इंग्लंडमधील विजयानंतर आकाश दीप झाला भावूक, बहिणीबद्दल दिली 'ही' माहिती

आकाश दीप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आकाश दीपची मोठी बहीण कर्करोगाशी लढा देते आहे.

"मी कोणालाही सांगितलेलं नाही, माझी मोठी बहीण कर्करोगाशी लढा देत आहे."

एजबॅस्टन कसोटीत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या आकाश दीपनं सामन्यानंतर त्याच्या भावना व्यक्त करताना हे सांगितलं.

विजयानंतर आकाश दीप खूपच भावूक झाला होता.

आकाश दीपनं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात सहा गडी बाद केले.

भारतानं पाच कसोटी सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी करण्यासाठी त्याच्या या कामगिरीची मोठी मदत झाली.

आकाश दीप म्हणाला की, एजबॅस्टन कसोटीत गोलंदाजी करताना त्याचं एकच ध्येय होतं. ते म्हणजे, मोठ्या बहिणीच्या चेहऱ्यावर हास्य आणणं.

सामन्यानंतर आकाश दीपनं जियो-हॉटस्टारवर समालोचन करणाऱ्या चेतेश्वर पुजाराशी बोलताना याबाबत सांगितलं होतं.

चेतेश्वर पुजारानं आकाश दीपला विचारलं की, "तुझ्या हातात चेंडू आहे, स्टम्प आहे. तू सहा गडी बाद केले. या कामगिरीनं तुझ्या घरी सगळे खूप आनंदी असतील ना?"

या प्रश्नाचं उत्तर देताना आकाश दीप म्हणाला, "सर्वात मोठी गोष्ट मी कोणालाही सांगितलेली नाही. माझी मोठी बहीण गेल्या दोन महिन्यांपासून कर्करोगाशी लढा देते आहे. सध्या तिची तब्येत ठिक आहे."

"सर्वात जास्त आनंद तिला होईल. कारण ती सध्या ज्या मानसिक अवस्थेतून जाते आहे, त्यामध्ये हा आनंद तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट असेल."

आकाश दीप

आकाश दीपनं सांगितलं की, हा सामना मोठ्या बहिणीला समर्पित करूनच तो खेळत होता.

तो म्हणाला, "मी हा सामना फक्त तिला समर्पित करूनच खेळलो. मला तिच्या चेहऱ्यावर हास्य आणायचं आहे."

"माझा हा परफॉर्मन्स, ताई तुझ्यासाठी आहे. मी जेव्हा चेंडू हाती घेत होतो, तेव्हा तुझाच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. मला तुला आनंदी पाहायचं होतं. आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत," असं त्यानं म्हटलं.

पहिल्या कसोटीत नव्हती मिळाली संधी

इंग्लंड विरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात आकाश दीपचा समावेश पहिल्या अकरा खेळाडूंमध्ये करण्यात आला नव्हता.

अर्थात एजबॅस्टन कसोटीत जसप्रीत बुमराहच्या जागी त्याचा संघात समावेश झाला. या सामन्यात आकाश दीपनं 10 गडी बाद करून फक्त त्याची निवडच सार्थ ठरवली नाही, तर इतिहासदेखील घडवला.

आकाश दीपनं एजबॅस्टन कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये 187 धावा देत 10 गडी बाद केले. इंग्लंडमध्ये कोणत्याही भारतीय गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

या संधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी आकाश दीपनं खास डावपेच आखले होते.

आकाश दीप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एजबॅस्टन कसोटीच्या दुसऱ्या डावात आकाश दीपनं सहा गडी बाद केले.

तो म्हणाला, "भारतात अशा खेळपट्ट्यांवर आम्ही खूप खेळलेलो आहोत. खेळपट्टी किती साथ देते आहे की नाही, हे मला पाहायचं नव्हतं. कारण ते आमच्या हातात नव्हतं."

