'नॉन-बायोलॉजिकल'च्या दाव्यामागचं राजकारण आणि जैविक-अजैविकतेचं 'डि-कोडिंग'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रशांत रुपवते
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी मराठीसाठी
"एखादा म्हणू शकतो माझा जन्म जैविक नाही म्हणून. कारण आपल्याकडे अयोनीज जन्म, ही पुराणामध्ये एक फार मोठी कल्पना मांडलेली आहे. खरं तर त्या अर्थानं तो अयोनीज जन्म नसतो."
असं विधान 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी बीबीसी मराठीच्या मुलाखतीत केलं. नंतर अध्यक्षीय भाषणातही त्यांनी हा मुद्दा मांडला.
'पाळी आणि तिच्याभोवती असलेली पावित्र्याची कल्पना' या मुद्द्यावर बोलताना डॉ. भवाळकरांनी हे विधान केलं.
या विधानची मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याचं कारण याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही महिन्यांपूर्वीच्या विधानाशी जोडलं गेलं.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारानं विचारलं होतं की, तुम्ही थकत का नाहीत? त्यावर मोदी म्हणाले होते की, "मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या विधानाची त्यावेळेसही बरीच चर्चा झाली होती. मात्र, आता डॉ. तारा भवाळकरांच्या विधानानं पुन्हा एकदा मोदींच्या विधानाची चर्चा सुरू झालीय.
जैविक-अजैविकतेच्या याच मुद्द्यावर ज्येष्ठ पत्रकार प्रशांत रुपवतेंनी बीबीसी मराठीसाठी विस्तृत लिहिलं आहे. ते खालीलप्रमाणे :

संस्कृतिक राष्ट्रवादाच्या शर्करा अवगुंठितेअंतर्गत धर्म, समाज आणि राजकारणात आठ-दहा दशकं काम करुनही जर आपल्या विचारांचा 'आयडॉल' समाजामध्ये स्थापिता न येण्याची नामुष्की आणि त्यासाठीही उसनवारी करावी लागत असेल, तर 'अवतार'वादा शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. व्यक्ती नव्हे, तर कळपनिर्मितीच्या काळामध्ये तर तो महत्त्वाचा पर्याय ठरतो.
'आवतारवाद' आपल्या संस्कृतीमध्ये नवा नाही. पुराणांमध्ये, दंतकथा–मिथककथांमध्ये त्याचे संदर्भ आहेतच. परंतु, त्यापेक्षा आपल्या लोककलांमध्ये त्याची समृद्ध परंपरा आहे.
काही भागात शिमग्याला, बैलपोळ्याला ज्यावेळी 'वीर' निघतात, त्यावेळी सोंग काढली जातात. त्याला 'सोंग नाचवणं' असंही म्हणतात. म्हणजे आपल्या 'खऱ्या' चेहऱ्यावर देवी, देवता, राक्षस, प्राणी वगैरेंचा मुखवटा लावून रात्रभर नाचणं.
एकूणच चेहरा झाकणं वा मुखवटा लावून वावरणं ही आपली सांस्कृतिक परंपरा आहेच! त्यात सोंग वा मुखवट्यामुळे उगी झाकलेल्या चेहऱ्याबद्दल कुतूहल वाढतं! याचकारणे, गोषातील स्त्री विनाकारण सुंदर दिसते!
झाकण्याचं हे कला-तंत्र सर्वत्र दिसतं आणि त्याची विविध रुपंही दिसतात. जसं की, भाषेबाबतचा हा एक प्रकार.
जेष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे एकदा असं म्हणाले होते, 'एखाद्यावर प्रभाव (इम्प्रेशन) पाडायचा असेल, तर कधीही त्याला न कळणाऱ्या भाषेत बोलायचं!'
डॉ. कसबेंनी अगदी सहज म्हणून म्हटलेलं हे वाक्य. पण यातून अनेक संदर्भ उलगडत जातात. म्हणजे, आताच संस्कृत या 'देवभाषे'चा सात्विक आग्रह का किंवा इंग्रजीची बळजबरी का? मग पुढे हेही धान्यात येतं 'ज्ञानदेवा'नं देवाधिकांची, भूदेवांची संहिता प्राकृतात मराठीत आणली म्हणून त्याला बहिष्कृत करण्यात आलं. आणि त्याही आधी बुद्धाने 'धम्मदेसना' उपदेश तत्कालीन प्राकृत तथा पाली भाषेत केला म्हणून बौद्धांसह या तत्त्वज्ञानालाच हदपार करण्यात आलं.
