72 हजार वर्षे जुनी कवटी, 13 हजार वर्षे जुना दात; नामशेष झालेल्या डायरवुल्फचा जन्म कसा झाला?

फोटो स्रोत, Universal Images Group via Getty Images
कोलोसल बायोसायन्सेस या अमेरिकेतल्या कंपनीनं एप्रिल 2025 मध्ये एक 17 सेकंदांचा व्हीडिओ पोस्ट केला. त्यात लांडग्याची दोन लहानशी पिल्लं दिसतात.
पांढुरक्या रंगाची ती पिल्लं कोलोसल बायोसायन्सेस नावाच्या जेनेटिक इंजिनियरिंग करणाऱ्या कंपनीनं तयार केली आहेत.
त्यांची नावं आहेत रेम्युलस आणि रीमस.
या नावाच्या दोन वीरांचा सांभाळ एक लांडग्याच्या मादीनं केला होता आणि पुढे जाऊन त्या दोघांनीच रोम शहर स्थापन केलं.
रेम्युलस आणि रीमस नावाची ही पिल्लं तयार करण्यासाठी हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेल्या डायरवुल्फ प्रजातीच्या डीएनएचा वापर करण्यात आला.
हा सगळा प्रकार काहीसा ज्युरासिक पार्क सिनेमाची आठवण करून देणारा आहे. त्यावरून वादही सुरू झाला आहे. मुळात हे योग्य आहे की अयोग्य, अशी चर्चा सुरू आहे. मग प्रजाती नामशेष होणं आता थांबेल का? याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात.
भूतकाळ पुन्हा जिवंत करण्याचे प्रयत्न
तुम्ही 'गेम ऑफ थ्रोन्स' ही सीरिज पाहिली असेल, तर त्यात डायरवुल्फ दाखवले आहेत. पण ज्यांनी ही मालिका पाहिलेली नाही, त्यांना डायरवुल्फविषयी माहिती नसेल.
डायरवुल्फ ही हिमयुगातल्या काळातली लांडग्यांची एक प्रजाती असल्याचं डॉक्टर बेथ शपिरो सांगतात. त्या कोलोसल बायोसायन्सेस कंपनीमध्ये मुख्य सायन्स ऑफिसर आहेत.
डॉ. शपिरो म्हणतात की, डायरवुल्फ ही लांडगा, कोल्हा आणि कुत्र्यांच्या जातकुळीतील प्रजाती आहे. जीवाष्मशास्त्रज्ञांच्या मते डायरवुल्फचा सर्वात जुना जीवाष्म हा जवळपास अडीच लाख वर्षांपूर्वीचा आहे. हे प्राणी त्या काळात आजच्या उत्तर अमेरिकेत राहायचे आणि शेवटच्या हिमयुगाच्या अखेरीस म्हणजे जवळपास बारा हजार वर्षांपूर्वी डायरवुल्फ नामशेष झाले.
खरंतर अशा नामशेष प्रजातींचं क्लोनिंग होऊ शकणार नाही, असं बेथ शिपरो यांनीच 2015 साली एका पुस्तकात लिहिलं होत. पण नव्या संशोधनानं त्यांचं मत बदललं.
बेथ सांगतात की, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या कंपनीच्या बैठकीत अशा कोणत्या प्रजातींना पुनरुज्जीवीत करता येईल यावर चर्चा झाली. यावेळी यातील तांत्रिकता, पारिस्थिती आणि नैतिक बाबींचा विचारही करण्यात आला. अखेर डायरवुल्फची निवड करण्यात आली.
त्या माहिती देतात की, या प्राण्याचा जिनोम म्हणजे डीएनएचा पूर्ण सेट मिळवण्याचे प्रयत्न सुरू केल्यानंतर 18 महिन्यांमध्ये रेम्युलस आणि रीमस यांचा जन्म झाला. सुरुवातीला डायरवुल्फचा डीएनए मिळवण्यात आला.
डॉक्टर बेथ शपिरो म्हणाल्या, "आम्हाला डायरवुल्फची 72 हजार वर्ष जुनी कवटी आणि 13 हजार वर्ष जुना दात सापडला, ज्यातून डीएनए मिळवण्यात आला. या दोन्हीचा वापर करून डायरवुल्फचा पूर्ण जिनोम सिक्वेन्स तयार करण्यात आला."
