सोशल मीडियावर मीम, पोस्ट करताय? त्यामुळं भविष्यात परदेश प्रवासात येऊ शकतात अशा अडचणी

    • Author, डॅनिएल सिफर्ट

सोशल मीडियावरील धोकादायक किंवा आक्षेपार्ह मानल्या जाणाऱ्या पोस्टमुळे आता व्हिसा नाकारला जाण्याची किंवा मोठ्या प्रमाणात ऑनलाइन टीका होण्याची शक्यता वाढत चालली आहे.

जगभरात पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे, ते या लेखातून जाणून घेऊयात.

गेल्या आठवड्यात, अमेरिकेच्या सरकारनं एक महत्त्वाची घोषणा केली. त्यानुसार आता, अमेरिकेत कोणत्याही व्हिसाशिवाय 90 दिवस प्रवास करता येण्यास पात्र असलेल्या डझनभर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या प्रवासी किंवा पर्यटकांच्या सोशल मीडियावरील 5 वर्षांच्या पोस्टची छाननी केली जाणार आहे.

या प्रस्तावातील विशिष्ट तपशील अद्याप समोर आलेले नसले, तरीदेखील हा नियम लागू होण्यापूर्वी त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अमेरिकन नागरिकांना काही आठवड्यांचा वेळ आहे. हा नवीन नियम 8 फेब्रुवारी 2026 ला लागू होणार आहे.

या नियमाबाबतच्या इतर माहितीबरोबरच, ईएसटीए या व्हिसामुक्त सुविधेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना आता त्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये वापरलेल्या ईमेल आयडींची माहिती द्यावी लागेल.

अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीत वाढ होण्याच्या अलीकडच्या काळातील ट्रेंडचं प्रतिबिंब या प्रस्तावात दिसतं.

या ट्रेंडनुसार अमेरिकेत येणारे प्रवासी किंवा पर्यटक यांच्या डिजिटल पाऊलखुणा म्हणजे त्यांच्या सोशल मीडियातील पोस्ट किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या कृतींचा वापर त्यांना अमेरिकेत येण्यापासून रोखण्यासाठी किंवा देशातून हद्दपार करण्यासाठी केला जाऊ शकतो.

यावर्षाच्या सुरुवातीला, नॉर्वेतील एका पर्यटकानं दावा केला की, त्याला अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला.

अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी त्याच्या फोनची तपासणी केली आणि त्यात त्यांना अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांचं एक मीम सापडलं होतं.

त्यानंतर या प्रवाशाला अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला होता.

अमेरिकेच्या कस्ट्म्स अँड बॉर्डर पेट्रोल (सीबीपी) यांनी हा दावा फेटाळला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, त्या नॉर्वेजियन व्यक्तीनं 'अमली पदार्थांचं सेवन केल्याचं कबूल केलं होतं'. त्यामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात आला होता.

सीबीपीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे, "अमेरिकेत येणाऱ्या व्यक्तीच्या येण्यामागच्या हेतूची खातरजमा केली जाते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी हा त्याचा अविभाज्य भाग आहे."

डोनाल्ड ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात पुन्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. तेव्हापासून ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत अमेरिकेच्या सीमा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

मात्र काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, नवीन योजनेमुळे अमेरिकेतील प्रवेशात एक अतिरिक्त अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे अमेरिकेत येणारे संभाव्य प्रवाशांना अमेरिकेत येण्यासाठी अडचण येईल.

सीमेवरील डिजिटल तपासणी

डोनाल्ड रॉथवेल, ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये कायद्याचे प्राध्यापक आहेत. ते आंतरराष्ट्रीय कायदेशीर बाबींवर नियमितपणे भाष्य करत असतात.

अमेरिकेत जाण्याबाबत सावध झालेल्या अनेक लोकांपैकी ते एक आहेत. कारण ते म्हणतात की, अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांचा अनुभव अधिकाधिक त्रासदायक, तणावपूर्व होत चालला आहे.

"सध्या 42 देशांमधील प्रवाशांना ईएसटीए प्रक्रियेअंतर्गत, अमेरिकेत व्हिसा मुक्त प्रवेश करता येतो. अशा प्रवाशांना सीमेवर फार कमी अधिकार असतात," असा इशारा ते देतात.

