स्टीव्ह बॅनर्जींचं चिपेंडेल्स : जेव्हा मुंबईतला एक तरूण अमेरिकेत जाऊन मेल स्ट्रिप क्लबचं साम्राज्य उभारतो...

फोटो स्रोत, HULU
- Author, मेरील सॅबस्टियन
- Role, बीबीसी न्यूज, कोची
महिलांचं मनोरंजन करण्यासाठी बो-टाय आणि जी स्ट्रिंग्ज परिधान केलेले पिळदार शरिरयष्टीचे पुरुष असलेले क्लब. साधारणपणे स्थलांतरीत भारतीय-अमेरिकन लोकांना हे फारसं भावत नाही.
पण मुंबईत जन्मलेले स्टीव्ह बॅनर्जी यांनी पारंपरिक अमेरिकन्सचं हे स्वप्न डोक्यावर घेत, 1979 मध्ये लॉस एंजल्समध्ये चिपेंडेल्स या मेल (पुरुष) स्ट्रिप क्लबची स्थापना केली.
त्यानंतर जे घडलं तो इतिहास होता. बॅनर्जी यांनी एक अत्यंत यशस्वी अशी फ्रँचायसी उभारत स्वतःचं नशीब साकारलं. त्यानंतर सेक्स, ड्रग्ज आणि मर्डर यामुळं बॅनर्जी यांची कथा ही एखाद्या दंतकथेसारखी रंगली.
भारतात बॅनर्जी आणि त्यांच्या कामाबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. तर अमेरिकेत चिपेंडेल्स ब्रँडनं त्याच्या वादग्रस्त संस्थापकाच्या प्रतिष्ठेला ग्रहण लावल्याचं पाहायला मिळतं. पण आता चित्र बदलतंय.
त्यांच्या निधनाच्या जवळपास तीन दशकांनंतर एका पॉडकास्ट आणि टीव्ही शोचे होस्ट एका नाट्य मालिकेच्या माध्यमातून बॅनर्जी यांची कथा पुन्हा एकदा सादर करत आहेत. वेलकम टू चिपेंडेल्स नावाच्या या सिरीजमध्ये कुमैल नंजियानी भूमिका साकारत आहेत.
डेडली डान्स:द चिपेंडेल्स मर्डर्स या 2014 मधील पुस्तकाचे सहलेखक स्कॉट मॅकडोनाल्ड यांच्या मते, "बहुतांश लोकांना असं वाटेल की, चिपेंडेल्सचे संस्थापक हे नेहमी पार्ट्यांमध्ये रमणारे, महिलांचा पाठलाग, ड्रग्ज सेवन करणारे आणि प्रचंड दारु पिणारे असे असावेत."

फोटो स्रोत, Getty Images
"पण स्टीव्ह हे अंतर्मग्न, स्वतःवर नियंत्रण असलेले आणि जागतिक स्तरावर डिस्ने, प्लेबॉय किंवा पोलो या ब्रँडचा स्पर्धक ठरेल असा ब्रँड तयार करण्याची भव्य महत्त्वाकांक्षा किंवा ध्येय असलेले व्यक्ती होते."
ते स्वतःच या कथेचा अनोखा भाग आहेत, असं मत इतिहासकार नटालिया मेलमन पेत्रझेला यांनी मांडलं.
त्यांच्या वेलकम टू यूवर फँटसी या पॉडकास्टनं पुन्हा एकदा चिपेंडल्सच्या एकूण विषयाबद्दल रस निर्माण केला. चकचकित, सावळ्या गव्हाळ वर्णाचे बॅनर्जी हे त्यांच्या फ्रँचायसीद्वारे विक्री होणाऱ्या कॅलिफोर्नियातील श्वेतवर्णीय, सोनेरी पुरुषांच्या अगदी विपरित असे होते.
बॅनर्जा प्रिंटर्सच्या कुटुंबातील होते. त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षाच्या आसपास 1960 च्या अखेरीस भारत सोडला आणि कॅनडाला गेले. त्यानंतर ते कॅलिफोर्नियात गेले आणि त्याठिकाणी लॉस एंज्समध्ये त्यांनी स्वतःचं गॅस स्टेशन सुरू केलं.
