2,500 पोलीस, शेकडो मृतदेह आणि थरकाप उडवणारं दृश्य; जगभरात चर्चेत असलेल्या 'या' पोलीस कारवाईत नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Bruno Itan
- Author, रूट पिना बीबीसी
- Role, न्यूज ब्राझील, साओ पाउलो
(इशारा: या लेखातील माहिती तुम्हाला विचलित करू शकते)
दक्षिण अमेरिकेतील संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी टोळ्या याची नेहमीच चर्चा होत असते. ब्राझीलमध्येही अशा संघटित टोळ्या आहेत, ज्या अमली पदार्थांच्या तस्करीत आहेत. अलीकडच्या काळात ब्राझालीच्या रिओ दी जानेरो राज्यात कोमांडो व्हर्मेल्हो गटाचा जोरात विस्तार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट अमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिय आहे. या टोळ्या सशस्त्र असून त्यांच्याकडे घातक शस्त्रे आहेत. कोमांडो व्हर्मेल्होच्या विस्ताराला पायबंद करण्यासाठी रिओ दी जानेरोच्या पोलिसांनी अलीकडेच मोठी सशस्त्र कारवाई केली.
रिओ दी जानेरोच्या नागरी आणि लष्करी पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या पोलीस कारवाईत किमान 121 जण मारले गेले तर 113 जणांना अटक करण्यात आली.
ही घटना कव्हर करणाऱ्या एका स्थानिक फोटोग्राफरनं या कारवाईत काय बघितलं याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईवरून स्थानिक पातळीवर अनेक प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर ही कारवाई नेमकी काय होती, ती कोणाविरुद्ध करण्यात आली, त्यावर काय प्रतिक्रिया उमटत आहेत, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.

फोटो स्रोत, Bruno Itan
तो 28 ऑक्टोबरचा दिवस होता, सकाळी 6 ची वेळ होती. फोटोग्राफर ब्रुनो इटान यांच्या फोनवर मेसेजचा जणूकाही पूर आला होता. ब्रुनो ज्या कॉम्प्लेक्समध्ये लहानाचे मोठे झाले, त्या कॉम्प्लेक्सो दो अलेमाओच्या परिसरातील गटांमध्ये गोळीबार झाल्याच्या अफवा सर्वत्र पसरल्या होत्या.
त्या सकाळी रिओ दी जानेरो महानगर क्षेत्रात पोलीस कारवाई सुरू होती. फेडरल फ्लुमिनेन्स युनिव्हर्सिटीमधील (जेनी/यूएफएफ) न्यू इललिगॅलिटीज स्टडी ग्रुपनं 1990 पासून नोंदवलेली ही सर्वात रक्तरंजित कारवाई होती.
रिओ दी जानेरोच्या नागरी आणि लष्करी पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, या पोलीस कारवाईत किमान 121 जण मारले गेले तर 113 जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई रिओमधील अलेमाओ आणि पेन्हा कॉम्प्लेक्समधील कोमांडो व्हर्मेल्हो गटाविरुद्ध करण्यात आली.
पोलिसांनीच दिला 'मृत्यूदंड'
ही अतिशय मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली कारवाई म्हणजे 'रिओ दी जानेरोच्या सुरक्षा दलांनी केलेलं सर्वात मोठं ऑपरेशन असल्याचं' राज्य सरकारनं म्हटलं आहे.
शहराच्या अनेक भागात वर्चस्व असलेल्या कोमांडो व्हर्मेल्हो या गटाच्या प्रादेशिक विस्ताराला रोखण्यासाठी रिओ सरकारनं एक कायमस्वरुपी मोहीम सुरू केली आहे. त्याला ऑपरेशन कंटेनमेंट म्हटलं आहे. ही कारवाई त्या मोहिमेचाच एक भाग आहे.
गव्हर्नर क्लॉडिओ कॅस्ट्रो यांनी ही कारवाई 'यशस्वी झाल्याचं' आणि त्यामुळे 'गुन्हेगारीला मोठा धक्का' बसल्याचं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Bruno Itan
मानवी हक्क चळवळीनं या कारवाईचं वर्णन हत्याकांड म्हणून केलं आहे. त्यांनी सुरक्षाविषयक धोरण म्हणून त्याच्या प्रभावीपणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. फोटोग्राफरदेखील त्या प्रश्नांशी सहमत आहेत.