"मला फक्त योग्य दिशेनं आणि टप्प्यावर गोलंदाजी करायची होती. मी एवढंच ठरवलं होतं की चेंडू सीमवर थोडा जोरात आदळू आणि तेही योग्य ठिकाणी."

एजबॅस्टन कसोटीच्या शेवटच्या डावात आकाश दीपनं इंग्लंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजाला म्हणजे जो रूट याला बोल्ड केलं. त्याच्या या चेंडूची खूप चर्चा झाली.

तो म्हणाला, "सुरुवातीला मी जो रूटला सरळ चेंडू टाकले. मात्र, त्या चेंडूच्या वेळेस मी थोडा कोपऱ्यातून टाकला. मी विचार केला होता की चेंडू बाहेरच्या बाजूला वळवायचा. मी जसा विचार केला होता, तसंच घडलं."

लॉर्ड्स कसोटीबद्दल काय म्हणाला?

इंग्लंडच्या संघाच्या दोन्ही डावांमध्ये आकाश दीपनं हॅरी ब्रूकला बाद केलं. पहिल्या डावात त्यानं हॅरी ब्रूकला बोल्ड केलं. तर दुसऱ्या डावात त्याला एलबीडब्ल्यू केलं.

आकाश दीप म्हणाला, "दुसऱ्या डावात हॅरी ब्रूक बचावात्मक खेळत होता. दोन-तीन षटकं माझ्या मनात गोंधळ होता की, नेमका कसा चेंडू टाकू. चेंडू योग्य ठिकाणी जोरात टाकायचा आहे हेच माझं उद्दिष्टं होतं."

आकाश दीपला वाटतं की एजबॅस्टन कसोटीत मिळालेल्या विजयाचा फायदा भारतीय संघाला मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांमध्ये होईल.

आकाश दीप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आकाश दीपनं ज्या चेंडूवर हॅरी ब्रुकला बाद केलं, त्याची खूप चर्चा होते आहे.

तो म्हणाला, "या विजयानं आम्ही खूप खूश आहोत. आम्ही त्याचा आनंद घेत आहोत. फलंदाजी असो की गोलंदाजी आम्ही ज्याप्रकारे खेळलो, ते पाहता या विजयामुळं आमचा आत्मविश्वास वाढेल. आमचं क्षेत्ररक्षणदेखील चांगलं होतं."

10 जुलैपासून लंडनच्या प्रसिद्ध लॉर्ड्स स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.

आकाश दीप म्हणाला की, जर त्याला लॉर्ड्स कसोटीत खेळण्याची संधी मिळाली, तर तो एजबॅस्टन कसोटीसारखीच गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल.

तो म्हणाला, "मी माझी क्षमता लक्षात घेऊनच गोलंदाजी करेन. चेंडू योग्य ठिकाणी टाकण्याचाच माझा प्रयत्न असेल. एखाद्या दिवशी यामुळे फायदा होईल, एखाद्या दिवशी होणार नाही. मात्र मी याच पद्धतीनं गोलंदाजी करेन."

आकाशदीप मूळचा बिहारचा

आकाश दीपनं गेल्या वर्षी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातूनच भारतासाठी कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं.

बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यापासून जवळपास 180 किलोमीटर अंतरावरील रोहतास जिल्ह्यातील बड्डी गावचा तो रहिवासी आहे.

रणजी ट्राफीमध्ये मात्र आकाश दीप बिहारऐवजी पश्चिम बंगालकडून खेळला आहे.

2022 मध्ये त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.

आकाश दीप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आकाश दीपनं गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

टीम इंडियाकडून पदार्पण केल्यानंतर आयपीएलमध्ये त्याला लखनौ सुपर जायंट्सच्या संघानं 8 कोटी रुपयांची बोली लावत विकत घेतलं होतं.

आतापर्यंत आकाश दीप भारतासाठी आठ कसोटी सामने खेळला असून त्यात त्यानं 25 गडी बाद केले आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.