सुनेला स्कूटरवरून ढकलून अपघाताचा बनाव, म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांनी रचला हत्येचा कट; नेमकं काय घडलं?

हत्या

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, इम्रान कुरेशी
    • Role, बीबीसीसाठी
    • Reporting from, बंगळरु

(सूचना - या बातमीतील मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो.)

कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह वृद्ध सासू-सासऱ्यांना अटक केली आहे.

आरोपींनी गुन्ह्यासाठी जी पद्धत वापरली त्यानं पोलिसांसह महिला हक्क कार्यकर्ते चकीत झाले.

मृत महिलेचं नाव रेणुका संतोष होनाकांडे (वय 34) असं आहे. ती आपल्या सासू-सासऱ्यांसोबत दुचाकीने जाण्यास निघाली होती. परंतु, वाटेतच दुचाकीवरून पडून तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.

वरकरणी हे अपघाताचं प्रकरण वाटत असतानाच तपासात वृद्ध सासू-सासऱ्यांनीच हे सर्व घडवून आणल्याचं समोर आलं.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती संतोष होनाकांडे, सासू जयंती होनाकांडे आणि सासरा कमन्ना होनाकांडे यांना अटक केली आहे. पोलीस आरोपी पती संतोष होनाकांडे याची कसून चौकशी करत आहेत.

हे नेमकं काय प्रकरण आहे? याचा उलगडा कसा झाला? जाणून घेऊया.

काय घडलं?

ही घटना 24 मे रोजी घडली. त्या दिवशी सासू जयंती आणि सासरे कमन्ना होनाकांडे यांनी रेणुकाला आपल्यासोबत दुचाकीने जाण्यास बोलावले.

दरम्यान, अथणी तालुक्याजवळ असलेल्या मलबाडी गावात तिचा अपघात झाला. हे गाव महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यापासून जवळपास 2 तासांच्या अंतरावर आहे.

सुरुवातीला हा अपघात वाटत होता. मात्र प्राथमिक पोलीस तपासात उघड झालं की, रेणुकाला तिच्या सासरच्यांनी मुद्दाम दुचाकीवरुन ढकलून खाली पाडलं. यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून साडीने तिचा गळा आवळला. त्यानंतर रेणुकाची साडी दुचाकीच्या मागच्या चाकाला बांधून तिला सुमारे 120 फुटापर्यंत ओढत नेलं.

हे सर्व कृत्य अपघाताप्रमाणे भासावं आणि आपला कुणाला संशय येऊ नये म्हणून केलं. या वृद्ध दाम्पत्याचं वय अनुक्रमे 64 आणि 62 वर्षं आहे.

पतीची भूमिका काय?

बेळगाव पोलीस अधीक्षक भीमशंकर गुलेद यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "वृद्ध दाम्पत्याला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. रेणुकाचा पती संतोष होनाकांडे हा घटनास्थळी उपस्थित नव्हता. मात्र, त्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे."

"पत्नीच्या हत्येच्या कटात संतोष होनाकांडे याची भूमिका होती का, याची चौकशी सुरू आहे. त्याला हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे", अशी माहिती एसपी गुलेद यांनी दिली.

रेणुकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वृद्ध सासू-सासऱ्यांना अटक केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रेणुकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वृद्ध सासू-सासऱ्यांना अटक केली आहे.

"संतोष पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. त्याने पत्नीच्या कुटुंबाकडून हुंडा म्हणून 5 लाख रुपये मागितले होते. त्यापैकी त्याला गेल्या महिन्यातच 50 हजार रुपये मिळाले होते."

"मृत महिलादेखील बीएमएस पदवी असलेली डॉक्टर होती." तिला मूल होत नसल्याच्या कारणावरून तिची हत्या करण्यात आली," अशी माहिती गुलेद यांनी दिली.

संतोषचे दुसऱ्या महिलेशी लग्न झाले आहे आणि ती गर्भवती आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

हिंसेचा अमानुष प्रकार

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

महिला हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, महिलांविरुद्ध होत असलेल्या हिंसेचे स्वरूप मागील काही वर्षांमध्ये बदलले आहे.

त्यांच्या मते, रेणुकाच्या प्रकरणात आणि अलीकडील काही इतर प्रकरणांत जी पद्धत वापरण्यात आली आहे, ती पूर्वीच्या तुलनेत अधिकच अमानुष आणि क्रूर होत चालली आहे.

