'पांढऱ्या सोन्या'साठी चीनने उचललेल्या पावलामुळे जगभरात तणाव वाढला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ग्लोबल चायना यूनिट
- Role, बीबीसी न्यूज
यावर्षीच्या सुरूवातीला उत्तर अर्जेंटिनामधील आपल्या डॉर्मिटरीच्या बाहेर येत असलेल्या भांडणाच्या आवाजाने मध्यरात्रीच्या सुमारास 'आय किंग' ला जाग आली.
ती खिडकीतून बाहेर डोकावली. त्या कॅम्पसमध्ये अर्जेंटाईन कामगार गोळा झाले होते आणि त्यांनी प्रवेशद्वारावर टायर पेटवून दिले होते. त्यामुळे प्रवेशद्वार अडवलं गेलं होतं.
"मला आगीचे लोट आकाशात दिसत होते. त्यामुळे वातावरण खूपच भीतीदायक झालं होतं. ही दंगलसदृश्य परिस्थिती होती," असं आय सांगते. ती एका चीनी खाणकाम कंपनीसाठी काम करते. ही कंपनी अर्जेटिनातील अँडीज पर्वतरांगांमधून लिथियमचं उत्खनन करते. हे लिथियम बॅटरीमध्ये वापरण्यात येतं.
अर्जेटिनांतील कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आल्यामुळं ही निदर्शनं सुरू झाली होती. चीनी कंपन्या आणि स्थानिक लोकांमधील संघर्षाच्या वाढत्या घटनांपैकी ही एक घटना आहे. चीन खनिजांच्या उत्खनन उद्योगाचा विस्तार करतो आहे. पर्यावरणपूरक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या खनिजांवरील प्रक्रियेवर चीनची आधीच मक्तेदारी आहे.
फक्त 10 वर्षांआधीच चीनी कंपनीने अर्जेंटिनात लिथियम उत्खनन प्रकल्पातील पहिला हिस्सा विकत घेतला होता. हा प्रकल्प अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चिली या देशांमधील लिथियम ट्रॅंगल या नावानं ओळखल्या जाणाऱ्या लिथियम समृद्ध प्रदेशात आहे. जगातील बहुतांश लिथियम साठे या भागात आहेत.
खाणउद्योगाशी निगडीत प्रकाशनं आणि कॉर्पोरेट, सरकारी, प्रसारमाध्यमांमधून आलेल्या बातम्यांनुसार या भागातील खाण प्रकल्पांमध्ये नंतरच्या काळात चीनची गुंतवणूक वाढली आहे.
बीबीसीने केलेल्या अभ्यासानुसार लिथियम उत्खनन प्रकल्पांमधील भागीदारीच्या आधारावर आता उत्खनन होत असलेल्या किंवा बांधकामाधीन असलेल्या 33 टक्के लिथियम प्रकल्पांवर चीनी कंपन्याचं नियंत्रण आहे.
मात्र जस जसा चीनी कंपन्यांनी व्यवसायाचा विस्तार केला आहे तसे त्यांच्यावर गैरवर्तन किंवा दुरुपयोगाच्या आरोप झाले आहेत. अनेकदा बड्या आंतरराष्ट्रीय खाण कंपन्यांवर होतात त्याच प्रकारचे हे आरोप आहेत.
टायर जाळून करण्यात आलेली निदर्शनांमुळे आय किंग खडबडून भानावर आली होती. तिला अर्जेंटिनामध्ये एक शांत आयुष्याची अपेक्षा होती. मात्र स्पॅनिश भाषा येत असल्यामुळे तिला या संघर्षात दुभाषाचे काम करावे लागत होतं.
"ही काही सोपी गोष्ट नव्हती," असं ती सांगते.

फोटो स्रोत, Getty Images
भाषेव्यतिरिक्त इतर असंख्य गोष्टी आम्हाला लक्षात घ्याव्या लागतात. कामगार खूपच आळशी आहेत आणि ते कामगार संघटनेवर खूप जास्त विसंबून आहेत असं कंपनीच्या व्यवस्थापनाला वाटतं आणि स्थानिक लोकांना वाटतं की चीनी लोकं इथं फक्त त्यांचं शोषण करण्यासाठीच आले आहेत, या प्रकारच्या बाबींचादेखील दुभाषा म्हणून तिला विचार करावा लागतो.
