आशिया कपमध्ये मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय कोणाचा? तो कसा ठरला?

टीम इंडिया

फोटो स्रोत, Getty Images

आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत हा चषक पटकावला. मात्र, विजयानंतर लगेचच जे घडलं, ते यापूर्वी क्रिकेटच्या मैदानावर कधीच पाहायला मिळालं नव्हतं.

भारतीय क्रिकेट संघानं आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. मोहसिन नकवी हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्षदेखील आहेत.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी नंतर सांगितलं की क्रिकेटपटूंनी हे आधीच ठरवलं होतं.

आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्ताननं भारतासमोर 147 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारतानं 19.4 षटकांमध्ये ही धावसंख्या गाठत पाच गडी राखून या सामन्यात विजय मिळवला.

तिलक वर्मानं नाबाद 69 धावा केल्या, तर शिवम दुबेनं 33 धावा केल्या.

मात्र भारतानं आशिया कप जिंकण्यापेक्षा या गोष्टीची जास्त चर्चा होते आहे की ट्रॉफी घेण्यासाठी भारतीय खेळाडू व्यासपीठावर गेले नाहीत.

सामन्यानंतर नेमकं काय घडलं?

सामना संपल्यानंतर लगेच होणारा पुरस्कार वितरण समारंभ जवळपास एक तास उशीरानं सुरू झाला. यादरम्यान प्रसारणात न्यूझीलंडचे माजी अष्टपैलू खेळाडू सायमन डूल यांनी जाहीर केलं की भारतीय संघ पुरस्कार वितरण समारंभ सहभागी होणार नाही, तसंच ट्रॉफी देखील स्वीकारणार नाही.

यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनीदेखील सांगितलं की भारतीय खेळाडूंनी एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

याच कारणामुळे विजेता संघ व्यासपीठावर आला नाही आणि ट्रॉफी कर्णधाराला देण्यात आली नाही.

पाकिस्तानी संघ

फोटो स्रोत, Getty Images

तिलक वर्मा (सामनावीर), अभिषेक शर्मा (मालिकावीर) आणि कुलदीप यादव (एमव्हीपी) मात्र त्यांचे वैयक्तिक पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर गेले. मात्र त्यांनी मोहसिन नकवी यांच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, मोहसिन नकवी व्यासपीठावरील एकमेव व्यक्ती होते, ज्यांनी भारतीय खेळाडूंसाठी टाळ्यादेखील वाजवल्या नाहीत.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एसीसी आणि स्टेडियम व्यवस्थापन हे ठरवण्याचा प्रयत्न करत होते की विजेत्या संघाला ट्रॉफी कोणाच्या हस्ते द्यायची. वृत्तानुसार अचानकच हा समारंभ थांबला आणि आयोजक ट्रॉफी ड्रेसिंग रूममध्ये घेऊन गेले.

भारतानं ट्रॉफी स्वीकारली नाही, मात्र मैदानावर खेळाडूंनी त्यांच्या शैलीत विजयाचा आनंद साजरा केला.

अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी मोहसिन नकवी यांनी वक्तव्यं केलं होतं, "एक जबरदस्त अंतिम सामना पाहण्यासाठी मी उत्साहित आहे आणि विजेत्या संघाला ट्रॉफी देण्याची वाट पाहतो आहे."

पंतप्रधान मोदींची पोस्ट, मोहसिन नकवी यांचं उत्तर

भारतानं आशिया कप जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर भारतीय संघाचं अभिनंदन केलं. मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख केला.

पंतप्रधानांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे, "खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल तोच आहे - भारत जिंकला आहे. आमच्या क्रिकेटपटूंचं अभिनंदन."

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई केली होती आणि त्याला 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव दिलं होतं.

आशिया कप

फोटो स्रोत, SAJJAD HUSSAIN/AFP VIA GETTY IMAGES

पंतप्रधानांच्या या पोस्टवर एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.

त्यांनी मोदींच्या पोस्टला रिपोस्ट करत लिहिलं, "जर युद्ध हेच तुमच्या अभिमानाचं परिमाण असेल, तर पाकिस्ताननं भारताचा केलेला पराभव इतिहासात आधीच नोंदवला गेला आहे. कोणताही क्रिकेट सामना ही वस्तुस्थिती बदलू शकत नाही. खेळात युद्ध ओढणं हे निराशाजनक आणि खिलाडूवृत्तीचा अपमान करणारं आहे."

तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक्सवर लिहिलं, "शानदार विजय, आमच्या खेळाडूंच्या जबरदस्त ऊर्जेनं पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना उद्ध्वस्त केलं."

ते म्हणाले, "भारताचा विजय निश्चित आहे, मग मैदान कोणतंही असो."

ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय कोणाचा होता?

ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेण्याबाबत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेत म्हणाला की त्यानं असं पूर्वी कधीही पाहिलं नाही. सूर्यकुमारनं हा संघाचा सामूहिक निर्णय असल्याचं सांगितलं.

तर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी एएनआयला स्पष्ट सांगितलं की भारतीय संघानं पाकिस्तानचे नेते आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आयसीसीच्या परिषदेत अधिकृत विरोध नोंदवला जाईल.

सूर्यकुमार यादव म्हणाला की विजेत्या संघाला ट्रॉफी देण्यात आली नाही, असं यापूर्वी कधीही पाहिलेलं नाही.

तो म्हणाला, "तीही अशी ट्रॉफी जी मेहनतीनं जिंकण्यात आली आहे. मला वाटतं की आम्ही त्याला पात्र होतो. मी अधिक काही बोलू शकत नाही, मी माझा मुद्दा स्पष्ट केला आहे."

"जर तुम्ही मला ट्रॉफींबद्दल विचाराल, तर माझ्या ट्रॉफी माझ्या ड्रेसिंग रुममध्ये आहेत. माझ्याबरोबर असलेले सर्व 14 खेळाडू आणि सहाय्यक स्टाफ याच खऱ्या ट्रॉफी आहेत."

टीम इंडिया

फोटो स्रोत, Getty Images

एका पत्रकारानं विचारलं की मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय अधिकृत होता की नाही.

त्यावर सूर्यकुमार यादव म्हणाला, "हा निर्णय आम्ही मैदानावरच घेतला. असं करण्यास कोणीही आम्हाला सांगितलं नाही. तुम्ही जेव्हा संपूर्ण स्पर्धेत इतकं चांगलं खेळता आणि जिंकता, तेव्हा तुम्ही ट्रॉफीसाठी पात्र ठरता की नाही? तुम्हीच सांगा?"

आशिया कप

देवजीत सैकिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं, "आम्ही एसीसीच्या अध्यक्षांच्या हस्ते आशिया कप 2025 ची ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ते पाकिस्तानातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या हस्ते ट्ऱॉफी न घेण्याचा निर्णय घेतला."

"मात्र याचा अर्थ असा नाही की ट्रॉफी आणि पदक त्यांच्याकडेच राहतील. आम्हाला आशा आहे की ते लवकरच भारताकडे दिलं जाईल. नोव्हेंबर महिन्यात दुबईत आयसीसीची परिषद आहे. या परिषदेत आम्ही एसीसीच्या अध्यक्षांच्या या कृतीच्या विरोधात कडक विरोध नोंदवू."

ते पुढे म्हणाले, "बीसीसीआय खूपच आनंदी आहे. आम्ही अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करतो. पाकिस्तानविरुद्ध झालेले तिन्ही सामने एकतर्फी झाले."

"आम्हाला आपल्या संघाचा खूप अभिमान आहे. आपल्या सशस्त्र दलांनी सीमेवर देखील असंच केलं आहे. आता दुबईतदेखील हेच झालं आहे. भारतीय संघाला 21 कोटी रुपये बक्षीस देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हे बक्षीस खेळाडू आणि सहाय्यक स्टाफ यांच्यात विभागलं जाईल."

पाकिस्तानचा कर्णधार काय म्हणाला?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याला ट्रॉफीचा वाद आणि भारतीय संघाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले.

त्याला विचारण्यात आलं की या संपूर्ण वादामध्ये त्यांच्या कामगिरीचा मुद्दा झाकला जाईल. त्यावर तो म्हणाला, "आमच्यावर टीका तर होणारच आहे. ज्या लोकांना क्रिकेटची समज आहे, ते क्रिकेटबद्दलच बोलतात. इतर गोष्टी दुय्यम आहेत."