ते पुढे म्हणतात, "हे घडण्यामागचं अंशत: कारण म्हणजे व्हिसा माफी कार्यक्रमांतर्गत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांचे, सीबीपीच्या (कस्ट्म्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन) अधिकाऱ्यांनी घेतलेल्या विशिष्ट निर्णयांना आव्हान देण्याबाबत त्यांना मिळालेले काही अमेरिकन कायदेशीर अधिकार कमी होतात."

"त्यामुळे जर अमेरिकेच्या सीमेत आल्यावर एखादा परदेशी प्रवासी सीबीपीच्या सीमा अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीचं पालन करण्यात अयशस्वी ठरला, तर त्याला अमेरिकेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो."

ते प्रवाशांना सल्ला देतात की, अमेरिकेचं धोरण किंवा अमेरिकन व्यक्तींशी संबंधित असलेल्या बाबींबद्दल तुम्ही ऑनलाइन काय पोस्ट करता याबद्दल अत्यंत सावधगिरी बाळगा.

पुढचा विचार करता, रॉथवेलांना असं वाटतं की, डिजिटायझेशनचं प्रमाण वाढत गेल्यामुळे उच्च स्तरावर तपासणी होणं ही अधिक सामान्य बाब होईल. तसंच तिची अंमलबजावणी करणंदेखील सोपं होईल.

"जर प्रवास सीमाविरहित होणार असेल, तर साहजिकपणे प्रवाशांची अधिक डिजिटल माहिती गोळा केली जाईल," असं मत ते व्यक्त करतात.

ते पुढे म्हणतात, "अधिक माहिती गोळा केल्यामुळे प्रवाशाकडून कोणताही धोका नाही याची अधिकाऱ्यांना अधिक खातरजमा करता येईल. मला वाटतं की, अशाप्रकारचे निर्णय घेण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अधिक वापर होत असल्याचं आपल्याला दिसेल."

पोस्ट करण्यापूर्वी विचार करा

अशाप्रकारे पाळत ठेवणारा अमेरिका हा काही एकमेव देश नाही.

जगभरातील सरकारं प्रवासी, पर्यटकांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर जास्तीत जास्त लक्ष ठेवत आहेत.

एखादी व्यक्तीनं एखाद्या देशात प्रवेश केल्यानंतरच्या काळातदेखील त्या व्यक्तीच्या डिजिटल फुटप्रिंट्स त्याच्यासाठी अडचण निर्माण करू शकतात.

2018 मध्ये न्यूझीलंडनं असा कायदा लागू केला होता. त्यांचं म्हणणं होतं की, हा जगातील असा पहिला कायदा होता, ज्यामुळे सीमेशी निगडीत अधिकाऱ्यांना प्रवाशांचे फोन तपासणीचे अधिकार मिळाले.

जे प्रवासी त्यांच्या फोनचा पासवर्ड देणार नाहीत त्यांना मोठा दंडदेखील करण्याची तरतूद त्यात आहे.

संयुक्त अरब अमिराती (यूएई) तर याच्याही पुढे गेलं आहे. तिथले अधिकारी बदनामीकारक मजकूर पोस्ट करणाऱ्या किंवा अगदी रिपोस्ट करणाऱ्या परदेशी नागरिकांना ताब्यात घेऊ शकतात.

एका आयरिश व्यक्तीच्या बाबतीत मागील वर्षी असंच घडलं होतं. या व्यक्तीनं त्याच्या तिथल्या पूर्वीच्या मालकाविषयी एक नकारात्मक ऑनलाइन रिव्ह्यू दिला होता.

प्रवाशांकडून संभाव्य संवेदनशील कॉन्टेन्टचं अधिक प्रमाणात तयार होत असल्यामुळे यासंदर्भातील धोकादेखील वाढतो आहे.

व्हर्जिन मोबाईलनं ब्रिटिश प्रवाशांचा एक सर्व्हे केला. त्यात त्यांना आढळलं की, निम्म्याहून अधिक प्रवासी "सुट्टीच्या दिवशी फोटो न काढण्याची कल्पनाच करू शकत नाहीत."

साधारणपणे ते सोशल मीडियावर दर आठवड्याला 7 फोटो अपलोड करतात.

वास्तवदर्शी नसलेला प्रचंड आकर्षक असा कॉन्टेन्ट ज्यात फोटो आणि व्हीडिओ असतात, अशा कॉन्टेन्टच्या बाबतीत अनेक युजर्स एकमेकांशी स्पर्धा करू लागतात.