बीबीसीनं चीनी कंपन्यांची भागीदारी असलेल्या जगभरातील 62 खाण प्रकल्पांची ओळख पटवली आहे. हे प्रकल्प एकतर लिथियमचं उत्खनन करण्यासाठी आहेत किंवा कोबाल्ट, निकेल आणि मॅंगेनीज या तीन खनिजांपैकी एका खनिजाचं उत्खनन करणारे आहेत. ही तीनं खनिज पर्यावरणपूरक तंत्रज्ञानांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
या सर्व खनिजांचा वापर लिथियम-आयन बॅटरीमध्ये केला जातो. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये याच बॅटरी वापरल्या जातात. त्याचबरोबर यांचा वापर सोलर पॅनेल्समध्येदेखील केला जातो. त्यामुळे चीनी उद्योगांसाठी त्या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्राधान्यक्रमाच्या आहेत. यातील काही प्रकल्प तर या खनिजांचं उत्खनन करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी आहेत.

चॅटहम हाऊस थिंक टॅंकनुसार लिथियम आणि कोबाल्टच्या शुद्धीकरणात चीन दीर्घकाळापासून आघाडीवर आहे. 2022 मध्ये जगभरात 72 टक्के शुद्ध लिथियम आणि 68 टक्के शुद्ध कोबाल्टचा पुरवठा चीनकडून करण्यात आला होता.
ही दोन खनिजे आणि इतर महत्त्वाच्या खनिजांचं शुद्धीकरण करणाऱ्या क्षमतेमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या उद्योगात चीनने आघाडी घेतली आहे. 2023 मध्ये जगभरात विक्री झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांपैकी निम्म्याहून अधिक इलेक्ट्रिकव वाहनांचं उत्पादन चीनमध्ये झालं होतं. त्याचबरोबर पवनचक्कीसाठीच्या विंड टर्बाईनचे जगातील एकूण उत्पादनापैकी 60 टक्के उत्पादन चीन करतो. तर सोलर पॅनेल पुरवठा साखळीच्या प्रत्येक टप्प्यातील किमान 80 टक्के उत्पादनावर चीनचं नियंत्रण आहे.
या क्षेत्रातील चीनच्या भूमिकेमुळं ही उत्पादनं स्वस्त झाली आहेत आणि जगभरात तुलनेनं सहजतेनं उपलब्ध आहेत.
मात्र पर्यावरणपूरक अर्थव्यवस्थेसाठी खनिजांचं उत्खनन आणि शुद्धीकरण करण्याची आवश्यकता फक्त चीनला आहे असं नाही. संयुक्त राष्ट्र संघानुसार जर 2050 पर्यत जगाला ग्रीनहाऊस वायूंच्या उत्सर्जनाची पातळी शून्यावर (नेट झिरो) आणायची असेल तर या खनिजांचा वापर 2040 पर्यत सहापटींनी वाढला पाहिजे.
दरम्यान अमेरिका, इंग्लंड आणि युरोपियन युनियन यांनी चीनकडून होणाऱ्या पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठीचं नियोजन आधीच केलं आहे.

फोटो स्रोत, bbc
चीनी कंपन्यांनी परदेशांतील त्यांच्या खाण प्रकल्पांच्या कामकाजात वाढ केल्यानंतर त्यांच्या प्रकल्पांमुळे समस्या निर्माण झाल्याच्या आरोपातदेखील वाढ होत गेली आहे.
द बिझनेस अॅंड ह्युमन राईट्स रिसोर्स सेंटर या स्वयंसेवी संस्थेचं म्हणणं आहे की चीनी खाण प्रकल्पांसाठी या प्रकारच्या अडचणी नव्या नाहीत. मागील वर्षी त्यांनी खनिजांचं उत्खनन करणाऱ्या चीनी कंपन्यांवर करण्यात आलेल्या 102 आरोपांची यादी प्रकाशित केली होती. स्थानिक समुदायाच्या अधिकारांच्या उल्लंघनापासून ते पर्यावरणाचं नुकसान आणि कामगारांना असुरक्षित वातावरणात काम करायला लावणं या सारखे आरोप यात करण्यात आले होते.
हे आरोप 2021 आणि 2022 दरम्यानचे आहेत. त्यानंतर 2023 मध्ये करण्यात आलेल्या 40 हून आरोपांची गणना बीबीसीनं केली आहे. या आरोपांच्या बातम्या स्वयंसेवा संस्था किंवा प्रसारमाध्यमांनी दिल्या होत्या.
