'शिवाजी कोण होता?' असं नाव पुस्तकाला देण्यामागे गोविंद पानसरेंची भूमिका काय होती?

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE
- Author, प्रविण सिंधू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 7 मिनिटे
"आपलं ज्या व्यक्तीवर अत्यंत प्रेम असतं, अशा व्यक्तिबद्दल आपण अगदी सहजपणे आपल्या भावना व्यक्त करतो. आपण सर्वात जास्त प्रेम आईवर करतो आणि आपण आईला अहो-जाहो बोलायला लागलो तर ते जसं कृत्रिम वाटेल तसंच हे आहे."
हे वाक्य आहे 'शिवाजी कोण होता?' या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे 'राष्ट्र सेवा दलाचे' अध्यक्ष असतानाच्या काळात त्यांच्याशी झालेल्या चर्चेत गोविंद पानसरेंनी हे मत व्यक्त केलं होतं. याबाबतची आठवण स्वतः सुभाष वारे सांगतात.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकात शिवाजी असा एकेरी उल्लेख का केला असा आक्षेप घेतला.
गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता या पुस्तकाची चर्चा होत आहे.
या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे लेखक असलेल्या गोविंद पानसरे यांची पुस्तकाला हे शीर्षक देण्यामागे काय भूमिका होती? नावावरील आक्षेपांवर त्यांनी काय म्हटलेलं? हे समजून घेऊयात.
'शिवाजी कोण होता?' या शीर्षकामागे पानसरे यांची भूमिका
'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लिहिताना गोविंद पानसरे यांना मदत करणारे त्यांचे सहकारी प्रा. अशोक चौसाळकर यामागील पानसरेंची भूमिका स्पष्ट करतात.
ते म्हणाले, "पुस्तक प्रकाशित झालं तेव्हाही उजव्या विचारसरणीच्या काही लोकांनी 'शिवाजी कोण होता?' या नावावरून आक्षेप घेतले होते. त्याबाबत पानसरे आणि आमची चर्चा झालेली. त्यात पानसरेंची भूमिका अशी होती की, इतिहास लेखनाची एक सर्वमान्य पद्धत आहे. त्या पद्धतीप्रमाणे एकेरी शब्दच वापरला जातो."
"कुठलंही इतिहासाचं पुस्तक बघा, त्यात एकेरीच उल्लेख असतो. पुस्तकात चंद्रगुप्त मौर्य म्हणाले असा उल्लेख नसतो. चंद्रगुप्त म्हणाला, समुद्रगुप्त म्हणाला, हर्षवर्धनने असं केलं, अशोकाने असं केलं, शंकराचार्याने असं केलं अशीच भाषा सर्व इतिहासाच्या पुस्तकात इतिहासकारांनी वापरली आहे. हीच इतिहासकारांची परंपरा आम्ही या पुस्तकात पुढे नेली", असं चौसाळकर स्पष्ट करतात.
ते पुढे म्हणतात, "अरे शाहुराया, अरे भाऊ राया असं म्हटल्यानं शाहू महाराजांचा किंवा भाऊराव पाटलांचा कुठलाही अपमान होत नाही. उलट आपली जवळीक साधली जाते. त्यामुळे पानसरेंचं असं म्हणणं होतं की, त्यात अवमानना नसून इतिहासाच्या परंपरेनुसार आम्ही ते लिहिलं. एकेरी उल्लेखात अवमानना नसून जवळीक व्यक्त होते."
"एकेरी उल्लेखाने शिवाजी महाराजांचा अवमान होत नाही. आपलं ज्यांच्यावर खूप प्रेम असतं अशा आई, भाऊ, बहिण यांना आपण एकेरी बोलतो, अहो-जाहो बोलत नाही", असंही ते नमूद करतात.

