300 फूट उंच टॉवरवर 18 महिने ठिय्या देणाऱ्या माजी सैनिकाला खाली कसं उतरवलं?

गुरजीत सिंग (43 वर्षे) 12 ऑक्टोबर 2024 पासूनच एका मोबाईल टॉवरवर बसलेले होते, आता त्यांना खाली उतरवण्यात आलं आहे.
फोटो कॅप्शन, गुरजीत सिंग (43 वर्षे) 12 ऑक्टोबर 2024 पासूनच एका मोबाईल टॉवरवर बसलेले होते, आता त्यांना खाली उतरवण्यात आलं आहे.
    • Author, सरबजीत सिंग धालीवाल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

(इशारा: या लेखातील काही माहिती तुम्हाला विचलित करू शकते.)

"मी 18 महिने आणि 12 दिवसांनंतर सुरक्षितपणे खाली जमिनीवर आलो आहे," पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील समानामधील खेरी नागिया गावातील गुरजीत सिंग यांचे हे उद्गार आहेत.

गुरजीत सिंग (43 वर्षे) 12 ऑक्टोबर 2024 पासून समाना शहरामध्ये असलेल्या एका मोबाईल फोन टॉवरवर बसलेले होते. शुक्रवारी (24 एप्रिल) सकाळी साधारण 7:45 वाजता त्यांना या टॉवरवरून खाली उतरवण्यात आलं.

'अवमानाच्या घटनां'वर कठोर कारवाई करण्यासाठी ते एका कडक कायद्याची मागणी करत होते.

एक दिवस आधी ते म्हणाले होते, "12 ऑक्टोबर 2024 ते 23 एप्रिल 2026 पर्यंत, मला भयानक उष्णता, पाऊस, वारा, जबरदस्त थंडी आणि इतर अडचणींना तोंड द्यावं लागलं. मात्र, आता माझी मागणी मान्य करण्यात आली आहे, याचा मला आज आनंद आहे."

'जगत जोत श्री गुरू ग्रंथ साहिब सत्कार (सुधारणा) अधिनियम, 2026' हे विधेयक 13 एप्रिल 2026 ला पंजाब विधानसभेत मंजूर करण्यात आलं. त्यानंतर 17 एप्रिलला राज्यपालांच्या सहीनंतर त्याचं रुपांतर कायद्यात झालं.

मात्र या कायद्याला पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. या याचिकेत म्हटलं आहे की, नवीन कायद्यामध्ये धर्मनिरपेक्षता आणि कलम 14 चं उल्लंघन करण्यात आलं आहे.

गुरजीत सिंग यांना टॉवरवरून उतरण्यासाठी पटियाला प्रशासन, नागरिक सुरक्षा आणि भारतीय सैन्य यांनी संयुक्तपणे काम केलं.

समानाचे डीएसपी फतेह सिंग बराड यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, गुरजीत सिंग यांना 24 तारखेला सकाळी अटक करण्यात येईल. आता त्यांना अटक करण्यात आली आहे.

गुरजीत सिंग यांना खाली उतरवणाऱ्या टीमचे सदस्य असलेले अग्निशमन दलाचे जवान कृष्ण कुमार म्हणाले, "मी त्यांना पकडलं, दोरी सोडली आणि पिंजऱ्यात टाकलं. यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून सराव करत होतो."

गुरजीत सिंग यांना खाली उतरवण्यात आल्यानंतर, तपासणीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

गुरजीत सिंग टॉवरवर अनेक महिने कसे राहिले?

पटियाला जिल्ह्यातील समाना शहरामध्ये असलेल्या चिल्ड्रन पार्कजवळ असलेला टॉवर गेल्या 18 महिन्यांहून अधिक काळापासून चर्चेत आहे.

आधी इथे लोक गोळा होत होते. मात्र 24 फेब्रुवारीला 'धर्म युद्ध मोर्चा'नं समानातील बाबा बंदा सिंग बहादूर चौकात आंदोलन सुरू केलं. टॉवरपासून मार्चाचं अंतर जवळपास 1 किलोमीटरचं आहे.

समानातील बाबा बंदा सिंग बहादूर चौक, संगरूर आणि पटियाला जिल्ह्यांना हरियाणाशी जोडणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे.

