होर्मुझ : सागरी सुरुंग नेमके काय असतात? ते कसे काम करतात? ते हटवणं कठीण का असतं?

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील जवळपास 20 टक्के कच्चे तेल आणि एलएनजीची वाहतूक होते

फोटो स्रोत, Ian Forsyth/Getty Images

फोटो कॅप्शन, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील जवळपास 20 टक्के कच्चे तेल आणि एलएनजीची वाहतूक होते.
    • Author, दीपक मंडल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

इराण युद्धात समुद्रात लावल्या जाणाऱ्या सुरुंगांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गुरुवारी (23 एप्रिल) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की जर होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणची कोणतीही बोट सुरुंग पेरताना दिसली तर तिला तत्काळ नष्ट करण्यात यावं, अशा सूचना त्यांनी अमेरिकेच्या नौदलाला दिल्या आहेत.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील जवळपास 20 टक्के कच्चे तेल आणि एलएनजीची वाहतूक होते. इराण हा सागरी मार्ग जवळपास बंद केला आहे.

तर अमेरिका वारंवार, लष्करी कारवाईद्वारे ही सामुद्रधुनी खुली करण्याबद्दल आणि तिथे कथितरित्या पेरण्यात आलेल्या अनेक सुरुंगांना हटवण्याबद्दल बोलत आली आहे.

समुद्रात लावले जाणारे हे सुरुंग नेमके कसे असतात आणि ते कशाप्रकारे काम करतात, तसंच त्यांना हटवणं अतिशय कठीण का असतं? याबद्दल जाणून घेऊया.

समुद्रातील हे सुरुंग किती धोकादायक असतात. युद्धामध्ये त्यांचं इतकं महत्त्व का असतं आणि त्यांचा काय इतिहास आहे?

सागरी सुरुंग काय असतात?

सी माईन्स किंवा सागरी सुरुंग म्हणजे पाण्याखाली ठेवण्यात आलेली स्फोट घडवून आणणारी स्फोटकं असतात. पाणबुड्या आणि जहाजांना नष्ट करण्यासाठी ती तयार केली जातात.

शत्रूचं जहाज समुद्रातील एखाद्या विशिष्ट भागात येण्यापासून रोखण्यासाठी किंवा जहाज तिथेच रोखण्यासाठी, याचा वापर केला जातो.

सागरी सुरुंगांचं तंत्रज्ञान जुनं आहे. चीननं 14 व्या शतकात समुद्रातील लुटारूंच्या विरोधात पहिल्यांदा त्याचा वापर केला होता.

तर अमेरिकेत पहिल्यांदा सागरी सुरुंगांचा वापर अमेरिकेतील क्रांतीच्या वेळी झाला.

त्यावेळी समुद्रात स्फोटकं किंवा दारूगोळा भरलेले आणि पाण्यावर तरंगतील असे ड्रम टाकले जायचे. त्यांची जहाजांबरोबर टक्कर झाल्यावर त्यांचा स्फोट व्हायचा.

आयआरजीसीनं 16 फेब्रुवारी 2026 ला केलेल्या नौदलाच्या एक सरावाचा फोटो, हा सराव पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये करण्यात आला होता

फोटो स्रोत, Press Office of Islamic Revolutionary Guard Corps / Handout/Anadolu via Getty Images

फोटो कॅप्शन, आयआरजीसीनं 16 फेब्रुवारी 2026 ला केलेल्या नौदलाच्या एक सरावाचा फोटो, हा सराव पर्शियन आखात आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये करण्यात आला होता

चीनमध्ये पहिल्यांदा वापर झाल्यानंतर जगभरातील जवळपास प्रत्येक समुद्रात या सागरी सुरुंगांचा (सी माईन्स) वापर झाला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाव्यतिरिक्त, कोरिया, फॉकलँड द्वीप समूह आणि आखाती युद्धात याचा वापर झाला होता.

संरक्षण तज्ज्ञ राहुल बेदी सांगतात की, सागरी सुरुंग ऑटोनॉमस प्रकारची म्हणजे आपोआप स्फोट होणारी असतात.

"ही स्फोटकं लक्ष्यावर आधारित हल्ला करतात. यांना इंटेलिजन्ट माईन्सही म्हटलं जातं. कारण तेलवाहू जहाज, हल्ला करणारी युद्धनौका किंवा व्यावसायिक मालवाहू जहाजातील फरक ओळखून हे सुरुंग त्यावर स्फोट घडवू शकतात. त्यांना प्रोग्रॅम केलं जातं आणि त्याच आधारे हे सुरुंग वेगवेगळ्या जहाजांमधील फरक ओळखू शकतात आणि त्यांना लक्ष्य करतात," असं ते म्हणाले.

