इस्रायल-हमास संघर्षात रफा शहर भीतीच्या छायेखाली का आहे?

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इजिप्त आणि गाझाच्या सीमेवरचं रफा शहर पुन्हा चर्चेत आहे.

इथे ओलिस ठेवलेल्या दोन इस्रायली नागरिकांची सुटका केल्याचं इस्रायली सैन्यानं 12 फेब्रुवारीला पहाटे जाहीर केलं.

मध्यरात्रीच इस्रायलकडून रफामध्ये बाँब हल्ले वाढवल्याचं स्थानिक नागरिक सांगतायत, तर इस्रायलच्या सैन्यानंही दक्षिण गाझामध्ये हवाई हल्ले केल्याचं जाहीर केलं आहे.

इस्रायल इथेही मोठी लष्करी कारवाई करेल, जमिनीवरचं आक्रमण वाढवेल अशी भीती गेल्या काही दिवसांपासून रफामधल्या लाखो निर्वासितांमध्ये पसरली आहे.

हमासवर विजय मिळवण्यासाठी रफावर कारवाई गरजेचं असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे आणि काही तज्ज्ञांच्या मते हा युद्धातला एक निर्णायक क्षण ठरू शकतो.

पण इथे हल्ला करून इस्रायलला आमची कत्तल करायची आहे का, असा प्रश्न तिथले सामान्य नागरीक विचारतायत. त्याविषयी अमेरिका आणि युरोपनंही इस्रायलला इशारा दिला आहे.

रफा शहर का महत्त्वाचं?

तुम्ही या प्रदेशाचा नकाशा पाहिलात, तर रफा महत्त्वाचं का आहे, हे लवकर लक्षात येईल.

गाझा पट्टी हा पॅलेस्टिनी प्रदेश उत्तर आणि पूर्वेला इस्रायलनं वेढला आहे. त्यांच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र आहे, जिथे इस्रायली जहाजंही गस्त घालतात. गाझाच्या चौथ्या बाजूला इजिप्तचा सिनाई द्वीपकल्प आहे.

गाझा पट्टीच्या याच दक्षिण भागात इजिप्तच्या सीमेवर रफा हे पॅलेस्टिनी शहर आहे.

गाझामधून पॅलेस्टिनींना बाहेर पडता येईल असा मुख्य मार्ग किंवा बॉर्डर क्रॉसिंग सध्या रफामध्येच आहे.

2007 मध्ये गाझा हमासच्या नियंत्रणाखाली गेलं, तेव्हापासून इस्रायलनं सुरक्षेचं कारण देत गाझाची नाकाबंदी केली आहे. इजिप्तचाही त्याला पाठिंबा आहे, कारण कट्टरतावादींपासून संरक्षणासाठी इजिप्तला ते महत्त्वाचं वाटतं.

पण या नाकबंदीमुळे हमास इस्रायलमधला संघर्ष पेटतो, तेव्हा गाझामधून बाहेर पडणं कठीण बनतं.

उत्तर गाझामध्येही एरेझ बॉर्डर क्रॉसिंग आहे, पण ते इस्रायलच्या नियंत्रणात आहे. काही परदेशी नागरीक, मानवाधिकार कार्यकर्ते किंवा वेस्ट बँकचे मोजके रहिवासी तिथून आधी गाझामध्ये येजा करू शकायचे.

मोजके अपवाद वगळता एरेझमधून गाझाच्या रहिवाशांना अजिबात बाहेर पडता येत नाही. इस्रायल हमास संघर्ष पुन्हा पेटल्यापासून हा मार्ग बंदच आहे.

त्याशिवाय दक्षिण गाझामध्ये कारेम शालोम हे बॉर्डर क्रॉसिंगही आहे, पण तिथून फक्त ट्रक्सची वाहतूक केली जाते. हमासनं ऑक्टोबर 2023 हल्ला केल्यापासून हे क्रॉसिंगही आता बंद आहे, केवळ संयुक्त राष्ट्रांच्या ट्रक्सना 17 डिसेंबर 2023 ला इथून मदत गाझामध्ये नेण्याची परवानगी मिळाली, पण गाझामधून या मार्गानं कोणी बाहेर पडू शकत नाहीत.

त्यामुळे रफा हाच गाझाबाहेर पडण्याचा एकमेव मार्ग उरला आहे. पण या मार्गावर इजिप्तचंही नियंत्रण आहे.

रफा क्रॉसिंग ओलांडून गाझाबाहेर पडायचं, तर स्थानिक पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांकडे दोन ते चार आठवडे आधी नोंदणी करावी लागते.

पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांची परवानगी मिळाली, तरी इजिप्तचे अधिकारी परवानगी नाकारू शकतात. त्यासाठी कुठलं कारणही दिलं जात नाही.

