कसबा-चिंचवड पोटनिवडणूक: कसब्यात धंगेकर, तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप विजयी

रवींद्र धंगेकर

फोटो स्रोत, facebook

पुण्यातील कसबा मतदारसंघ आणि चिंचवड मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

कसबा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. मतमोजणीच्या 20व्या फेरीअखेर धंगेकर यांनी तब्बल 11 हजार मतांनी विजय मिळवला.

तर चिंचवडमधून अश्विनी जगताप यांनीही पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवत विजय मिळवला आहे.

या पोटनिवडणुकीसाठीचं मतदान रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पार पडलं होतं.

Facebook पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Facebook पोस्ट समाप्त

कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी जोर लावल्याचं दिसून आलं. तसंच चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवाराच्या एन्ट्रीमुळे निवडणुकीत रंगत आली होती.

अश्विनी जगताप रवींद्र धंगेकर

फोटो स्रोत, facebook

कसबा : चौदाव्या फेरीपर्यंतची आकडेवारी

धंगेकर

रवींद्र धंगेकर - 48986

हेमंत रासने - 44165

काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर 4 हजार 700 मतांनी आघाडीवर

हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर

चिंचवड : अकराव्या फेरीपर्यंतची आकडेवारी

अश्विनी जगताप - 35228

नाना काटे - 27794

राहुल कलाटे - 10669

भाजप उमेदवार अश्विनी जगताप 8554 मतांनी आघाडीवर

नाना काटे आणि अश्विनी जगताप

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, नाना काटे आणि अश्विनी जगताप

नेत्यांनी काय म्हटलं?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कसबा मतदारसंघात पराभवाचं तोंड पाहावं लागल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, "नाना पटोले यांच मी अभिनंदन करतो. तीन राज्यांच्या निवडणुकीत कांग्रेस कुठे दिसत नाही. चिंचवडमध्ये ही त्यांनी विचार केला पाहिजे. थोडा तुम्ही ही विचार करा आणि आम्ही ही करतो."

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही कसब्याच्या निकालांवर प्रतिक्रिया दिल.

सकाळपासून मी कल पाहत होतो. पण निकाल हाती येईपर्यंत आम्ही प्रतिक्रिया दिली नाही. माझी परिस्थिती थोडी खुशी थोडा गम, अशी झाली आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ही निवडणूक लढवली. रवींद्र धंगेकर यांच्या स्वरुपात आम्ही तिथे दिला होतो. आम्ही सर्वांनी मिळून येथील प्रचार केला. यातून महाराष्ट्रात एक संदेश जाणार आहे.

दोन्ही ठिकाणी सहानुभूती असूनसुद्धा धंगेकर यांनी मिळवलेला विजय कौतुकास्पद आहे, असं पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, धंगेकर यांच्या विजयानिमित्त काँग्रेस पक्षाकडून जल्लोष करण्यात येणार आहे. आज दुपारी 3 वाजता टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत या विजयाचा जल्लोष करण्यात येणार आहे, असं पटोले यांनी सांगितलं.

निकालांवर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "कसब्याच्या आणि चिंचवडच्या निकालांमधून मतदार वेगळा विचार करू शकतात हे समोर आलं आहे. भाजपच्या विरोधात मतांची संख्या वाढत चालली आहे. महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांनी एकत्र राहून मतांची बेरीच करणं, हे आता आमचं काम आहे."

कसबा आणि चिंचवडमधला प्रचार का वैशिष्ट्यपूर्ण ठरला?

कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झाल्यामुळे विधानसभेच्या या दोन जागा रिक्त झाल्या. त्यासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.

कसबा-चिंचवड पोटनिवडणूक

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, नाना काटे, अश्विनी जगताप, रवींद्र धंगेकर, हेमंत रासने

कसबा आणि चिंचवड हे दोन मतदारसंघ भाजपच्या हातात होते. या निवडणुकीत महाविकास आघाडीनेही उमेदवार दिले होते.

कसब्यात भाजपकडून हेमंत रासने यांना तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळाली. तर चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाना काटे यांना उमेदवारी मिळाली.

या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते पाहायला मिळाले.

