लसूण खरोखर आरोग्यासाठी चांगला आहे का? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि फायदे

लसूण खरोखर आरोग्यासाठी चांगला आहे का? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि फायदे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस

लसूण हा स्वयंपाकासाठी घराघरात वापरला जातो. मात्र त्याचा वापर काही आजचा किंवा अलीकडच्याच काळातील नाही. हजारो वर्षांपासून लसूण वापरला जात आहे.

फक्त उग्र किंवा वेगळ्या चवीसाठी त्याचा वापर केला जातो असं नाही. तर औषधी गुणधर्मांसाठीदेखील तो वापरला जातो.

लसूण हा त्याच्या अँटीमायक्रोबियल आणि अँटीव्हायरल वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो. स्वयंपाकघरात आणि पारंपरिक उपायांमध्ये तो दीर्घकाळापासून एक प्रमुख घटक आहे.

लसूण तसा मूळचा मध्य आशियातील. स्थलांतरित लोकांबरोबर तो युरोप आणि अगदी अमेरिकेपर्यंतही पोहोचला.

सध्या जगात लसणाचं सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये होतं.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसेसच्या फूड चेन या कार्यक्रमात लसणाचा समृद्ध इतिहास, त्याचं सांस्कृतिक महत्त्व यांचा शोध घेण्यात आला.

त्यातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला, तो म्हणजे लसूण खरोखरच आपल्यासाठी चांगला आहे का?

स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक

लसूण हा असंख्य पाककृतींमधील एक अतिशय महत्त्वाचा किंवा आवश्यक घटक आहे. डॅनिश शेफ पॉल एरिक जेन्सन यांचं वायव्य फ्रान्समध्ये एक फ्रेंच डायनिंग स्कूल आहे. तिथं त्यांच्याकडे शिकायला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युके आणि आशिया खंडातून विद्यार्थी येतात. पॉल म्हणतात की, लसूण माहिती नसलेला विद्यार्थी अजून त्यांना भेटलेला नाही.

पॉल यांच्या मते, लसणामुळे अन्नाची चव नाट्यमयरित्या वाढते. लसणाचा वापर नसलेल्या फ्रेंच पाककृतींची ते कल्पनाही करू शकत नाहीत.

पॉल म्हणतात की, "लसणाशिवाय फ्रेंच लोक चवदार पदार्थाची कल्पना करू शकतात, असं मला वाटत नाही. अगदी चिकन किंवा मटणाच्या सूपपासून ते साध्या सूपपर्यंत, भाज्यांमध्ये किंवा मांसाहारी पदार्थांमध्ये लसणाची एखादी तरी पाकळी नक्कीच असते. लसणाचा वापर न करता पदार्थ तयार करणं हे कल्पनेपलीकडचं आहे."

लसूण

फोटो स्रोत, AFP via Getty Images

मात्र, 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला ते जेव्हा डेन्मार्कच्या ग्रामीण भागात मोठे होत होते, तेव्हा त्यांना लसूण जवळपास माहीतच नव्हता.

तीव्र वासामुळे तो तेव्हा कुप्रसिद्धच होता हे त्यांना आठवतं. मात्र, नंतरच्या काळात तुर्कियेमधील कामगार डेन्मार्कला स्थलांतरित होऊ लागले. ते त्यांच्या अन्नपदार्थांमध्ये नेहमीच लसणाचा वापर करायचे. त्यातून तिथे लसूण परिचयाचा होत गेला.

शेफ पॉल जेन्सन यांना इटालियन पिझ्झामधून लसणाची सवय झाली. आज हिवाळ्यातील एक औषधी घटक म्हणूनदेखील ते लसणाचा वापर करतात.

"मी आणि माझी जोडीदार सकाळी एक कप ब्रॉथ घेतो. प्रत्येक कपात लसणाची एक पाकळी टाकलेली असते. आम्हाला सर्दी किंवा फ्लूचा त्रास होत नाही. मला खात्री आहे की, ते लसणामुळे असेल, " असं पॉल जेन्सन म्हणतात.

ब्रॉथ म्हणजे मटण किंवा चिकन आणि विविध भाज्या टाकून तयार केलेलं एकप्रकारचं सूप असतं.

लसणाचा प्रदीर्घ प्रवास

लसणाचं सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्व हजारो वर्ष जुनं आहे. प्राचीन ग्रीक लोक चौकाचौकात लसूण ठेवत असतं. हेकेट या देवतेला ते तो लसूण अर्पण करत असत. हेकेट ही जादूटोणा आणि घरांचं रक्षण करणारी देवता आहे.

