You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनवणारे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 101 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी बनवलेल्या अनेक कलाकृती भारतात आणि जगभरात कौतुकाच्या विषय ठरल्या.
दिल्लीत संसद भवनातील शिल्पं राम सुतारांनी साकारलेली आहेत.
काही दिवसांपूर्वीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः रुग्णालयात भेट घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला होता.
राम सुतार यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे की "ज्येष्ठ शिल्पकार महाराष्ट्रभूषण, डॉ. राम सुतार यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना दूरध्वनी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना सांत्वना दिली."
राम सुतार यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरलेली दिसत आहे.
राम सुतार यांना श्रद्धांजली देताना फडणवीस म्हणाले, "वयाच्या 100 व्या वर्षी सुद्धा ते इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामात गुंतले होते. संसद भवन परिसरात सुद्धा त्यांनी तयार केलेले अनेक पुतळे आहेत.
"आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, आपले वारकरी संत अशा मोठ्या मांदियाळीच्या शिल्पांना आकार देण्याचे काम त्यांनी केले. या शिल्पांच्या माध्यमातून त्यांची कला शतकानुशतके आपल्या स्मरणात राहील आणि ते प्रत्येक शिल्प पाहताना त्यांचेच स्मरण होईल," असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राम सुतार यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली.
जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण
राम सुतार हे मुळचे धुळे जिल्ह्यातील होते. मुंबईतील जेजे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं. तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांनी स्वतःला शिल्पकलेला वाहून घेतलं.
त्यांनी घडवलेल्या महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याचंही खूप कौतुक झालं आहे. फ्रान्स, अमेरिका, इटली, अर्जेंटिना, रशिया, इंग्लंड, मलेशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, चीन, इजिप्त, पोलंड, दक्षिण आफ्रिका आणि इतर अनेक शहरांसह जगभरातील 450 हून अधिक शहरांमध्ये त्याची स्थापना करण्यासाठी निवड देखील झाली आहे.
त्यांच्याकडून शिल्पकला शिकण्यासाठी जगभरातील अनेक कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओला भेट दिली आहे. अनेकांनी त्यांच्या कलाकृतींची तुलना रोडिन आणि मायकेल एंजेलो यांच्या कौशल्याशी देखील केली आहे.
आज 'राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड' आणि 'राम सुतार फाइन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' या भव्य शिल्पं तयार करणाऱ्या त्यांच्या कंपन्यांची जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणना होते.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथे त्यांचा भव्य स्टुडिओ आहे.
जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची होती इच्छा
शालेय जीवनात असताना त्यांनी पहिल्यांदा 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'चे फोटो पाहिले होते तेव्हापासून त्यांना जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची खूप इच्छा होती.
दरम्यान, गुजरातमधील साधू बेट येथील सरदार सरोवर धरणावर स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थापित झाल्यानंतर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालंच.
522 फूट उंच असलेला सरदार वल्लभ भाई पटेल यांचा हा पुतळा जगातील सर्वात मोठा पुतळा मानला जातो.
दरम्यान, त्यांच्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राम सुतार यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
त्यांच्याप्रमाणेच त्यांचे चिरंजीव अनिल सुतार हे देखील एक शिल्पकार आहेत.
सध्या भारतात बनवल्या जाणाऱ्या अनेक सर्वात मोठ्या पुतळ्यांची निर्मिती ते करत आहेत. यात अयोध्येत प्रस्तावित 251 मीटर उंच भगवान रामाचा पुतळा देखील समाविष्ट आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)