मात्र, बॅनर्जीच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या. पेत्रझेला यांच्या मते, लोक जेव्हा त्यांच्या गॅस स्टेशनवर विविध आकर्षक कार घेऊन गॅस भरण्यासाठी यायचे, तेव्हा "मला ही कार चालवायची आहे," असं ते म्हणत असावे.
1970 च्या दशकात बॅनर्जी यांनी बचत केलेल्या संपत्तीच्या माध्यमातून लॉस एंजल्समध्ये एक बार खरेदी केला. डेस्टिनी 2 असं त्याचं नाव होतं.
त्याठिकाणी गर्दी खेचण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. बॅकगॅमन गेम्स, मॅजिक शो (जादूचे प्रयोग) आणि महिलांची मड रेसलिंग (चिखलातील कुस्ती) याचा त्यात समावेश होता.

फोटो स्रोत, Getty Images
1979 मध्ये पॉल स्निडेर यांनी बॅनर्जी यांना क्लबमध्ये मेल स्ट्रिपर आणण्याचा सल्ला दिला. आधी मेल स्ट्रिपर केवळ गे क्लबमध्ये दिसत होते.
दरम्यान, अधिक चांगला आणि दर्जेदार अनुभव वाटावा म्हणून बारचं नावही बदलून चिपेंडेल्स असं ठेवण्यात आलं होतं.
संपूर्ण पश्चिम लॉस एंजल्समध्ये स्ट्रिप शोच्या जाहिराती करण्यात आल्या. नेल सलून पासून ते महिलांच्या रेस्ट रूमपर्यंत जिथं कुठं महिला जमत असतील तिथं जाहिरात करण्यात आल्याचं, पेत्रझेला यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं.
अत्यंत कमी कालावधीत यशस्वी झालेल्या चिपेंडेल्समध्ये लवकरच रोज रात्री महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हायला सुरुवात झाली होती.
ह्यू हेफनर यांच्या प्लेबॉय बनीजची प्रेरणा घेऊन याठिकाणचे डान्सर कफ आणि कॉलरसह घट्ट अशी ब्लॅक पँट असा ड्रेस परिधान करत होते.
1980 च्या दशकातील अमेरिकेसाठी हे सर्व धक्कादायक होतं, असं पेत्रझेला म्हणतात.
1970 च्या दशकात झालेल्या लैंगिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवर, जेव्हा महिला सबलीकरण आणि लैंगिक स्वातंत्र्य याचं समाजात महत्त्वं वाढत होतं, त्याच वेळी बॅनर्जी यांचं चिपेंडेल्स देखील सुरू झालं होतं, असं इतिहासकारांनी स्पष्ट केलंय.

फोटो स्रोत, Getty Images
महिलांना जिथं बिनधास्तपणे जल्लोष करता येईल आणि त्यासाठी कोणी त्यांना दोषही देणार नाही, अशा एका ठिकाणाची गरज होती असं क्लब प्रमोटर बार्बरा लिगेटी यांनी सिक्रेट्स ऑफ चिपेंडेल्स मर्डर या डॉक्यु सिरीजमध्ये म्हटलं होतं.
"त्या एकमेकांना पाहू शकत होत्या, काही ड्रिंक घेत, बट पिंच असं बरंच करू शकत होत्या. तसंच एखाद्या आकर्षक पुरुषाच्या जी स्ट्रिंगमध्ये $20 देखील ठेवणं त्यांना शक्य होतं."
बॅनर्जी यांना प्रौढांसाठीचं डिस्नेलँड साकारायचं होतं. त्यांच्यासाठी हिरो असलेल्या हेफनर आणि वॉल्ट डिस्ने यांना स्पर्धेत टक्कर देण्यासाठी मोठा ब्रँड त्यांना तयार करायचा होता.
