'मादुरो हे सत्य साईबाबांचे भक्त होते', पुट्टपर्थी आश्रमाने नेमकी काय माहिती दिली?

फोटो स्रोत, satyasai.org
- Author, तुलसी प्रसाद रेड्डी,
- Role, बीबीसीसाठी
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना अटक केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे.
मात्र, भारतात सध्या मादुरो यांच्या एका वेगळ्या पैलूची चर्चा रंगली आहे. मादुरो यांनी 2005 मध्ये पुट्टपर्थी येथे येऊन सत्य साईबाबांचे आशीर्वाद घेतले होते, अशी माहिती 'श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्ट'ने दिली आहे.
"होय, मादुरो हे सत्य साईबाबांचे भक्तच आहेत. मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांनी 2005 मध्ये पुट्टपर्थी येथील सत्य साईबाबा आश्रमाला भेट देऊन बाबांचे आशीर्वाद घेतले होते," अशी पुष्टी पुट्टपर्थी येथील 'श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्ट'चे व्यवस्थापकीय विश्वस्त आर. जे. रत्नाकर यांनी 'बीबीसी'शी बोलताना दिली आहे.
अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी काराकसवर 3 जानेवारी रोजी हल्ला केला आणि राष्ट्राध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेतले.
अमेरिकेच्या या कारवाईनंतर आता व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्षांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, मादुरो यांनी भूतकाळात आंध्र प्रदेशातील पुट्टपर्थी येथे येऊन सत्य साईबाबांचे दर्शन घेतल्याची चर्चा भारतात रंगली.
"मादुरो यांनी पुट्टपर्थी येथे येऊन सत्य साईबाबांचे दर्शन घेतले होते, हे सत्य आहे," अशी पुष्टी आर. जे. रत्नाकर यांनी 'बीबीसी'शी बोलताना दिली.
मादुरो आणि सिलिया फ्लोरेस यांनी 2005 मध्ये पुट्टपर्थी सत्य साईबाबा आश्रमात येऊन बाबांचे आशीर्वाद घेतले होते. येथे मोठ्या संख्येने परदेशी भक्त येतात. जोपर्यंत ते स्वतः आपली ओळख सांगत नाहीत, तोपर्यंत ते कोण आहेत हे आम्हाला समजत नाही," असेही त्यांनी पुढे नमूद केले.
मादुरो आले होते तेव्हा एक मोठा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी त्यांनी आत जाऊन बाबांची भेट घेतली होती अशी माहिती आहे. त्यांनी विनंती करून बाबांसोबत छायाचित्र काढून घेतले होते. आमच्याकडे त्यांचे ते एकच छायाचित्र उपलब्ध आहे," असे स्पष्टीकरण रत्नाकर यांनी दिले.
"व्हेनेझुएलामध्येही बाबांशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात. फक्त तिथेच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये बाबांच्या नावाने अनेक आश्रम आहेत. त्या सर्व ठिकाणी विविध कार्यक्रम होत असतात."
"ते सत्य साईबाबांचे भक्त आहेत आणि बाबांच्या शिकवणीचे पालन करतात. मादुरो यांनी त्यांच्या महालात सत्य साईबाबांचे छायाचित्र लावले असल्याचेही आम्हाला समजले आहे," असे रत्नाकर यांनी सांगितले.
'व्हेनेझुएलाच्या नव्या राष्ट्राध्यक्षही भक्त'
"व्हेनेझुएलाच्या सध्याच्या राष्ट्राध्यक्ष डेलसी रॉड्रिग्ज यादेखील सत्य साईबाबांच्या भक्त आहेत," अशी माहिती रत्नाकर यांनी बीबीसीला दिली.
रॉड्रिग्ज जेव्हा उपराष्ट्राध्यक्ष होत्या, तेव्हा त्यांनी पुट्टपर्थी येथे येऊन सत्य साईबाबांच्या महासमाधीचे दर्शन घेतले होते, असे त्यांनी सांगितले.
त्या सत्य साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत असतानाची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
'सत्य साई सेंट्रल ट्रस्ट'ची वेबसाईट आणि फेसबुकवरील फोटो व माहितीनुसार, रॉड्रिग्ज यांनी ऑगस्ट 2023 आणि ऑक्टोबर 2024 मध्ये पुट्टपर्थीला भेट देऊन, प्रशांती निलयम येथील समाधी मंदिरात साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे समोर आले आहे.

फोटो स्रोत, satyasai.org
सत्य साई ट्रस्टने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकावरून असे समोर आले आहे की, 26 ऑक्टोबर 2024 रोजी जेव्हा रॉड्रिग्ज पुट्टपर्थी येथे आल्या होत्या, तेव्हा त्या व्हेनेझुएलाच्या उपराष्ट्राध्यक्ष होत्या.
त्या वेळी त्यांच्यासोबत भारतातील व्हेनेझुएलाचे राजदूत 'कपाया रॉड्रिग्ज गोन्साल्विस' देखील उपस्थित होते, असेही या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
"सत्य साई सेंट्रल ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक आर. जे. रत्नाकर यांनी त्यांचे स्वागत केले. 2023 मध्ये जेव्हा डेलसी रॉड्रिग्ज G-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले होते, तेव्हा त्यांनी पुट्टपर्थीला भेट दिली होती. ती त्यांची वैयक्तिक भेट असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते."
अमेरिकेने मादुरो यांना अटक का केली?
डाव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो शावेझ आणि 'युनायटेड सोशालिस्ट पार्टी ऑफ व्हेनेझुएला'च्या कार्यकाळात मादुरो सत्तेवर आले.
पूर्वी बस चालक आणि युनियन नेते म्हणून काम केलेले मादुरो, शावेझ यांच्यानंतर 2013 पासून राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत.
2024 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मादुरो विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले होते. मात्र, विरोधी पक्षांनी हा निकाल स्वीकारला नाही.

फोटो स्रोत, Reuters
मादुरो हे अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित एक गुन्हेगारी टोळी चालवत असल्याचा आरोप अमेरिका दीर्घकाळापासून करत आहे, परंतु त्यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत.
'Cartel de los Soles' नावाच्या गटाला अमेरिकेने विदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. व्हेनेझुएलातील काही प्रभावशाली व्यक्तींचा उल्लेख करण्यासाठी अमेरिका या नावाचा वापर करते.
अमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर खाणकाम यांसारख्या अवैध कारवायांचे हा गट नियोजन करतो, असा अमेरिकेचा आरोप आहे.
मादुरो यांना आता शस्त्रे आणि अमली पदार्थांशी संबंधित आरोपांखाली अमेरिकेत खटल्याचा सामना करावा लागत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











