IPO म्हणजे काय? यामध्ये पैसे गुंतवताना कोणत्या 5 गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?

आयपीओ

फोटो स्रोत, Getty Images

अनेक गुंतवणूकदारांना इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ ही झटपट नफा मिळवण्याची संधी वाटते.

परंतु, प्रत्येक आयपीओ सोन्याची खाण ठरत नाही. निर्णय घेण्यात चूक झाल्यास नफ्याऐवजी तोटाही होऊ शकतो. म्हणून आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणारे लोक नेहमी मोठ्या आणि नामांकित कंपन्यांच्या आयपीओची नेहमीच वाट पाहत असतात.

तसेच, ज्यांना जास्त जोखीम घेणं आवडतं ते लोक कमी कालावधीत जास्त नफा मिळवण्यासाठी आयपीओमध्ये पैसे गुंतवतात.

परंतु, आयपीओमध्ये गुंतवणूक करणं नेहमीच फायदेशीर ठरतं असं नाही. अनेकवेळा शेअरची लिस्टिंग त्याच्या किंमतीच्या बँडपेक्षा कमी दरात होते, ज्याला डिस्काउंट लिस्टिंग म्हणतात.

अशावेळी काही प्रमाणात तोटा सहन करावा लागू शकतो. काही वेळा शेअर खूप काळ किंमतीच्या बँडपेक्षा खाली राहतो, ज्यामुळे शेअर विकताना तोटा सहन करावा लागतो.

आयपीओमध्ये पैसे गुंतवताना पुढील पाच गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात.

1) कंपनीचं प्रोफाइल अवश्य तपासा

जेव्हा एखादी कंपनी बाजारातून पैसे उभारण्यासाठी आयपीओ आणते, तेव्हा सर्वप्रथम तिची माहिती आणि उद्दिष्टं पाहणं गरजेचं असतं.

अनेक मोठ्या कंपन्या आयपीओ येण्यापूर्वी बाजारात मोठा गाजावाजा करतात, परंतु नंतर शेअरची किंमत घसरल्याने गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागू शकतो.

रिलायन्स पॉवर आणि पेटीएमचे आयपीओ हे याचे प्रमुख उदाहरण आहे. फेब्रुवारी 2008 मध्ये जेव्हा रिलायन्स पॉवरचा आयपीओ आला, तेव्हा ग्रे मार्केटमध्ये त्या शेअरची किंमत 80 टक्क्यांनी वाढली होती.

परंतु शेअर बाजारात लिस्टिंगच्या दिवशी त्याची किंमत 17 टक्क्यांनी कमी झाली होती.

बीएसईमध्ये कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नोव्हेंबर 2021 मध्ये पेटीएमचा आयपीओ आला होता. लिस्टिंगच्या दिवशी बीएसईमध्ये कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी बेल वाजवली.

हा भारतातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि अपयशी ठरलेल्या आयपीओपैकी एक मानला जातो. आजही आर पॉवरचा शेअर, आयपीओच्या वेळी असलेल्या किंमतीपेक्षा सुमारे 85 टक्क्यांनी कमी दरात आहे.

अशाच प्रकारे नोव्हेंबर 2021 मध्ये पेटीएमचा आयपीओ आला होता. मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्यानंतरही त्याची लिस्टिंग 9 टक्क्यांनी कमी दरात झाली आणि शेवटी तो इश्यू किंमतीपेक्षा 27 टक्क्यांनी कमी किमतीत बंद झाला.

त्यामुळे बाजारात निर्माण होणाऱ्या प्रचाराकडे किंवा गाजावाजाकडे दुर्लक्ष करून खरी परिस्थिती लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे.

2) आयपीओ का आणला जातोय हे जाणून घ्या

बहुतेक छोट्या गुंतवणूकदारांकडे कंपनीबद्दल पुरेशी माहिती नसते, त्यामुळे ते इतरांना पाहून आयपीओमध्ये पैसे गुंतवतात. कंपनीचं नाव मोठं आणि प्रसिद्ध असल्यामुळे तिचा आयपीओ नक्की चांगला असेल, असं समजूनही अनेकजण गुंतवणूक करतात.

काही कंपन्या आपल्या व्यवसायाचा विस्तार, वाढ किंवा विलीनीकरणासाठी आयपीओमधून मिळालेल्या पैशांचा वापर करतात. म्हणूनच गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीची नीट माहिती घ्या आणि मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्या.

गुंतवणूक तज्ज्ञ गुंजन चोक्सी

फोटो स्रोत, Gunjan Choksi

फोटो कॅप्शन, गुंतवणूक तज्ज्ञ गुंजन चोक्सी म्हणतात की, दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांनी कंपनीच्या मूल्यांकनाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.

अहमदाबाद येथील इन्व्हेस्टअलाइन प्रा. लि.चे सीइओ गुंजन चोक्सी बीबीसीशी बोलताना म्हणाले की, आयपीओ आणणारी कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते आणि त्या क्षेत्रातील इतर स्पर्धक कंपन्यांची कामगिरी कशी आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे.