मग जिनोम सिक्वेन्सची तुलना डायरवुल्फचा जवळचा नातेवाईक असलेल्या ग्रे वूल्फ जातीच्या लांडग्याच्या जिनोमसोबत करून पाहण्यात आली.

फोटो स्रोत, Colossal Biosciences
डॉ. बेथ शपिरो सांगतात की, त्यांनी जिनोममध्ये काही बदलही केले, जेणेकरून प्राचीन डायरवुल्फशी सर्वाधिक साधर्म्य असलेली प्रजाती तयार होईल.
प्रयोगाच्या शेवटच्या टप्प्यात ग्रेवुल्फच्या पेशींमध्ये डायरवुल्फचा डीएनए टाकण्यात आला आणि भ्रूण तयार केले.
मग या भ्रूणांना विकसित करण्यासाठी पाळीव कुत्रीचा सरोगेटसारखा वापर करण्यात आला. म्हणजे तिच्या गर्भाशयात हे भ्रूण सोडण्यात आले आणि मग सिझेरियन सेक्शन शस्त्रक्रियेद्वारा पिल्लांचा जन्म झाला.
सरोगेट म्हणून ग्रेवुल्फचा वापर न करता कुत्र्यांचा वापर का झाला, याविषयी विचारलं असता डॉ. बेथ शपिरो सांगतात की, कुत्र्यांविषयी आपल्याकडे अधिक माहिती आहे आणि सरोगेट म्हणून असा वापर करण्याचा अनुभवही आहे. शिवाय कुत्रासुद्धा ग्रे वुल्फपासूनच विकसित झाला आहे. पण डायरवुल्फची पिल्लं प्रत्यक्षात काय आहेत आणि काय नाहीत, यावरही चर्चा होते आहे.
त्या पुढे म्हणाल्या, "हे अगदी सेम टू सेम डायरवूल्फ नाहीत, हे खरं आहे. आम्ही त्यांना डायरवुल्फ म्हणत नाहीयेत, पण त्यांना प्रॉक्सी डायरवुल्फ किंवा कोलोसल डायरवुल्फ म्हणता येईल. आम्हाला त्यांच्यात ग्रेवुल्फचे काही गुणधर्मही आढळून आले आहेत."
लांडग्यांची दोन पिल्लं ऑक्टोबर 2024 मध्ये जन्माला आली होती आणि तिसरं पिल्लू यंदा जानेवारीमध्ये जन्माला आलं.
डॉ. बेथ शपिरो स्पष्ट करतात की, या पिल्लांना जंगलात सोडलं जाणार नाही. त्यांना संरक्षित जागी ठेवलं जाणार आहे. तसंच या पिल्लांचा प्रजननासाठी वापर केला जाणार नाही, असंही कंपनीनं स्पष्ट केलं.
हे प्राणी कसे मोठे होतात हे समजून घेणं, त्यांचा अभ्यास करणं आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं यावर भर देणार असल्याचं त्या सांगतात.
या तंत्रज्ञानाचा वापर करून सध्या नामशेष होण्याच्या मार्गावरील प्रजातींचं संरक्षणही करता येईल.
डॉ. बेथ शपिरो सांगतात की, अशा प्रजातींचं संरक्षण अत्यंत गरजेचं आहेच, पण सोबतच विज्ञानाचा वापर करून जगात जैवविविधताही कायम ठेवता येईल.
मुळात प्रजाती नामशेष म्हणजे विलुप्त कशा होतात?
डॉ. डॅनियल पिंचेरा डोनोसो युकेमधल्या बेलफास्ट इथल्या क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्ये इव्होल्यूशनरी बायॉलॉजी म्हणजे उत्क्रांतीशी निगडीत जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
त्यांच्या मते पृथ्वीवरचा जीवनाचा इतिहास पाहिला तर गेल्या 3.7 अब्ज वर्षांमध्ये जेवढ्या काही प्रजाती तयार झाल्या, त्यातल्या 99 टक्क्यांहून अधिक नामशेष झाल्या आहेत.
डॉ. डॅनियल पिंचेरा डोनोसो म्हणतात, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या पृथ्वीवर असलेल्या प्राण्यांपैकी 48 टक्के प्रजातींमध्ये संख्येच्या बाबतीत घट होते आहे. म्हणजे ज्या प्रजाती सुरक्षित वाटत आहेत, त्यांची संख्याही घटते आहे आणि ती अशीच घटत राहिली, तर पुढच्या काही दशकांमध्ये या प्रजाती नामशेष होतील."