80 च्या दशकाच्या सुरुवातीला बॅनर्जी ऍमी पुरस्कार विजेते दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर निक डे नोया यांना भेटले. त्यांनी बॅनर्जी यांना त्यांच्या शोमध्ये काही बदल करणं गरजेचं असल्याचं सांगितलं.
विविध पात्रं आणि कथेचा वापर करून चिपेंडेल्समधील शो अधिक आकर्षक आणि संवादात्मक नाट्य निर्मिती बनवण्याचं श्रेय येथील डान्सर आणि प्रोड्युसर डे नोया यांनाच देतात.
डे नोया यांनी एका यशस्वी दौऱ्याच्या माध्यमातून चिपेंडेल्सला न्यूयॉर्क शहरात नेण्यासाठी आणि संपूर्ण अमेरिकेत पसरवण्यासाठी मदत केली.
पण परिस्थिती लवकरच बदलली. दोघांमधील वादाच्या काही बाबी समोर आल्या. कारण करिश्माई कोरिओग्राफर नोया हेच या ब्रँडचा चेहरा बनले आणि त्यांना माध्यमांमध्ये मिस्टर चिपेंडेल्स म्हटलं जाऊ लागलं. तर बॅनर्जी मात्र लॉस एंजल्सवरून कारभार चालवत कायम पडद्यामागंच राहिले.

फोटो स्रोत, Getty Images
दोघांमधला तणाव वाढला तशी नोया आणि बॅनर्जी यांनी भागीदारी रद्द केली आणि त्यानंतर नोया यांनी स्वतःची कंपनी यूएस मेल (US Male) सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या सर्व प्रकारामुळं बॅनर्जी प्रचंड मानसिक तणावात किंवा नैराश्यसदृश्य स्थितीत गेले असं चिपेंडेल्समधील एका माजी निर्मात्यानं सांगितलं होतं. या निर्मात्यानं नोया यांना त्यांची नवी कंपनी सुरू करण्यासाठी मदत केली होती.
बॅनर्जी यांना ओळखणाऱ्या अनेकांच्या मते, ते असे विलक्षण व्यक्ती होते ज्यांच्यासाठी यश हा अगदी शून्यासारखा खेळ होता. जर इतर लोक यशस्वी होत असतील, तर त्यामुळं आपण यशापासून दूर जावू असं त्यांना वाटायचं, असं मत पेत्रझेला यांनी व्यक्त केलं.
प्रतिस्पर्धी स्ट्रिप क्लब उदयाला येत असल्यामुळं बॅनर्जी यांनी त्यांना संपवण्यासाठी त्यांचा मित्र बनलेल्या रे कोलन या मारेकऱ्याला जबाबदारी सोपवत बरोबर घेतलं.
1987 मध्ये बॅनर्जी यांच्या आदेशावरून कोलनने एका साथीदाराला काम सोपवले. त्यानं डे नोया यांना त्यांच्या कार्यालयात ठार मारलं.
मित्र आणि इतर अनेक सहकाऱ्यांना या गुन्ह्यामध्ये बॅनर्जी यांचाच हात असल्याचा संशय होता. मात्र तपास करणाऱ्या एफबीआयच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतचा संबंध जोडण्यासाठी किंवा पुरावे मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागली.
बॅनर्जी यांचे वकील ब्रूस नहीन यांनी या हत्येचा ब्रँडवर काहीही परिणाम झाला नाही असं म्हटलं.
ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील दौऱ्यांमुळं चिपेंडेल्सचा आणखी विस्तार झाला.

फोटो स्रोत, GOPAL SHOONYA/BBC
1991 मध्ये चिपेंडेल्सच्या युके दौऱ्यावर असताना बॅनर्जी यांनी कोलन यांना त्यांच्याच क्लबच्या काही माजी डान्सर्सने सुरू केलेल्या प्रतिस्पर्धी ग्रुपच्या सदस्यांना बाहेर काढण्यास म्हणजे संपवण्यास सांगितलं.
