जेव्हा जरांगे पाटील म्हणाले, 'माझ्या पोरांना मी ओळखतो' मनोज जरांगे यांचे मराठा तरुणांना एवढं आकर्षण का आहे?

फोटो स्रोत, ANI
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
29 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 या काळात उपोषणाला बसलेले मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आले. त्यांना एक एक अटी मनोज जरांगे यांनी सांगितल्या.
मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या मान्य केल्या आणि जरांगे पाटलांच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे निघाले, 'राजा हो जिंकलो आपुन.'
थोड्या वेळानंतर अध्यादेश आला. तो जरांगे पाटलांनी आपल्या सहकाऱ्यांना, तज्ज्ञांना वाचायला दिला. त्यानंतर ते म्हणाले, सांगा उपोषण मागे घ्यायचं का?
काही तरुण म्हणाले 'नको नको', मग जरांगे पाटलांनी त्यांना विचारलं 'का नको'? त्यावर तरुणांनी सांगितलं की मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्याच हाताने उपोषण सोडा. त्यावर जरांगे म्हणाले, 'आपल्याला जीआरशी मतलब, बाकीचं काय काम, कोण आला अन् कोण गेला.'
त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला, 'आता सांगा उपोषण सोडायचं का?' त्यावर तरुण म्हणाले 'हो'.
मनोज जरांगे किंचित हसले आणि म्हणाले, 'माझ्या पोरांना मी ओळखतो, त्यामुळेच ते माझ्या सोबत आहेत.'
हा प्रसंग त्यांच्या नेतृत्वाबद्दल खूप काही सांगून जातो.
मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून मराठा समाजातील तरुणांनी 'आम्ही जरांगे,' 'हम सब जरांगे' अशा टोप्या आणि टी-शर्ट्स घातल्याचे पाहायला मिळाले आहे.
'मनोज दादांनी सांगितले ते करण्यासाठी आम्ही तयार आहोत,' असं सांगणारे तरुण आपल्याला दिसतात.
त्याचबरोबर आपल्या मुलांची काळजी घेणारे, गोरगरीबांच्या लेकरांना पोटापाण्याला लागू द्या म्हणणारे त्यांचे नेते जरांगेही त्याचवेळी दिसतात.
जेव्हा मनोज जरांगे यांनी अध्यादेश पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू लपले नाहीत.
मनोज जरांगे यांचे नेतृत्व कसे आहे हे उलगडून दाखवणारा हा लेख..
जरांगे यांचे मराठा तरुणांना आकर्षण का आहे?
मनोज जरांगे यांचे मराठा समाजातील तरुणांना आकर्षण का आहे, त्यांच्या पाठीमागे एवढी गर्दी का असते याचा आढावा घेणारा हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.
मनोज जरांगेंचं आंदोलन पत्रकार म्हणून मला अतिशय जवळून कव्हर करता आलं.
मराठा आंदोलनादरम्यान, जरांगेंना मराठा तरुणांचा प्रचंड पाठिंबा मिळाल्याचं दिसून आलं. जरांगेंना ऐकण्यासाठी गावागावात मराठा तरुण एकत्र येत होते, सभास्थळी ते पहाटे 4 वाजेपर्यंत थांबत होते.
जरांगेंवर कुठं जेसीबीनं फुलांची उधळण करण्यात आली, तर कुठं बँडबाजा लावून मिरवणूक काढण्यात आली. यात मराठा समाजातील तरुणांचा मोठा सहभाग होता.
मराठा आंदोलन कव्हर करताना माझी अनेक मराठा तरुणांसोबत भेट झाली. अनेकांशी चर्चा झाली.
त्यातून या तरुणांचा मनोज जरांगेंवर विश्वास का आहे, जरांगेंबाबत त्यांना नेमकं काय वाटतं, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला.
यादरम्यान, मराठा समाजातील तरुणांनी मनोज जरांगेंबाबत व्यक्त केलेली ही 7 निरिक्षणं इथं मांडत आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
1. राजकीय पार्श्वभूमी नाही
मनोज जरांगेंना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. त्यांच्या कुटुंबातील आजोबा-पणजोबा कुणीही राजकारणात नाही. त्यामुळे त्यांना सहकार सम्राट, साखर सम्राट, शिक्षण सम्राट असा वारसा नाहीये.
मराठा तरुणांना हीच जरांगेंची जमेची बाजू वाटत आहे. कारण मराठा समाजातील नेते आणि त्यांच्या नवीन पिढीलाही मराठा समाजातील तरुण अक्षरश: कंटाळल्याचं या तरुणांच्या बोलण्यातून दिसून येतं.