फोटोग्राफरनं म्हटलं, "ब्राझीलमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा नाही. कोणत्याही गुन्हेगाराला, मग त्यानं कोणतंही कृत्य केलेलं असलं तरीदेखील. अटक करून न्यायालयासमोर हजर करावं लागतं आणि त्यानंतर त्याला शिक्षा सुनावली जाते."
"मात्र 28 ऑक्टोबरला कॉम्प्लेक्सो दो अलेमाओ आणि कॉम्प्लेक्सो दा पेन्हामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली."
ते पुढे म्हणाले, "पोलिसांनी स्वत:च ही मृत्यूदंडाची शिक्षा निश्चित केली. कोण जिवंत राहील आणि कोण मरणार, हे त्यांनीच ठरवलं."
या फोटोग्राफरचा जन्म रेसिफेमध्ये झाला. त्यानंतर वयाच्या 10 व्या वर्षी ते त्यांच्या कुटुंबाबरोबर कॉम्प्लेक्सो दो अलेमाओमध्ये राहायला गेले.

फोटो स्रोत, Bruno Itan
2008 मध्ये त्यांनी फोटो काढण्यास सुरुवात केली. तिथल्या समुदायात फेडरल सरकारनं सुरू केलेल्या मेमोरियास दो पीएसी या कोर्सद्वारे ते फोटो काढू लागले.
2011 ते 2017 दरम्यान त्यांनी रिओ दी जानेरो सरकारसाठी अधिकृत फोटोग्राफर म्हणूनही काम केलं. ब्रुनो इटान हे ओल्हार कॉम्प्लेक्सो प्रकल्पाचे संस्थापक आहेत. या प्रकल्पात फावेलामधील मुलांना आणि तरुणांना फोटोग्राफीचे मोफत शिक्षण दिलं जातं.
फावेलामधील दैनंदिन आयुष्य आणि तिथलं वास्तव यांचं चित्रण करण्यावर त्यांचं काम केंद्रित आहे.
ब्रुनो म्हणतात, "फावेलामध्ये ज्या सकारात्मक गोष्टी आहेत, तिथे असणारी बहुलता म्हणजे तिथे आढळणारी विविधता आणि संस्कृती याकडे नेहमीच माझं लक्ष असतं. मात्र दुर्दैवानं, आपल्याला माहीत आहे की फावेलाचं वास्तव फक्त तेवढंच नाही."

फोटो स्रोत, Bruno Itan
ब्रुनो इटान रोसिन्हामध्ये राहतात. या कारवाईत 2,500 पोलिसांचा सहभाग असल्याचं त्यांना कळताच, त्यांनी घर सोडून घटनास्थळी पोहोचण्याचं ठरवलं.
ते सकाळी 10 वाजेच्या सुमारास तिथे पोहोचले. तेव्हा त्यांना तिथे, जळालेल्या गाड्या, गोळ्यांच्या खुणा आणि घाबरलेले, भेदरलेले रहिवासी दिसले.
ब्रुनो म्हणतात, "मी गोळीबार पाहिला, जळालेल्या कार पाहिल्या. मी त्या ठिकाणचं चित्रीकरण सुरू केलं. तिथल्या रहिवाशांनीदेखील पोलिसांच्या क्रौर्याबद्दल सांगितलं."
गेटुलिओ वार्गास हॉस्पिटलमध्ये मृतदेह येत राहिले. त्या क्षणापर्यंत अधिकृतपणे 64 जण मारले गेले होते.
"अनेक मृतदेह आले, त्यात पोलीस अधिकाऱ्यांचेही मृतदेह होते," असं ते म्हणाले.
कुटुंबातील सदस्यांनी घेतला शोध
ब्रुनो यांच्या म्हणण्यानुसार, पेन्हा कॉम्प्लेक्समध्ये पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला. "पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि आम्हाला आत येण्यापासून रोखलं. त्यांनी एक रांग तयार केली आणि म्हणाले की 'पत्रकारांना इथं येण्याची परवानगी नाही.'"
ते फावेलामध्येच लहानाचे मोठे झालेले असल्यामुळे, ते त्या ठिकाणी प्रवेश करू शकले. "मी तिथल्या वस्तीत पोहोचलो. तिथे मी पहाटेपर्यंत चित्रीकरण करत होतो."
