You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोलापूरकरांनी 'नो डीजे' मोहीम राबवत लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात केलं गणेश विसर्जन
- Author, मुस्तान मिर्झा
- Role, बीबीसी मराठीसाठी
सोलापूर शहरानं यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत 'नो डीजे' मोहीम राबवून एक वेगळा आदर्श घालून दिला. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर विसर्जन मिरवणुका पार पडल्या.
यामुळे केवळ ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळवता आलं नाही, तर नागरिकांसाठीही हा उत्सव सुखदायी ठरला. तब्बल 25 हजार तरुणाई पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर दंग झाली होती.
गेल्या काही वर्षांत डीजेच्या प्रचंड आवाजामुळे नागरिक त्रस्त होत होते.
2023 मध्ये दिवसा आवाजाची पातळी 75 डेसिबल आणि रात्री 65 डेसिबलपर्यंत नोंदवली गेली होती. यावर्षी मात्र ती दिवसा सरासरी 58-60 आणि रात्री 48-50 डेसिबल इतकीच राहिली.
पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. विनायक धुळप यांनी हे 'जागतिक मानकांशी सुसंगत' असल्याचं सांगितलं.
सहभागात घट
सार्वजनिक मंडळांचा सहभाग मागील काही वर्षांत घटलेला दिसतो.
2023 : 364 मंडळं, 23 तास मिरवणूक
2024 : 226 मंडळं, 15 तास मिरवणूक
2025 : 195 मंडळं, 18 तास मिरवणूक
तरीदेखील उपस्थित मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सवाला रंगत आणली.
महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येनं मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर उतरले होते.
वादकांचे 'गुड डेज'
यानिमित्तानं वादकांचे 'गुड डेज' आल्याची भावना पारंपारिक वाद्य वाजवणाऱ्यांमध्ये दिसून आली.
डीजे बंदीमुळे हलगी, बँड आणि बेंजो पथकांना यंदा मोठी मागणी होती.
एका हलगी वादकाचा एरवीचा दर 500 रुपयांवरून तिप्पट वाढला. एका पथकासाठी हजारो रुपये खर्च केले गेले.
"कायम डीजे बंदी राहिली, तर आमचा रोजगार वाचेल," असं हलगी वादकांनी सांगितलं.
डीजे बंदीमुळे यंदाचं विसर्जन कोणताही गोंधळ न होता, पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीनं झालं.
पोलीस, महापालिका कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि विविध विभागांच्या मदतीनं व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली.
सोलापूरकरांनी विसर्जनाच्या निमित्तानं "डीजे बंदी कायम ठेवू, शिस्तीनं उत्सव साजरा करू" अशी सामूहिक शपथ घेतली.
गणेशभक्तांनी गजाननाला निरोप देताना पुन्हा पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घातली.
अशी झाली डीजेमुक्त चळवळीला सुरुवात
सोलापूर शहरात 365 दिवसांपैकी बहुतांश दिवशी उत्सव साजरे केले जातात. ज्यात डॉल्बी-डीजे असतोच.
या डीजेच्या आवाजानं आणि त्यात असणाऱ्या लेझर लाईट्समुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत होता.
याबाबत बीबीसीशी बोलताना डीजेमुक्त कृती समितीचे अध्यक्ष अॅड. धनंजय माने म्हणाले, "याचं गांभीर्य ओळखून सकाळचे सहयोगी संपादक सीताराम पाटील यांनी एक बैठक बोलावली आणि सोलापूर डीजेमुक्तची चळवळ हातात घ्यायची असं सांगितलं. आम्ही बैठक संपताच विविध संघटनांना तसेच नागरिकांना डीजे मुक्तीचं आवाहन केलं."
"स्वाक्षरी मोहिमेत तब्बल 42 हजार नागरिकांनी स्वाक्षरी केली. 25 ऑगस्ट रोजी हजारोंच्या उपस्थितीत ऑफिसर्स क्लब ते कमिशनर ऑफिसपर्यंत मोर्चा काढला. त्यामध्ये 400 पेक्षा जास्त डॉक्टर सहभागी झाले होते. त्यांनी डीजेच्या आवाजामुळे मानवी शरीरावर होणारे गंभीर परिणाम मांडले", असंही ते पुढे म्हणाले.
नागरिकांच्या मागणीनुसार पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी डीजेबंदीचे आदेश काढले. मात्र त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं.