काहीवेळा प्रजातींची आंशिक विलुप्तीही पाहायला मिळते. म्हणजे ती प्रजाती जगाच्या काही भागांतून नामशेष होते, पण दुसऱ्या एखाद्या भागात टिकून राहते.
पण अशी प्रजाती सगळीकडे नष्ट होते, तेव्हा ती नामशेष झाली म्हणजे विलुप्त झाली, असं मानलं जातं.
प्राणी नामशेष होण्यामागे अनेक कारणं असल्याचं डॉ. डॅनियल पिंचेरा डोनोसो सांगतात.
उदाहरणार्थ, शिकारीचा अतिरेक किंवा अधिवासावर दुसऱ्या प्राण्यांनी कब्जा करणं वगैरे. तसंच एखाद्या प्रजातीचा प्रजनन दर संथ असू शकतो.
शास्त्रज्ञांनी पृथ्वीवर अशा पाच घटना शोधल्या आहेत, ज्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात सजीव प्रजाती नामशेष झाल्या. यालाच मास एक्सटिंक्शन किंवा महाविलुप्ती म्हणून ओळखलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. डॅनियल पिंचेरा डोनोसो म्हणतात, "या आधीच्या महाविलुप्तीच्या घटना या ज्वालामुखी उद्रेक किंवा अशनी पृथ्वीवर आदळणे, अशा नैसर्गिक कारणांमुळे घडल्या आहेत. उदाहरणार्थ-मेक्सिकोमध्ये अशनी कोसळल्यामुळे डायनोसॉर नष्ट झाले."
ती घटना जवळपास 6.5 कोटी वर्षांपूर्वी घडली होती. अशाच प्रकारच्या घटनेत 20.5 कोटी वर्षांपूर्वीही पृथ्वीवरच्या 90 टक्के प्रजाती नामशेष झाल्या होत्या.
महाविलुप्तीच्या पाच घटनांची नेमकी कारणं समजलेली नाहीत. पण आता आपण सहाव्या महाविलुप्तीच्या जवळ पोहोचलो आहोत.
डॉ. डॅनियल पिंचेरा डोनोसो स्पष्ट करतात की, एखाद्या घटनेनं कमीत कमी 70 टक्के प्रजाती नष्ट होतात, त्याला मास एक्स्टिंक्शन किंवा महाविलुप्ती म्हटलं जातं.
ते सांगतात की, जैवविविधता वेगानं घटते आहे आणि आपण महाविलुप्तीच्या काळाकडे वेगानं वाटचाल करतो आहोत. महाविलुप्तीच्या काळानंतर पृथ्वीवर जीवनच बदलून जाईल. पण नेमकी कोणत्या प्रजातींवर विलुप्तीची टांगती तलवार आहे?
डॅनियल पिंचेरा डोनोसो म्हणाले, "अनेक मोठ्या सस्तन प्राण्यांवर नामशेष होण्याचं संकट ओढवू शकतं. जसं की व्हेलच्या काही प्रजाती किंवा अफ्रिकेतले काही मोठे सस्तन प्राणी. पण सर्वात मोठं संकट कुणावर आलं असेल, तर ते म्हणजे बेडकाच्या काही प्रजाती."
"हवामान बदल, अधिवासावर आक्रमण आणि आजार अशा कारणांमुळे बेडकांसारखे उभयचर प्राणी इतर प्राण्यांच्या तुलनेत फार वेगानं नष्ट होत आहेत. त्यांच्या अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत आणि अनेक विलुप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत."
"कोणतीही प्रजाती नामशेष झाल्यानं एक चेन रिअक्शन सुरू होते. आणि त्या प्रजातीशी निगडीत अन्य प्रजातीही नामशेष होऊ लागतात. एखाद्या कारच्या इंजिनाला कसे अनेक भाग असतात, पण त्यातला एक छोटासा स्क्रू निखळलल्यानंही ते इंजिन बंद पडू शकतं. तसंच काहीसं आहे हे."
नामशेष प्रजातींचं पुनरागमन
टोरिल कोर्नफेल्ट विज्ञान पत्रकार आहेत आणि त्यांनी जीन एडिटिंगवर, जीनच्या पुनरर्चनेवर पुस्तकंही लिहिली आहेत.