जगाच्या दोन टोकांना असणाऱ्या दोन देशांमधील लोकांनी आम्हाला त्यांची कहाणी सांगितली.

फोटो स्रोत, BBC Byobe Malenga
डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमध्ये दक्षिणेला असणाऱ्या लुबुमबाशीच्या परिघावरील भागात रुआशी कोबाल्ट खाण आहे. 2011 पासून या खाणीची मालकी जिनचुआन समूहाकडे आहे. या खाणीला होणाऱ्या विरोधाचं नेतृत्त्व ख्रिसोफ काबविटा करत आहेत.
ते म्हणतात, ही खुली खाण (ओपन पिट माईन) त्यांच्या घरापासून 500 मीटर अंतरावर आहे. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तिथं स्फोटकांचा वापर करून घडविण्यात येत असलेल्या स्फोटांमुळे तिथल्या नागरिकांचं आयुष्य उद्धवस्त करून टाकलं आहे. खाणीत स्फोट होण्यापूर्वी सायरन वाजतात. प्रत्येकानं हातातलं काम थांबवून सुरक्षित आसरा घ्यावा यासाठी हा सायरन वाजवला जातो.
"कितीही तापमान असो, पाऊस पडत असो की वादळ सुरू असो, आम्हाला आमची घर सोडून खाणीजवळच्या निवाऱ्यांमध्ये जावं लागतं," असं ते सांगतात.
ही गोष्ट प्रत्येकाला करावी लागते. आजारी व्यक्ती आणि नुकतंच बाळाला जन्म दिलेली महिला प्रत्येकालाच हे करावं लागतं. कारण खाणीच्या आसपासचा परिसर सुरक्षित नाही.

फोटो स्रोत, BBC Byobe Malenga
2017 मध्ये कॅटी काबाझो या किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला होता. ती शाळेतून तिच्या घरी जात असताना हवेतून एक दगड तिच्या अंगावर पडला होता. खाणीतील स्फोटामुळे हवेत दगड भिरकावले गेले होते. यातील एक तिच्यावर पडला होता तर इतर दगडांमुळे घरांच्या भिंती आणि छतावर खड्डे पडले होते.
रुआशी खाणीच्या प्रवक्त्या एलिसा कालासा यांनी ही घटना घडल्याचं मान्य करत म्हटलं की एक मुलगी त्या भागात होती. तिनं त्या भागात असायला नको होतं. ती दगडांच्या तडाख्यात सापडली होती.
कालासा पुढे सांगतात की, "तेव्हापासून आम्ही तंत्रज्ञानात सुधारणा केली आहे आणि आता आम्ही करत असलेल्या स्फोटांमधून दगडं इतरत्र उडत नाहीत."
कंपनीचे प्रक्रिया व्यवस्थापक पॅट्रिक शिसॅंड यांच्याशी बीबीसीनं संवाद साधला. मात्र त्यांनी वेगळीच माहिती दिली. ते म्हणाले, "उत्खनन करताना आम्ही स्फोटकं वापरतो. स्फोटामुळे दगडं हवेत भिरकावली जातात. ही दगडं अखेर आसपासच्या वस्त्यांमध्ये जाऊन पडतात. कारण या वस्त्या खाणीपासून खूपच जवळ आहेत... त्यामुळे या प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत."
कालासादेखील म्हणाल्या की 2006 आणि 2012 दरम्यान खाणीपासून दूर राहण्यास जाण्यासाठी कंपनीने 300 हून अधिक कुटुंबाना नुकसान भरपाई दिली आहे.
इंडोनेशियाच्या ओबी या दुर्गम बेटावरील खाणीची संयुक्त मालकी चीनची लिजेंड रिसोर्सेस अॅंड टेक्नॉलॉजी ही कंपनी आणि इंडोनेशियाचा आघाडीचा खाणसमूह असलेल्या हरिता ग्रुपकडे आहे. या खाणीमुळे कावासी गावाजवळची जंगलं झपाट्याने नामशेष झाली आहेत.