कारण या दोहोंचा उद्देशच मुळी 'शहाणे करुन सोडावे सकळजन' हाच होता. परंतु, 'सकळजन' ज्ञानी झाले तर कसे होणार? म्हणून, सकळजन अज्ञानी आणि मूठभर ज्ञानी, म्हणजेच 'अज्ञान ही शक्ती' राहू शकते ना!


या सोंगांच्या परंपरेचं आणि मुखवटा लावून वावरण्याचा काहींनी धंदा केला. नंतर काही मूठभरांनी त्याचं 'सिंडिकेट' केलं. त्या मागच्या गणिताचे 'डि-कोडिंग' करण्याचा हा प्रयत्न.
ढोबळपणे आपण असे मानूया की, मानवी सभ्यता धारण करणारी गोष्ट म्हणजे धर्म किंवा समाजाला नियंत्रित करणारी गोष्ट म्हणजे धर्म. परंतु, ज्यावेळी धर्मसंस्था, राज्यसंस्था आणि भांडवलदार यांची युती झाली, तेव्हा अवतार व्यवस्था जन्माला आली. मग धर्माच्या नावे भ्रम आणि भय निर्माण करून शोषण व्यवस्था निर्माण करण्यात आली.

फोटो स्रोत, Getty Images
पाश्चात्य देशात चर्च, राजा आणि भांडवलदार युती बरीच उशिरा झाली. आपल्याकडे तर संस्कृतीचा आणि व्यवस्थेचा मुलभूत पायाच तो आहे. ही बाब अचूकपणे ओळखली महात्मा जोतिबा फुले यांनी. आणि त्याला त्यांनी 'शेटजी भटजी'ची सत्ता असं नामकरण केलं. तर या युतीला इटालियन लेखक उंबर्तो इको यांनी 'फॅसिझम' म्हटलं. याचं बालपण मुसोलिनीच्या राजवटीत गेलं होतं.
तर 'शेठजी-भटजी'च्या युतीतून साकार झालेली 'सनातन व्यवस्था' असो किंवा आधुनिक जगतातील धर्मसंस्था–भांडवलदार–राज्यकर्ते यांची 'फॅसिस्ट' व्यवस्था असो, ही सारी मूठभरांच्या हितसंबंधाची, वर्चस्ववादाची लढाई आहे. आणि या लढाईसाठी काही चिन्ह, प्रतिकं, परमात्मा, अवतार गरजेचे असतात. काही घोषणाही आवश्यक असतात, ज्याला जॉर्ज ऑर्वेल 'न्यूजस्पीक' म्हणतात.
अर्थात, या संकल्पना धर्मग्रंथात, पुराणांमध्ये, मिथककथांमध्ये आढळतात. यातूनच युरोपीय श्वेतवर्णीय आपली 'सुप्रिमसी' दृढ करण्यासाठी 'वुई आर चुझन पिपल्स', तर आपल्याकडे आदीपुरुष संकल्पनेतून 'वुई आर पार्ट ऑफ गॉड' ही संकल्पना प्रसवतात.
या दोन्ही संकल्पनेतून 'नॉन-बायोलॉजिकनेस' प्रतित केला जातो. कारण जगातले सगळेच लोक जैविकतेतून नाही, तर लैंगिकतेतून जन्माला आले. म्हणजे इतर प्राणीजगतासारखे तर आम्ही अजैवकतेतून! आणि अर्थात या संकल्पानाच्या प्रसवणारे गट सार्वजनिक जीवनात लैंगिकतेबद्दलचा घनघोर 'टॅबू' बाळताना दिसतील. आणि ते प्रभावीपणे रुढ करण्यासाठी सार्वजनिक जीवनात अविवाहित राहणं, ब्रम्हचर्येच व्रत वगैरे आलचं.
