विदर्भात भाजपसह महायुतीचा इतका दारुण पराभव का झाला? 5 संभाव्य कारणं

रामदास तडस, मुनगंटीवार, नवनीत राणा

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

विदर्भात दहा जागांपैकी दोन जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं, तर शिंदेंच्या शिवसेनेला फक्त एक जागा मिळाली.

विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे पाच जागा मिळाल्या आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली.

2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला 9 जागांवर विजय मिळाला होता. पण, 2024 च्या निवडणुकीत महायुतीला फक्त तीन जागांवर समाधान मानावं लागलं. त्यातही भाजपला फक्त दोनच जागा मिळाल्या.

भाजप आणि शिवसेना जेव्हा एकत्र लढली होती, तेव्हा म्हणजेच 2014 ला विदर्भातल्या दहाच्या दहा जागा आणि 2019 ला 9 जागा जिंकल्या होत्या.

यावेळेस भाजपसोबत शिवसेना होती, पण या शिवसेनेचे संदर्भ बदलले होते. ती शिवसेना एकनाथ शिंदेंची होती. सोबत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही होता आणि युतीची आता ‘महायुती’ बनली होती.

पण तरीही भाजपचा विदर्भात इतका दारुण पराभव का झाला? विदर्भात काँग्रेसला पुन्हा भरघोस यश कसं मिळालं? यामागच्या पाच संभाव्य कारणांची चर्चा या लेखात करुयात. पण, त्याआधी विदर्भातल्या दहाही मतदारसंघाचा निकाल थोडक्यात पाहूयात.

विदर्भातल्या दहा लोकसभा मतदारसंघापैकी फक्त नागपूर आणि अकोला या दोन जागा भाजपला मिळाल्या, तर बुलडाण्याची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली. विदर्भात काँग्रेसला चांगलं यश मिळालेलं दिसतंय.

काँग्रेसनं भाजपच्या ताब्यात गेलेला आपला बालेकिल्ला परत खेचून आणला. महाराष्ट्रात 13 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. त्यापैकी तब्बल पाच जागा एकट्या विदर्भानं दिल्या.

रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली चिमूर, भंडारा गोंदिया, अमरावती या पाच जागांवर काँग्रेसनं बाजी मारली, तर वर्ध्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी, तर यवतमाळ वाशिममध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला यश मिळालं आहे.

चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचा पराभव करत धानोरकर खासदार

प्रतिभा धानोरकर-सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरात 2019 ला बाळू धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांना हरवून जायंट किलर ठरले होते. तीच परंपरा कायम राखत राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करून प्रतिभा धानोरकर या देखील जायंट किलर ठरल्या आहेत.

प्रतिभा धानोरकर यानी त्यांचे पती दिवंगत बाळू धानोरकर यांच्यापेक्षा देखील जास्त लीड घेतली. प्रतिभा धानोरकर तब्बल 2 लाख 58 हजारांच्या मताधिक्क्यानं विजयी झाल्या आहेत.

व्हीडिओ कॅप्शन, नितीन गडकरी नागपूर लोकसभा जिंकले, पण विदर्भात महायुती इतकी का पडली?

रामटेकमध्ये राजकीय पार्श्वभूमी नसलेले श्यामकुमार बर्वे विजयी

रामटेकमध्ये रश्मी बर्वे या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार होत्या. पण, उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आणि त्यांची उमेदवारी रद्द झाली.

त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांनी डमी म्हणून अर्ज भरला आणि ते 76 हजार 158 मताधिक्क्यानं निवडून आले.

रामटेक मतदारसंघ

त्यांनी शिवसेनेच्या राजू पारवे यांचा पराभव करत गेली 10 वर्ष महायुतीच्या ताब्यात असलेला रामटकेचा गड काँग्रेसला परत मिळवून दिला.

श्यामकुमार बर्वे हे कांद्री गावचे उपसरपंच होते. त्यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आता थेट रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले आहेत.

गडचिरोली-चिमूरमध्ये वडेट्टीवारांचं नाणं चाललं, दोन टर्म खासदाराचा पराभव

गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय नामदेव किरसान यांचा विजय झाला आहे. त्यांनी तब्बल 1 लाख 40 हजार मतांनी दोन टर्म खासदार राहिलेल्या भाजपच्या अशोक नेतेंचा पराभव केला.