जतम, ही खाणउद्योगावर लक्ष ठेवणारी स्थानिक संस्था म्हणते की सरकारकडून दिली जाणारी नुकसान भरपाई घेण्यात यावी आणि तिथून स्थलांतरित व्हावं यासाठी गावकऱ्यांवर दबाव आहे. डझनभर कुटुंबांनी इतरत्र स्थलांतरित होण्यास नकार दिला आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांना बाजारभावापेक्षा कमी मोबदला दिला जातो आहे. याचा परिणाम म्हणून व्यूहरचनात्मकदृष्ट्या राष्ट्रासाठी महत्त्वाचा असलेल्या प्रकल्पाला कथितरित्या अडथळा आणण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, source planet
जतम सांगतं की खाणीकडे जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी जुनी जंगलं तोडण्यात आली आहेत. त्याचबरोबर नद्या आणि महासागरात गाळ जमा झाल्यामुळे तिथलं सागरी पर्यावरण कसं प्रदूषित होतं आहे, याचीही नोंद त्यांनी ठेवली आहे.
"नदीचं पाणी आता इतकं दूषित झालं आहे की ते पिण्यायोग्य राहिलेलं नाही. तर एरवी निळाशार असणारा समुद्र आथा पाऊस पडल्यावर लाल रंगाचा होतो," असं नुर हयाती ही कावासी गावात राहणारी शिक्षिका सांगते.
या खाणीला संरक्षण देण्यासाठी तिथं इंडोनेशियन सैनिकांना तैनात करण्यात आलं आहे. अलीकडेच जेव्हा बीबीसीनं तिथं भेट दिली, तेव्हा त्या परिसरातील वाढलेला लष्करी वावर लक्षात येण्यासारखा होता. जतमचा दावा आहे की सैनिकांचा वापर धमकावण्यासाठी केला जातो आहे. अगदी जे लोक खाणीविरोधात बोलत आहेत त्यांना मारहाण करण्यासाठीसुद्धा केला जातो आहे.
नुर सांगतात की, "त्यांच्या समुदायाला वाटतं की सैन्याचं तिथलं अस्तित्व खाणीचं संरक्षण करण्यासाठी आहे. त्यांच्या स्वत:च्या नागरिकांच्या हितासाठी सैन्य तिथं नाही."
जकार्तामधील लष्करी प्रवक्त्यानं सांगितलं की "धमकावण्याचे आरोप बिनबुडाचे असून ते सिद्ध करता येणार नाहीत. सैनिक जरी तिथं खाणीचं संरक्षण करण्यासाठी असले तरी स्थानिकांशी त्यांचा थेट संवाद नाही."

फोटो स्रोत, source planet
एका प्रसिद्धीपत्रकात त्यांनी दावा केला की खाणीसाठी रस्ता तयार करण्यासाठी जागा हवी म्हणून गावकऱ्यांचं इतरत्र स्थलांतर करण्यात येत आहे. ही कारवाई पोलिसांच्या अखत्यारित येते आणि त्यांनी हे काम अतिशय शांततेने आणि सुरळीतपणे पार पाडलं आहे.
इंडोनेशियाची राजधानी असलेल्या जकार्ता इथं जून 2018 मध्ये गेलेल्या गावकऱ्यांच्या गटामध्ये नुरदेखील होत्या. खाणीमुळे होत असलेल्या परिणामांसंदर्भात निदर्शनं करण्यासाठी ते जकार्ताला गेले होते. मात्र सरकारचे स्थानिक प्रतिनिधी समसू अबबाकर यांनी बीबीसीला सांगितलं की पर्यावरणाची हानी होत असल्याबद्दलची कोणतीही तक्रार लोकांनी त्यांच्याकडे केलेली नाही.
त्यांनी एक अधिकृत अहवालदेखील दिला. ज्यात म्हटलं आहे की हरिता समूह पर्यावरण व्यवस्थापन आणि त्याची हानी यासंदर्भात काम करण्यास सक्षम आहे.
हरिता समूहाने आम्हाला सांगितलं की, "ते अतिशय कठोरपणे व्यावसायिक मूल्यांचं आणि स्थानिक नियमांचं पालन करतात. खाणीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची दखल घेत आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी ते सातत्याने काम करत आहेत."
त्यांनी असंही सांगितलं की मोठ्या प्रमाणात झालेल्या जंगलतोडीसाठी ते जबाबदार नाहीत. ते पिण्याच्या पाण्याच्या स्थानिक स्त्रोतांची ते देखरेख करत आहेत. स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या चाचण्यांमधून हे स्पष्ट झालं आहे की तेथील पाणी सरकारच्या निकषांप्रमाणे आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की त्यांनी जबरदस्तीने तिथून लोकांना हलवलेले नाही किंवा चुकीच्या पद्धतीने व्यवहार केलेले नाहीत की कोणालाही धमकावलेलंदेखील नाही.

