कसबा, चिंचवडः उद्धव ठाकरे- होय! शिवसैनिक, राष्ट्रवादी, काँग्रेसला मतदान करणार

हेमंत रासने आणि अश्विनी जगताप

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, हेमंत रासने आणि अश्विनी जगताप
    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी, पुण्याहून

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आज कसबा आणि चिंचवड मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी ऑनलाईन भाषण केले. या भाषणात त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. कसबामध्ये काँग्रेस आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपल्याला मत द्यायचं आहे., असा आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुख्यमंत्री होतो, अजितदादा उपमुख्यमंत्री होतो. जयंत पाटील सहकारी होते. मी मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून सगळ्यांचा उल्लेख केला. त्यानंतर घडलं ते तुम्ही पाहताय. शिवसेनेची लढाई सुरू आहेत यात साथ देणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनो, कठीण काळात साथ देणाऱ्या सहकाऱ्यांनो असा उल्लेख करत आहे. निवडणुकीत जिंकायची इच्छा असणं गैर नाही. विरोधक म्हणजे दुसऱ्या पक्षात असणारा. मी लक्ष्मणराव आणि मुक्ताताईंना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. विधिमंडळातील हे सहकारी होते. मतमतांतर होती पण तरीही लोकशाहीत हे असतं. बिनविरोध निवडणूक व्हावी असं ज्यांना वाटतं त्यांच्या भावनांचा मी आदर करतो. सहानुभूतीचं राजकारण पलिकडून झालं. लोकमान्याच्या घरात उमेदवारी न देता इतर उमेदवाराला दिली. मग सहानुभूती कुठे गेली?"

"उमेदवारी दुसऱ्याला दिल्यानंतर मला वाईट एका गोष्टीचं वाटतं की गिरीश बापट यांचा उमेदीचा काळ मी पाहिला आहे. बाळासाहेब ठाकरे जेव्हा जेव्हा पुण्यात या्यचे तेव्हा ते असायचे. टिळकांच्या कुटुंबाला उमेदवारी न देता उमेदवारी बदलण्यात आली."

"गिरीशराव आजारी असतानाही त्यांना प्रचारात उतरवलं. ही कुठली माणुसकी. अशा पक्षाला आपण मतदान करायचं. माणसं वापरून घ्यायची. शिवसैनिक काँग्रेस,राष्ट्रवादीला मतदान करणार का असा प्रश्न मला केला. का नाही करणार एवढे वर्षं भाजपला केलंच ना."

"मी शिवसैनिकांना सांगतो की आपण मतदान करायचं."

ते पुढे म्हणाले, "आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत. आपल्यात फूट पाडली. शिवसेना संपवायला हे निघाले. त्यामुळे महाविकास आघाडीला मतदान केलंच पाहिजे. सहानुभूती भाजपला दाखवण्याची परिस्थिती राहिली नाही.

तुमचा वापर करून पाशवी पकड घट्ट करू पाहत असेल तर आम्हालाही जिंकावं लागेल. स्थानिक मुद्दे आणि इतर विषयांवर बोलायला अजितदादा नाथाभाऊ आहेतच.

पिंपरी चिंचवडमध्ये पाच वर्षांत घोटाळा झाला आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षावरही चौकशी झाली हे विसरू नका. आमदाराने कोणाला 400 कोटीचा प्रसाद दिला याचीही चौकशी लावा.

50 हजार अनधिकृत बांधकामं आहेत त्याचं पुढे काय झालं हे सुद्धा विचारा

"प्रत्येक वेळेला गृहीत धरून राजकारण केलं जातं. लक्ष्मणराव जावेत असं कोणालाही वाटलं नव्हतं. त्यांच्या कुटुंबाशीही माझे संबंध होते. पण राजकारण वेगळं आहे. टिळक घराण्याला वापरून सोडून दिलं. सहानुभूती ही भाजपचं थोतांड आहे."

पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी-चिंचवड भागातील चिंचवड विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची तारिख 18 जानेवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला.

कसबा मतदारसंघातून भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमधून भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या.

7 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे या पोटनिवडणुकांच्या लढतींचं चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे.

ही निवडणूक बिनविरोध होणार नसून भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये लढत होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.

या दोन्ही मतदारसघांमध्ये प्रमुख लढत कोणत्या उमेदवारांमध्ये होऊ शकते आणि त्या उमेदवारांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागेल याचा आढावा घेऊया.

कसबा मतदारसंघ

कसबा मतदारसंघातून भाजपकडून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना उमेदवारी न देता, हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीतर्फे ही जागा काँग्रेस लढवणार आहे.

काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी प्रमुख लढत बघायला मिळू शकते.

