You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बहिणींच्या लग्नासाठी दोन मित्रांनी खोदकामातून मिळवला हिरा, फक्त 20 दिवसांत नशीब पालटण्याची गोष्ट
- Author, विष्णुकांत तिवारी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
एखादा भाऊ आपल्या बहिणीसाठी काय करू शकतो? याचं अगदी चपखल उत्तर मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात राहणाऱ्या दोन मित्रांच्या या गोष्टीतून मिळतं.
9 डिसेंबरची गारठलेली सकाळ. पन्ना येथील हिरा कार्यालयाबाहेर फारशी गर्दी नव्हती.
कागदांच्या पुडक्यात एक छोटं पाकिट ठेवून ते हातात घेऊन साजिद मोहम्मद आणि सतीश खटीक हे त्या कार्यालयाबाहेर उभे होते. हाच दिवस त्यांचं नशीब पलटवणारा दिवस ठरणार याची त्यांना खात्री होती. कारण त्या पाकिटामध्ये होता 15.34 कॅरेटचा एक हिरा! त्यासोबतच ते स्वप्न होतं, जे पन्नामध्ये अनेक लोक पाहतात, पण खूप कमी जणांसाठी ते प्रत्यक्षात खरं ठरलेलं दिसतं.
साजिदचं एक छोटंसं फळांचं दुकान आहे. आम्ही भेटलो तेव्हा साजिद आणि सतीश दोघेही त्याच दुकानावर बसलेले होते. बीबीसीशी बोलताना साजिद म्हणाले, "जेव्हा हिरा मिळतो, तेव्हा आपोआप कळतं. एकदम लाईट मारल्यासारखा. अंगावर काटा येतो की हो! हा हिरा आहे."
पन्नाच्या हिरा कार्यालयात असलेले शासकीय हिरा पारखी अनुपम सिंह यांनी बीबीसीला सांगितलं, "सतीश खटीक आणि साजिद मोहम्मद यांना मिळालेला हिरा 15.34 कॅरेटचा आहे. खाण सतीशच्या नावावर होती आणि दोघांनी मिळून हा हिरा शोधला आहे."
हिरा मिळाल्याचा तो क्षण आठवत सतीश म्हणतात, "आम्ही इतक्या लवकर इतक्या मोठ्या रकमेचे मालक बनू, याची अपेक्षा नव्हती. आता बहिणींची लग्नं व्यवस्थित करता येतील."
'डायमंड सिटी'च्या मागची कहाणी
बुंदेलखंड भागात वसलेलं पन्ना हे देशात 'डायमंड सिटी' म्हणून ओळखलं जातं. पण या ओळखीमागे गरिबी, पाण्याची टंचाई आणि रोजगाराचा अभाव यासारख्या समस्यांचं वास्तव दडलेलं आहे.
येथे जमीन खोदणं हा फक्त रोजगार नाही, तर आशा आणि अनिश्चितता यांच्यामध्ये घेतलेला एक निर्णय असतो.
साजिद आणि सतीश यांनीही हिरा मिळवण्याच्या इच्छेने हाच मार्ग निवडला.
पन्नामध्ये हिऱ्याच्या शोधात अनेक लोकांचं आयुष्य सरून जातं, पण या दोन मित्रांना हे यश अवघ्या 20 दिवसांत मिळालं.
साजिद आणि सतीश लहानपणापासूनचे मित्र आहेत. दोघांचं आयुष्यही बरंचसं सारखंच आहे.
पन्नाच्या रानीगंज परिसरात दोघांची घरं आहेत. दोघांच्याही मागच्या अनेक पिढ्यांचं आयुष्य हिरा शोधण्यात गेलं आहे.
पन्नामध्ये सतीश एका छोटं मटणविक्रीचं दुकान चालवतो, तर साजिदचं कुटुंब फळं विकून आपला उदरनिर्वाह करतं.
दोन्ही कुटुंबांमध्ये बहिणींच्या लग्नाचा खर्च हा खूप दिवसांपासून काळजीचा विषय होता. तुटपुंजं उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये ही जबाबदारी अनेकदा एक मोठा प्रश्न असतो असतो.
साजिद सांगतात, "आमचे वडील आणि आजोबा यांनीही अनेक वर्षं जमीन खोदली, पण कधीच हिरा हाती लागला नाही."
सतीशच्या कुटुंबाची कहाणीही काही वेगळी नाही. पण लोक प्रत्येक वेळी फावडं उचलताना हेच विचार करतात की कदाचित यावेळी तरी नशीब बदलेल.
घराचा वाढता खर्च आणि बहिणींच्या लग्नाची काळजी यामुळे नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही मित्रांनी एक निर्णय घेतला. तो म्हणजे हिरा शोधण्याचा निर्णय.
पन्नाच्या दृष्टीने पाहिलं तर हा निर्णय काही आश्चर्यकारक नव्हता. ज्या भागात शेकडो कुटुंबं अनेक पिढ्यांपासून हिरा शोधण्यासाठी धडपड करत आहेत, तिथे दोन तरुण मित्रांचा हा निर्णय अजिबातच आश्चर्यकारक नव्हता, पण 20 दिवसांच्या आत त्यांची सगळीकडे चर्चा सुरू झाली.