एफबीआयच्या पुराव्यांनुसार त्यांना सायनाईडचे इंजेक्शन देण्याची योजना होती. स्ट्रॉबेरी नावाच्या सहकाऱ्याकडे कोलनने ते दिले होते.
पण त्या सहकाऱ्याने भीतीपोटी एफबीआयला कोलनची तक्रार केली.
कोलनला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर कट रचणे आणि पैसे घेऊन हत्या असे आरोप लावण्यात आले. कोलनच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये त्याच्या घरातून 46 ग्रॅम सायनाईड मिळाल्याचा दावाही एफबीआयने केला.
अटकेच्या नंतर अनेक महिने कोलन बॅनर्जी यांच्याबरोबर प्रामाणिक राहिला आणि दोषी नसल्याचं सांगत राहिला.
पण "स्टिव्ह बॅनर्जी यांनी कोलन यांना वकिलाच्या फिससाठी आर्थिक मदत करण्यास नकार दिल्यामुळं अखेर त्यानं स्टिव्ह बॅनर्जींशी संबंध तोडले", असं मॅकडोनाल्ड यांनी म्हटलं.
1993 मध्ये एफबीआयला बॅनर्जी यांच्या विरोधात पुरेसे पुरावे मिळवण्यात यश आलं. त्यांनी कोलनच्या मदतीनं गोपनीय पद्धतीनं त्यांच्यातील संभाषण रेकॉर्ड केलं. त्यानंतर बॅनर्जी यांना बेकायदेशीर वर्तन, कट रचने आणि हत्येसह इतर आरोपांखाली अटक करण्यात आली. पण त्यांनी मात्र निर्दोष असल्याचंच सांगितलं.
काही महिने यासंबंधी खटल्याची सुनावणी चालली. त्यानंतर बॅनर्जी यांनी एका विनवणी कराराची तयारी दर्शवली. 26 वर्षांचा तुरुंगवास आणि दंडापोटी चिपेंडेल्स क्लबची मालकी अमेरिका सरकारकडं देण्याचा तो करार होता.
पेत्रझेला यांच्या मते बॅनर्जींच्या वकिलांनी कंपनीवरची जप्ती टाळण्याचा प्रचंड प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. ऑक्टोबर 1994 मध्ये बॅनर्जी यांनी त्यांना शिक्षा सुनावण्याच्या एक दिवस आधीच तुरुंगामध्ये त्यांच्या कोठडीत आत्महत्या केली.
बर्कलेमध्ये साऊथ एशियन रॅडिकल हिस्ट्री वॉकिंग टूरचं आयोजन करणारे अनिर्वान चॅटर्जी यांच्या मते, "अत्यंत कमी भारतीय अमेरिकन नागरिकांना त्यांची कथा माहिती आहे."
"बॅनर्जी यांचं जीवन 1990 च्या दशकातील कॅलिफोर्नियाच्या व्यवसायाच्या कथेचं रंजक रुप होते," असंही ते म्हणाले. तसंच त्यांनी समाजातील सर्व रुढींच्या विरोधात वर्तन केल्याचंही ते म्हणाले.
बॅनर्जी यांनी कॅलिफोर्नियातील मोठ्या व्यावसायिंकांचा अभ्यास करण्याचा आणि त्यांच्याप्रमाणे मोठे व्यावसायिक बनण्याचा प्रचंड प्रयत्न केला होता, असं पेत्रझेला यांना संशोधनात आढळून आलं.
पण तरीही त्यांच्या मुलाखतीच्या आठवणींमध्ये भारतीय उच्चार स्पष्टपणे लक्षात राहिले, असं त्या म्हणतात. "म्हणजे इतर लोक त्यांच्याकडे कायम परदेशी व्यक्ती किंवा भारतीय अशा दृष्टीने पाहत असल्याचं स्पष्ट होतं," असं त्या म्हणाल्या.
"अगदी त्यांच्या मृत्यूनंतरही लोकांनी प्रतिक्रिया देताना सर्वात आधी त्यांच्या उच्चारावर बोलण्यास सुरुवात केली होती."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