रात्रीच्या वेळेस तिथल्या रहिवाशांनी बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. बेपत्ता झालेल्या लोकांची संख्या तोपर्यंत मृत म्हणून नोंदवलेल्या लोकांच्या संख्येशी जुळत नव्हती.
पहाटे, तिथल्या वस्तीतील कुटुंबांनी स्वत:च मिसेरिकॉर्डिया पर्वतरांगांमध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. ही पर्वतरांग कॉम्प्लेक्सो दा पेन्हा आणि कॉम्प्लेक्सो दो अलेमाओ यांना वेगळं करते.
तिथल्या रहिवाशांनी किमान 55 मृतदेह साओ लुकास चौकात हलवले. तो या प्रदेशातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या एस्ट्राडा जोस रुकास या रस्त्यावर आहे.

फोटो स्रोत, Bruno Itan
"कुटुंबांनी स्वत:हून मृतदेह शोधले. ते मोटरसायकल आणि कारनं तिथे पोहोचले. त्यांनी मृतदेहांना चादरी किंवा इतर कपड्यांनी झाकलं आणि कॉम्प्लेक्सो दा पेन्हाच्या चौकात आणलं," असं ते पुढे म्हणाले.
"सुरुवातीला तिथे फक्त 20 मृतदेह आले. मात्र नंतर मृतदेह येणं सुरूच राहिलं. 25, 30, 35, 40, 45 मृतदेह आले. त्यांनी काहीही केलं असलं, तरीदेखील ती माणसं होती, जीव होते."
रिओ दी जानेरो नागरी पोलीस दलाचे सचिव फेलिप क्यूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवाशांनी जंगलातून मृतदेह काढून आणल्यासंदर्भात रिओ दी जानेरोचे नागरी पोलीस एक चौकशी सुरू करतील. जेणेकरून, या कारवाईत काही 'प्रक्रियात्मक फसवणूक' किंवा 'गैरप्रकार' होता का, हे निश्चित करता येईल.

फोटो स्रोत, Bruno Itan
क्यूरी म्हणाले की, जे मृतदेह लोकांसमोर ठेवण्यात आले होते, त्यात फसवणूक करण्यात आली होती.
ते म्हणाले, "आमच्याकडे जे मृतदेहांचे फोटो आहेत, ते सर्व कॅमोफ्लॉज करणारे कपडे घातलेले, बुलेटप्रूफ जॅकेट घातलेले आणि युद्धात वापरली जाणारी शस्त्रं बाळगलेले होते."
"त्यानंतर असंख्य मृतदेह, फक्त अंडरवेअर किंवा शॉर्ट्स घातलेले, अनवाणी आणि अंगावर इतर काहीही नसलेले होते. दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर जणूकाही चमत्कारच झाला होता."
"असं दिसतं की, ते एका इमारतीत शिरले आणि त्यांनी त्यांचे कपडे बदलले. आमच्याकडे लोक जंगलातून मृतदेह काढत असल्याचे आणि त्यांना रस्त्यांवर ठेवत असल्याचे तसंच या गुन्हेगारांचे कपडे उतरवत असल्याचे फोटो आहेत," असं पोलीस प्रमुखांनी सांगितलं.
'ही काही सामान्य गोष्ट नाही'
फोटोग्राफरनं चाकू किंवा सुरीच्या वारानं मृत पावलेल्या लोकांच्या मृतदेहांची संख्यादेखील अधोरेखित केली.
"ही काही सामान्य गोष्ट नाही. ही देशाच्या इतिहासातील कदाचित सर्वात मोठी कारवाई असेल," असं ब्रुनो म्हणतात.

फोटो स्रोत, Bruno Itan
या कारवाईबद्दल बोलताना ते 1992 मध्ये झालेल्या कारांदिरू हत्याकांडाची आठवण करून देतात. त्यावेळेस साओ पाउलो पेनिटेन्शरी सेंटरमध्ये झालेलं बंड दडपण्यासाठी 111 कैद्यांना मारण्यात आलं होतं.