पन्नामध्ये हिरा कसा शोधला जातो?
पन्नामध्ये नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चालवत असलेली 'मझगवां' हिरा खाण हे देशातील एकमेव संघटित हिरा उत्पादन केंद्र आहे.
याव्यतिरिक्त, पन्नामध्ये कोणतीही व्यक्ती राज्य सरकारकडून 8 X 8 मीटरचा भूखंड भाडेतत्त्वावर घेऊन कायदेशीररीत्या एका वर्षापर्यंत हिऱ्याचं उत्खनन करू शकते. यासाठी वार्षिक शुल्क 200 रुपये आहे.
अर्थात, उत्खनन केल्यावर हिरा मिळेलच याची कोणतीही शाश्वती नसते.
साजिद आणि सतीश यांनीही असाच एक जमिनीचा तुकडा भाड्याने घेतला आणि उत्खनन सुरू केलं. सुमारे 20 दिवसांच्या मेहनतीनंतर, 8 डिसेंबरच्या सकाळी त्यांना तो दगड मिळाला, जो त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारा ठरला.
दुसऱ्या दिवशी हा हिरा पन्नाच्या हिरा कार्यालयात पोहोचला, तेव्हा तपासणीत त्याचं वजन 15.34 कॅरेट असल्याचं आढळलं. हा 'जेम-क्वालिटी'चा हिरा आहे.
किमतीच्या प्रश्नावर अनुपम सिंह म्हणतात, "हिऱ्याची नेमकी किंमत सांगणं कठीण आहे कारण ती आंतरराष्ट्रीय बाजारभावावर अवलंबून असते. पण सध्याच्या अंदाजानुसार त्याची किंमत 50 ते 60 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते."
त्यांच्या माहितीनुसार, पन्नामध्ये आतापर्यंतचा सर्वात महागडा हिरा 2017-18 मध्ये मोतीलाल प्रजापती यांना मिळाला होता.
त्या हिऱ्याचं वजन 42.58 कॅरेट होतं आणि लिलावात त्याची किंमत सहा लाख रुपये प्रति कॅरेट लागली होती. अशा प्रकारे त्याची एकूण किंमत अडीच कोटी रुपयांहून अधिक होती.
लिलावात न विकल्या गेलेल्या हिऱ्यांबद्दल विचारले असता, अनुपम सिंह यांनी सांगितलं की बहुतेक हिरे पाच लिलावांमध्ये विकले जातात.
जर कोणताही हिरा विकला गेला नाही, तर तो मिळवणारा व्यक्ती सरकारकडे ठरलेली रॉयल्टी जमा करून तो परत घेऊ शकतो आणि नंतर खासगी बाजारात विकू शकतो.
लिलावातून मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी 12 टक्के सरकार आपल्याकडे ठेवते, तर उर्वरित रक्कम हिरा शोधणाऱ्यांना मिळते.
साजिद आणि सतीशच्या बहिणींचं म्हणणं आहे की पहिल्यांदा असं वाटतंय की आयुष्य बदलणार आहे.
साजिद आणि सतीश यांचं म्हणणं आहे की ही रक्कम त्यांच्या कल्पनेपलीकडची आहे, कारण त्यांची महिन्याची कमाई काही हजार रुपयांपेक्षा जास्त नसते.
साजिदची बहीण सबा बानो म्हणते की, हिरा मिळण्याच्या बातमीनं घरात पहिल्यांदाच आशेचं वातावरण तयार झालंय.
ती म्हणते, "माझ्या वडिलांना आणि आजोबांच्या प्रयत्नांना यश मिळालं नव्हतं. माझ्या भावानं आणि सतीश दादानं सांगितलं आहे की ते आमची लग्नं लावून देतील.आमचं तर संपूर्ण कुटुंबच खूप आनंदात आहे."
साजिद आणि सतीश सांगतात, "हिरा मिळाल्याच्या रात्री झोपच लागली नाही. स्वप्नात पैशांपेक्षा सुरक्षित भविष्य होतं, बहिणींचं लग्न, घर आणि स्थैर्य या बाबतचे विचार घोळत होते."
सतीश म्हणतात, "येथे शिक्षणापासून ते रोजगाराचे इतर मार्ग बहुतेक बंदच आहेत, त्यामुळे पिढ्यानपिढ्या हाच जुगार सर्वात मोठा आधार बनलेला आहे."
पन्नामध्ये हिरा शोधणं हा आशा आणि निराशा यांच्यात हेलकावे खाणारा प्रवास आहे.
बहुतेक लोक रिकाम्या हाती परत जातात, पण जेव्हा कोणाला हिरा मिळतो, तेव्हा त्याची चमक फक्त एका कुटुंबापुरती मर्यादित नसते. तर ती संपूर्ण परिसरात ही आशा निर्माण करते की कदाचित पुढचा नंबर आपला असेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.