क्रूझपासून कोर्टापर्यंत: समीर वानखेडे विरुद्ध शाहरुख-आर्यन हा 'वाद' पुन्हा कसा सुरू झाला?

फोटो स्रोत, Getty Images/ANI
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या वेब सिरीजविरोधात एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
समीर वानखेडे यांनी हा दावा अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतर संबंधितांविरोधात दाखल केला आहे.
समीर वानखेडे यांचा आरोप आहे की, रेड चिलीजने निर्मिती केलेली आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली वेब सिरीज 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' मध्ये खोटे, द्वेषपूर्ण आणि मानहानीकारक माहिती दाखवण्यात आली आहे.
या याचिकेत समीर वानखेडे यांनी 2 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे, जी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलच्या ये कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी दान करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या वेब सिरीजमध्ये एक पात्र दाखवले गेले आहे, जे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासारखे दिसते आणि ते पात्र बॉलिवूडमधील लोकांच्या मागे लागलेले दाखवले आहे.
या पात्राची सोशल मीडियावर सिरीजच्या रिलीजनंतर खूप चर्चा झाली होती.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, चार वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर 2021 रोजी समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या टीमसह मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ शिपवर छापा टाकून आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती.
त्यांनी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा कट रचला होता, असा वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
समीर वानखेडे कोण आहेत?
आर्यन खानला अटक करणारे NCB चे अधिकारी समीर वानखेडे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत होते.
समीर वानखेडे 2008च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत. भारतीय महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये (Central Police Organization) रूजू झाले होते.
CPO मध्ये केंद्रीय गुप्तचर विभाग, सीबीआय (CBI), नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB), नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेंसी (NIA) यांसारखे विविध विभाग येतात.
त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास झाल्यानंतर समीर वानखेडे भारतीय महसूल सेवेत रुजू झाले.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त (Assistant Commissioner Customs) म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.
त्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीतही (NIA) त्यांनी काम केलंय.
ऑगस्ट 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याच वर्षी वानखेडे यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ठ तपासासाठीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
समीर वानखेडे मूळचे कुठले आहेत?
समीर वानखेडे यांचं कुटुंब मूळचं महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातलं आहे. रिसोड तालुक्यातील भरुणतोफा हे गाव वानखेडेंचं मूळ गाव.
समीर वानखेडे यांच्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. समीर वानखेडेंचे काका शंकरराव वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना "समीरच्या वडिलांचं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे," अशी माहिती दिली आहे.
समीर वानखेडे यांचे वडील महाराष्ट्र सरकारच्या अबकारी (State Excise) विभागात कामाला होते. साल 2007 मध्ये अबकारी खात्यातून वरिष्ठ निरीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडेंचं शिक्षण मुंबईत झालं. त्यांचे वडील 1970 च्या दशकात मुंबईत कामानिमित्त आले होते.
समीर वानखेडेंचं बॉलिवुड कनेक्शन काय?
समीर वानखेडेंवर नेहमीच बॉलीवूडला टार्गेट केल्याचा आरोप केला जातो. पण त्यांची दुसरी पत्नी क्रांती रेडकर या मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत. 2017 साली समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर यांचं लग्न झालं. बॉलिवूडविरोधात ड्रग्ज रॅकेट प्रकरणी मोहीम उघडल्यामुळे समीर वानखेडे पहिल्यांदा चर्चेत आले ते 2020 मध्ये.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवुडचं ड्रग्ज कनेक्शन एनसीबीच्या रडारवर आलं. बॉलिवूड आणि ड्रग्जची चर्चा सुरू असतानाच सुशांतची गर्लफेंड रिया चक्रवर्तीवर ड्रग्जप्रकरणी आरोप झाले.
एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली. त्यानंतर समीर वानखेडे यांनी आपला मोर्चा बॉलिवुडकडे वळवला. दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकूलप्रित सिंह आणि श्रद्धा कपूरची एनसीबीने कसून चौकशी केली. तर, प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक करण्यात आली होती.
बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने चौकशी केली. तर, टीव्ही सिरीयलची अभिनेत्री प्रतिका चौहानवर कारवाई करण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे म्हणतात, "गेल्यावर्षभरात एनसीबीने अनेक कारवाया केल्या. या कारवाया मीडियामध्ये झळकल्या. पण केस पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे."
नार्कोटिक्स कंट्रोल विभागाने ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयालाही अटक केली होती.
बीबीसीशी बोलताना समीर वानखेडे म्हणतात, "गेल्या वर्षभरात एनसीबीने मुंबईत 94 आणि गोव्यात 12 कारवाया केल्या आहेत. यामध्ये ड्रग्ज रॅकेटच्या 12 गॅंग पकडण्यात आल्या आहेत."
समीर वानखेडेंवर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी बॉलिवुडला टार्गेट केल्याचे आरोप झाले. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी त्यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला.
समीर वानखेडेंवर करण्यात येणाऱ्या आरोपांबद्दल बोलताना त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर म्हणतात, "समीर वानखेडे खंडणीवर विश्वास ठेवत नाहीत. ज्या व्यक्तीने विविध कारवायातून सरकारला कोट्यावधी रूपये मिळवून दिले. त्याला खंडणीची काय गरज?"
टॅक्स वसुली
समीन वानखेडे आणि वाद हे नातं तसं जुनचं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात कार्यरत असतानाही त्यांच्यावर बॉलिवुडला टार्गेट करण्याचे आरोप झाले होते.
एअरपोर्टवर सहायक आयुक्त असताना वानखेडे यांनी परदेशातून येणाऱ्या बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींवर कस्टम ड्युटी टाळल्याप्रकरणी कारवाई सुरू केली.
शाहरुख खानला 2011 मध्ये समीर वानखेडे यांच्या टीमने मुंबई एअरपोर्टवर थांबवलं. शाहरुख लंडनवरून भारतात परतत होता. परदेशातून आणलेल्या वस्तूंवर कर भरल्यानंतर शाहरूखला सोडण्यात आलं.
त्यानंतर मिनिषा लांबा, गायक मिका सिंग यांना कर चुकवल्याप्रकरणी समीर वानखेडे यांनी दंड ठोठावला होता.
कस्टम विभागात कार्यरत असताना समीर त्यांनी बॉलिवुड सेलेब्रिटींसह अनेकांवर कर चुकवल्याप्रकरणी कारवाई केली होती, असं त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर सांगतात.
"समीर यांनी आजवर कोट्यवधींचं सोनं पकडून दिलं. नाहीतर तेव्हाच सेटलमेंट केली असती," असं क्रांती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलंय.
2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपची ट्रॉफी मुंबई एअरपोर्टवर आली होती. ही ट्रॉफी सोन्याची होती. कस्टम ड्युटी भरल्यानंतरच ही ट्रॉफी सोडण्यात आली. समीर वानखेडे त्यावेळी कस्टम विभागात कार्यरत होते.
तुळशीदास भोईटे सांगतात, "कस्टममध्ये असताना बॉलिवुडवर कारवाई केली. आता एनसीबीमध्ये पुन्हा बॉलिवुड त्यांच्या टार्गेटवर आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित होणं सहजिकच आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