1995 सालापासून भाजप नेते गिरिश बापट कसबा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत होते. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून गिरिश बापट यांना उमेदवारी देण्यात आली. ते पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले.

कसबा आणि चिंचवड मतदारसंघासाठी भाजपातर्फे हेमंत रासने, अश्विनी जगताप यांना

फोटो स्रोत, Getty Images

गिरिश बापट यांच्या खासदार होण्यामुळे रिक्त झालेली कसबा पेठ मतदारसंघाच्या जागेतून 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत तेव्हा पुण्याच्या महापौर असलेल्या मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली.

कसबा मतदारसंघात मध्ये 2019 सालच्या निवडणुकीत एकूण 2 लाख 89 हजार 54 मतदार होते. या निवडणुकीत मुक्ता टिळक यांनी काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांचा 28 हजार 196 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत लोकमान्य टिळक यांच्या कुटूंबातील सदस्य मुक्ता टिळक पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या.

हेमंत रासने कोण आहेत?

हेमंत रासने हे पुण्यातले भाजपचे 52 वर्षीय नेते आहेत. 2002, 2012 आणि 2017 साली ते भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी पुणे महापालिका स्थायी समितीचं अध्यक्षपदही भुषवलं आहे.

हेमंत रासने मुळ पेठांमधलेच रहिवासी आहेत. ते सध्या सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत त्याचसोबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सव प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

हेमंत रासने, भाजप, अश्विनी जगताप

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, हेमंत रासने

जुन्या पुण्यामधून नगरसेवक म्हणून काम केल्याने या भागातला त्यांचा जनसंपर्क मोठा मानला जातो. त्याचसोबत पेठांमधल्या गणपती मंडळांसोबतही त्यांचा जवळचा संपर्क आहे.

गणपती मंडळांची ग्राऊंडवरची कार्यकर्त्यांची फौज असते. हे सगळे मुद्दे त्यांच्यासाठी निवडणुकीत फायद्याचे ठरू शकतात.

पण हेमंत रासने यांच्यासमोर काही आव्हानही आहेत.

हेमंत रासने यांच्यासमोरची आव्हानं कोणती?

कमी कालावधी उरला असतानाही कसब्यातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपमधून अनेक इच्छुक होते. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भाजपकडून मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना तिकीट न देता रासने यांना उमेदवारी जाहीीर करण्यात आली. त्यामुळे टिळक कुटूंबीय नाराज असल्याची चर्चा सुरू झाली.

हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा टिळक कुटुंबातील सदस्य अनुपस्थित होते. याचसोबत भाजपच्या वरिष्ठ नेते हे सातत्याने शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेटी घेताना दिसले. यामुळे टिळक कुटुंबाची समजूत घालताना भाजपची धावपळ होत असल्याचं चित्र निर्माण झालं.

याचसोबत कसब्यातून भाजपने ब्राह्मण उमेदवार न दिल्याने ब्राह्मण समाजाच्या संघटनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

हिंदू महासंघाकडून कसबा पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यात आला आहे. आनंद दवे यांनी अर्ज दाखल केला आहे.

या आव्हानांना हेमंत रासने यांना सामोरं जावं लागू शकतं. तसंच ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झाल्याने हेमंत रासने यांना निवडणुकीसाठी मैदानात उतरावं लागणार आहेच. त्यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचं आव्हान असेल.

कसब्यातील काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर कोण आहेत?

रविंद्र धंगेकर यांच्या नावावर काँग्रेसकडून शिक्कामोर्तब व्हायला वेळ लागला. उमेदवारी अर्ज कधी भरला जाणार हे काँग्रेसकडून निश्चित झालं होतं. पण उमेदवार कोण असेल याचा निर्णय अखेरच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यात होता.

रविंद्र धंगेकर हे मुळचे काँग्रेसचे नेते नाहीत. ते पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. शिवसेना आणि मनसेकडून नगरसेवक म्हणून ते पुणे महानगरपालिकेत निवडून गेले होते. त्यानंतर 2017 साली काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून नगरसेवकपदावर निवडून गेले.

कसब्यातून विधानसभा निवडणूक लढवण्याची धंगेकर यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी 2009 साली गिरिश बापट यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता.

त्यामुळे या निवडणुकीत रविंद्र धंगेकर पूर्ण शक्तिनिशी उतरतील असा कयास बांधला जातो.

धंगेकर यांच्यासमोरची आव्हानं कोणती?