त्या सांगतात की, जीन एडिटिंगच्या मदतीनं नष्ट झालेल्या प्रजातींचं पुनरुज्जीवन करण्यासाठी जगभरात किमान 10 प्रकल्प काम करत आहेत.
टोरिल कोर्नफेल्ट पुढे म्हणाल्या, "काही प्रकल्प हजारो वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या मॅमथसारख्या प्राण्यांना पुन्हा उभं करण्यासाठी काम करत आहेत, तर काही प्रकल्प अगदी अलीकडच्या काही काळात नामशेष झालेल्या किंवा सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांची पुन्हा पैदास करण्यावर भर देत आहेत."
"ज्या प्राण्यांविषयी माणसाला नेहमी आकर्षण वाटत आले आहे, अशा प्रजातींना पुन्हा जन्म देण्याचे प्रयत्न होत आहेत. उदाहरणार्थ, मॅमथ, डायरवुल्फ किंवा अमेरिकेतील पॅसेंजर पिजन तसेच उत्तरी सफेद गेंडा म्हणजे नॉर्दन व्हाईट ऱ्हायनो, जो आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे."
"पण विज्ञानाच्या मदतीनं एक लाख सफेद गेंड्यांची पैदास करून त्यांना जंगलात सोडलं तरी आठवड्याभरातच अवैध शिकारी त्यांची शिकार करतील. खरंतर शिकारीमुळेच हे प्राणी नामशेष होतायत, पण त्या प्रश्नावर तोडगा काढला जात नाही."

फोटो स्रोत, Getty Images
विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्रांतीकारी बदलांमुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य झाल्या आहेत. पण हे काम तेवढं सोपंही नाही.
टोरिल कोर्नफेल्ट म्हणतात, "बर्फामध्ये गोठून गेलेला मॅमथ जरी मिळाला, तरी त्याच्या डीएनएचं बरंच नुकसान झालेलं असतं. त्याची पुनर्रचना करायची, म्हणजे ते एखाद्या कादंबरीची अनेक फाटलेली पानं जोडून ती वाचण्यासारखं काम आहे."
"1980 च्या दशकात डीएनएची पुनर्रचना करून अभ्यास करण्याचं तंत्र विकसित झालं. पण 1990 च्या दशकात डॉली नावाच्या मेंढीचा जन्म झाला, जिला क्लोनिंग करून तयार करण्यात आलं होतं. म्हणजे ती दुसऱ्या एका मेंढीची सेम टू सेम कॉपी होती. पण असं क्लोनिंग करण्यासाठी जीवंत पेशी मिळणं गरजेचं असतं."
2012 साली 'CRISPR-Cas9' (क्रिस्पर कॅस नाईन) हे नवं जीन एडिटिंग तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं. त्याच्या मदतीनंच कोलोसल बायोसायन्सेसनं डायरवुल्फची पिल्लं जन्माला घातली.
टोरिल कोर्नफेल्ट सांगतात की, या तंत्रज्ञानामुळे जीन एडिटिंगमध्ये क्रांतीकारक बदल झाले आहेत, ते अगदी अचूकपणे करता येणं शक्य झालं आहे.
संवर्धनच नाही, तर कृषीविज्ञान क्षेत्रातही 'CRISPR-Cas9'चा वापर केला जातो आहे. या तंत्रज्ञानामुळे नामशेष झालेल्या प्रजातींचं पुनरुज्जीवन करण्याचं स्वप्नही सत्यात उतरू शकतं. पण मुळात लोक असं स्वप्न का पाहात आहेत?
मला वाटतं याचं कारण आहे विज्ञानाविषयीची जिज्ञासा. गोष्टींवर प्रयोग करून एखादी गोष्ट आणखी चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याच्या याच जिज्ञासेमुळे जगात अनेक चांगल्या गोष्टींचा शोध लागला आहे आणि त्यामुळे फायदाच झाला आहे. पण या प्रयोगांमुळे नैतिकतेशी निगडीत प्रश्नही निर्माण झाले आहेत.
डीएक्सटिंक्शनची दुविधा
डॉ. जे ओडेनबो अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यात लुईस अँड क्लार्क कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफी आणि ह्युमॅनिटीजचे प्राध्यापक आहेत. ते प्रश्न विचारतात की, जीनएडिटिंग अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे, पण ते वापरून डीएक्सटिंक्शन म्हणजे नामशेष झालेल्या प्रजातींचं पुनरुज्जीवन करणं हा आपण देव बनण्याचा प्रयत्न तर नाही ना?