नामदेव किरसान यांच्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वडेट्टीवार या मतदारसंघात तळ ठोकून होते. तसेच नामदेव किरसान यांनी 10 वर्षं मतदारसंघ पिंजून काढला होता.

आता पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरून त्यांनी दोन टर्म खासदाराला दीड लाखाच्या मताधिक्क्यानं पराभूत करून भाजपला घाम फोडला आहे.

भंडारा-गोंदियात 25 वर्षांनंतर फडकला काँग्रेसचा झेंडा, भाजपला धक्का

भंडारा गोंदियामध्ये काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांनी भाजपचे खासदार सुनील मेंढे यांचा 33 हजार 518 मतांनी पराभव केला आहे. पडोळे यांच्या रूपानं या मतदारसंघात तब्बल 25 वर्षानंतर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

आतापर्यंत ही जागा राष्ट्रवादीला सुटत होती. पण, प्रफुल पटेल महायुतीत गेल्यानंतर काँग्रेसला ही जागा मिळाली आणि काँग्रेसनं पहिल्याच झटक्यात विजय मिळवला.

खरंतर नाना पटोले हेच उमेदवार असतील, पडोळेंचा फक्त डमी म्हणून अर्ज भरला अशी चर्चा होती.

पण, नानांनी निवडणुकीत काढता पाय घेतला आणि डमी असलेल्या प्रशांत पडोळे यांना निवडून आणून दाखवलं. प्रफुल पटेल यांचीही ताकद या मतदारसंघात चाललेली नाही.

अमरावतीमध्ये नवनीत राणांचा पराभव, काँग्रेस उमेदवार विजयी

देशात अमरावतीच्या जागेची भरपूर चर्चा झाली. कारण, या मतदारसंघातून खासदार नवनीत राणा यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखेडे यांनी 19 हजार 731 मतांनी नवनीत राणांचा पराभव केला.

या मतदारसंघात नवनीत राणा यांचे सर्वपक्षीयांसोबत असलेले वाद त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे.

नवनीत राणा

फोटो स्रोत, Getty Images

कारण महायुतीचे घटक असलेल्या बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळ यांच्यासोबत राणांचं वैर होतं. बच्चू कडूंचे उमेदवार दिनेश बूब यांना 85 हजार मतं मिळालेली मतं महायुतीची आहेत.

कारण, बच्चू कडू हे महायुतीचे घटक आहेत. हे कारणही नवनीत राणा यांच्या पराभवामागे आहे.

वर्ध्यात शरद पवारांच्या पक्षाचं खातं उघडलं, दोन टर्म भाजप खासदाराचा पराभव

वर्धा लोकसभा मतदारसंघ खरंतर काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पहिल्यांदाच या मतदारसंघात काँग्रेसचा पंजा दिसला नाही. कारण, या मतदारसंघात काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. शरद पवार यांनीच काँग्रेसमधून अमर काळे यांना आयात केलं आणि त्यांना तुतारी चिन्हावर लढायला लावलं.

अमर काळे यांनी 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत विजयी झालेल्या रामदास तडस यांचा पराभव करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचं खातं वर्ध्यात उघडलं आहे. अमर काळे यांनी 66 हजार 238 मतांनी रामदास तडस यांचा पराभव केला

यवतमाळ वाशिम राहिला उद्धव ठाकरेंचाच बालेकिल्ला

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण, खासदार भावना गवळी या एकनाथ शिंदेंसोबत गेल्या.

शिंदेंनी त्यांना तिकीट नाकारलं. त्यांच्याजागी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली.

यवतमाळ-वाशिम

पण, उद्धव ठाकरेंनी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत संजय देशमुख यांना उमेदवारी दिली. इथं शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली.

यात संजय देशमुख यांनी राजश्री पाटील यांचा तब्बल 94 हजार 473 मतांनी पराभव केला आणि यवतमाळ वाशिममधले आमदार खासदार शिंदेंसोबत गेले असले तरी कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं स्पष्ट झालंय.

नागपुरात नितीन गडकरी विजयी, पण मताधिक्क्य का कमी झालं?

