कैलाश विजयवर्गीय ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूंबाबत नेमकं काय म्हणाले? त्यांची यापूर्वीची 5 वादग्रस्त वक्तव्यं

फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images
मध्य प्रदेशातील शाजापूरमधील एका कार्यक्रमात 25 सप्टेंबर 2025 रोजी मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
विजयवर्गीय यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, "त्यांच्यात संस्कारांचा अभाव आहे", असं म्हटलं होतं.
त्यानंतर काँग्रेसने त्यांनी माफी मागयला हवी असं म्हटलं होतं. कैलाश विजयवर्गीय हे 'महिलाविरोधी' असल्याचा आरोप पक्षानं यावेळी केला होता.
या घटनेच्या अवघ्या महिनाभरानंतर आता त्यांच्या आणखी एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंवर इंदूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेला त्यांनी दुर्दैवी असल्याचं म्हटलं. पण, त्याचबरोबर 'यात थोडासा निष्काळजीपणा झाला', असंही त्यांनी म्हटलं आहे.
कैलाश विजयवर्गीय यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटलं की, "कोणालाही न सांगता खेळाडूंनी तिथून अचानक निघून जाणं, ही चूक त्यांच्याकडून झाली. कारण त्यांना तिथं वैयक्तिक आणि पोलीस सुरक्षाही होती."
पुढे त्यांनी, "आता खेळाडूही यातून शिकतील की, जेव्हा आपण इतर कोणत्याही देशात किंवा शहरात जातो तेव्हा आपणही आपल्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे," असं वादग्रस्त वक्तव्यही केलं.
पण कैलाश विजयवर्गीय यांनी अशाप्रकारचं वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक वेळा त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधानं केली आहेत.

25 सप्टेंबर रोजी शाजापूरमधील एका सभेला संबोधित करताना त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या रॅलीवर भाष्य करताना म्हटलं होतं की, "आम्ही जुन्या संस्कृतीचे लोक आहोत, जुन्या काळात लोक त्यांच्या बहिणीच्या गावातील पाणीही पीत नव्हते, परंतु आजचे विरोधी नेते असे आहेत की ते त्यांच्या बहिणीचं चौकात चुंबन घेतात. हा संस्कारांचा अभाव आहे. हे परदेशातील संस्कार आहेत."
त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेससह अनेक लोकांनी टीका केली होती आणि हे विधान महिलाविरोधी असल्याचं म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images
या टीकेनंतर कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, "मी कोणत्याही नात्याच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही.
सर्व नातेसंबंध पवित्र असतात, तरी प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते आणि मी त्यासंदर्भातच बोलत होतो. मी म्हणालो होतो की, परदेशात असं असतं, मात्र इथं भारतात असं नसतं."

यावर्षी जून महिन्यात इंदूरमध्ये लोकांना संबोधित करताना कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं होतं की, "आपल्याकडे महिला देवीचं रूप असतात. त्यांनी खूप चांगले कपडे घालावेत, शृंगार करावा. मला तर छोटे कपडे घातलेल्या मुली आवडत नाहीत.

फोटो स्रोत, Getty Images
अनेक मुली माझ्यासोबत सेल्फी काढायला येतात तेव्हा मी त्यांना म्हणतो की, बेटा आधी चांगले कपडे घालून ये आणि नंतर काढ. मी त्यांना नकार देतो."
ते म्हणाले, "परदेशात कमी कपडे घालणाऱ्या मुलीला चांगलं मानलं जातं, पण आपल्या देशात चांगले कपडे, शृंगार आणि दागिने घालणाऱ्या मुलीला सुंदर मानलं जातं."

एप्रिल 2023 मध्ये, हनुमान जयंती आणि महावीर जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या एका समारंभातील कैलाश विजयवर्गीय यांच्या एका वक्तव्यानंतर बराच वाद झाला होता.
तेव्हा ते म्हणाले होते की, "जेव्हा मी रात्री सुशिक्षित तरुणांना नाचताना पाहतो, तेव्हा माझी इच्छा होते की मी खाली उतरून त्यांना पाच-सात लावून द्याव्यात, मग त्यांची नशा उतरेल.
मुलीही इतके घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात की, त्या देवीसारख्या दिसत नाहीत. त्या शूर्पणखासारख्या दिसतात."

त्यांच्या या विधानावर जोरदार टीका झाली होती. विजयवर्गीय त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रभारी होते.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा त्यावेळी म्हणाल्या होत्या की, "तुमचे विचार घाणेरडे आहेत. तुमची दृष्टी घाणेरडी आहे. आमच्या कपड्यांमुळे काही फरक पडत नाही."

जानेवारी 2013 मध्येही बलात्काराच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना कैलाश विजयवर्गीय यांनी केलेल्या विधानामुळं बराच वाद निर्माण झाला होता.
सततच्या टीकेनंतर भाजपला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.
माध्यमांशी बोलताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, "एकच शब्द आहे, मर्यादा. मर्यादेचं उल्लंघन झालं तर सीतेचं अपहरण होतं.
प्रत्येक व्यक्तीसाठी लक्ष्मणरेषा आखण्यात आली आहे. लक्ष्मण रेखेला कोणीही ओलांडलं तर रावण त्याच्यासमोर बसलेला आहे, तो सीतेला घेऊन जाईल."
आपल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर वाद वाढताना पाहून भाजपचे तत्कालीन प्रवक्ते रवीशंकर प्रसाद म्हणाले होते की, "पक्ष या विधानापासून स्वत:ला दूर ठेवतो आहे तसेच त्यांनी विजयवर्गीय यांना हे विधान मागे घेण्यास सांगितलं आहे."
कैलाश विजयवर्गीय म्हणाले होते की, "कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता."

आगामी विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत.
परंतु ऑगस्ट 2022 मध्ये नितीशकुमार यांनी भाजपसोबतची युती तोडली आणि बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासोबत (आरजेडी) सरकार स्थापन केलं होतं.
त्यानंतर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी केलेल्या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी म्हटलं होतं, "ज्या दिवशी बिहारमध्ये सत्ता परिवर्तन झालं, त्या दिवशी मी परदेशात होतो. तेव्हा एकानं म्हटलं होतं की, मुली जशा बॉयफ्रेंड बदलतात, तसंच बिहारचं राजकारण आहे. बिहारच्या मुख्यमंत्र्यांचीही हीच परिस्थिती आहे."
हा वाद वाढताना पाहून कैलाश विजयवर्गीय यांनी स्पष्ट केलं होतं की, "मी माझ्या मित्राचं विधान सांगितलं होतं. महिला आपल्यासाठी आदरणीय आहेत. आपल्या सर्वांना महिलांबद्दल खूप आदर आहे, किमान भारतीय महिलांबद्दल तरी."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











