अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांनी 'यू टर्न' घेत दिली मुलाला माफी, नेमकं काय म्हणाले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अँथनी झुर्कर
- Role, बीबीसी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांना करचोरी आणि बेकायदेशीररित्या बंदुक बाळगल्या प्रकरणी माफी मिळाली आहे. यानंतर या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत असून नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बायडन हे मुलाला माफ करणार नाही, असं वारंवार सांगितलं जात होतं. मात्र, हंटर बायडन यांना दोन्ही प्रकरणात माफी मिळाल्यानंतर अनेकांचं लक्ष बायडन यांच्या भूमिकेकडं आहे.
रविवारी (1 डिसेंबर) जो बायडेन यांनी हंटर बायडेन यांच्या क्षमा याचिकेवर स्वाक्षरी केली. यावेळी बायडेन यांनी आपल्या मुलाविरोधातील खटला राजकीय हेतुनं प्रेरित असल्याचंही म्हटलं.
बायडन म्हणाले, “मी पदभार स्वीकारला त्या दिवसापासून न्याय विभागाच्या प्रकरणांमधील निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करणार नाही हे स्पष्ट केलं होतं. त्यानुसार मी माझं वचन पाळलं आहे. मुलगा हंटरवरील आरोप राजरकीयदृष्ट्या प्रेरित आहेत."
"त्याच्यावर खटला सुरू असताना तो संयमानं वागला. मला राजकीयदृष्ट्या फटका बसावा या उद्देशानं हे आरोप करण्यात आले. हंटर माझा मुलगा आहे म्हणून त्याला या प्रकरणात अडकवण्यात आलं. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे इतर दुसरं कारण नाही. एक राष्ट्राध्यक्ष आणि बाप या नात्यानं मी जो निर्णय घेतला आहे त्याला अमेरिकेचे नागरिक समजून घेतील,” असंही बायडन यांनी नमूद केलं.


दरम्यान, हंटर बायडन यांनी सप्टेंबरमध्ये कर चुकवल्याचा आरोप स्वीकारला होता. या व्यतिरिक्त जूनमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी ते दोषी आढळून आले होते.
त्यानंतर सप्टेंबर 2024 मध्ये व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सचिवांकडून सांगण्यात आलं होतं की, राष्ट्रपती बायडन हे मुलगा हंटर याला कधीही माफ करणार नाहीत. त्याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे असून त्याच्यावर कायद्यानुसार जी कारवाई होईल, ती मान्य राहील, असं बायडन यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं.
मात्र, बायडन यांनी आता दिलेल्या स्पष्टीकरणानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आपल्या मुलाला वाचविण्यासाठी वचन मोडलं असं म्हणत सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जो बायडन यांनी मुलाला माफी दिल्याच्या प्रकरणावर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रम्प यांनी एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट करत म्हटलं, “बायडन यांनी हंटरला माफी दिली आहे. या माफीनाम्यात वर्षानुवर्ष तुरुंगात असलेल्या 6 जानेवारीच्या कैद्यांचाही समावेश आहे का? हा न्यायव्यवस्थेच्या अधिकारांचा दुरुपयोग आहे.”
कोलोराडोचे राज्यपाल जेरेड पोलिस यांनी एक निवेदन जारी करत म्हटलं की, हे पाऊल अत्यंत निराशाजनक असून यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची प्रतिमा मलिन होऊ शकते.
बायडन यांचा राजकीय प्रवास आता संपुष्टात येतो आहे. मात्र, त्यांनी घेतलेल्या निर्णयाची त्यांना मोठी किंमत मोजावी लागू शकते. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेऊन पुढची धुरा सांभाळणार आहेत. त्यानंतर पुढे काय होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्राध्यक्षांनी माफी देण्याबाबतचे मार्गदर्शक नियम मूलभूतपणे आणि कायमस्वरूपी बदललेले दिसतात. या टप्प्यावर राजकीय भूमिका काहीही असली, तरी कुणीही तक्रार करण्याची दुर्मिळ स्थिती आहे.
ट्रम्प गटाने बायडन यांनी दिलेल्या माफीच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना तत्परता दाखवली. ते म्हणाले की, ते त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकन न्याय व्यवस्थेतील हे प्रश्न सोडवतील आणि आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पुनर्स्थापित करतील.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
विशेष म्हणजे ट्रम्प पदभार सांभाळतील तेव्हा ते बायडन यांच्या कार्यकाळात ज्या त्यांच्या समर्थकांवर खटला चालवण्यात आला, त्यांच्या माफीनाम्याबाबत आणि 6 जानेवारी 2021 रोजी यूएस कॅपिटॉलवर झालेल्या हल्ल्यातील दोषींची सुटका करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