नागपुरात नितीन गडकरी यांनी विजयाची हॅटट्रीक केली आहे. त्यांनी 1 लाख 37 हजार मतांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा पराभव केला आहे. नितीन गडकरी हे विजयी झाले असले तरी त्यांचं मताधिक्क लाखभर मतांनी कमी झालं आहे.

नितीन गडकरी

2019 मध्ये त्यांना 2 लाख 16 हजारांचं मताधिक्क्य होतं. या निवडणुकीत गडकरींची लीड कमी होण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेसनं दिलेला उमेदवार. विकास ठाकरे हे नागपुरातल्या दलित, मुस्लीम, ओबीसी या जातीय समीकरणात फीट बसत होते. तसेच वंचितनं देखील नागपुरात उमेदवार दिला नव्हता. ऐरवी गटतटांमध्ये विखुरलेली काँग्रेस यावेळी ठाकरेंसाठी एकत्र दिसली. तसेच विकास ठाकरे हे एक स्थानिक ओबीसी चेहरा होता.

त्यांनी गडकरींच्या रस्ते बांधकामाच्या विरोधात केलेला प्रचारही काँग्रेसच्या पथ्यावर पडला. त्यामुळेच विकास ठाकरेंना नितीन गडकरी यांचं लीड लाखभर मतांनी कमी करण्यात यश मिळाल्याची चर्चा आहे.

अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे विजयी

अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रसचे अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यात अनुप धोत्रे यांनी 40 हजार मतांनी काँग्रेसच्या अभय पाटील यांचा पराभव केला.

अभय पाटील यांनी 4 लाख 16 हजार मतं मिळाली, तर प्रकाश आंबेडकर 2 लाख 76 हजार मतं घेत तिसऱ्या स्थानावर राहिले.

बुलडाण्यात शिंदेंच्या सेनेचा विजय

बुलडाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली होती. यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव विजयी झाले. त्यांनी 29 हजार 479 मतांनी उद्धव ठाकरेंचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांना पराभूत केलं आहे.

प्रतापराव जाधव हे सलग तीन टर्म खासदार होते. आता चौथ्यांदा त्यांना बुलडाण्याच्या जनतेनं कौल दिला आहे. यात महत्वाचं म्हणजे रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार होते आणि त्यांना अडीच लाख मतं मिळाली आहेत. त्याचाही फटका उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला बसल्याची चर्चा आहे.

विदर्भात काँग्रेसची मुसंडी, भाजपचा पराभव का झाला?

विदर्भ हा काँग्रेसचा गड होता. 2019 ला अख्ख्या महाराष्ट्रात काँग्रेसचा सुपडासाफ झाला होता. पण, विदर्भानं काँग्रेसला चंद्रपुरातून एक खासदार दिला होता. विदर्भ नेहमीच काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला दिसतोय. आणीबाणीच्या काळातही इंदिरा गांधींना देशात फटका बसला होता. पण, विदर्भानं साथ दिली होती.

मधल्या काळात काँग्रेसमधल्या गटतटाच्या राजकारणात विदर्भ काँग्रेसपासून दुरावला गेला. आता परत काँग्रेसनं आपला बालेकिल्ला भाजपच्या ताब्यातून परत मिळवला आहे.

विदर्भात काँग्रेसला कौल मिळण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे इथं चाललेला DMK फॅक्टर.

विदर्भात बहुजनवादी राजकारण चालतं. यावेळीही या बहुजनवादी राजकारणाचा काँग्रेसला फायदा झालेला दिसला. या निवडणुकीत दलित, मुस्लीम आणि कुणबी असा DMK फॅक्टर चालला. विदर्भात दलित, मुस्लीम आणि कुणबी मतदार मोठ्या प्रमाणात आहे. दलित आणि मुस्लीम ही काँग्रेसची पारंपरिक व्होट बँक आहे. यावेळी संविधान बचावचा मुद्दा काँग्रेसनं इथल्या दलित मतदारांपर्यंत पोहोचविण्यात काँग्रेस यशस्वी ठरली.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

मतदारांमध्ये निवडणुकीच्या निकालाबद्दल चर्चा होताना संविधान वाचतंय की नाही अशी चर्चा होताना दिसली. दुसरं म्हणजे भाजपचं गेल्या काही वर्षांतलं मुस्लीमांविरोधातलं राजकारण यामुळे मुस्लीम समाज हा काँग्रेससोबत राहिला.