सागरी सुरुंग किती प्रकारचे असतात?

तंत्रज्ञानाचा विकास झाला तसतसं सागरी सुरुंगंही मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहेत.

रॉबर्ट स्ट्रॉस सेंटर फॉर सिक्युरिटी अँड लॉ यांच्या मते, या सुरुंगांचे तीन प्रकार असतात. कॉन्टॅक्ट सुरुंग, इन्फ्लुएन्स सुरुंगआणि कंट्रोल्ड सुरुंग, असे हे तीन प्रकार असतात.

कॉन्टॅक्ट सुरुंगांना जेव्हा एखादं जहाज थेट धडकतं किंवा जहाज त्यांच्या खूप जवळ येतं, तेव्हा त्यांचा स्फोट होतो. हे सुरुंग पेरणं सर्वात सोपं असतं.

इन्फ्लुएन्स सुरुंग तांत्रिकदृष्ट्या अधिक आधुनिक असतात. याचा स्फोट होण्यासाठी जहाजांच्या थेट संपर्कात येण्याची आवश्यकता नसते.

हे सुरुंग सेन्सर्सद्वारे जहाजांकडून येणारे विशिष्ट सिग्नल ओळखतात. यात चुंबकीय, ध्वनी, ताण, सिसमिक(हालचाल) किंवा पाण्याखाली असलेले इलेक्ट्रॉनिक सिग्नल यांचा समावेश असू शकतो.

तिसऱ्या प्रकारच्या म्हणजे कंट्रोल्ड सुरुंगांमध्ये रिमोटद्वारे स्फोट घडवून आणला जातो. सुरुंग पाण्यात अनेक प्रकारे पेरली किंवा लावली जातात.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस 1842 मध्ये नॉर्थ सीमध्ये जर्मन सैनिक सागरी सुरुंगांबरोबर

फोटो स्रोत, Roger Viollet via Getty Images

फोटो कॅप्शन, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस 1842 मध्ये नॉर्थ सीमध्ये जर्मन सैनिक सागरी सुरुंगांबरोबर.

ड्रिफ्टिंग माईन्स

यांना पाण्यात टाकलं जातं आणि ते प्रवाहाबरोबर वाहत राहतात.

मूरड माईन्स

हे आकारानं मोठे सुरुंग असतात. ही नांगराला (अँकर) बांधलेली 'कॉन्टॅक्ट' माईन्स असतात. ती पाण्याच्या पृष्ठभागाच्या बरोबर खाली तरंगत असतात. एखादं जहाज यांना धडकतं, तेव्हा त्यांचा स्फोट होतो.

या सुरुंगांमधून जवळपास 100 पौंड किंवा त्याहून अधिक एक्सप्लोझिव्ह फोर्स निर्माण होतो.

बॉटम माईन्स

हे इन्फ्लुएन्स सुरुंगं असतात. ती समुद्राच्या तळाशी ठेवली जातात.

सेन्सर्सच्या कॉम्बिनेशनचा वापर करून ही सुरुंगं जहाज ओळखतात. मग शेकडो पौंड एक्सप्लोझिव्ह फोर्ससह त्यांचा स्फोट होतो.

लिम्पेट माईन्स

ही छोटी स्फोटकं असतात. पाणबुडे हे सुरुंग जहाजाच्या पुढच्या बाजूस पाण्याखाली असलेल्या भागाखाली लावू शकतात.

विशिष्ट वेळेनंतर त्यांचा स्फोट व्हावा यासाठी टायमरच्या स्वरुपात त्यांचा वापर केला जाऊ शकतो.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणनं लावलेल्या सुरुंगांचं वास्तव

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अमेरिकेच्या मते, इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 5 ते 6 हजार सुरुंग पेरलेले आहेत.

यात कॉन्टॅक्ट माईन्स आणि इन्फ्लुएन्स माईन्स, अशा दोघांचाही समावेश आहे. हाय स्पीड बोटीचा वापर करून हे सुरुंग वेगानं लावता येतात.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, या युद्धाच्या काळात, मार्च महिन्याच्या मध्यात इराणनं इथे एक डझन सुरुंग लावले आहेत.

"होर्मुझच्या सामुद्रधुनीतील प्रत्यक्ष स्थिती नेमकी काय आहे, हे सध्या कोणालाही माहित नाही. तिथल्या परिस्थितीबद्दल बराच गोंधळ आहे.

अमेरिकेची जहाजं कुठे आहेत आणि इराणच्या जहाजांचा कंट्रोल कुठे आहे, हे कोणालाच माहिती नाही. त्यामुळेच तिथली नेमकी वस्तुस्थिती कळत नाही," असं राहुल बेदी म्हणाले.