एवढेच पुरेसं नसतं म्हणून मर्दांगीचे प्रतिकं राखली जातात. मग मिश्या, दाढी, शस्त्र वैगेरे. यांना हिंसेबद्दल अनुचित आकर्षण असतं. अहिंसा, शांतता म्हणजे बुळगेपणा, या त्यांच्या अढळ धारणा असतातच. परंतु, हे झालं काहीसं व्यक्तिगत वा थोडसं संघटना पातळीवर. यामागे खूप मोठं जाळं वा सिंडिकेट काम करत असतं. ते कसे, हे आपण दोन-तीन पुस्तकाद्वारे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

फोटो स्रोत, Getty Images
प्रथम 'सीज द टाईम' (1967) या ब्लॅक पँथरचे अध्यक्ष बॉबी सीएल यांच्या आत्मचरित्रामधील एक परिच्छेद पाहू. युरोपच्या इतिहासामध्ये गेलो, तर निव्वळ श्वेतवर्णीयांचा वंशवाद नव्हे, तर अश्वेतांचा वंशवादही दिसेल. आणि वंशवादाबरोबरच सांस्कृतिक राष्ट्रवादाचे कॉकटेल आणखी भंयकर. म्हणूनच अमेरिकेतील अश्वेतांच्या कल्चर नॅशनल पार्टीवाल्यांच्या 'आय अँम ब्लॅक, आय अँम ब्युटीफूल' या वंशवादालाही ब्लॅक पँथरचा विरोधच होता.
आणि श्वेतवर्णियांच्या वंशवादाचे तर आपण सारेच घोर निंदक आहोतच. कारण हे श्वेतवर्णीय त्यांच्या शैक्षणिक संस्थातून पूर्णतः शुद्धतेविषयी म्हणजेच श्रेष्ठत्वाविषयी शिकवतात. आता हे पहा ना, मुलांना लैंगिक शिक्षण द्यावं की देऊ नये, याबाबत सध्या कॅलिफोर्नियात वाद सुरू आहे. याबाबत वाद होण्याची वेळच का येते?
पृथ्वीवर 300 कोटी लोक राहतात. ते सर्व येथे आले, ते शरीर संबंधानेच. तुम्ही त्याच मार्गाने आला, मी ही त्याच मार्गाने आलो. मग लैंगिकता ही घाणेरडी आणि वाईट बाब कशी ठरू शकेल, ही वाईट असल्याचे चित्र कोणी निर्माण केले? याही पुढे जाऊन, ब्लॅक पँथर या संघटनेचे माहिती मंत्री असलेले एल्डरिच क्लेव्हर आपल्या 'सोल ऑन द आईस' या आत्मचरित्रामध्ये म्हणतात, युरोपात एका डोक्याच्या देवाची संकल्पना रुढ आहे.
पूर्णतः शुद्ध देव. मग शुद्ध रक्त म्हणजे माझा मुलगा म्हणजे तो शुद्धवंशाचा, तो राजा बनेल. शुद्ध रक्ताची मुलगी राणी बनेल. याच गोष्टी चालत आल्यात. ही शुद्धतेची बाब थेट देवाची असते. म्हणजे, ही केवळ एक संकल्पना नव्हे, तर यातून काय दर्शवायचे हे ध्यानात घ्या.
मी देवाच्या प्रतिमेतून तयार झालो. पूर्ण शुद्धतेतून. त्यामुळे श्रेष्ठ, सुपेरिअर आणि त्याकारणे ते त्यांच्या नैसर्गिक, स्वाभाविक असलेल्या पशू प्रेरणा फेटाळतात, झिडकारतात.
एवढंच नाही, तर त्यांच्या नितिमत्तेच्या, श्रेष्ठत्वाच्या, सौंदर्याच्या अशा एक ना अनेक खोट्या कल्पना तुमच्यावर लादतात. त्यासाठी त्यांच्या 'आदर्श शिक्षण' संस्था आणि त्यांच्या सांस्कृतिक व्यवस्थांचा, उदा. माध्यमांचा उपयोग केला जातो.