तिसरं म्हणजे कुणबी मतदार. तसं पाहायला गेलं तर कुणबी ही भाजपची व्होट बँक आहे. पण, मराठ्यांना कुणबी सर्टीफिकेट देण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयाला खरा विरोध झाला तो विदर्भातल्या कुणबी समाजाचा.

नागपूर, चंद्रपुरात कुणबी समाजाची मोठमोठी आंदोलनं झाली. त्यामुळे भाजपविरोधात कुणबी समाजात रोष होता. हाच रोष मतांच्या स्वरुपात एन्कॅश करण्यासाठी काँग्रेसनंही कुणबी उमेदवार उतरवले. यात भंडारा गोंदिया, चंद्रपूर, नागपूर इथं कुणबी उमेदवार दिले. त्याचा काँग्रेसला फायदाही झाला.

मोदींविरोधात शेतकरी, पेन्शनर्सची नाराजी

विदर्भात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. पण, मोदी सरकारच्या काळात या पिकांना भाव मिळाला नसल्याची शेतकऱ्यांची ओरड होती. तसेच या ऐन निवडणुकीच्या काळात सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी झाले होते. त्यामुळे शेतकरी मोदी सरकारवर नाराज होते.

दुसरीकडे काँग्रेसनं प्रचाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा मुद्दा योग्य रितीनं मांडला. त्याचा फायदा काँग्रेसला झालेला दिसतोय. दुसरं म्हणजे जुन्या पेन्शनचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून गाजतोय.

पण, गेल्या दोन वर्षांत शासकीय कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनसाठी आंदोलन केलं. त्यासाठी नागपुरात मोठमोठी आंदोलनं झाली. पण, त्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली नाही. त्यांचाही भाजप सरकारवर राग होता.

तिसरं म्हणजे महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा विदर्भात प्रभावी ठरला. दैनंदिन जीवनात कामात येणाऱ्या वस्तूंचे भाव वाढल्यानं सामान्य जनतेत नाराजी होतीच. त्याचा फटका भाजपला बसल्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि महाविकास आघाडीतली एकजूट

काँग्रेसमध्ये याआधी गटतटाचं राजकारण अधिक चालत होतं. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे भाजपला विदर्भात पाय पसरता आले होते. पण, या निवडणुकीत सगळे गटतट एकत्र आले. काँग्रेसमध्ये एकजूट दिसली. नागपुरात तर विकास ठाकरेंसाठी सगळे गट एकत्र दिसले. अमरावती, गडचिरोली, भंडारा गोंदियातही हेच चित्र दिसलं. एक-दोन अपवाद वगळता कुठेही बंडखोरी झालेली नाही.

चंद्रपुरात सुरुवातीला विजय वडेट्टीवारांनी प्रतिभा धानोरकरांना विरोध केला होता. पण, धानोरकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात का होईना वडेट्टीवारांनी धानोरकरांचा प्रचार केला. याच एकजुटीचा काँग्रेसला फायदा झाला.

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्येही विदर्भात एकजूट दिसली. यात वर्ध्याची आपली पारंपरिक जागा काँग्रेसनं जिंकण्याची क्षमता असणारा उमेदवार राष्ट्रवादीकडे असल्यानं त्यांना सहज दिली. कोणत्या उमेदवारात जिंकण्याची क्षमता आहे हे ठरवून तिन्ही पक्षांचं जागावाटप झालं. प्रसंगी एकमेकांच्या पारंपरिक जागा देखील सोडल्या.

महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी भाजपला हरवायचं या एकाच उद्देशानं प्रचारात एकजुटीनं काम केलं. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला.

पक्ष फोडाफोडी जनतेला आवडली नाही

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचा प्रकार जनतेला आवडला नाही हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं. विदर्भात काँग्रेस आणि भाजप हे दोनच मोठे पक्ष असले तरी इथल्या जनतेलाही हे फोडाफोडीचं राजकारण आवडलं नाही.

