विमानात प्रवाशाला मारली झापड, विमान उतरल्यानंतर पीडित बेपत्ता, काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या एका विमानातून प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाला झापड मारल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हीडिओमध्ये एका प्रवाशाला एक सह-प्रवासी झापड मारताना दिसतो आहे.

ज्या प्रवाशाबरोबर ही घटना घडली, ते आसाममधील कछार जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.

गुरुवारी, 31 जुलैला मुंबईहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईट नंबर 6E138 मध्ये घडली आहे. या घटनेबाबत सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, मोठी टीका होताना दिसते आहे.

बीबीसीचे सहयोगी पत्रकार विश्वकल्याण पुरकायस्थ, सिल्चरमध्ये पीडित व्यक्तीच्या वडिलांशी बोलले.

प्रसारमाध्यमांमधील वृत्तांमध्ये दावा केला जातो आहे की ज्या व्यक्तीला झापड मारण्यात आली, त्याची तब्येत बिघडली होती. त्यामुळे केबिन क्रू त्या व्यक्तीची मदत करत होता. त्याचवेळेस दुसऱ्या प्रवाशानं या व्यक्तीला अचानक झापड मारली.

व्हीडिओमध्ये काय दिसतं आहे?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हीडिओमध्ये झापड मारण्यात आल्यानंतर पीडित व्यक्ती त्रस्त झालेली दिसते आहे आणि रडते आहे. तर आणखी एक प्रवासी, "तुम्ही त्यांना का मारलं? तुम्हाला कोणाला मारण्याचा कोणताही अधिकार नाही," असं म्हणत असल्याचं ऐकू येतं आहे.

व्हीडिओमध्ये दिसतं आहे की, केबिन क्रूचे दोन सदस्य पीडित व्यक्तीची मदत करत आहेत आणि त्यांना विमानाबाहेर पडण्यास मदत करत आहेत.

याच वेळेस कडेला असणाऱ्या सीटवर बसलेल्या एका प्रवाशानं त्या व्यक्तीला जोरात झापड मारली. त्यावर फ्लाईट अटेंडंटनं सांगितलं की, "सर, प्लीज असं करू नका."

तर व्हीडिओ रेकॉर्ड करणारा प्रवासी म्हणतो आहे की, "तुम्ही त्यांना झापड का मारली?"

यावर झापड मारणाऱ्या व्यक्तीनं उत्तर दिलं की, "त्याच्यामुळे आम्हाला त्रास होत होता."

विमानातील आणखी एक प्रवासी यावर म्हणाला की, "ठीक आहे, त्रास होत होता. मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्यांना मारहाण करावी."

मग या प्रवाशानं विमानातील कर्मचाऱ्याला त्या पीडित व्यक्तीसाठी पाणी आणण्यास सांगितलं. व्हीडिओ बनवणारा प्रवासी म्हणाला, "त्यांना पॅनिक अटॅक आला आहे. कृपया त्यांच्यासाठी पाणी आणा."

हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रातील बातमीनुसार, कोलकात्यात विमान उतरल्यानंतर मारहाण करणाऱ्याला विमानतळावरील सुरक्षारक्षकांच्या ताब्यात देण्यात आलं होतं.

पुढील तपास करण्यासाठी, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.

विमानात झापड मारण्याच्या घटनेबद्दल इंडिगो एअरलाईन्सनं एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, झापड मारणाऱ्या व्यक्तीला विमान कोलकात्यात उतरताच लगेचच सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं.

एअरलाईन्सनं झापड मारताना दिसणाऱ्या व्यक्तीला 'उपद्रवी' ठरवलं आहे. तसंच एअरलाईन्सनं म्हटलं आहे की प्रोटोकॉलनुसार संबंधित विमान सुरक्षा यंत्रणांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

मात्र 'इंडियन एक्सप्रेस'नं बिधाननगर पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा संदर्भ देत बातमी दिली आहे की ज्या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आलं होतं, त्याला नंतर सोडून देण्यात आलं.

घटनेनंतर पीडित व्यक्ती बेपत्ता, कुटुंबीयांनी काय सांगितलं?

ही घटना घडल्यानंतर पीडित व्यक्ती बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला असून ते चिंताग्रस्त आहेत.

त्यांच्या कुटुंबानं सिल्चरमध्ये बीबीसीचे सहयोगी प्रतिनिधी विश्वकल्याण पुरकायस्थ यांना सांगितलं, "आम्ही व्हिडिओ पाहिला, मात्र त्यानंतर काय झालं, याची आम्हाला काहीही माहिती नाही. जेव्हा तो घरी येईल, तेव्हाच सत्य समोर येईल."

पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकार विश्वकल्याण पुरकायस्थ यांना दिलेल्या माहितीनुसार पीडित मुंबईतील एका हॉटेलमध्ये काम करतात. आणि गेल्या सात वर्षांपासून ते तिथेच राहत आहेत.

पीडित व्यक्तीच्या वडिलांनी सांगितलं, "मुंबईहून सिल्चरला ते बहुधा पाचव्यांदा प्रवास करत होते. मात्र जे काल घडलं, तसं याआधी कधीही झालं नव्हतं."

पुढे बोलताना ते म्हणाले की मुलाला मारहाण होत असल्याचा एक व्हायरल व्हीडिओ त्यांनी पाहिला आणि मग त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल बंद होता.

