोडणाऱ्या प्रा. मधु दंडवतेंचा पहिला विजय असा ऐतिहासिक झाला होता.
क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत दाखल झालेला तरुण, भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, समाजवादी विचारांचा नेता, पाचवेळा खासदार, रेल्वेमंत्री, अर्थमंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष... असा प्रा. मधु दंडवतेंचा प्रवास.
मधु दंडवतेंच्या प्रवासातले रंजक आणि महत्त्वपूर्ण निवडक किस्से आपण या वृत्तलेखातून जाणून घेऊ.
क्रिकेट खेळण्यासाठी मुंबईत ते अजित वाडेकरांचे शिक्षक
मधु दंडवते कुठले नेते, तर ‘कोकणातले’ असं सहज उत्तर येऊ शकतं. 20 वर्षे कोकणातल्या राजापूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्यानं अनेकांनं तसं वाटूही शकतं. पण मधु दंडवते मूळचे कोकणातले नव्हते.
मधु दंडवतेंचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात 21 जानेवारी 1924 रोजी झाला. घरातूनच साहित्यिक वारसा दंडवतेंना लाभला होता.

फोटो स्रोत, Getty Images
अहमदनगरच्या नगरपालिकेच्या शाळेत माध्यमिक शिक्षणानंतर मॅट्रिकच्या शिक्षणासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दाखल झाले. याच शाळेत न्या. रानडे, रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, सेनापती बापट अशा दिग्गजांचं शिक्षण झालं होतं.
कविता, नाटक यांसह क्रिकेटची आवड मधु दंडवतेंना शालेय जीवनापासूनच होती.
‘जीवनाशी संवाद’ या आपल्या आत्मचरित्रात मधु दंडवते सांगतात, "शालेय जीवनातच मला क्रिकेटचीही गोडी लागली. त्यात मी काही पारितोषिकेही मिळवली. माझ्या वडिलांनाही क्रिकेटची गोडी असल्यामुळे त्यांनी माझ्या क्रिकेटशौकास उत्तेजनच दिले. माझी क्रिकेटची आवड आणि खेळातील कौशल्य विकसित व्हावे, म्हणून पुढील शिक्षणासाठी मी मुंबईला जावे, असे माझ्या वडिलांचे मत पडले."
क्रिकेटमधील आवड आणि वडिलांनी दिलेलं प्रोत्सहन, यांमुळे मधु दंडवते मुंबईत क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी आले. अर्थात, शिक्षणाकडे त्यांना दुर्लक्ष करायचं नव्हतचं. भौतिकशास्त्र हा त्यांचा आवडता विषय होता.
मुंबईत आल्यानंतर रामनारायण रुईया कॉलेजमध्ये विज्ञानशाखेमध्ये प्रवेश घेतला. तिथे दोन वर्षे शिक्षण घेतल्यानंतर मुंबईतील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या प्रतिष्ठित विज्ञानससंस्थेतून भौतिकशास्त्रात (फिजिक्स) एम. एस्सी पदवी मिळवली.
मुंबई विद्यापीठ आणि सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिक्षक म्हणून पुढे दंडवते नियुक्त झाले. सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापक असतानाच त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी भेट झाली आणि प्रदीर्घ संवाद झाला.
क्रिकेट आणि भौतिकशास्त्र हे दोन क्षेत्र प्रा. मधु दंडवतेंचे आवडते. या दोन्ही क्षेत्रांशी दंडवतेंचं आणखी एक रंजक नातं आहे, ते त्यांच्या दोन हुशार आणि कर्तबगार विद्यार्थ्यांमुळे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन हे दोघेही प्रा. मधु दंडवते यांचे विद्यार्थी.

फोटो स्रोत, Getty Images
पुढे खासदार झाल्यावरही त्यांचं क्रिकेटचं प्रेम कमी झालं नाही.
‘जीवनाशी संवाद’मध्ये प्रा. दंडवते लिहितात, "क्रिकेट सामने खेळूनही मी काही बक्षिसे मिळवली. लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांच्या क्रिकेट सामन्यांच्या काही मधुर आठवणी माझ्याजवळ आहेत. लोकसभेच्या क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचाही बहुमान मला मिळाला होता. विजेत्या लोकसभा संघाच्या यष्टीरक्षकासाठी ठेवलेली चांदीची ढाल भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मला त्यावेळी मिळाली होती."
ऐतिहासिक विजयानं प्रा. दंडवते पहिल्यांदा खासदार
मुंबई विद्यापीठात 1946 ते 1971 अशा जवळपास 25 वर्षे भौतिकशास्त्र विषय शिकवल्यानंतर 1970 च्या आसपास प्रा. मधु दंडवते पूर्णवेळ राजकारणात उतरले. या 25 वर्षात ते समाजवादी विचाराधारांच्य पक्षांच्या माध्यमातून, विशेषत: प्रजा सोशालिस्ट पार्टीच्या माध्यमातून राजकारणात होतेच. मात्र, आपलं अध्यापनाचं कार्य सांभाळत ते राजकीय चळवळीत सहभागी होत होते.
संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो वा गोवामुक्ती संग्राम असो, प्रा. मधु दंडवते आंदोलनांच्या अग्रस्थानी होते.
1970 साली प्रा. दंडवते मुंबई पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून गेले होते. त्यापूर्वी 1962 ते 1970 दरम्यान ते मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य होते.