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE
पुस्तकाच्या शीर्षकासंदर्भात बोलताना गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे म्हणाल्या, "80 च्या दशकात मी विद्यार्थी चळवळीत काम करत होते. तेव्हा कॉ. पानसरे ही व्याख्यानं देत असत.
त्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावरील पुस्तके, त्यांची चरित्रे यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी भाषणाचेच एक पुस्तक लिहिले. तेव्हाची प्रक्रिया मी पाहिली आहे."
"ते असं म्हणत की, मी ग्रामीण भागातून आलो आहे. आपली बहुतांशी जनता शेतकरी आहे, ग्रामीण भागात राहते. त्यांचं शिवाजीशी नातं खूप जवळचं आहे.
ते शिवाजी महाराजांना आपलं दुःख समजून घेणारा, आपण किती हलाखीचं आयुष्य जगत आहोत, त्याची जाणीव असणारा आणि आपल्यावर दुःख लादणाऱ्या जुलूमी सत्तेपासून स्वातंत्र्य देणारा, स्वराज्य स्थापन करणारा आपला सखा, आपला बाप मानतात."
"ते म्हणायचे की, ग्रामीण भागात आई-बापाला आपण बिरूदं लावत नाहीत. त्यांच्यासारखाच शिवाजी आमच्या ह्रदयाच्या खूप जवळ आहे. त्यानं आम्हाला स्वराज्याचं स्वप्न दाखवलं, मावळ्यांच्या सोबतीने ते उभं केलं अशा माणसाबद्दल आम्ही आमच्या बापासारखंच बोलू. तो आम्हाला आमच्या बापासारखा आहे.
त्यामुळे त्याचा उल्लेख करताना आम्ही कोणतीही बिरूदं लावत नाही. कारण आम्हाला त्याच्यात आणि आमच्यात अंतर नको आहे," अशी आठवण मेघा पानसरे यांनी सांगितली.
त्या पुढे म्हणाल्या, "आम्ही आमच्या शिवाजीला शिवबा म्हणायचं की शिवा म्हणायचं की, आणखी काही हे आम्हाला इतरांनी का सांगावं. ज्यांना शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी उपयोग करायचा आहे त्यांनी आम्हाला काय म्हणायचं आहे हे सांगू नये. ते स्वातंत्र्य आम्हाला आहे."
"आमचं शिवाजीबद्दलचं प्रेम ज्यातून व्यक्त होतं ते नाव आम्ही घेऊ, अशी त्यांची भूमिका होती. काहीही झालं तरी हे नाव मी मागं घेणार नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं," असंही मेघा पानसरे नमूद करतात.
इतिहासकार एकेरी उल्लेख का करतात?
इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी 'श्री राजा शिवछत्रपती खंड 1' च्या प्रस्तावनेत इतिहासकार एकेरी उल्लेख का करतात याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
ते म्हणतात, "प्रस्तुत शिवचरित्रात छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा उल्लेख बहुतेक सर्व ठिकाणी एकेरी म्हणजेच नुसता शिवाजी असा केलेला आहे. तसे करण्यामागे त्यांच्याविषयी माझ्या मनात काही अनादराची भावना आहे, किंवा कोणाच्या भावना दुखवायचा हेतू आहे, असा गैरसमज कृपया कोणी करून घेऊ नये."
"एकेरी उल्लेख हा काही केवळ अनादरापोटी केला जातो असे नाही. परमेश्वराचा, राम-कृष्णांसारख्या पौराणिक, आणि चंद्रगुप्त, हरिहर-बुक्क, राणा प्रताप यांच्यासारख्या ऐतिहासिक, महापुरुषांचा आणि आपल्या आईवडिलांचा उल्लेख आपण सर्रास एकेरी करतो. अर्थात एकेरी उल्लेख करणे म्हणजे मनात अनादर असणे असे समीकरण मांडणे युक्त नाही."
"माझ्या लहानपणी मुले 'शिवाजी म्हणतो' असा एक खेळ खेळत असत. 'शिवाजी म्हणतो' असे म्हणून दिलेल्या आज्ञा पाळायच्या, तसे न म्हणता दिलेल्या आज्ञा पाळायच्या नाहीत, असे त्या खेळाचे स्वरूप होते.
हा खेळ हे शिवाजी महाराजांविषयी लोकांच्या मनात असलेल्या गाढ आदराचेच द्योतक आहे. तरीही त्या खेळात 'शिवाजी म्हणतो' असा एकेरी वाक्प्रयोग केला जात असे," अशी आठवण मेहेंदळे सांगतात.

फोटो स्रोत, Facebook/Pustakvishva
मेहेंदळे पुढे म्हणतात, "प्रस्तुत शिवचरित्रात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी करण्यामागील कारण असे की, हे शिवचरित्र मी इतिहास संशोधनाच्या दृष्टिकोनातून लिहिले आहे. असे चरित्र लिहिताना लेखकाने भाविक राहू नये, शक्य तेवढ्या तटस्थ वृत्तीने ते लिहावे, अशी अपेक्षा असते. पूर्णत: तटस्थ वृत्तीची अशी कोणती व्यक्ती असली तर ती क्वचितच असेल."
"बहुतेकांच्या मनावर कोणत्या ना कोणत्या पूर्वग्रहांचा थोडाबहुत पडसाद असतो. माझ्याही मनात कोणते ना कोणते पूर्वग्रह असतीलच. त्या संबंधी मला जाणीव आहे असेही नाही.
जाणीव असली तर ते काढून टाकण्याचा मी प्रयत्न केला असता, पण असे पूर्वग्रह असले तरी ते काबूत ठेवण्याचा प्रयत्न ऐतिहासिक चरित्र लिहू पाहणाऱ्याने अवश्य केला पाहिजे."
"चरित्रनायकाविषयी त्याला जितका अधिक आदर वाटत असेल तितक्याच प्रमाणात त्याने आपली तटस्थता टिकवून धरण्याची अधिकाधिक काळजी घेतली पाहिजे. तसे न केल्यास त्या चरित्रातील ऐतिहासिकता केव्हाच लोप पावली आणि त्या चरित्राला कथा-कादंबरीचे किंवा निबंध स्तुतिस्तोत्राचे स्वरूप केव्हा आले ते त्याचे त्यालाही कळणार नाही," असा इशाराही ते देतात.
'आई, विठोबा माऊलीचा एकेरी उल्लेख तसा शिवाजी उल्लेख'
सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांनी 'आईचा, विठोबा माऊलीचा जसा एकेरी उल्लेख तसा शिवाजी उल्लेख', अशी भूमिका व्यक्त केली.
ते म्हणाले, "गोविंद पानसरे यांच्या या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दलच्या मोठेपणाचेच वर्णन आहे. जसं आपण आईला किंवा विठोबा माऊलीला 'अहो-जाहो' म्हणण्याचा विषयच येत नाही. तेच या पुस्तकात दिसते.
आपल्या प्रेमाच्या लोकांना आपण एकेरीच हाक मारतो. जिथे कृत्रिमता असते तिथे अहो-जाहो बोललं जातं."

