You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी रडायला लागलं तेव्हा
डॉक्टरांनी आधी एक नवजात बाळाला मृत घोषित केलं आणि तेच बाळ अंत्यसंस्कारावेळी रडायला लागल्यानंतर जिवंत असल्याचं समोर आलं. बीड जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
हे प्रकरण नेमकं काय आहे? पाहूया.
बीडच्या केज तालुक्यातील एक महिला प्रसुतीसाठी 7 जुलैच्या संध्याकाळी अंबाजागोई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. रात्री महिलेनं मुलाला जन्म दिला. मात्र, हे मूल हालचाल करत नव्हतं. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
या घटनेविषयी बोलताना अंबाजोगाई शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कचरे यांनी म्हटलं, "7 जुलैला संध्याकाळी या महिलेची प्रसूती झाली. त्यावेळी बाळानं जिवंत असल्याची कोणतीच लक्षणं दाखवली नाही. त्याच्यामुळे त्याला बालक मृत असल्याचं सांगून त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आलं. रात्रभर त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देईपर्यंत त्यानं जिवंत असल्याची लक्षणं दाखवली नाहीत."
सकाळी हे बाळ नातेवाईंकाच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर ते त्याला घरी घेऊन गेले. तिथं त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू करण्यात आली. तिथं एका आजीच्या लक्षात आलं की बाळ हालचाल करत आहे. त्यावेळी ते बाळ रडायलाही लागलं. त्यानंतर पुन्हा कुटुंबीय रुग्णालयात आले.
डॉ. राजेश कचरे सांगतात, "सध्या ते बाळ अतिदक्षता विभागात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बाळाचं वजन फक्त 900 ग्रॅम आहे. त्याची परिस्थिती सध्या चांगली आहे."
याप्रकरणी अद्यापर्यंत या बाळाच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. दुसरीकडे, या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत चौकशी करण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्याचं रुग्णालय प्रशासनानं म्हटल आहे.
डॉ. राजेश कचरे म्हणाले, "या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 2 समित्या तयार केल्या आहेत. स्त्रीरोग विभागाचे विभाग प्रमुखांना तातडीने या घटनेची चौकशी करुन अहवाल अधिष्ठाता कार्यालयाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
"तसेच स्त्रीरोग विभागाव्यरितिक्त इतर विभागाच्या 5 जणांची टीम तयार केली आहे, त्यांनाही या घटनेची चौकशी करुन अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश दिला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि दोषी असल्यास सिद्ध झाल्यानंतर तातडीनं कारवाई केली जाईल."
या घटनेविषयी बोलताना अंबाजोगाई ग्रामीण रुग्णालयाचे स्त्रीरोग व प्रसूती विभागप्रमुख डॉ. गणेश तोडगे यांनी माध्यमांना सांगितलं की, "प्रसूतीचा काळ पूर्ण होण्यापूर्वीच हे बाळ जन्माला आलं होतं. त्याचं वजन केवळ 900 ग्रॅम आहे. जन्मानंतर त्याची कसलीही हालचाल झालेली नव्हती. त्यामुळे असा प्रकार घडला असावा."
आता या प्रकरणाचा अहवाल कधी व काय येतो, त्यात कोण दोषी आढळतं किंवा आढळत नाही, ते पुढच्या काही दिवसांत कळेल.
काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील एका रुग्णालयातही असाच प्रकार समोर आला होता.
एका व्यक्तीला मृत घोषित करून डॉक्टरांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलं. त्यानंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना संबंधित व्यक्तीच्या छातीची धडधड सुरू असल्याचं नातेवाईकांच्या लक्षात आलं. त्यानंतर या व्यक्तीला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि त्यांना वाचवण्यात यश आलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)