फोटो स्रोत, Getty Images
प्रा. दंडवते संसदेत पोहोचले ते 1971 च्या लोकसभा निवडणुकीतून.
खरंतर प्रा. दंडवतेंचा संसदेतील प्रवेश अचानकच झाला. 1971 च्या लोकसभा निवडणुकीच्या महिन्याभर आधीच कोकणातील राजापूर मतदारसंघातील प्रजा सोशालिस्ट पार्टीचे खासदार बॅरिस्टर नाथ पै (1957-71 खासदार) यांचं निधन झालं. राजापूर मतदारसंघ हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला मानला जात असे. त्यामुळे नाथ पै यांच्या निधनानंतर त्याच तोडीचा उमेदवार देताना समाजवाद्यांना फारसा प्रश्न पडला नाही. कारण प्रा. मधु दंडवतेंचं नाव त्यांच्यासमोर होतं.
1971 ची निवडणुकीत देशभरात काँग्रेस आणि विशेषत: इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेची लाट होती.

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात तेव्हा लोकसभेच्या 45 जागा होत्या. 1971 च्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसनं 42 जागांवर विजय मिळवला. केवळ तीन जागांवर काँग्रेस पराभूत झाली. नागपूर, पंढरपूर आणि तिसरी जागा होती, जिथे काँग्रेस पराभूत झाली, ती म्हणजे राजापूर.
मधु दंडवतेंचा संसदेतील प्रवेश असा ऐतिहासिक झाला होता.
पुढे राजापूरमधूनच ते 1977, 1980, 1984 आणि 1989 या निवडणुकीत विजयी झाले. एकूण पाचवेळा ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले.
सेकंड क्लासच्या बाकांना गादी लावणारा रेल्वेमंत्री
प्रा. मधु दंडवते दोनवेळा केंद्रीय मंत्री होते. पहिल्यांदा मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री आणि दुसऱ्यांदा व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.
रेल्वेमंत्री असताना त्यांची कारकीर्द गाजली, ती त्यांच्या निर्णयांनी.
ज्येष्ठ इतिहास संशोधक रामचंद्र गुहा यांनी ‘टू इंचेस ऑफ फोम’ या मथळ्याखाली प्रा. मधु दंडवतेंवर लेख लिहिलाय. त्यात त्यांनी प्रा. दंडवतेंच्या रेल्वेमंत्री असतानाच्या कामाची माहिती दिलीय.
गुहा लिहितात, भारतीय रेल्वेचा इतिहास जेव्हा कधी लिहिला जाईल, तेव्हा त्याचे दंडवते रेल्वेमंत्री बनण्यापूर्वीचा कालखंड आणि दंडवते रेल्वेमंत्री झाल्यानंतरचा कालखंड असे दोन भाग निश्चितच पडतील.
1977 मध्ये प्रा. मधु दंडवते केंद्रीय रेल्वेमंत्री झाले. त्यापूर्वी रेल्वेमध्ये फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासच्या बैठक व्यवस्थेत जमीन-आसमानाचा फरक होता. सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कठीण लाकडापासून बनलेल्या बाकावर बसून आणि झोपून प्रवास करावा लागत असे.

फोटो स्रोत, Getty Images
गुहा लिहितात, सेकंड क्लासच्या बाकांना दोन इंच कुशनची सोय दंडवतेंनी करून दिली. दंडवतेंच्या याच निर्णयामुळे आजही लाखो-करोडो गरीब लोक सेकंड क्लासमधून आरामदायक प्रवास करू शकतात.
या निर्णयानंतर फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमधील फरकावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर प्रा. दंडवते म्हणाले होते, “मला फर्स्ट क्लासचे महत्त्व कमी करायचे नाही. मला सेकंड क्लासचा प्रवास सुखकर करायचा आहे.”
यासह त्यांनी रेल्वेबाबत इतर महत्त्वाचे निर्णय घेतले. तिकीट आरक्षणाचं संगणकीकरण केलं. यामुळे यातील भ्रष्टाचार कमी होण्यास मदत झाली. तसंच, जनता खानाअंतर्गत कमी पैशात लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये जेवणाची सोय करून दिली.
कोकण रेल्वे हा त्यांच्या रेल्वेमंत्रिपदाच्या कार्यकाळातील महत्त्वाचा निर्णय ठरला.
कोकण रेल्वेचं स्वप्न वालावलकरांनी पाहिलं, मात्र ती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रा. मधु दंडवतेंनी रेल्वेमंत्री म्हणून सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पातच तरतूद केली. आपटा ते रोहा या मार्गाच्या कामास वाट मोकळी करून दिली.