सर्व्हेतील 10 पैकी एकानं सांगितलं की, हॉलिडे सेल्फीसाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. यात डोंगराच्या काठावर उभं राहणं किंवा जंगली प्राण्यांसोबत पोस देण्याचा समावेश आहे.

यातील समस्या अशी आहे की, हे फोटो अनेकदा स्थानिक नियमांना लक्षात न घेता काढले जातात. त्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटते.

2022 मध्ये, एक रशियन इन्फ्लुएन्सर आणि तिच्या पतीला बालीतून हद्दपार करण्यात आलं होतं. त्यांनी एका पवित्र झाडाखाली नग्नावस्थेत फोटोशूट केल्यामुळे ही कारवाई झाली होती.

हे फोटो सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर लगेचच स्थानिक राजकारणी निलुह जेलान्टिक यांनी नागरिकांना या इन्फ्लुएन्सरची पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितलं होतं.

जेलान्टिक यांनी लिहिलं होतं, "गावकऱ्यांना तिथे शुद्धीकरण समारंभ करण्यासाठी जो खर्च येईल, त्याचा भार तिनं उचलला पाहिजे. टाकाऊ पर्यटक, घरी परत जा!"

अशा घटनांमुळे, सरकारांना जगभरात फिरणाऱ्या त्यांच्या नागरिकांना शिक्षित करण्यासाठी धावपळ करावी लागते. यात अनेक प्रवाशांना परदेशातील सतत बदलणाऱ्या सोशल मीडियाशी संबंधित शिष्टाचार, नियम किंवा सांस्कृतिक नियम अस्तित्वात असल्याची कल्पना नसते.

उदाहरणार्थ, कॅनडा सरकारच्या पोर्टलवर इशारा देण्यात आला आहे की, थायलंडमध्ये मद्यपानाला प्रोत्साहन देणं बेकायदेशीर आहे. तसंच सोशल मीडियावर मद्य हातात घेतलेले फोटो पोस्ट केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो.

गैरसमजांची व्याप्ती

सुचेता रावल प्रवासाविषयी बोलणाऱ्या एक वक्ता आहेत. तसंच त्या लहान मुलांसाठीच्या पुस्तिकांच्या लेखिका आहेत.

एखादी हॉलीडे पोस्ट किती वेगानं हाताबाहेर जाऊ शकते किंवा गंभीर वळण घेऊ शकते याचा अनुभव त्यांनी घेतला आहे.

गेल्या वर्षी त्या आफ्रिकेत एका ट्रिपवर गेल्या होत्या. त्यावेळेस त्यांची एक पोस्ट त्यांच्या एका कॉन्टॅक्टमधील व्यक्तीनं पाहिली. मग त्यानं ती रागानं शेअर केली.

त्या म्हणाल्या, "मी असंवेदनशीलपणे वागते आहे, असं मला वाटलं नव्हतं. मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, माझ्यावर आरोप करण्यात आले आणि माझ्याबद्दल शत्रुत्वाची भावना निर्माण झाली. त्यामुळे माझी उर्वरित ट्रिप अतिशय कठीण झाली. सर्वप्रकारचा कॉन्टेन्ट असुरक्षित असतो."

"मग ते तुम्ही व्यावसायिक स्वरुपात पोस्ट केलेलं असो की खासगी स्वरुपात. आजच्या काळात, एखादी कॉमेंट वेगळ्या संदर्भात घेणं किंवा तुम्ही सांगू इच्छित नसलेल्या मुद्द्यांमध्ये त्या गुंफणं ही काही फारशी कठीण गोष्ट नाही."

अशा काळात जेव्हा अधिकाधिक प्रवासी कॉन्टेन्ट क्रिएटर होत आहेत आणि दर महिन्याला कित्येक गिगाबाइट्सचा कॉन्टेन्ट पोस्ट करत असताना गैरसमज होण्याची शक्यता वाढत चालली आहे.

सुचेता रावल म्हणतात, "मी जेव्हा बीटो गोज टू जपान लिहत होते, तेव्हा मला जाणीव झाली की माझ्या फोटोंमधील अनेक सांस्कृतिक बारकाव्यांबद्दल मला जागरूक राहावं लागेल."

त्या नमूद करतात की, जिवंत व्यक्ती आणि मृतदेह यांच्यासाठी 'युकाटा' (उन्हाळी किमोनो) घालण्याची पद्धत वेगळी असते. तर शिंटो पूजास्थळाचं प्रवेशद्वार असलेल्या टोरी गेटकडे पाठ करून उभं राहणं हे अनादराचं मानलं जातं.