"मात्र इतकं निश्चित आहे की अमेरिकेनं केलेल्या दाव्यांनुसार इराणनं जर तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात सुरुंगं लावले असतील तर त्यांनी या सामुद्रधुनीचा वापर शस्त्र म्हणून केला आहे.

आता हीच इराणची ताकद झाली आहे. कारण समुद्रात लावण्यात आलेले सुरुंग हटवणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. यासाठी बराच वेळ लागतो. इराणनं एकप्रकारे याला त्यांचं व्यूहरचनात्मक शस्त्र बनवलं आहे," असं ते पुढे म्हणाले.

सुरुंग हटवणं कठीण का असतं?

राहुल बेदी, संरक्षण तज्ज्ञ यांची प्रतिक्रिया
फोटो कॅप्शन, राहुल बेदी, संरक्षण तज्ज्ञ

अमेरिकेचं म्हणणं आहे की त्यांची माईन्स स्वीपर (सुरुंग शोधणारी जहाजं) हे सुरुंग हटवण्याचं काम करत आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, हे सुरुंग शोधणं आणि त्यांना हटवणं अतिशय कठीण आणि खूप वेळ लागणारं काम आहे.

सी माईन्स लावणं किंवा पेरणं खूप असतं. मात्र त्यांना हटवणं कठीण असतं. हे सुरुंग समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागावर, पाण्याखाली किंवा समुद्राच्या तळाशी असू शकतात.

जर हे सुरुंग पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत असतील, तर समुद्रातील पाण्याच्या प्रवाहांमुळे त्यांची जागा बदलू शकते.

एकदा सर्व साफ केल्यानंतर देखील ती जागा पुन्हा धोकादायक ठरू शकते.

इराणला स्वत:लाच त्यांचे सुरुंग नेमके कुठे कुठे आहेत, हे माहिती नाही. कारण, कदाचित त्यांनी हे सुरुंग घाईघाईनं लावलेले असू शकतात.

किंवा प्रत्येक सुरुंगांच्या लोकेशन किंवा ठिकाणाची नोंद ठेवण्यात आली नसावी किंवा काही सुरुंग मुद्दाम पाण्याबरोबर वाहण्यासाठी सोडण्यात आले असावेत.

"सुरुंग हटवणं हे अतिशय कठीण, क्लिष्ट काम आहे. त्यासाठी बराच वेळ लागतो. ही गोष्ट इराणला देखील माहिती आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत किती सुरुंगं लावण्यात आले आहेत, याबद्दल कोणालाच निश्चित माहिती नाही. मात्र तिथे सुरुंग लावण्यात आल्याचं सांगून इराणनं सध्या एक मानसिक दबाव निर्माण केलेला आहे," असं राहुल बेदी म्हणाले.

तज्ज्ञांच्या मते, सुरुंग दोन प्रकारे हटवले किंवा काढले जातात. माईन्स स्वीपिंगद्वारे आणि माईंस हंटिंगद्वारे. माईन्स स्वीपिंगमध्ये जहाज, तार किंवा उपकरण ओढून माईन्स निष्क्रिय करतात. नंतर त्यांना वर काढून नष्ट केलं जातं.

तर माईन्स हंटिंगमध्ये सोनार तंत्रज्ञानाच्या मदतीनं सुरुंग शोधले जातात. मग रोबोट किंवा ड्रोनद्वारे ते नष्ट केले जातात. त्यानंतर पाणबुड्यांची मदत घ्यावी लागते.

सुरुंगांच्या बाबतीत भारताची काय स्थिती आहे?

राहुल बेदी यांच्या मते, भारतानं कधीही सागरी सुरुंगांचा वापर केलेला नाही.

"भारताकडे सोव्हिएत युनियनच्या काळातील किंवा रशियाचे 10-12 माईन्स स्वीपर होते. मात्र सध्या भारताकडे कोणताही माईन्स स्वीपर नाही," असं ते म्हणाले.

"गेल्या 3-4 वर्षांमध्ये भारतानं याचं कंत्राट देण्याचे प्रयत्न केले आहेत. दक्षिण कोरिया आणि इटलीबरोबर यासंदर्भात बोलणी सुरू होती. मात्र अद्याप त्यातून काहीही झालेलं नाही," असं ते म्हणाले.

"माईन्स स्वीपर हे विशिष्ट प्रकारचं जहाज असतं. त्याचं हार्डवेअर म्हणजे त्याची रचना सुरुंगांचा शोध घेण्यासाठी केलेली असते. या जहाजावर विशेष साधनं असतात, जी सुरुंग हटवतात," असं राहुल बेदी म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)