फोटो स्रोत, Loksabha
रेल्वेकर्मचाऱ्यांमध्येही प्रा. मधु दंडवतेंची लोकप्रियता वाढण्याचे आणि परिणामी रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होण्याचं एक कारण म्हणजे त्यांनी घेतला एक निर्णय.
झालं असं होतं की, 1974 साली रेल्वे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यावेळी ज्या जवळपास 50 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं, त्यांना मधु दंडवतेंनी पुन्हा कामावर घेतलं.
या निर्णयामुळे रेल्वेमंत्री म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर वाढला होता. याचा परिणाम रेल्वे खात्यातील कामावर झाला. कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन देणार हा निर्णय होता.
याचमुळे दंडवते रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली होती. विक्रमी 125 कोटींचा नफा त्यांच्या कार्यकाळात रेल्वेखात्यानं कमावला. सरप्लस प्रॉफिट कमावणारे पहिले रेल्वेमंत्री ठरले.

फोटो स्रोत, Getty Images
कर्नाटकचे माजी राज्यपाल टी. एन. चतुर्वेदी यांनी प्रा. मधु दंडवतेंवर आठवणी सांगताना म्हटलंय की, ‘पंतप्रधान मोरारजी देसाई हे फारसं कुणाचं कौतुक करत नसत. मात्र, ते एकदा जाहीरपणे म्हणाले होते की, हे (रेल्वे मंत्रालय) एकमेव मंत्रालय आहे, ज्या मी अजिबात हस्तक्षेप करत नाही. मधु दंडवते अशा पद्धतीने रेल्वे मंत्रालयाचं काम पाहतात, जे मलाही जमलं नसतं.’
तर तत्कालीन राष्ट्रपती म्हणाले होते, “जर कुणाला मंत्रिपदासाठी सुवर्णपदक द्यायचं झाल्यास, मी मधु दंडवतेंची शिफारस करेन.”
‘तुमचा चष्मा नको, माझ्याकडे दूरदृष्टीचा चष्मा आहे’
व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये मधु दंडवते अर्थमंत्री होते. 5 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990 असा त्यांचा कार्यकाळ होता.
प्रा. मधु दंडवतेंनी एकदा व्ही. पी. सिंग यांना विचारलं की, अर्थमंत्रिपदासाठी माझीच निवड का केली?
यावर व्ही. पी. सिंग म्हणाले, “मी अर्थमंत्री असताना संसदेतील तुमचं कामगिरी निरखून पाहत होतो. आर्थिक विषयांवील तुमचे दृष्टिकोन, अभ्यास आणि मांडणी हे मी पाहत होतो. आर्थिक विषयांना तुम्ही उत्तम हाताळू शकता, हे मला पटलं होतं.”
अर्थमंत्री म्हणून त्यांना जेमतेम एका वर्षाचा कालावधी मिळाला. पण त्यातही त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले.