प्रवास किंवा पर्यटनातील फोटोग्राफी अधिकाधिक दिखाऊपणाची होत चालली असल्यामुळे लाखो लोक स्थानिक पोशाख घालून किंवा धार्मिक स्थळांना भेट देत सेल्फी काढतात. असे फोटो ऑनलाइन पोस्ट होण्याआधीच याप्रकारच्या चुकांमुळे आसपासच्या लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.

संदर्भ हाच सर्वात महत्त्वाचा

अनेकदा, अशा घटनांमागे वाईट भावना नसते, तर सांस्कृतिक नियमांविषयीची अनभिज्ञता हेच कारण असतं.

उदाहरणार्थ, इतर आशियाई देश आणि पश्चिम आशियातील देशांसह जपान हा 'हाय-कॉन्टेक्स्ट सोसायटी' उदाहरण आहे. म्हणजे इथे थेट शब्दांऐवजी देहबोली, नातेसंबंध आणि प्रतिकात्मक हावभाव या गोष्टींना अधिक महत्त्व असतं.

या विषयावरील एका भाषणात आंतरसांस्कृतिक संवाद तज्ज्ञ एरिन मेयर स्पष्ट करतात की, अशा संस्कृतींमध्ये संवाद हा "अधिक अप्रत्यक्ष स्वरुपात किंवा बहुस्तरिय किंवा सूक्ष्म स्वरुपाचा असतो."

इथे बऱ्याच गोष्टी प्रतिकात्मक हावभाव किंवा सूचित स्वरुपाच्या संवादातून सांगितलं जातं.

तर 'लो कॉन्टेक्स्ट सोसायटी' म्हणजे जिथे थेट शाब्दिक संवादाला प्राधान्य असतं. अशा ठिकाणाहून आलेले प्रवासी किंवा पर्यटकांना अशा प्रकारच्या अप्रत्यक्ष संवादामुळे संभाव्य अशिष्टता वाटू शकते किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते.

जिथे तुम्ही शब्द टाळले तरीदेखील तुम्ही गैरसमज होण्यापासून टाळू शकालच असं नाही. आजच्या काळात सोशल मीडियावरील पोस्टमध्ये जोडण्यासाठी असंख्य इमोजींचा पर्याय उपलब्ध आहे.

अशावेळी परदेशी फळांच्या बाजारात टरबूजाचा चिन्ह असलेला एक साधा व्हीडिओ अपलोड केल्यास त्यातून काही दर्शक सहजपणे दुखावले जाऊ शकतात.

त्यांना हा व्हीडिओ ज्यूविरोधी भावना किंवा कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांच्या विरोधातील वर्णद्वेषी रुढीवादी विचार वाटू शकतो.

याचा अर्थ असा नाही की पर्यटकांनी टीका होण्याच्या भीतीनं स्वत:ला पूर्णपणे आवर घालावा किंवा बंधनात अडकवून घ्यावं.

त्याऐवजी, अधिक सजगपणे, जागरुकपणे पोस्ट कराव्यात. सोशल मीडियाच्या अल्गोरिदम किंवा तिथल्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी, संख्येऐवजी गुणवत्तेला अधिक प्राधान्य देणं हे अधिक योग्य ठरू शकतं.

सुचेता रावल पुढे म्हणतात, "तुमच्या अवतीभोवतीच्या परिस्थितीबद्दल पूर्णपणे जागरुक राहूनच अनेकदा सजगता, जाणीव निर्माण होते. तुमच्या आजूबाजूचे लोक कसे कपडे घालतात, बोलतात, वागतात याचं निरीक्षण करा आणि त्यांच्यात शक्य तितकं मिसण्याचा प्रयत्न करा. तुम्ही पर्यटक आहात, म्हणून स्थानिक लोकांशी ते एखादी वस्तू असल्यासारखं वागू नका."

हे सर्व केल्यामुळे तुमची ट्रिप, प्रवास अधिक सुरक्षित आणि अधिक अर्थपूर्ण होईलच. त्याचबरोबर हा असा प्रवास ठरेल जिथे तुम्ही सांस्कृतिक ठिकाणांना फक्त वस्तू म्हणून वापरण्याऐवजी त्यांच्याशी आदरानं जोडलं जाता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.