कोर्टातील लढाई
वकील योगेश पवार यांनी कोर्टात धाव घेतली. त्यांचं म्हणणं होतं की, "सरसकट डीजेबंदी करता येत नाही. ध्वनीप्रदूषण अधिनियम कायद्यात 75 डेसिबलच्या आत डीजे, डॉल्बी वाजवण्याची मुभा आहे. वर्षातील 15 दिवस महाराष्ट्र शासनाने ठरवले आहेत ज्यात वेळेच्या आणि डेसिबलच्या मर्यादेत डीजे वापरता येतो."
मात्र कोर्टानं बंदी कायम ठेवली.
"माझी वैयक्तिक परवानगीसाठीची मागणी असती तर मला कोर्टानं मान्यता दिली असती," असं पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
या चळवळीत लोकांनी पुढे यावं म्हणून मिस्डकॉल मोहीम राबवण्यात आली.
धनंजय माने म्हणाले, "दबावामुळे अनेकजण चळवळीत पुढे येत नव्हते. म्हणून वीरशैव व्हिजनच्या माध्यमानं मिस्डकॉल मोहीम राबवली. दर तासाला 300 मिस्डकॉल प्रमाणे हजारो कॉल आले."
प्रशासनाची भूमिका
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "शहरातील विविध घटक आमच्याकडे आले आणि त्यांनी ही मागणी पुढे केली. आम्हाला ती योग्य वाटली म्हणून आदेश काढला. राजकीय दबाव तर असतोच, मात्र नागरिकांचा पुढाकार असल्यानं याला यश मिळालं."
कुमार आशीर्वाद यांनी याबाबतचं सर्व श्रेय सोलापूरकरांना दिलं आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार म्हणाले, "मागच्या वर्षीपर्यंत आम्ही 2 बेस आणि 2 टॉपची परवानगी देत होतो. पण यावेळी नागरिकांनी पुढाकार घेऊन डीजेमुक्त सोलापूरची चळवळ राबवली. सर्व गणेश मंडळांची बैठक घेऊन कायद्याचं पालन करण्याची सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे कसल्याही प्रकारचा डीजे-डॉल्बी वाजला नाही."
ते पुढे म्हणाले, "दरवर्षी 50 पेक्षा जास्त डीजे वाजवले जायचे. एकमेकांत स्पर्धा व्हायची आणि भांडणं व्हायची. मात्र यंदा कसल्याही प्रकारचा वाद झाला नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला नाही आणि पारंपरिक वाद्यांना चालना मिळाली."
गणपती मंडळांनीही यापुढे डीजे लावणार नसल्याची ग्वाही दिली.
थोरला गणपती मंगळवेढा तालीम संघाचे प्रमुख अमोल शिंदे म्हणाले, "सुरुवातीला डीजेचं आकर्षण होतं. पण त्याचे दुष्परिणाम समोर आले. वृद्ध, लहान मुले, महिला यांना प्रचंड त्रास होत होता. त्याचबरोबर डॉल्बीमुळे देवी-देवतांचं पावित्र्य राखलं जात नाही. पारंपरिक वाद्यं दुर्लक्षित होत होती. त्यामुळे यापुढे आम्ही डीजे लावणार नाही."
डीजेमुळे आरोग्यावर परिणाम
सोलापूर शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयकर यांनी याबाबत बीबीसी मराठीशी चर्चा केली.
त्यांनी सांगितलं, "100 पेक्षा जास्त डेसिबल आवाज मानवी शरीरासाठी अतिशय धोकादायक आहे. अति आवाजामुळे छातीत धडधडणं, ब्लड प्रेशर वाढणं, हृदयविकाराचा झटका येणं असे प्रकार घडू शकतात."
"काही वेळा जागेवर मृत्यूही होऊ शकतो. नवजात बाळ, वृद्ध, हृदयरोगी यांना डीजेचा धोका जास्त असतो."
पुढे ते म्हणाले, "अतितीव्रतेच्या आवाजामुळे चिडचिड होणं, कानांना इजा होणे असे परिणाम होतात. लेझर लाईट्स डोळ्यावर पडल्यामुळे तात्पुरतं अंधत्व किंवा रेटिनाला इजा होऊ शकते. त्यामुळे आम्ही डॉक्टर मंडळी कुठल्याही संघटना किंवा मंडळाच्या विरोधात नाही, पण डीजेच्या विरोधात आहोत. उत्सवात, जयंतीत डीजे वाजू नयेत हीच आमची भावना आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.