मुक्ता टिळक लक्ष्मण जगताप

फोटो स्रोत, twitter

“महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्षांमधले मोठे नेते प्रचारात पाहायला मिळाले. शरद पवार, अजित पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांसारखे सहभागी झाले. भाजपकडून मोठे नेते प्रचारात होते. पण त्याचसोबत भाजपने संघटनात्मक ताकद पणाला लावलेली दिसून आली. प्रभागांमध्ये त्यांनी नगरसेवकांवर जबाबदारी दिली. राज्यस्तरीय नेते जसे की देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे नेते सक्रीय होते. गिरिश महाजन आणि रविंद्र पाटील या हे ग्राऊंड लेवलवर काम करताना दिसले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार-पाच दिवस चिंचवड आणि पुण्यातच होते. याचसोबत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सात आठ दिवस मुक्कामी राहिले. रात्रंदिवस बैठका घेतल्या जात होत्या. यामुळे गेल्या पन्नास वर्षात कसब्याची निवडणूक चुरशीची झाली,” असं दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे चिफ रिपोर्टर ज्ञानेश्वर बिजले यांनी सांगितलं.

याचसोबत आजारी असलेले गिरिश बापटही पाहायला मिळाले. यावरून विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस

कसबा-चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवारांना सहानुभूतीचा फायदा मिळेल?

मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होते आहे. चिंचवडमधून भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली.

पण कसब्यात तसं झालं नाही. मुक्ता टिळक यांच्या कुटूंबात तिकीट दिलं गेलं नाही. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यावर टिळक कुटूंबातून नाराजीसुद्धा पाहायला मिळाली. आमदारांच्या निधनामुळे लोकांची सहानुभूती भाजपच्या उमेदवाराला फायदेशीर ठरेल का हा एक प्रश्न आहे.

विश्लेषकांच्या मते चिंचवडमध्ये आश्विनी जगताप यांना सहानुभूतीचा काही प्रमाणात फायदा होऊ शकेल. पण कसब्यात मात्र सहानुभूती हा मुद्दा आता मागे पडला आहे.

दैनिक ’पुढारी’चे प्रतिनिधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं की, “विद्यमान आमदारांच्या निधनानंतरची पोटनिवडणूकीत सहानुभुती फॅक्टर मोठा असतो. पुण्यात कसबा आणि चिंचवड या पोटनिवढणुका त्या अनुषंगाने नेण्याचा भाजपचा प्रयत्न होता. भाजपने त्या अनुषंगाने प्रयत्नही केला की ही निवडणूक बिनविरोध व्हावी.

"पण मागच्या काही पोटनिवडणुका बिनविरोध झाल्या नाहीच. एकंदरीत सध्या राज्यातलं जे वातावरण बघितलं तर स्वतःच्या पक्षाची ताकद तपासून बघण्याची गरज सगळ्यांना वाटली असेल. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. राज्यात सत्तांतर झाले.

"महाविकास आघाडीचं सरकार गेलं. शिंदे-फडणवीस सरकार आलं. शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदेंना मिळालं. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते आहे. यामुळे सहानुभुतीचा मुद्दा या निवडणुकीत सुरुवातीपासूनत मागे पडला.

"चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांना ती कदाचित ती मिळेल. पण कसब्यात तसं चित्र नाही. सहानुभुती असती तर भाजपला ज्या पद्धतीने कसब्यात ताकद लावावी लागत आहे ती लावावी लागली नसती,” दैनिक ’पुढारी’चे प्रतिनिधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकांचे निकाल महापालिका निवडणुकांमध्ये महत्त्वाचे ठरतील?

कसबा आणि चिंचवड हे दोन्ही मतदारसंघ अनुक्रमे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये येतात. यामुळे या पोटनिवडणुकांच्या निकालाचा परिणाम महापालिका निवडणुकांमध्येही दिसू शकतो, असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलं. यासाठी अजून बऱ्याच गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.

“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काळात कधीही जाहीर होऊ शकतात. पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पण काम करतेय. पण ही निवडणूक जिंकणं काँग्रेससाठी महत्त्वाचं आहे. राष्ट्रवादीसोबत जर पुणे पालिकेत सत्तेत यायचं असेल तर ही निवडणूक महत्त्वाची ठरेल.

महापालिका जिंकण्यासाठी पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं मानसिक बळ वाढवायचं असेल तर ही निवडणूक जिंकणं महत्त्वाचे ठरेल. चिंचवडची पोटनिवडणूक अश्विनी जगताप यांच्यासाठी काहीशी सोपी आहे. पण तरिही तिथे राष्ट्रवादीने त्यांची ताकद पणाला लावली आहे. महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच हे केलं असावं,” असं दैनिक पुढारीचे प्रतिनीधी पांडुरंग सांडभोर यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)