त्यांनी सांगितलं की, "मुंबईहून निघण्यापूर्वी त्यानं दुसऱ्या एक नंबरवरून आम्हाला फोल कॉल केला होता. त्यानं आम्हाला सांगितलं होतं की त्याचा फोन हरवला आहे. त्यानं सांगितलं होतं की घरी पोहोचल्यावर तो नवीन फोन विकत घेईल."

"आम्ही सकाळी एक व्हिडिओ पाहिला. त्यात एक सह-प्रवासी माझ्या लेकाला झापड मारत होता. आम्ही लगेचच विमानतळावर पोहोचलो. तो तिथे भेटेल अशी आम्हाला आशा होती, मात्र तो आला नाही."

कुटुंबीयांनी सांगितलं की इंडिगो एअरलाईन्स आणि एअरपोर्ट प्रशासनानं त्यांच्या स्थितीबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही.

कुटुंबियांनी सांगितलं की विमानतळावर त्यांची कोणतीही मदत करण्यात आली नाही. कुटुंबातील एका सदस्यानं सांगितलं की "आम्ही विमानतळाच्या परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र आम्हाला परवानगी मिळाली नाही."

आसाम पोलिसांनी काय माहिती दिली?

आसामच्या कछार जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) नुमल महत्ता यांनी सांगितलं की ते कोलकाता पोलिसांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या मते, 31 जुलैला झापड मारणाऱ्या प्रवाशाबरोबर तडजोड झाल्यानंतर पीडित व्यक्तीला कोलकाता विमानतळावरून जाऊ देण्यात आलं होतं.

महत्ता म्हणाले, "सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी पीडित आणि हल्लेखोर प्रवाशामध्ये बैठक घडवून आणली. दोन्ही बाजूंची वक्तव्यं नोंदवण्यात आल्यानंतर त्यांना जाऊ देण्यात आलं."

"पीडित व्यक्तीला दुसऱ्या दिवशी सकाळी कोलकात्याहून सिल्चरला जाणारं विमान पकडायचं होतं. मात्र बुहधा त्यांना विमान पकडता आलं नव्हतं."

त्यांनी सांगितलं की पीडिताने शनिवारी (2 ऑगस्ट) कोणतंही विमान पकडलं नव्हतं आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशीदेखील संपर्क केला नाही.

महत्ता म्हणाले, "त्यांच्या कुटुंबीयांनुसार, पीडिताचा मोबाईल मुंबईत हरवला होता. त्यामुळे ते संपर्क करू शकत नव्हते. आम्हाला वाटतं की ते दुसऱ्या मार्गानं सिलचरला पोहोचण्याचा प्रयत्न करत असावेत."

त्यांनी बीबीसीचे सहयोगी पत्रकारांना सांगितलं की पोलीस बेपत्ता पीडिताचा शोध घेत आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. मात्र कुटुंबीयांनी अद्यापर्यंत पीडित व्यक्ती बेपत्ता झाल्याची कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.

अर्थात त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं होतं की ते स्थानिक पोलिसांकडे गेले आणि त्यांनी उधरबोंद पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

सोशल मीडियावर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

या घटनेबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

प्रसिद्ध वकील संजय हेगडे यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "इंडिगो एअरलाईन्सनं मवाळ आणि हलकी प्रतिक्रिया दिली आहे. झापड मारणाऱ्या व्यक्तीला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे का?"

"इंडिगोनं विमान उतरल्यानंतर पोलीस आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली का? जर हल्लेखोर प्रवाशाला सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आलं असेल तर कायद्यानुसार त्याच्यावर काय आरोप लावण्यात आले."

तर फॅक्ट चेकर आणि ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबैर यांनी द हिंदू वृत्तपत्राच्या विमान उड्डाण (एव्हिएशन) पत्रकार जागृति चंद्रा यांचा संदर्भ देत एक्स या सोशल मीडियावर लिहिलं की विमानात प्रवासी अस्वस्थ होता आणि त्याला विमानातून खाली उतरायचं होतं. त्यावेळेस सह-प्रवाशानं त्याला झापड मारली. दोन्ही प्रवासी एकाच धार्मिक समुदायातील आहेत.

शिवराज यादव नावाच्या एका युजरनं लिहिलं, "इंडिगोच्या विमानातील व्हीडिओ पाहून मला धक्का बसला! एका आजारी मुस्लीम प्रवाशाला एअर होस्टेस आधार देत घेऊन जात होती. तितक्यात एका व्यक्तीनं त्याला झापड मारली."

"झापड फक्त दाढी-टोपी पाहून मारण्यात आली की इतर काही वाद होता, हे लक्षात येत नाही? सत्य समोर येण्याची वाट पाहतोय, मात्र हे चुकीचं आहे."

डॉ. शीतल यादव नावाच्या एका युजरनं लिहिलं, "इंडिगोच्या विमानात जे घडलं, ते खूपच लज्जास्पद आहे. धर्माच्या आधारे भेदभाव करणं चुकीचं आहे. इस्लामोफोबिया हा एक चिंतेचा विषय आहे."

एका युजरनं लिहिलं आहे, "या घटनेमध्ये कोणताही धार्मिक पैलू नाही. कारण पीडित व्यक्ती आणि हल्लेखोर प्रवासी, हे दोघेही एकाच समुदायातील आहेत. हिंदूंना बदनाम करता यावं, यासाठी काँग्रेसचं आयटी सेल या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)