फोटो स्रोत, FACEBOOK/KABEER PANSARE
"त्या पुस्तकाचं केवळ शीर्षक न वाचता ते पुस्तक वाचण्याची मेहनत घ्यायला हवी. पुस्तक वाचणाऱ्यांना या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल आदर, आपलेपणा आणि अभिमान असल्याचं दिसेल."
"गोविंद पानसरे असताना आणि हे पुस्तक प्रकाशित झालं तेव्हाही शिवाजी महाराजांचा केवळ चलनी नाणं म्हणून वापर करणाऱ्या काही लोकांनी असा वाद केला होता.
मात्र त्याला तितके महत्त्व दिले गेले नाही. मात्र आत्ता हे गृहस्थ आमदार असल्याने याची अधिक चर्चा होत आहे," असं मत सुभाष वारे व्यक्त करतात.
'शिवाजी' असा उल्लेख करणारं हे एकमेव पुस्तक नाही
पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे 'शिवाजी' असा उल्लेख पानसरेंचे पुस्तक येण्याआधीही झाल्याचे संदर्भ देत म्हणाल्या, "पानसरे होते, तेव्हाही असे वाद झाले होते.
पण 1988 रोजी हे पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीही 1939 साली गणेश कुऱ्हाडे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नावही 'शिवाजी कोण होता?' असंच आहे.
शिवाय, प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचं नावही 'दगलबाज शिवाजी' असंच आहे."

फोटो स्रोत, Madhushree Publication
"शिवाजी महाराजांची बहुतांश गाणी, घोषणा, आरत्याही झालेल्या आहेत. त्यात एकेरी उल्लेख आहेत, याचा अर्थ तो अनादर आहे, असा होतो का?" असा प्रश्नही स्मिता पानसरे विचारतात.
'शिवाजी कोण होता?' पुस्तकात नक्की काय आहे?
शिवाजी महाराजांनी तत्कालीन सरंजामशाहीतही नेमकं असं काय काम केलं की त्यांचं आधुनिक लोकशाहीतही कौतुक होतं या प्रश्नाचं उत्तर दिलं.
अनेक राजे होऊन गेले, तरी सर्व राजांची आठवण केली जात नाही हे सांगताना पानसरेंनी शिवाजी महाराज सर्वांच्या आठवणीत राहण्याची विस्तृत कारणं या पुस्तकात मांडली आहेत.
या मांडणीत त्यांनी शिवाजी महाराजांना राज्य वारसाहक्काने मिळालं नाही, तर त्यांनी 'निर्माण' केलं, हेही अधोरेखित केलं आहे.

शिवाजी महाराजांचे कार्य आणि राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला-रयतेला आपले वाटत होते हे सांगताना पानसरेंनी त्याची अनेक उदाहरणे या पुस्तकात नोंदवली आहेत.
यात शिवाजी महाराजांसाठी स्वतःच्या मृत्यूला कवटाळणाऱ्या सर्वसमाजातील मावळ्यांचाही उल्लेख ते करतात. ही माणसं शिवाजी महाराजांसाठी प्राणाची आहुती द्यायला का तयार झाले यावरही पानसरे भाष्य करतात.
शिवाजी महाराजांनी रयतेची लूट थांबवण्यासाठी वतनदारांबाबत नियम तयार केले, मनमर्जी करवसुलीचा प्रकार बंद केला, शेतकरी आणि शेतीला बळ दिलं, स्त्रियांच्या सन्मानाबाबत ठोस भूमिका घेतली हेही पानसरे या पुस्तकात नमूद करतात.
तसेच आजही गोरगरीब रयतेच्या लेकी-सुनांवर खेडोपाडी आणि शहरातही बलात्कार होतात, पण शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे, उठल्याबसल्या जयघोष करणारे आज काय करतात? असा प्रश्नही पानसरे विचारतात.
शिवाजी महाराजांनी व्यापार-उद्योगाला कसं संरक्षण दिलं, गुलामांच्या व्यापारावर कशी बंदी घातली, त्यांचा धर्मविषयक दृष्टिकोन काय होता, त्यांच्या सैन्यात कोणत्या जाती-धर्माचे सैनिक होते, इतिहासाचा विपर्यास कोठे आणि कसा केला गेला यावरही पानसरेंनी या पुस्तकात मांडणी केली.
इतकंच नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेली काही पत्रेही वाचकांसमोर ठेवली आणि शिवाजी महाराज कसे 'रयतेचा राजा' होते, हे अधोरेखित केले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