फोटो स्रोत, Getty Images
सुपरमॅन या कल्पनेवर लोकांचा असाच अंधविश्वास निर्माण करण्यात आला आहे. कॉमिक्स बुक्समधल्या संकल्पना, डोनाल्ड डक, मिकी माऊस, आर्चिस वगैरे. यातून कर्मठ नितिमत्तेच्या कल्पना प्रतिकात्मक रुपात मांडल्या जातात. याचा थेट संबंध वंशवादाशी वर्णवादाशी आहे.
सुपरमॅन कल्पना हा एक उथळ कल्पनाविलास आहे. त्याचा थेट संबंध स्टील मॅन या कल्पनेशी आहे. ही कल्पना वस्तुस्थितीशी संबंध नसलेली आहे. कारण आशा स्टीलमॅनपासून खऱ्याखुऱ्या जिवंत माणसाची उत्पत्ती होऊ शकत नाही.
हा सुपरमॅन सर्वात सामर्थ्यवान असल्याचा भ्रम निर्माण केला जातो. या सुपरमॅनकडे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र, हाड्रोजन बॉम्ब की जे पृथ्वीवरील जीवन नष्ट करु शकतात. हे सुपरमॅन कधी गरिब शोषित पीडित यांना मदत करताना यांना वाचवताना दिसणार नाहीत. तुम्ही कोणतेही कॉमिक्स बुक उघडून बघा, तुम्हाला माझ्या म्हणण्याची प्रचिती येईल.
वस्तुस्थिती अशी आहे की, स्त्री–पुरुष एकमेकांशी संबंधित आहेत. त्यांच्या शरीरसंबंधातून नवा माणूस जन्माला येतो. पण मिकी माऊस, डोनाल्ड डक यांचे कधी लैंगिक संबंधाचे चुकूनही कॉमिक्स बुकमध्ये उल्लेख नसतात. तसे दाखवण्याचा कधी प्रयत्न केला जात नाही. या मागील कारणमिमांसा फार महत्त्वाची आहे.
जेव्हा 200-300 कोटी लोक या पृथ्वीवर आहेत आणि ते सर्व याच सूबंधातून निर्माण झाले आहेत. पण ही सर्वासत्ताधीश संकल्पना या लैगिंकतेला निषिद्ध ठरवते. लोकांना, समाजाला लैंगिकता ही एक तुच्छ, घृणास्पद बाब असल्याचे मनावर बिबंवते. ही मानसिकता अनौरस ही संकल्पना निर्माण करते. आता तुम्ही सांगा, स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधातून निर्माण झालेले मानवाचे मूल अनौरस कसे असू शकेल?

फोटो स्रोत, Getty Images
1971 मध्ये चिली या देशामध्ये 'हाऊ टू रीड डॉनाल्ड डक' नावाचं एक पुस्तक एरिअल डॉर्फम आणि आर्मंड मॅटेलार्ट या दोन प्राध्यापकांनी लिहिलं होतं. डॉनाल्ड डक या कार्टूनच्या माध्यमातून अमेरिका, भांडवली साम्राज्यशाही इतर देशांवर कशी थोपवते आणि स्थानिक परंपरा, लोक यांची कशी खिल्ली उडवते, याचे विवेचन यात आहे.
या पुस्तकाला अनेक तांत्रिक, कायदेशीर अडथळे पार करावे लागले आणि पुन्हा नव्याने छापून येण्यासाठी 2018 साल उजाडलं.
डॉनाल्ड डक हे वरवर नुरुपद्रवी वाटणारं एक पात्रं, साधासा वाटणारा मिकी, त्याचे अति हुशार भाचे हुई, लुई आणि ड्युई, त्यांचे कंजूस आणि अति श्रीमंत काका अंकल स्क्रूज, मग अवतीभोवती जमणारे मिनी, डेझी, गुफी, प्लेटो वगैरे गोतावळा. पण त्याच्या माध्यमातून मुलांच्या मनोविश्वात घुसून त्यांच्यावर जे भांडवलशाही संस्कार कसे केले जातात, उदाहरणार्थ, अंकल स्क्रूज हा अत्यंत श्रीमंत आणि कंजूस असतो.
डक वर्ल्डमध्ये त्याची मोठी बँक असते आणि तो फक्त खजिना शोधून आपल्या संपत्तीमध्ये भर घालत असतो. त्याचे शत्रू कायम त्याच्या संपत्तीवर डोळा ठेवून असतात. मात्र, मूळात ही संपत्ती येते कुठून आणि ती कमावण्यासाठी काय कष्ट पडतात, हे कधीच त्यात दाखवलं जात नाही.