ते म्हणतात, "मृतदेहांचे शिरच्छेद करण्यात आले होते, ते पूर्णपणे विद्रूप करण्यात आलेले होते. मृतदेह चेहरा नसलेले, अर्धा चेहरा नसलेले, हात नसलेले, पाय नसलेले अशा अवस्थेत होते."
"मला खरोखर ज्या गोष्टीमुळे धक्का बसला ती म्हणजे चाकू किंवा सुरीनं मारलेल्या लोकांची संख्या. अनेक फोटो आहेत ज्यात दिसतं की, ते शस्त्र होतं, एका धारदार शस्त्रानं ते घडलं होतं, तुमच्या लक्षात आलं का?"

फोटो स्रोत, Bruno Itan
ते म्हणतात की, तो 'मृत्यूचा वास' अजूनही त्यांच्या स्मरणात आहे. "मी आता जिथे आहे, तिथे आता मृतदेह नाहीत. मात्र त्यांचा तो वास माझ्या मनात तसाच आहे," असं ते म्हणतात.
ब्रुनो म्हणतात, "तिथे दाखवण्यात आलेल्या क्रौर्यामुळे मला प्रचंड धक्का बसला आहे. त्या कुटुंबांच्या वेदना, बेशुद्ध पडणाऱ्या माता, रडणाऱ्या गर्भवती महिला, संतापलेले वडील. मी त्यांच्यापैकी एक असू शकलो असतो. जर मला फोटोग्राफी येत नसती, तर मीदेखील त्यांच्यापैकी एक असू शकलो असतो."
त्यांच्या मते, फाव्हेलामधील सुरक्षा धोरण अजूनही हिंसाचारावर आधारित आहेत.
ते पुढे म्हणतात, "दुर्दैवानं, सार्वजनिक सुरक्षा धोरण हे नेहमीच क्रूर शक्तीवर आधारलेलं असतं. ते कधीही सामाजिक कृती, शिक्षण, गृहनिर्माण, आरोग्य किंवा संस्कृती यावर आधारित नसतं. या लोकांना वाचवण्यासाठी फाव्हेलामध्ये त्याचीच आवश्यकता आहे."
ब्रुनो इटान यांनी इतर कारवायांचंही दस्तऐवजीकरण केलं आहे. यात मे 2021 मध्ये जकारेझिन्हो इथं झालेल्या कारवाईचा समावेश आहे. त्यात 28 जण मारले गेले होते. ब्रुनो इटान म्हणतात की, 28 ऑक्टोबरला त्यांनी जी कारवाई पाहिली त्याची तुलना इतर कोणत्याही कारवाईशी करता येणार नाही.
ते म्हणतात, "मला वाटतं की, मी माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट कारवाई पाहिली आहे. आज मी इथे जे पाहिलं आहे, त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही."
29 ऑक्टोबरला फेडरल प्रॉसिक्युटर्स ऑफिसनं (एफएफपी) रिओ दी जानेरो फॉरेन्सिक मेडिकल इन्स्टिट्यूटला (आयएमएल) विनंती केली आहे की, रिओ दी जानेरोमध्ये करण्यात आलेल्या मोठ्या पोलीस कारवाईत बळी पडलेल्या मृतदेहांच्या शवविच्छेदनाची सर्व माहिती 48 तासांच्या आत देण्यात यावी.
या दस्तावेजात अशीही मागणी करण्यात आली आहे की, रिओ दी जानेरो राज्य सरकारनं दाखवून दिलं आहे की, त्यांनी एडीपीएफ 635 प्रकरणात सर्वोच्च संघीय न्यायालयानं (एसटीएफ) केलेल्या ठरावांतील आदेशांचं पालन केलं आहे. या कारवाईत रिओ पोलिसांच्या घातकपणाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
एडीपीएफनं (ॲलेगेशन ऑफ नॉन कॉम्प्लायन्स विथ द फंडामेंटल प्रीसेप्ट) (मूलभूत नियमांचं पालन न केल्याचा आरोप) रिओ सरकारला पोलीस कारवाईसाठी नियम आणि निकषांसह एक योजना सादर करण्यास भाग पाडलं. एप्रिल महिन्यात देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं तिचा स्वीकार केला होता.