'अवेक्षा' या महिला अधिकार संघटनेच्या डोना फर्नांडिस यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितले, "आम्ही 1997 मध्ये बंगळुरूमध्ये एक अभ्यास केला होता. त्या वेळी हुंड्यासाठी दर महिन्याला सुमारे 100 महिलांचे मृत्यू होत होते."

"यापैकी सुमारे 70 टक्के महिलांना जाळून मारण्यात आल्याचं समोर आलं. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. कारण कायदे प्रभावी ठरत नाहीत."

त्यांनी सांगितलं, "पुरुष मुद्दाम महिलेचा मृत्यू होईल किंवा ती गंभीर जखमी होईल, असे वाहन चालवत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर ते पुन्हा हुंडा घेऊन दुसरे लग्न करतात. आता हिंसेचे प्रकार बदलले आहेत."

ग्लोबल कन्सर्न्स इंडिया आणि मुक्ती अलायन्स अगेन्स्ट ह्यूमन ट्रॅफिकिंग अँड बॉन्डेड लेबरच्या संचालिका वृंदा अडिगे म्हणाल्या, "बेलगावीच्या प्रकरणात दिसून येतं की, यात हिंसेचा जो प्रकार वापरण्यात आला, तो क्रूरतेचा कळस आहे. कारण कायद्याला गांभीर्याने घेतलं जात नाही."

बीबीसी हिंदीसोबत बोलताना वृंदा अडिगे म्हणाल्या, "अशा प्रकरणात तक्रार दाखल व्हायला वेळ लागतो. कारण पोलिसांना सर्व बाबी तपासाव्या लागतात."

"एखाद्या प्रकरणात महिलेने रागापोटी तर आरोप लावले नाहीत ना याचीही पडताळणी करावी लागते. त्याला कोर्टातही पुरावे सादर करावे लागतात. त्यांनी सर्व नियमांचे पालन केले, असं आपण गृहीत धरलं, तरी न्यायालय परिस्थितीजन्य पुरावे स्वीकारत नाही."

महिला अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
फोटो कॅप्शन, महिला अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

फर्नांडिस याबाबत उदाहरण देताना म्हणाले, "परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, 498 अ लागू करण्याचे नियमही बदलले आहेत. आता महिलांना प्रथम समुपदेशन दिले जाते, त्यानंतरच 498 अ (किंवा बीएनएसएसच्या कलम 85) अंतर्गत चौकशी सुरू केली जाते."

"पती पुन्हा पोलीस ठाण्यात येत नाही आणि महिला एकटी पडते. पोलीस 'समुपदेशन अयशस्वी' म्हणून नोंदवतात. पुरुष पळून जातात. ही खेदजनक बाब आहे."

वेगवेगळ्या पातळ्यांवर अशा प्रकरणांना कसे हाताळले जाते याबद्दल सामाजिक कार्यकर्ते नेहमीच प्रश्न उपस्थित करतात.

कर्नाटक पोलिसांच्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2023 पर्यंत पतींकडून होणाऱ्या क्रूरतेचे एकूण 3005 गुन्हे दाखल झाले. हुंड्यामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 156 होती.

2024 च्या अखेरीस, पतीच्या क्रूरतेशी संबंधित 2943 प्रकरणे नोंदवण्यात आले. हुंड्यामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 110 होती. एप्रिल 2025 पर्यंत, हे आकडे अनुक्रमे 946 आणि 45 आहेत.

दरम्यान, पुण्यातील मुळशी परिसरातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूचे प्रकरणही चर्चेत आहे. सुरुवातीला ही आत्महत्या वाटत होती. परंतु, शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर हल्ल्याच्या खुणा आढळून आल्या. तिच्या पालकांनी आरोप केला आहे की, वैष्णवीचा हुंड्यासाठी अतोनात छळ सुरू होता आणि त्यातूनच तिची हत्या करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, ननद करिश्मा हगवणे, सासरा हगवणे आणि दुसरा मुलगा सुशील हगवणे यांना अटक केली आहे.

अडिगे म्हणतात, "दिवसेंदिवस अशा प्रकरणांत वाढ होत आहे. पण शिक्षा होण्याचं प्रमाण 3 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. एखाद्या विवाहितेच्या सुंदरतेला तिच्या शिक्षणापेक्षा जास्त महत्व आहे."

"ती सॉफ्टवेअर इंजिनिअर, डॉक्टर आहे की अंतराळवीर आहे याला महत्त्व नाही. परंतु, लग्नात किती हुंडा मिळतोय, मूल झालं पाहिजे आणि वंशाचा दिवा असायला हवा अशा गोष्टींना जास्त महत्व दिलं जातं. हे खरंच दु:खद आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)