तर इजिप्तमध्ये प्रसिद्ध फारोह तुतनखामेनच्या खडग्यात लसूण सापडला होता. मृत्यूनंतरच्या जगात त्याचं रक्षण करण्यासाठी तो ठेवण्यात आलेला होता.

चीनमधील आणि फिलिपिनो लोककथांमध्ये व्हॅम्पायरशी लढण्यासाठी लोकांनी लसणाचा वापर केल्याच्या कथा आहेत.

लसूण

फोटो स्रोत, Getty Images

रॉबिन चेरी 'गार्लिक: ॲन एडिबल बायोग्राफी' या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत.

त्या म्हणतात, "लसणाचा वापर करून तयार करण्यात आलेला जगातील सर्वात प्राचीन पदार्थ किंवा पाककृती मेसोपोटेमियन स्टू ची आहे. यात मांस आणि इतर भाज्या एकत्र करून शिजवल्या जातात. ती जवळपास 3,500 वर्षे जुनी आहे. त्यात लसणाच्या दोन पाकळ्यांचा वापर करण्यात आलेला आहे."

"औषधी घटक म्हणून लसणाचा वापर केल्याचा सर्वात जुना संदर्भ जवळपास 3,500 वर्षांपूर्वीचा आहे. त्याला एबर्स पॅपिरस म्हणत. त्यात अस्वस्थता ते परजीवी आणि हृदयाचे आजार ते श्वसनाच्या आजारांपर्यंत सर्व काही बरं करण्यासाठी लसणाचा वापर कसा करावा याचे उल्लेख करण्यात आलेले आहेत," असं त्या म्हणतात.

रॉबिन चेरी नमूद करतात की, प्राचीन ग्रीक वैद्य आणि तत्वज्ञ हिप्पोक्रेट्स यांनी लसणाचा वापर विविध वैद्यकीय उपचारांमध्ये केला होता.

याशिवाय अरिस्टॉटल आणि अरिस्टोफान्ससारख्या प्रमुख विचारवंत आणि लेखकांनी देखील लसणाच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख केला आहे.

गुलामांचं अन्न ते राजघराण्यातील स्वयंपाकघर

प्राचीन मेसोपोटेमिया, इजिप्त, ग्रीस, रोम, चीन आणि भारतात लसूण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होता. रोमन सैनिकांचा विश्वास होता की, लसणामुळे त्यांना हिंमत आणि शक्ती मिळते. मग रोमन साम्राज्याच्या विस्ताराच्या काळात लसूण संपूर्ण युरोपात पसरला.

लसणाचा वापर जरी अन्न आणि औषधी स्वरुपात होत होता. तरीही देखील एकेकाळी लसणाचा स्वयंपाकघरातील वापर फक्त गरीब वर्गापुरताच मर्यादित होता.

"ते फक्त गरीब लोकांसाठीचंच अन्न होतं. इजिप्तमध्ये पिरॅमिड बांधणारे गुलाम किंवा रोमन सैनिक यांना ताकद देण्यासाठीच त्याचा वापर होत होता.

लसूण स्वस्त होता. खराब अन्नाची चव लसणाच्या तीव्र चवीखाली दाबली जात होती. त्यामुळे लसणाकडे गरीबांचं अन्न म्हणूनच पाहिलं जात असे," असं रॉबिन चेरी म्हणतात.

लसूण

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

युरोपमधील रेनेसान्सच्या म्हणजे पुनरुत्थानाच्या काळात लसणाचं स्थान, प्रतिष्ठा बदलू लागली. 14 व्या ते 16 व्या शतकात युरोपात मोठा बदल घडून आला.

तो युरोपच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा कालखंड होता. त्यावेळेस शास्त्रीय शिक्षणाचा पुनर्जन्म झाला, कला आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भरभराट झाली.

"फ्रान्सचा हेन्री चौथा यानं लसणाचा बाप्तिस्मा केला. त्यानं भरपूर लसूण खाल्ला. त्यामुळे लसूण काही प्रमाणात लोकप्रिय झाला," असं रॉबिन चेरी म्हणतात.

त्या पुढे म्हणतात की, 19 व्या शतकात व्हिक्टोरियन काळातील इंग्लंडमध्ये लसूण आणखी लोकप्रिय झाला.