भंडारा-गोंदिया मतदारसंघात प्रफुल पटेल यांनी दिलेला उमेदवार आतापर्यंत निवडून आला. पण, अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष ताब्यात घेतला आणि पटेल शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले. त्याचा परिणाम भंडारा-गोंदिया मतदारसंघात झाल्याची चर्चा आहे. कारण, सुनील मेंढेंना निवडून आणण्याची जबाबदारी प्रफुले पटेलांनी घेतली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपनं मेंढेंना उमेदवारी दिली होती. पण, पटेलांची जादू चालली नाही.

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे

फोडाफोडीचं राजकारण प्रभावी ठरणारा विदर्भातला दुसरा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ-वाशिम. या मतदारसंघात सेना विरुद्ध सेना लढत झाली. आमदार, खासदार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. पण, ठाकरेंनी निष्ठावान शिवसैनिकाला तिकीट दिलं आणि संजय देशमुख यांनीही बाजी मारली. इथंही लोकप्रतिनिधींनी साथ सोडली तरी कार्यकर्ते ठाकरेंसोबत राहिले, त्यांना फोडाफोडीचं राजकारण आवडलं नाही हे दिसलं.

तिसरा मतदारसंघ म्हणजे रामटेक. हा मतदारसंघ गेली अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. यावेळी महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला. पण, शिंदेंनी मात्र त्यांचा उमेदवार दिला. पण, रामटेक विधानसभा मतदारसंघातलं ठाकरेंच् कॅडरनं काँग्रेस उमेदवाराचं काम केलं. या मतदारसंघात मविआचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना चांगली मतं मिळाली. म्हणजे इथलाही कार्यकर्ता अजून उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं दिसलं.

वंचितचा फॅक्टर चालला नाही, बसपा कमजोर झाली

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

विदर्भात बहुजन समाजवादी पक्षाचं कॅडर होतं. पण, गेल्या काही वर्षांपासून विदर्भात बसपचा जोर कमी होताना दिसतोय. दुसरीकडे 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना फटका बसला होता. पण, त्यावेळी वंचितनं एमआयएमसोबत युतीमध्ये निवडणूक लढली होती हे विसरून चालणार नाही. यावेळी प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासून महाविकास आघाडीसोबत यायचं आहे असं म्हणाले. त्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत युती केली, ज्या काँग्रेसवर टीका करायचे त्यांचं शेवटच्या टप्प्यात तोंडभरून कौतुक केलं आणि शेवटच्या क्षणी मात्र त्यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला.

दुसरीकडे वंचितनं दिलेले उमेदवारही तगडे नव्हते. वंचितनं नागपुरात उमेदवार दिला नाही, रामटेकमध्ये तीन वेळा उमेदवार बदलला, तिकडे यवतमाळमध्येही उमेदवार बदलला. अमरावतीमध्ये अधिकृत उमेदवारानं अर्जच भरला नाही.

ऐनवेळी आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा घोषित केला. तसेच वंचित भाजपची बी टीम आहे, हा मुद्दा काँग्रेसनं लावून धरला होता. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की विदर्भात दलित मतदार मोठ्या प्रमाणात असले तरी त्याचा फायदा वंचितला झालेला नाही. त्याचा फायदा काँग्रेसला झाला हे आपल्याला रामेटक आणि अमरावती या दोन अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघाच्या निकालावरून दिसून येईल.

रामटेकमध्ये किशोर गजभियेंना वंचितनं पाठिंबा दिला होता. पण, त्यांना फक्त 24 हजार मतं मिळाली. दुसरीकडे अमरावतीत वंचितच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या आनंदराज आंबेडकरांना फक्त 18793 मतं मिळाली. त्यामुळे विदर्भात दलित उमेदवार मोठ्या प्रमाणात असला तरी त्याचा फायदा काँग्रेसला झाला.

याबद्दलच लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे संपादक देवेंद्र गावंडे सांगतात, "भारतीय जनता पक्ष एकटा लढतो तेव्हा विदर्भात इतकं यश मिळत नाही. त्यांना वंचितचा किंवा बंडखोरांचा पाठिंबा हवा असतो तेव्हा भाजपचा विजय होताना दिसतोय. पण, यावेळी वंचितचा फॅक्टर चालला नाही आणि ज्याठिकाणी वंचितचा फॅक्टर चालला, प्रकाश आंबेडकर चालले त्या अकोल्यात भाजपला यश मिळालं."