फोटो स्रोत, Getty Images
प्रा. दंडवते अर्थमंत्री असताना त्यांनी गोल्ड कंट्रोल अॅक्ट रद्द केला. अर्थमंत्री म्हणून त्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाना समाजवादी स्पर्श होता. त्यांनी डिझेलवरील एक्ससाईज ड्युटी कमी केली.
अर्थमंत्री असताना दंडवतेंनी केंद्र सरकार पुरस्कृत 90 टक्के योजना राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या. रोजगार हा मुलभूत हक्क असायला हवा, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले.
अर्थमंत्री असतानाच 2 ऑक्टोबर 1989 रोजी मधु दंडवतेंनी सरकरी बँकेकडून 10 हजारांहून कमी रकमेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली.
डायलॉग विथ लाईफ या आत्मचरित्रात मधु दंडवतेंनी अर्थमंत्री असतानाचा एक किस्सा सांगितलाय.
“एकदा अर्थसंकल्प सादर करत असताना माझा चष्मा खाली पडला. तर काँग्रेसच्या एका खासदारानं टोमणा मारला की, प्रा. दंडवते, मी माझा चष्मा तुम्हाला देऊ का? त्यावर दंडवते म्हणाले, नको, मला तो जवळचं पाहण्याचा चष्मा असेल. माझ्याकडे दूरदृष्टीचा चष्मा आहे.”
पुढे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा असताना नियोजन आयोगाचं उपाध्यक्षपदही प्रा. मधु दंडवतेंना देण्यात आलं होतं. तेव्हाही त्यांनी चमकदार कामगिरी करत आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता.
‘संसदेत मागच्या दारानं जाणार नाही’ म्हणत राज्यसभा नाकारली..
1971 ला राजापूर मतदारसंघातून लोकसभेत पाऊल टाकलेल्या प्रा. मधु दंडवतेंचा 1991 ला काँग्रेसचे उमेदवार सुधीर सावंत यांनी राजापुरातूनच पराभव केला.
त्यानंतर त्यांना राज्यसभेवर जाण्यासाठी अनेकांनी गळ घातली. पण त्यांनी ती नम्रपणे नाकारली.
याबाबत माजी मंत्री आणि समाजवादी विचारांचे नेते सदानंद वर्देंनी एका लेखात विस्तृतपणे लिहिलंय.
सदानंद वर्दे म्हणतात, मधु 1991 ची निवडणूक हरल्यानंतर त्यानं राज्यसभेत जावं किंवा त्यानंतर बिहार वा कर्नाटकमधून सुरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवावी म्हणून पक्षाने आग्रह धरला. पण याबाबत मधूची भूमिका निखळ तत्त्वनिष्ठेची राहिली. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर त्याच्याच भाषेत मागील दारानं राज्यसभेत जाणं हे त्याच्या लोकशाही नीतीत बसणार नव्हतं. त्यानं त्याला साफ नकार दिला.”

फोटो स्रोत, Getty Images
स्वत: प्रा. मधु दंडवतेंनीही याबाबत एका मुलाखतीत सांगितलंय. ज्येष्ठ माध्यमकर्मी सुहास बोरकर यांनी सीएफटीव्हीसाठी घेतलेल्या मुलाखीत प्रा. दंडवतेंना विचारलं होतं की, तुम्ही राज्यसभेत जाण्याचा निर्णय का घेतला नाहीत?
त्यावर प्रा. दंडवते म्हणाले, “याचं उत्तर अगदी सोपं आहे. लोकसभेत 5 वेळा निवडून गेल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा (1991) लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. तेव्हा मला अनेक मित्रांनी सूचवलं की, मी राज्यसभेत जायला हवं आणि त्यासाठी चांगला मतदारसंघही निवडू.
“मी दोन करणांनी नकार दिला. पहिलं कारण म्हणजे, लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असताना संसदेत मागच्या दारानं मला शिरायचं नव्हतं. दुसरं कारण, त्यावेळी राज्यघटनेत म्हटलं होतं की, ज्या राज्यातून तुम्ही राज्यसभेत जाता, त्या राज्याचं डोमिसाईल तुमच्याकडे असायला हवं. अनेकजण खोटी कागदपत्रं बनवतात. पण मला त्यात पडायचं नव्हतं. खोटेपणा माझ्या तत्त्वात बसत नाही.”
सदानंद वर्दे म्हणतात, “ही तत्त्वनिष्ठा आणि पन्नास वर्षांच्या सार्वजनिक जीवनातील धुतल्या तांदळासारखं त्याचं स्वच्छ चारित्र्य हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं फार मोठं नैतिक बळ आहे. अनेक निवडणुकांत मतदारसंघ बदलणारे महाभाग देशात काही थोडेथोडके नाहीत. या पलायनवादाचा त्यांना फायदाही मिळाला आहे. राजकारणात अशा महाभागांची सध्या चलती आहे.”
पुढे 1996 च्या निवडणुकीतही ते राजापूर लोकसभा मतदारसंघातून प्रजा सोशालिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. मात्र, तेव्हा शिवसेनेकडून माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना उमदेवारी देण्यात आली होती. यावेळी सुरेश प्रभूंनी प्रा. दंडवतेंना पराभूत केलं. मात्र, पराभूत केल्यानतंर सर्वात आधी ज्यांच्या पायाला हात लावला, ते प्रा. मधु दंडवते होते. प्रा. दंडवतेंच्या निष्कलंक आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्वाला दुजोरा देणारा हा प्रसंग होता.
पुढे 12 नोव्हेंबर 2005 रोजी प्रा. मधु दंडवतेंचं निधन झालं.
संदर्भ :
- जीवनाशी संवाद (आत्मचरित्र) – मधु दंडवते
- मधु दंडवते इन पार्लमेंट (संपादित पुस्तक) – लोकसभा
- टू इंचेस ऑफ फोम (लेख) – रामचंद्र गुहा
- उमलत्या वयाती उपद्वाप (लेख) – प्रमिळा दंडवते
- मधु दंडवते शतायुषी व्हा (लेख) – ग. प्र. प्रधान
- रेल्वे अर्थसंकल्प (1-78-79) – भारतीय रेल्वे