अमेरिकेत मात्र लसूण तसा काहीसा उशीराच आला. 1950 आणि 1960 च्या दशकात अमेरिकेत लसणाचा वापर होऊ लागला.

तिथे गेलेल्या स्थलांतरितांनी त्यांच्याबरोबर लसूणदेखील अमेरिकेत नेला. त्यामुळे नकारात्मक रुढी उलथवण्यास मदत झाली.

"खरं तर, लसूण शब्दाचा वापर ज्यू, इटालियन आणि कोरियन लोकांविरुद्ध अतिशय अपमानास्पद अर्थानं केला जात असे. त्यांना लसूण खाणारे असं उपहासानं म्हटलं जात असे. त्यामागे नकारात्मक अर्थ होता," असं रॉबिन चेरी म्हणतात.

औषध म्हणून लसणाचा वापर

सध्या जगभरात लसणाच्या 600 हून अधिक जाती आहेत. त्यातील काही जाती मध्य आशियातील उझबेकिस्तान आणि कॉकेशियन जॉर्जियामधील आहेत. त्या अलीकडच्याच काळात जगभरात उपलब्ध झाल्या आहेत.

आधुनिक अन्नपदार्थांमधील महत्त्वाचा घटक म्हणून वापर करण्याव्यतिरिक्त लसणाचा वापर सामान्यपणे सर्दीवर उपचार करण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी केला जातो.

लसूण

फोटो स्रोत, AFP via Getty Images

क्लिनिकल ट्रायल म्हणजे वैद्यकीय चाचण्यांमध्ये रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि अगदी कर्करोगावर उपचार करताना लसणाचा काय परिणाम होतो हे पाहिलं गेलं आहे. मात्र, त्यातून आलेले निष्कर्ष मिश्र स्वरुपाचे आहेत.

इराणमध्ये करण्यात आलेल्या एका छोट्या अभ्यासात आढळलं आहे की, लसूण आणि लिंबूचा रस यांचं सेवन केल्यानं सहा आठवड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

मात्र, अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात 200 निरोगी लोकांवर सहा महिन्यांच्या कालावधीत करण्यात आलेल्या एक मोठा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून आढळलं आहे की, लसणामुळे कोलेस्ट्रॉलमध्ये लक्षणीय घट होत नाही.

लसूण

फोटो स्रोत, Press Association

2014 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठात करण्यात आलेल्या एका अभ्यासात नोंद करण्यात आली होती कीस लसणामध्ये मोठ्या प्रमाणात अँटिमायक्रोबियल, अँटिव्हायरल आणि अँटिफंगल गुणधर्म आहेत.

"लसणामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, फॉस्फरस, झिंक, सल्फर आणि मध्यम प्रमाणात मॅग्नेशियम, मँगेनीज आणि लोह असतं. ती एक अद्भूत वनस्पती आहे," असं बाही वॅन डी बोर म्हणतात. त्या ब्रिटिश डाएटेटिक असोसिएशनचे प्रवक्ते आहेत आणि बालरोग आहारतज्ज्ञ आहेत.

"लसणामध्ये ॲलिसिन नावाचं अतिशय छान सल्फरयुक्त संयुग असतं. त्यात प्रीबायोटिक फायबर मोठ्या प्रमाणात असतात. ते आपल्या आतड्यांसाठी चांगलं असतं. त्यामुळे लसूण आपल्या आतड्यांसाठी, पचनक्रियेसाठी अतिशय उत्तम असतो. त्यात काही अँटिमायक्रोबियल गुणधर्मदेखील असतात," असं त्या म्हणतात.

त्या पुढे म्हणतात की, लसणामधील फायबरमुळे आतड्यांमधील जिवाणूंना पोषण मिळण्यास मदत होते. त्याचा बद्धकोष्ठता आणि पोटफुगी कमी करण्यास उपयोग होऊ शकतो.

दररोज लसणाच्या एक किंवा दोन कच्च्या पाकळ्या खाणं प्रौढांसाठी सुरक्षित मानलं जातं.

मात्र, अमेरिकन फॅमिली फिजिशियन या क्लिनिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधानुसार, लसूण अती प्रमाणात खाल्ल्यावर, विशेषकरून उपाशीपोटी खाल्ल्यास त्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या, पोटात गॅस होणं आणि आतड्यातील सूक्ष्मजीवांमध्ये बदल होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)