फेडरल प्रॉसिक्युटर्स ऑफिस आणि ओंबड्समन ऑफ द युनियन यांनी विनंती केली की, क्लॉडिओ कॅस्ट्रो यांच्या सरकारनं या योजनेत नमूद केलेल्या मुद्द्यांबाबत स्पष्टीकरण द्यावं आणि त्यांचं पालन केल्याचं दाखवून द्यावं. उदाहरणार्थ, एजंट्सद्वारे बॉडी कॅमेऱ्यांचा वापर, या कारवाईसाठीचं औपचारिक सुयोग्य कारण आणि प्रभावित भागातील रुग्णवाहिकांची उपस्थिती.
ब्रुनो इटान या सर्व गोष्टींकडे थकव्यानं आणि निराश होऊन पाहतात. ते म्हणतात, "जर समाजाला वाटत असेल की ते जिंकले, त्यांनी विजय मिळवला, तर मला वाटतं की, आपण सर्वजण हरणार आहोत."
"दुर्दैवानं, फाव्हेलासाठीचं सार्वजनिक सुरक्षा धोरण नेहमीच रायफलच्या दहशतीवर आधारित राहिलं आहे," असं ते दु:खानं सांगतात.
"जेव्हा कोणी अमली पदार्थांच्या तस्करीत मारला जातो, तेव्हा त्या सापळ्यात दोन-तीन जण अडकतील, याची मी तुम्हाला हमी देतो," असं ते शेवटी म्हणतात.
रिओमधील संघटित गुन्हेगारीचं जाळं
रिओमधील अलेमाओ आणि पेन्हा कॉम्प्लेक्समधील कोमांडो व्हर्मेल्हो हा एक गुन्हेगारी गट असून तो अमली पदार्थांच्या तस्करीत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी जी कारवाई केली ती याच गटाच्या विरोधात केली.
रिओ दी जानेरोच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्यांपैकी 99 जणांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यातील 42 जणांविरोधात अटक वॉरंट होतं आणि 78 जणांची 'लक्षणीय गुन्हेगारी पार्श्वभूमी' होती.
ज्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि जे मारले गेले, त्यांची पूर्ण यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
रिओ दी जानेरोच्या पब्लिक प्रॉसिक्युटर्स ऑफिसनं दाखल केलेल्या तक्रारीत, पेन्हा कम्प्लेक्समध्ये कोमांडो व्हर्मेल्हो गटाची रचना, त्यांची भाषा, ते वापरत असलेली शस्त्रं आणि उपकरणं यांची माहिती देण्यात आली आहे.
या तक्रारीत, या गुन्हेगारी गटाचं नुकसान करणाऱ्या लोकांच्या छळाची, तसंच त्यांची हत्या करण्याचीही माहिती देण्यात आली आहे.
रिओ दी जानेरोच्या पब्लिक प्रॉसिक्युटर्स ऑफिसच्या स्पेशल टास्क फोर्स टू कॉम्बॅट ऑर्गनाईज्ड क्राईमनं दाखल केलेल्या तक्रारीमध्ये पेन्हा कॉम्प्लेक्समधील गुन्हेगारी गटांच्या रचनेची माहिती देण्यात आली आहे.
कोमांडो व्हर्मेल्होचा पहिल्या थरातील सूत्रधार आहेत, एडगर आल्वेस दी आंद्रेद. तो 'डोका' किंवा 'उर्सो' या नावानं ओळखला जातो. यातील दुसरा महत्त्वाचा गुन्हेगार आहे, पेड्रो पाउलो गुडेस, तो 'पेड्रो बाला' या नावानं ओळखला जातो.
डोका हा सध्या कोमांडो व्हर्मेल्होचा मुख्य नेता आहे. मार्सिन्हो व्ही पी आणि फर्नांडिन्हो बिरा-मार यांच्यानंतर तो टोळी चालवतो. हे दोघेही आता तुरुंगात आहेत.
पोलिसांच्या दस्तावेजानुसार, "डोका हाच सध्या या गुन्हेगारी गटाचा मुख्य नेता असून, या गटाचा सध्या रिओ दी जानेरो राज्यात विस्तार होतो आहे."
डोका सध्या फरार आहे. पोलिसांच्या तपासानुसार, टोळीतील त्याच्या महत्त्वाच्या स्थानामुळे त्याच्या निवासस्थानाला शस्त्रं, रायफल असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मोठं सुरक्षा कवच पुरवलेलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