"आम्हाला माहीत आहे की या स्पर्धेत आमची फलंदाजी जशी व्हायला हवी होती तशी झालेली नाही आणि आम्ही कोणत्या गोष्टीत सुधारणा करायला हवी. आम्ही त्यावरच लक्ष देतो. इतर गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नाही."

हँडशेक आणि खिलाडूवृत्ती यावर प्रश्न विचारल्यावर सलमान आगा म्हणाला की भारतीय खेळाडूंचं या प्रकारचं वर्तन त्याला निराशाजनक वाटलं.

तो म्हणाला, "जर तुम्ही क्रिकेटचा विचार केलात, तर त्यांनी हँडशेक न करणं किंवा याप्रकारचं वर्तन करणं, हा आमचा नाही तर क्रिकेटचा अनादर आहे. जो क्रिकेटचा अपमान करतो, तो कुठे ना कुठे समोर येतोच."

"आजदेखील त्यांनी जे केलं, तसं माझ्या दृष्टीनं कोणताही चांगला संघ करत नाही. चांगला संघ तेच करतो जे आम्ही केलं. एकट्यानं जाऊन ट्रॉफीबरोबर फोटो काढला आणि आमची पदकं घेतली."

आशिया कप

सलमानचा दावा आहे की भारतीय कर्णधारानं स्पर्धेच्या सुरुवातीला पत्रकार परिषदेत किंवा रेफरी मीटिंगमध्ये त्याच्याशी हँडशेक केला होता. मात्र जेव्हा मैदानात सर्वांसमोर असं करण्याची वेळ आली तेव्हा तसं घडलं नाही.

त्याच्या मते, "मला वाटतं की त्याला ज्या सूचना देण्यात आल्या होत्या त्याचं तो फक्त पालन करत होता. असं असेल तर ठीक आहे."

भारतीय संघाकडून सातत्यानं होत असलेल्या पराभवाबद्दल विचारलं असता त्यानं मान्य केलं की त्यांची कामगिरी चांगली झालेली नाही. मात्र ही गोष्ट त्यानं सध्याच्या काळाशी जोडली.

तो म्हणाला, "आम्हाला माहीत आहे की सध्या आम्ही त्यांच्या विरुद्ध चांगली कामगिरी करत नाही आहोत. मात्र जर तुम्ही एकूण सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर आम्ही अजूनही त्यांच्या पुढे आहेत. याचा अर्थ आहे की प्रत्येक संघाचा एक काळ असतो."

"सध्या बहुधा त्यांचा काळ सुरू आहे. जसं 90 च्या दशकात आम्ही त्यांचा पराभव करायचा. तसंच आता त्यांचा काळ सुरू आहे, ते आम्हाला हरवत आहेत. मात्र लवकरच तुम्हाला दिसेल की आम्ही त्यांचा पराभव करण्यास सुरुवात करू."

आधीच्या सामन्यांमध्ये देखील भारतानं केला नव्हता हँडशेक

आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ तीन वेळा समोरा-समोर आले. आधीच्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतानं सहज विजय मिळवला होता.

मात्र या सामन्यांच्या वेळेस देखील मैदानाबाहेर बराच तणाव पाहायला मिळाला.

सुरुवातीच्या सामन्यापासूनच भारतीय संघानं पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. त्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव असंही म्हणाला होता की हा विजय त्यांनी पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना समर्पित केला आहे.

आशिया कप

फोटो स्रोत, FADEL SENNA/AFP VIA GETTY IMAGES

पहिल्या साखळी सामन्यात जेव्हा भारत जिंकला होता, त्या सामन्यात नाणेफेकीच्या वेळेस देखील दोन्ही कर्णधारांमध्ये हस्तांदोलन झालं नव्हतं. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळानं (पीसीबी) सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली होती.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी एक्सवर लिहिलं होतं, "सामनाधिकाऱ्यानं आयसीसीचा कोड ऑफ कंडक्ट आणि स्पिरिट ऑफ क्रिकेटसंदर्भात एमसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. पीसीबीनं त्यासंदर्भात आयसीसीकडे तक्रार केली आहे."

हस्तांदोलन न करण्याबाबत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं, "काही गोष्टी खिलाडूवृत्तीपेक्षाही मोठ्या असतात."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)