या जगामध्ये गरीब म्हणजे बिगल बॉईज जे चोर दाखवले आहेत. लहान मुलांसाठी आई–वडील हे सर्वात महत्त्वाचे, नंतर आजी-आजोबा, काका, मामा, मावशी वगैरे येतात. पण संपूर्ण डिस्ने परिवारामध्ये आई–वडील, नवरा-बायको हे नातंच नाही. मिनी आणि डेझी या अनुक्रमे मिकी आणि डॉनाल्डच्या कायम मैत्रिणीच राहतात. स्त्रियांची पात्र ही कायम दिखावू, नाजूक-साजूक, नावापुरती येतात.

फोटो स्रोत, Getty Images
अंकल स्क्रूज कुठली मूल्यं, नितिमत्ता शिकवतो, तर वेगवेगळया देशांत जाऊन खजिना शोधायचा, व्यवहारी राहायचं, नफा कमवायचा आणि प्रत्येक गोष्ट पैशांमध्ये मोजायची. पैसा मिळवण्यासाठी कधी आफ्रिका, अरेबिया, लॅटिन अमेरिका वगैरे. तिथल्या स्थानिक लोकांची खिल्ली उडवायची. त्या देशांची नावंही इका, ब्लिंका, अँझटेक लँड, अनस्टेडिस्तान अशी असतात.
इंका आणि अँझटेक ही लॅटिन अमेरिकेतली दोन जुनी साम्राज्य होती, तर स्थिरता नसलेले यावरुन अनस्टेडिस्तान. इथली लोक अडाणी असतात. त्यांना जगाचं ज्ञान नसतं आणि ते पशूवत राहणारे असतात, त्यांना माणसांच्या जगातील (इथे अमेरिका अपेक्षित आहे) साध्या साध्या सुविधाही माहित नसतात. अगदी अंगभर कपडेही नसतात. ते एक तर शत्रू होतात किंवा नोकर. मित्र कधीच होत नाहीत.
तर अशी ही मानसिकता नंतर भंयकर होत जाते. इतकी की, त्यातून शरीराची नाळच तोडली जाते. त्यांचे मन केवळ त्यांची सुपॅरिटी, श्रेष्ठत्वाचे खेळ, भ्रम यातच आडकलेले राहते. मानसिक पातळीवर जगणं हेच खरं जगणं.
नैसर्गिकदृष्टया शरीर आणि मनाने जगणं म्हणजे कनिष्ठ पातळीवर जगणं होय. केवळ मानसिक पातळीवर जगण्याने त्यांचे एका वस्तुत रुपांतर होत जाते. ठराविक कामासाठी आपण ठराविक औजरं वापरतो.
उदाहरणार्थ, भाजी चिरण्यासाठी चाकू तर शेतातील घास कापण्यासाठी विळा वापरतो. ही औजारं आपण छोटया कारखान्यात तयार करतो. या औजारांची तथा वस्तूंची कामं ठरलेली असतात, नव्हे त्याकामासाठीच त्यावस्तूचे उत्पादन केले जाते.
अगदी तसंच अवतार तथा नॉन-बायोलॉजिकल संकल्पनेतून प्रसवलेली व्यक्ती दावा करते की, ईश्वराने सदर व्यक्तीस अमूक एका कामासाठी निर्माण केले आहे. त्या विशिष्ट कामासासाठी भूतलावर पाठवले आहे. तर सदर व्यक्ती 'ह्युमन बिईंग' न राहता एक वस्तू होते. नेमून दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी.
अर्थात, वस्तू म्हटलं की, मानवी संवेदना, भावभावना, सुख-दु:ख, हिंसा-हत्या इत्यादी प्रश्न उपस्थित होत नाहीतच. आणि अशा वस्तूंचे वा झोंबीचे घाऊक प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग व्हायला लागले, तर ती निश्चित मानवी सभ्यतेसाठी धोक्याची घंटा आहे.
(सदर लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक आहेत.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