'मराठा नेत्यांनी समाजासाठी काय केलं?' असा प्रश्न आंदोलक तरुणांकडून मला वारंवार ऐकायला मिळाला.
जरागेंना पोलीस घेऊन जाणार अशी अफवा अंतरावलीमध्ये पोहचली तेव्हा 31 ऑक्टोबरच्या रात्री तासाभरात हजारो तरुण आंदोलन स्थळी जमा झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

2. फाटका माणूस पण समाजाप्रती बांधील अशी इमेज
मनोज जरांगे एका सामान्य कुटुंबातून येतात, अशी ठाम धारणा मराठा तरुणांची आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून हा माणूस मराठा समाजासाठी लढत आहे, असं त्यांना वाटतं.
त्यांचं घर अगदी साधं पत्र्याचं आहे. मी त्यांच्या कुटुंबाला भेटलो तेव्हा ते घर मराठवाड्यातील बहुसंख्य मराठ्यांच्या घरांचं, त्यांच्या स्थितीचं प्रतिनिधित्व करत होतं.
मराठवाड्यातील बहुसंख्य मराठ्यांची आज अशीच अवस्था आहे. जमिनीचे जसजसे तुकडे पडत गेले, तसेतसे मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न वाढत गेले.
मनोज जरांगे या लाखो लोकांना आपले वाटतात, कारण ते त्यांच्यापैकी एक आहेत, असं त्यांना वाटतं.

फोटो स्रोत, shrikant bangale/bbc
3. मॅनेज होत नाही हा विश्वास
मनोज जरांगेंना त्यांनी आंदोलन सुरू केल्यापासून अनेक पक्षांनी पैशांची ऑफर दिल्याचं म्हटलं जातं. खुद्द ज्या गावात जरांगेंचं आंदोलन सुरू आहे, त्या अंतरवाली सराटीतल्या नागरिकांनी ही गोष्ट मला बोलून दाखवली. पण जरांगे मात्र मॅनेज झाले नाहीत, होत नाहीत, असंही तिथले नागरिक सांगत होते.
मराठा आरक्षणासाठी याआधी अनेक आंदोलनं झाली, पण आताचं आंदोलन करणारा प्रामाणिक आणि मॅनेज न होणारा असल्याचं मराठा तरुण स्वतःहून सांगतात.

4. जे काही आहे ते कॅमेऱ्यासमोर
याआधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी सरकारशी बंद दाराआड चर्चा केली आणि त्यानंतर आंदोलनं थांबली. पण जरांगेंचं तसं नाहीये. ते सरकारचे प्रतिनिधी आणि मराठा समाजातले लोक यांच्याबरोबर मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा करतात.
जरांगेंच्या आंंदोलनाचा हा पॅटर्न आवडत असल्याचं मराठा तरुण सांगतात. जरांगेंनी आतापर्यंत तरी त्यांच्या आंदोलनाचा हा पॅटर्न कायम ठेवल्याचं दिसून येतं.

5. 'मराठ्यांच्या पोरांच्या भविष्यासाठीचा लढा'
जरांगेंच्या भाषणात कायमस्वरुपी ‘हा मराठा समाजातील पोरांच्या भविष्यासाठीचा हा लढा आहे,’ असा उल्लेख असतो. त्यांची ही लाईन मराठा तरुणांच्या काळजाला हात घालणारी ठरली आहे.
"चांगले गुण असूनही आम्हाला चांगलं कॉलेज मिळत नाही, आरक्षणाअभावी आम्ही मोठी फी भरू शकत नाही आणि चांगली नोकरी मिळवू शकत नाहीत," असं अंतरवालीत जमलेले मराठा सांगत होते. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरक्षण चांगल्या शिक्षणासाठीची संधी वाटत असल्यांचंही त्यांचं म्हणणं होतं.

6. राजकीय महत्वाकांक्षा नसल्याची इमेज
मनोज जरांगेंना राजकीय महत्त्वांकाक्षा नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे.
कोणत्या पक्षात जाणार किंवा कुणाला पाठिंबा देणार असा प्रश्न विचारल्यावर ती आपली वाट नसल्याचं त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं होतं.
‘मला कोणत्याही पक्षात जायचं नाही की निवडणूक लढवायची नाही,’ असं जरांगे वारंवार सांगत आहेत. अजून तरी ते तसंच सांगत आहेत.
जरांगेंची ही गोष्ट मराठा तरुणांना आवडत आहे. 'मतासाठी नाही, तर फक्त जातीसाठी' लढणारा हा माणूस आहे, असं हे तरुण बोलून दाखवतात.

7. आंदोलनाला आतापर्यंत मिळालेलं यश
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आतापर्यंत यश मिळत गेलं. जरांगेंच्या मागण्यांनंतर अटी-शर्थींवर का होईना पण सरकार हालचाल करताना दिसलं आहे, वेळोवेळी शासन निर्णय घेताना दिसलं आहे.
मराठवाडा आणि इतर भागात प्रत्यक्षात मराठा समाजातल्या लोकांना शासनाकडून कुणबी प्रमाणपत्र मिळायला लागली आहेत. मराठा तरुणांना ही दिलासादायक बाब वाटत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