कसब्यातून लढण्यासाठी काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या बरीच होती. 2019 ची निवडणूक कॅंग्रेसकडून कसब्यातून अरविंद शिंदे यांनी लढवली होती. त्याचसोबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांनी पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती. टिळक कुटुंबातले सदस्य रोहित टिळक यांचंही नाव उमेदवारी साठी चर्चेत होतं. या सगळ्या मुद्द्यांमुळे काँग्रेसकडून उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब व्हायला वेळ लागला.

काँग्रेसमध्ये बंडखोरी करत पुण्यातले स्थानिक नेते बाळासाहेब दाभेकर यांनीही निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवताना रविंद्र धंगेकर यांना आघाडीतल्या घटक पक्षांशी समन्वय साधावा लागेल. त्याचसोबत पक्षांतर्गत गटबाजी वर मात करावी लागेल.

चिंचवड मतदारसंघ

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. चिंचवडची ही जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. अखेरच्या दिवशी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. पण चिंचवडमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी करत राहूल कलाटे यांनी सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. यामुळे चिंचवडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

चिंचवडचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने 3 जानेवारी 2023 रोजी निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. ते सलग तीनवेळा चिंचवड विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले होते.

2009 साली लक्ष्मण जगताप अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2014 आणि 2019 साली भाजपकडून आमदार झाले.

चिंचवड मतदारसंघात 5 लाख 66 हजार 415 मतदार आहेत. 2019 साली लक्ष्मण जगताप यांनी 38 हजार 498 मतांनी अपक्ष आमदार राहुल कलाटेंचा पराभव केला होता.

आश्विनी जगताप यांच्या सक्रीय राजकीय प्रवासाला सुरुवात

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि भाऊ शंकर जगताप यांच्या नावांची उमेदवारीसाठी चर्चा होती. अखेर भाजपकडून आश्विनी जगताप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

अश्विनी जगताप

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, अश्विनी जगताप

आश्विनी जगताप यांनी याआधी लक्ष्मण जगताप यांच्यासोबत प्रचारामध्ये सहभाग घेतला आहे. पोटनिवडणुकीची उमेदवारी मिळाल्याने चिंचवडमधून आश्विनी जगताप यांच्या सक्रिय राजकीय इनिंगला सुरुवात होणार आहे.

लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीलाच उमेदवारी दिल्याने चिंचवडची निवडणूक बिनविरोध होणार का याची उत्सुकता होती. पण आता ही निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.

राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे कोण आहेत?

पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून चिंचवडमध्ये महाविकास आघाडीकडून कोणाला तिकीट मिळणार याची चर्चा होती. त्यामागे कारण असं की, महाविकास आघाडीकडून लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांची मोठी यादी होती. इच्छुकांसोबत अजित पवार यांनी बैठकाही घेतल्या.

त्यानंतर राष्ट्रवादीकडून नाना काटे यांचं नाव निश्चित करण्यात आलं.

नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी

फोटो स्रोत, NAana kate facebook

फोटो कॅप्शन, नाना काटे

नाना काटे हे माजी नगरसेवक आहेत. 2007 पासून पिंपळे सौदागर भागातून ते नगरसेवक म्हणून पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेत निवडून गेले आहेत. त्यांनी पालिकेत विरोधी पक्षनेते पद देखील सांभाळलं आहे. नाना काटे यांनी 2014 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं.

नाना काटे यांच्या पत्नीदेखील राजकारणात सक्रिय आहेत. त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.

राहूल कलाटेंची चिंचवडमधून महाविकास आघाडीत बंडखोरी

राष्ट्रवादीकडून नाना काटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते राहूल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

राहलू कलाटे यांनी 2014 आणि 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या आव्हानासमोर कडवी लढत दिली होती. यामुळे या पोटनिवडणुकीतही राहूल कलाटे यांच्या नावाची चर्चा होती.

राहुल कलाटे

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, राहुल कलाटे

पण ही उमेदवारी त्यांना मिळाली नाही. यामुळे कलाटेंनी 7 फेब्रुवारीला बंडखोरी करत उमेदवार अर्ज भरला. राहुल कलाटे यांनी अर्ज मागे न घेतल्यास चिंचवडमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

पोटनिवडणुकीचा टाईमटेबल कसा आहे?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 31 जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात झाली.

तर 7 फेब्रुवारी हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. 10 फेब्रुवारी हा अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 26 फेब्रुवारीला मतदान होईल. यानंतर 2 मार्चला निकाल जाहीर करण्यात येईल.

10 फेब्रुवारी प्रर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने तोपर्यंत राजकीय गणितं कशी बदलतात हे बघावं लागेल. याचसोबत बंडखोरांची मनधरणी करुन त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडण्यात राजकीय पक्ष यशस्वी होतात का याकडेही सर्वांचं लक्ष असेल.

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
फोटो कॅप्शन, बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)