डॉ. जे ओडेनबो पुढे म्हणतात, "एक फिलॉसॉफर म्हणून आम्हाला यात फायदे आणि तोटे पडताळून पाहावे लागतात. सोबतच याच्या बाजूनं आणि विरोधात काय म्हटलं जातंय याचं विश्लेषण करावं लागतं. नामशेष प्रजातींचं पुनरुज्जीवन हा नैतिकतेचा मुद्दा आहेच. पण याचे साईड इफेक्ट्सही आहेत."
एक चिंता व्यक्त केली जाते आहे की, यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांच्या रक्षण आणि संवर्धनाला लोकांचा असलेला पाठिंबा कमी होईल.
डॉक्टर जे ओडेनबो यांच्या मते, "असंही होऊ शकतं की एखादी प्रजाती लुप्त झाली तरी ती पुन्हा निर्माण करता येईल असं लोकांना वाटू शकतं. आधी असं मानायचे की प्राणी नामशेष झाल्यावर ते पुन्हा परतत नाहीत. पण आता हा विचार बदलू शकतो. त्यामुळे लोकांना संवर्धनाच्या प्रयत्नांकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं वाटू लागेल."

फोटो स्रोत, Getty Images
कोणत्या प्रजातीचं पुनरुज्जीवन करायचं आणि कोणाचं नाही, हे कसं ठरवणार हाही प्रश्नच आहे.
डॉ. जे ओडेनबो सांगतात की, मॅमथ सारखे प्राणी पुन्हा निर्माण करण्यामागे एक कारण दिलं जातं की हे प्राणी झाडं पाडायचे आणि बर्फ पायाखाली तुडवायचे. त्यामुळे थऱ्माफ्रॉस्ट म्हणजे गोठलेलं बर्फ वितळण्याचं प्रमाण कमी होतं आणि पर्यावरणासाठी ते फायद्याचं ठरू शकतं.
पण ज्या प्राण्यांच्या प्रजातींना पुन्हा जन्माला घातलं जातंय, त्या अगदी मूळ प्राण्यासारख्या जशाच्या तशा नाहीत. तर त्यांच्याशी मिळत्याजुळत्या प्रजाती आहेत.
तसं झालं तर मूळ उद्देश साध्य होणार नाही. तसंच या प्राण्यांचं जीवन एकाकी ठरू शकतं.
डॉ. जे ओडेनबो म्हणाले, "जेनेटिक एडिटिंगद्वारा तयार केलेले हे प्राणी मूळ प्राण्यांसारखे आहेत की नाहीत याविषयी लोकांना उत्सुकता वाटते. त्यामुळे मग या प्राण्यांना संरक्षित पिंजऱ्यात ठेवलं जाईल."
"ते प्रजनन करू शकणार नसतील, तर तेही लुप्त होऊन जातील. त्यामुळे मला वाटतं की, असे प्रकल्प केवळ कुतुहलापोटी चालवले जातायत, संवर्धनासाठी नाही. हे काम खासगी कंपन्या करत आहेत आणि इतर शास्त्रज्ञ हे प्रयोग पाहू शकत नाहीत."
डायरवुल्फच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पासाठीचं संशोधन अकॅडमिक मासिकाद्वारा समीक्षेसाठी पाठवलं जाईल, असं कोलोसल बायोसाइंसेसनं एप्रिल 2025 मध्ये जाहीर केलं. पण ते प्रकाशित व्हायला अनेक महिने जातील.
आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूयात. प्रजाती नामशेष होणं आता थांबलं आहे का? अजिबात नाही. कोलोसल बायोसायंसेसनं तयार केलेली डायरवुल्फची पिल्लं 100 टक्के डायरवुल्फ नाहीत.
पण हा प्रयोग म्हणजे डीएक्सटिंक्शनच्या दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल नक्कीच आहे आणि कदाचित हे संवर्धनाचं माध्यमही ठरू शकतं.
पण केवळ एका नामशेष प्राण्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी बरीच मेहनत आणि पैसा लागतो. सोबतच त्यात काय योग्य काय अयोग्य असे नैतिकतेचे मुद्देही आहेत. लांडग्यांची डायरवुल्फ प्रजाती अजूनही विलुप्तच आहे आणि अनेक प्रजातींवर असलेला नामशेष होण्याचा धोकाही कायम आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