पटियाला प्रशासन, नागरिक सुरक्षा आणि भारतीय सैन्यानं संयुक्त मोहीम चालवली
फोटो कॅप्शन, पटियाला प्रशासन, नागरिक सुरक्षा आणि भारतीय सैन्यानं संयुक्त मोहीम चालवली
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बीबीसीच्या टीमनं गुरुवारी (23 एप्रिल) दुपारी साधारण 2 वाजता गुरजीत सिंग यांच्याशी फोनवर संपर्क केला. ते समाना कोर्टजवळ चिल्ड्रन पार्कच्या अगदी शेजारी असलेल्या एका टॉवरवर बसलेले होते.

गुरजीत सिंग म्हणाले, "मी भूतकाळात अनेक अडचणींना तोंड दिलं आहे. मात्र गुरबानीच्या मदतीनं अखेरीस माझा विजय झाला आहे."

गुरजीत सिंग माजी सैनिक आहेत. आता ते शेतकरी आहेत. त्यांनी सांगितलं की, 12 ऑक्टोबर 2024 ला ते टॉवरवर चढले. सुरुवातीला त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं. विशेषकरून कबूतरं आणि इतर पक्ष्यांनी त्यांना खूप त्रास दिला.

"मी 100 फूट उंचीवर चढल्यानंतर थोडा वेळ आराम केला. मग मी 200 फूट उंचीवर पोहोचलो. शेवटी मी जवळपास 300 फूट उंचीवर पोहोचलो. कारण ती जागा सुरक्षित वाटत होती," असं ते म्हणाले.

गुरजीत सिंग म्हणाले की, ते आधी टॉवरवर थांबले आणि नंतर हळूहळू सामान खालून वर घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी टॉवरवर तंबू बांधला.

"मीू एक माजी सैनिक असल्यामुळे पाण्याच्या छोट्या बाटल्या, काही नाश्ता आणि इतर लहान-सहान गोष्टी घेऊन गेलो होतो. मात्र लवकरच त्या सर्व गोष्टी संपल्या. मग 5 दिवसांनी प्रशासनानं पुन्हा काही गोष्टी पाठवल्या. मला त्या पुरेशा होत्या," असं ते म्हणाले.

गुरजीत सिंग जवळपास 18 महिने या टॉवरवर बसलेले होते
फोटो कॅप्शन, गुरजीत सिंग जवळपास 18 महिने या टॉवरवर बसलेले होते

ते म्हणाले की, ते रात्रभर जागे राहायचे आणि सुर्योदय झाल्यानंतर झोपायचे.

यामागचं कारण सांगताना गुरजीत सिंग म्हणाले, "रात्रीच्या वेळेस मला सुरक्षेबाबत धोका वाटायचा. त्यामुळेच खबरदारी म्हणून मी रात्रीच्या वेळेस जागा राहायचो. मग सकाळी 9 वाजेपर्यंत झोपायचो."

ते म्हणाले की, त्यांना खाली उतरवण्यासाठी प्रशासनानं भरपूर प्रयत्न केले. मात्र उंचीमुळे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. ते त्यांच्या मागणीवर ठाम राहिले.

"माझ्या परिचयातील एकजण मला रोज नाश्ता, औषधं आणि पाणी आणून द्यायचा. त्यामुळे मला हळूहळू वेळ घालवता येत होता," असं गुरजीत सिंग म्हणाले.

"जोरदार वारे आणि अंधार असताना सर्वात कठीण परिस्थिती असायची. कारण त्यावेळेस टॉवर हलायचा. त्यामुळे खूप त्रास व्हायचा. याव्यतिरिक्त हिवाळ्यात धुक्यामुळे दृश्यमानता खूपच कमी असायची आणि थंडीमुळे देखील खूप त्रास व्हायचा," असं गुरजीत सिंग म्हणाले.

पावसाळ्यात कपडे ओले व्हायचे. मग हवेमुळेच ते सुकून जायचे, असं ते म्हणाले.

त्यांनी सांगितलं की, ते दिवसा फक्त एकदाच जेवण करायचे. ते प्रामुख्यानं द्रव पदार्थांवरच जगत होते. प्रातःविधीसाठी त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागत होतं.