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार ऑगस्ट 2023 मध्ये इजिप्तनं 19608 जणांना गाझाबाहेर जाऊ दिलं तर 314 जणांना प्रवेश नाकारला. दोन महिन्यांतच ही परिस्थिती बदलली.

रफामध्ये काय सुरू आहे?

7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासनं इस्रायलवर हल्ला केला आणि युद्धाला तोंड फुटलं.

मग 9 ऑक्टोबरपासून इस्रायलनं गाझाची पूर्ण नाकाबंदी केली. काही दिवसांतच रफा क्रॉसिंगही बंद करण्यात आलं. यामागे काही कारणं आहेत.

रफामार्गे गाझातल्या शरणार्थींचा लोंढा इजिप्तमध्ये येईल, त्यासोबतच इस्लामिक कट्टरतावादी आपल्या देशात येतील अशी भीती इजिप्तला वाटते.

लोक गाझा सोडून गेले, तर पॅलेस्टाईनसाठीच्या चळवळीचं नुकसान होईल, असा इशारा इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांनी 12 ऑक्टोबरला दिला होता.

पण हे क्रॉसिंग बंद झाल्यानं गाझामधले सामान्य लोक कात्रीत सापडले आहेत. कारण इस्रायलनं हल्ले सुरू केले, तेव्हा गाझा शहरातून आणि उत्तर गाझा प्रदेशातल्या इतर शहरांमधून लाखो लोक रफामध्ये आश्रयाला आले.

आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार रफामध्ये सध्या 15 लाख पॅलेस्टिनी आहेत, ज्यातले साधारण 14 लाख शरणार्थी आहेत.

अनेकांना आपल्या घरी परत जायचं आहे, पण तेही युद्धामुळे शक्य नाही.

गेल्या तीन महिन्यांत रफामधल्या शिबिरातले शरणार्थींचे तंबू कसे वाढले आहेत, याची कल्पना उपग्रहानं घेतलेल्या फोटोंमधून येईल.

7 ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 1,200 इस्रायली मारले गेलेत. हमासनं सुमारे 240 जणांना ओलीस ठेवल्याचं सांगितलं जातं.

हमास चालवत असलेल्या गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार गाझामध्ये आतापर्यंत 27,900 पॅलेस्टिनी मारले गेले असून किमान 67,000 जखमी झाले आहेत.

इस्रायलनं आता रफामध्ये जमिनी हल्ला म्हणजे लष्करी कारवाई केली तर मोठ्या प्रमाणात लोक मारले जातील अशी भीती व्यक्त केली जाते आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंना सल्ला दिलाय की नागरिकांच्या सुरक्षेची ग्वाही असल्याशिवाय रफामध्ये कारवाई करू नका. युरोपियन युनियन आणि अन्य संस्थांनीही याविषयी काळजी व्यक्त केली आहे.

इस्रायलच्या रफामध्ये होऊ घातलेल्या कारवाईविषयी इजिप्तनंही चिंता व्यक्त केली आहे. याचं कारण आहे ऑक्टोबरमध्ये कारेम शालोम क्रॉसिंगवर घडलेल्या घटना.

हमासनं इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा कारेम शालोम क्रॉसिंगच्या प्रमुखाला मारल्याचा दावा केला होता. तसंच इस्रायलनं 22 ऑक्टोबर 2023 रोजी कारवाई केली, तेव्हा त्यांच्या टँकनं डागलेली स्फोटकं ‘चुकून’ सीमेपलीकडे इजिप्तमध्ये जाऊन पडली होती, ज्याबद्दल इस्रायली सैन्यानं माफीही मागितली.

मग इस्रायल रफावर बाँबहल्ले का वाढवत आहे? कारण इस्रायलच्या मते रफा या युद्धात निर्णायक ठरू शकतं. हमासविरोधात - Total Victory 'पूर्ण विजय' मिळवण्यासाठी रफावर हल्ला करणं ही लष्करी गरज आहे.

नेतन्याहूंच्या कार्यालयानं जारी केलेल्या पत्रकानुसार, हमासच्या चार बटालियन्स रफामध्ये आहेत आणि हमासला उद्धवस्थ केल्याशिवाय या युद्धाचा उद्देश पूर्ण होऊ शकत नाही.

रफामध्ये कारवाई करताना तिथल्या सामान्य नागरिकांना सुरक्षित पॅसेज पुरवला जाई असं इस्रायलनं म्हटलं आहे. पण म्हणजे हे नागरीक कुठे जातील हे स्पष्ट नाही.

रफामधल्या सगळ्यांनाच इजिप्तमार्गे बाहेर काढता येणार नाही, असं गाझामध्ये काम करणाऱ्या मानवाधिकार संस्थांनी सांगितलं आहे.

हेही नक्की वाचा