फोटो स्रोत, Getty Images
एका वर्षापूर्वी सीसीसीएमसी या चीनी खाण व्यापार संघटनेने एक तक्रारनिवारण व्यवस्था उभारण्यास सुरूवात केली होती. चीनी कंपन्यांच्या मालकीच्या खाण प्रकल्पांविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचं निवारण करणं हा त्यामागील उद्देश होता. चीनी कंपन्यां स्थानिक समुदायाशी किंवा नागरी संस्थांशी सांस्कृतिक आणि भाषेच्या पातळीवर संवाद साधू शकत नाहीत, असं लेलिया ली या प्रवक्त्यानं सांगितलं.
मात्र ही तक्रारनिवारण व्यवस्था अद्याप पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही.
दरम्यानच्या काळात परदेशांमधील खाण प्रकल्पांमधील चीनचा सहभाग वाढला आहे. महत्त्वाच्या बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठीची ही फक्त भूराजकीय क्रिया नाही. तर यातून व्यापारी फायदादेखील मोठा आहे., असं आदित्य लोला सांगतात. ते एम्बर या इंग्लंडस्थित पर्यावरणविषयक थिंक टॅंकचे आशिया कार्यक्रम संचालक आहेत.
"चीनी कंपन्या बरेच अधिग्रहण करत आहेत कारण त्यांच्यासाठी ही नफ्याची गोष्ट आहे," असं ते सांगतात.
याची फलनिष्पत्ती म्हणून जगभरातील खाण प्रकल्पांमध्ये चीनी कामगार पाठवणे सुरूच राहणार आहे. या प्रकल्पांमधून चांगली कमाई करण्याची संधी आहे.

फोटो स्रोत, Getty Images
वॅंग गॅंग सारख्या लोकांनी डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोमधील चीनी मालकीच्या कोबाल्ट खाणींमध्ये 10 वर्षे काम केले आहे. 48 वर्षीय गॅंग कंपनीच्या क्वार्टर्समध्ये राहतात आणि स्टाफसाठीच्या कॅंटिनमध्ये जेवतात. ते आठवड्याचे सातही दिवस दररोज 10 तास काम करतात. त्यांना महिन्यातून चार दिवस सुट्टी असते.
त्यांचं कुटुंब चीनच्या हुबेई प्रांतात आहे. चीनमध्ये राहून केली असती त्यापेक्षा जास्त कमाई होत असल्यामुळे त्यांनी कुटुंबापासून दूर राहणं स्वीकारलं आहे. कॉंगोमधील स्वच्छ आकाश आणि उंच झाडांची जंगलं त्यांना आवडतात.
खाणीत काम करणाऱ्या स्थानिक कामगारांशी ते फ्रेंच, स्वाहिली आणि इंग्रजी या भाषांच्या मिश्रणातून संवाद साधतात. ते म्हणतात, "कामाशिवाय इतर गोष्टींबाबत आम्ही क्वचितच बोलतो."
आय किंगसुद्धा अर्जेंटिनातील स्थानिक भाषा अस्खलितपणे बोलते. मात्र स्थानिक अर्जेंटाईन कामगारांशी कामाव्यतिरिक्त तिचं क्वचितच संभाषण होतं. ती इतर चीनी कामागारांशी संवाद साधते. घरापासून हजारो मैल दूरचे अंतर प्रत्येकालाच जवळ आणतं.
अॅंडीज पर्वतामध्ये वर उंचावर असणाऱ्या भूभागांवर ज्याला सॉल्ट फ्लॅट (पाण्याचं बाष्पीभवन झाल्यामुळं जमिनीवर शिल्लक राहिलेला मीठाचा थर) म्हणतात तिथं जाणं ही तिच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तिथं लिथियमचं उत्खनन होतं आणि आयुष्य अतिशय शांत आहे.
"उंचावर गेल्याचा मला त्रास होतो. मला झोप लागत नाही आणि मी काहीही खात नाही. मात्र मला डोंगरावर उंच जायला आवडतं. कारण तिथं गोष्टी खूप सोप्या आहेत आणि तिथं कोणत्याही प्रकारचं ऑफिसमधील राजकारण नाही," असं ती सांगते.
(आय किंग आणि वॅंग गॅंग ही टोपणनावं आहेत.)
(एमरी माकुमेनो, बायोबे मालेंगा, ल्युसियन काहोझी यांच्याकडून अतिरिक्त रिपोर्टिंग)