गुरजीत म्हणाले की, त्यांचे पाय सुजले आहेत. त्यांना अनेक आजारदेखील झाले आहेत. मात्र अवमाननेच्या विरोधात कायदा झाल्यामुळे ते आनंदी आहेत.

गुरजीत सिंग यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि एक मुलगा आहे. गुरजीत सिंग त्यांच्या आईची आठवण करत म्हणाले की, त्यांच्या आईवर त्यांचं सर्वाधिक प्रेम आहे. ते आईशी सातत्यानं बोलत राहायचे.

गरजेच्या गोष्टी टॉवरवर कशा पोहोचायच्या?

गुरजीत सिंग जवळपास 300 फूट उंच टॉवरवर होते. त्यांच्यापर्यंत दररोज जेवण आणि इतर गरजेच्या वस्तू पोहोचवणं, हे सर्वात मोठं आव्हान होतं.

गुरजीत सिंग यांच्यापर्यंत दररोज सामान पोहोचवण्याची जबाबदारी गुरजंट सिंग नावाच्या एका तरुणावर होती. गुरजंट सिंग एका खासगी कंपनीत टॉवर उभारण्याचं काम करायचा. त्यामुळे त्याला टॉवरची उंची आणि त्याचे बारकावे यांची चांगलीच माहिती होती.

त्यामुळेच तो दररोज दुपारी 1 वाजता टॉवरवर चढायचा. येताना सोबत जेवण, कपडे, औषधं आणि बॅटरीसह आवश्यक वस्तू घेऊन जायचा.

टॉवरवरून खाली उतरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, गुरजीत सिंग
फोटो कॅप्शन, टॉवरवरून खाली उतरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, गुरजीत सिंग

"टॉवरवर गुरजीत सिंग यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला दररोज जवळपास 40 मिनिटं लागायचे. प्रत्येक 100 फूट उंचीपर्यंत पोहोचल्यानंतर मी बसायचो, विश्रांती घ्यायचो. मग पुन्हा वर चढण्यास सुरुवात करायचो," असं गुरजंट सिंग म्हणाला.

"गुरजीत सिंग यांच्याजवळ पोहोचल्यानंतर, मी काही वेळ विश्रांती घ्यायचो आणि मग आम्ही गप्पा मारायचो. जवळपास 4 तासांनी मी खाली यायचो," असं तो पुढे म्हणाला.

गुरजंट सिंग म्हणाला की, टॉवरचे पाईप हवामानानुसार कधी थंड होतात, तर कधी गरम होतात. त्यामुळे टॉवरवर चढल्याने त्याच्या हातांचे कातडे निघाले.

पावसाळ्याच्या आणि धुक्याच्या दिवसांमध्ये टॉवरवर चढणं खूप कठीण असायचं.

300 फुट उंचीवर तंबू

गुरजीत सिंग टॉवरवर बसून जेव्हा त्यांची मागणी करत होते. तेव्हा काहीजण खाली जमा झाले. त्यांनी सरकारपर्यंत ही माहिती पोहोचवली. यात काही टीव्ही पत्रकार, चित्रपटसृष्टीतील लोक, मानसशास्त्रज्ञ आणि शेतकरी नेते यांचा सहभाग होता.

गुरदासपूर जिल्ह्यातील बटाला तालुक्याचे रहिवासी असलेले 53 वर्षांचे टीव्ही पत्रकार, गुरप्रीत सिंग हे समन्वय साधत होते.

गुरजीत सिंग यांनी टॉवरवर जवळपास 300 फूट उंचीवर तंबू लावला होता
फोटो कॅप्शन, गुरजीत सिंग यांनी टॉवरवर जवळपास 300 फूट उंचीवर तंबू लावला होता

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "24 फेब्रुवारीला मोठ्या संख्येनं निषेध करण्यासाठी संगत जमली. सुरुवातीला पंजाब सरकारनं हे दडपण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले. मात्र लोक मागे हटले नाहीत आणि बाबा बंदा सिंग बहादूर चौकात यशस्वीपणे आंदोलन करण्यात आलं."

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, 13 एप्रिलला विधानसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर 14 एप्रिलला पंजाबच्या विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवान आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी तिथे असलेल्या आयोजकांना 'जगत जोत श्री गुरू ग्रंथ साहिब सत्कार सुधारणा विधेयक-2026' ची एक प्रत दिली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)