ते म्हणतात, "अनेक वेळा आयपीओ हा ऑफर-फॉर-सेल (ओएफएस) प्रकारचा असतो, ज्यात आधीचे गुंतवणूकदार कंपनीमधून बाहेर पडण्यासाठी शेअर्स विकतात. अशा वेळी सावध होणं गरजेचं आहे. कारण ज्या गुंतवणूकदारांनी कंपनी उभी केली, तेच जर यातून बाहेर पडत असतील, तर सामान्य गुंतवणूकदारांना त्यातून वाढ कशी मिळणार?" असा सवालही त्यांनी केला.

3) कंपनी भांडवल कुठे वापरणार आहे?

जेव्हा कंपन्या गुंतवणूकदारांकडून भांडवल उभा करतात, तेव्हा ते भांडवल कुठे वापरणार आहेत हे जाणून घेणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीवर मोठं कर्ज असेल आणि ती ते फेडण्यासाठी आयपीओ आणत असेल, तर अशा कंपनीत गुंतवणूक टाळावी.

पण जर कंपनी व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा विलीनीकरणासाठी भांडवल उभारत असेल, तर त्यात गुंतवणूक करण्याचा विचार केला जाऊ शकतो.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कंपनी आयपीओमधून मिळणारे भांडवल कुठं वापरणार आहे, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

गुंजन चोक्सी म्हणतात, "अनेक कंपन्या बँकेचं कर्ज फेडण्यासाठी आयपीओ आणतात. अशा वेळी गुंतवणूकदारांना हे निश्चित समजतं की पुढील वर्षी कंपनीवर व्याजाचा भार कमी असेल, त्यामुळे तिच्याकडे अधिक निधी (लिक्विटिडी) उपलब्ध होईल. परंतु त्याचबरोबर कंपनी खरोखर वाढ करू शकेल का, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे."

4) शेअरचं मूल्य योग्य आहे का ते तपासा

जेव्हा कंपनी आयपीओद्वारे शेअर्स जारी करते, तेव्हा त्यांची किंमत योग्य आहे का हे ओळखणं छोट्या गुंतवणूकदारांसाठी कठीण असतं. परंतु, तज्ज्ञ सांगतात की, 'प्राइस-टू-अर्निंग' आणि 'प्राइस-टू-बुक' या गुणोत्तरांच्या आधारे शेअरचं मूल्यांकन किती योग्य आहे, हे समजून घेता येतं.

गुंजन चोक्सी पुढे म्हणाले की, "लिस्टिंगच्या दिवशीच शेअर्स विकायचा विचार करणाऱ्यांसाठी ही सूचना लागू होत नाही. परंतु, जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर कंपनीचा उद्देश, वाढीची क्षमता आणि मूल्यांकन याकडे विशेष लक्ष द्यायला हवं."

ते म्हणतात, "मूल्यांकन (व्हॅल्यूएशन) न पाहता गुंतवणूक केली, तर काहीवेळा अल्पकाळात थोडा फायदा मिळू शकतो, पण दीर्घकालीन तोटा होण्याची शक्यता जास्त असते."

त्यांच्या मते, "आयपीओ आणणाऱ्या कंपनीच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांचे शेअर्स कोणत्या मूल्यांकनावर आहेत, याची तुलना केली पाहिजे."

5) कंपनीवर कायदेशीर भार आहे का?

गुंजन चोक्सी म्हणतात, "अनेक वेळा आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांवर जीएसटी किंवा इन्कम टॅक्ससंबंधी प्रकरणं प्रलंबित असतात, आणि ही रक्कम हजारो कोटींमध्ये असते.

त्यामुळे अशा आयपीओमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्यायला हवी. भविष्यात जर सरकारच्या बाजूने निर्णय लागला आणि कंपनीला मोठा टॅक्स किंवा इतर जबाबदाऱ्या भराव्या लागल्या, तर कंपनीचा नफा कमी होईल आणि शेअर्सची किंमत खाली येईल. म्हणून कंपनीवर कोणते सरकारी किंवा टॅक्ससंबंधी खटले चालू आहेत, हे आधी शोधा."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आयपीओच्यावेळी शेअर्सचे मूल्यांकन खूप जास्त असेल तर गुंतवणूकदारांचं नुकसान होऊ शकतं.

छोट्या गुंतवणूकदारांसाठी गुंजन चोक्सी यांचा सल्ला आहे की, जर फक्त लिस्टिंग गेन मिळवण्यासाठी आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर त्या शेअरला बाजारात किती प्रीमियम मिळत आहे ते आधी पाहा.

अशा वेळी एक-दोन लॉटचाच छोटासा अर्ज करा. पण जर दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार असेल, तर नेहमी कंपनीच्या उद्दिष्टांकडे आणि भविष्यातील योजना लक्षात घ्यायला हव्यात.

(हे तज्ज्ञांचं वैयक्तिक मत आहे, बीबीसीचं मत नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन आणि सल्ला घ्या.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)