अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत भयंकर 9/11 चा दहशतवादी हल्ला मोहम्मद अताने कसा पूर्णत्वास नेला?

    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

( हा लेख पहिल्यांदा 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. )

11 सप्टेंबर 2001 या दिवसाची सुरुवात नेहमीसारखीच झाली होती. पण 10 वाजता हा दिवस जगाच्या इतिहासातील सर्वांत भयंकर दहशतवादी हल्ल्यासाठी आणि अमेरिकेवर झालेल्या पर्ल हार्बरनंतरच्या सर्वांत भयानक आक्रमणासाठी नोंदवला गेला.

त्या दिवशी 10 वाजता न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन टॉवर्सवर दोन विमानं येऊन धडकली आणि त्यात 2606 लोक मृत्युमुखी पडले.

शिवाय, पेन्टागॉनवर झालेल्या हल्ल्यात 206 जण मरण पावले, तर पेन्सिल्वानियामध्ये विमानाचं अपहरण थांबवण्याच्या प्रयत्नात 40 जणांना प्राण गमवावे लागले. न्यूयॉर्कमध्ये बांधण्यात आलेल्या 9/11 च्या स्मारकात या हल्ल्यांमध्ये मृत्यू झालेल्या एकूण 2983 लोकांच्या नावाची नोंद आहे.

वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हा पहिला दहशतवादी हल्ला नव्हता. 8 वर्षांपूर्वी, 1993 मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 6 लोक मृत्युमुखी पडले होते.

गॅरट ग्राफ यांनी 'द ओन्ली प्लेन इन द स्काय: द ओरल हिस्ट्री ऑफ 9/11' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "9/11 रोजी झालेल्या हल्ल्यांमध्ये 3 हजारांहून अधिक मुलामुलींनी त्यांचे आई-वडील गमावले. यातील जवळपास 100 बालकांचा जन्म हल्ल्यांनंतर काही महिन्यांनी झाला आणि त्यांना स्वतःचे वडील कधीच पाहायला मिळाले नाहीत.

आकडेवारीचा भाग बाजूला ठेवला, तरी या हल्ल्यांनी अमेरिकेच्या सर्वच नागरिकांवर आणि ही धक्कादायक बातमी ऐकलेल्या जगभरातील लाखो लोकांवर प्रभाव पाडला."

ग्राफ लिहितात, "या घटनेचा धक्का अजूनही अमेरिकी लोकांच्या स्मृतीतून गेलेला नाही. जगातील सर्वांत सुरक्षित मानलेल्या ठिकाणी ही घटना घडली."

अता मोहम्मदचं मृत्युपत्र

11 सप्टेंबर 2001 रोजी पोर्टलँडमधील कम्फर्ट इन या हॉटेलातील खोली क्रमांक 233 मध्ये पहाटे 4 वाजता मोहम्मद अता याला जाग आली.

उठल्यावर त्याने त्याच हॉटेलात उतरलेला त्याचा साथीदार अब्दुल अझीझ अल ओमारी याला फोन केला. मग आंघोळ करून त्याने निळ्या रंगाचा शर्ट आणि काळी पँट घातली.

नंतर त्याने लॅपटॉपवर स्वतःच्या मृत्युपत्राची फाइल उघडली. एप्रिल 1996 मध्ये त्याने मृत्युपत्र तयार केलं होतं.

या मृत्युपत्रातील दोन गोष्टी विचित्र होत्या. मार्टिन अ‍ॅमिस यांनी 'द सेकंड प्लॅन' या पुस्तकात लिहिल्यानुसार, "'माझ्या अंत्यसंस्कारावेळी लोकांनी खूप आवाज करू नये, अशा क्षणी शांत राहावं अशी ईश्वराची इच्छा असते.

दुसरी गोष्ट, मी मरण पावल्यावर माझ्या शवाला आंघोळ घालणाऱ्या लोकांनी हातमोजे घालावेत आणि माझ्या गुप्तांगांना स्पर्श करू नये. त्याचप्रमाणे गर्भवती महिला आणि स्वच्छ नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने मला अखेरचा निरोप द्यायला येऊ नये', असं अता याने मृत्युपत्रात लिहिलं होतं."

यातली कोणतीही सूचना अमलात आली नाही, कारण त्याला कोणीही अखेरचा निरोप दिला नाही, कोणीही त्याच्या शवाला आंघोळ घातली नाही अथवा त्याच्या गुप्तांगांना स्पर्श करण्याचाही प्रश्नच आला नाही.

विल्यम आर्किन यांनी 'ऑन दॅट डे: द डेफिनेटिव्ह टाइमलाइन' या पुस्तकात लिहिलं आहे, "5 वाजून 33 मिनिटांनी अता व त्याच्या साथीदाराने हॉटेलातून चेक-आउट केलं. हॉटेलचं बिल अताच्या व्हिसा डेबिट कार्डद्वारे भरण्यात आलं. आदल्या दिवशी त्याने एटीएममधून पैसे काढून पिझ्झा खाल्ला आणि वॉलमार्टमध्ये खरेदी केली होती. एफबीआयच्या म्हणण्यानुसार, त्याच दिवशी अताने त्याच्या कारमधून वर्ल्ड ट्रेड सेंटरची पाहणी केली होती."

मेटल डिटेक्टरमध्ये काहीच सापडलं नाही

हॉटेलातून बाहेर पडल्यावर अता व त्याचा साथीदार अब्दुल अझीझ अल ओमारी भाड्याने घेतलेल्या निळ्या रंगाच्या निस्सान अल्टिमा कारमध्ये बसले आणि 7 मिनिटांमध्ये विमानतळाच्या पार्किंगमध्ये पोचले. तिथे पार्किंगमध्ये जाताना विमानतळाच्या सुरक्षाप्रक्रियेमध्ये त्यांचं छायाचित्र काढण्यात आलं. 5 वाजून 45 मिनिटांनी अता व त्याचा साथीदार यांची तपासणी झाली.

अताच्या हातात खांद्यावर लटकवायची एक काळी बॅग होती, तर अमारीने दोन्ही हातांमध्ये कॅमेरा अथवा कॅमरेकॉर्डरसारख्या गोष्टी धरल्या होत्या. मेटल डिटेक्टरला त्यांच्याकडे कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट आढळली नाही.

"बरोबर 6 वाजता अता व त्याचा साथीदार यूएस एअरवेजच्या फ्लाइट क्रमांक 5930 मध्ये बसले. एकोणीस प्रवासी-क्षमतेच्या त्या विमानामध्ये एकूण आठ प्रवासी बसलेले होते. अताला नवव्या रांगेत सीट मिळाली होती. तो आणि अल ओमारी हे विमानात प्रवेश करणारे शेवटचे प्रवासी होते.

पंचेचाळीस मिनिटांमध्ये ते बोस्टन लोगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर पोचले. तिथून त्यांना लॉस एन्जेलीसला जाणाऱ्या ए-ए फ्लाइट क्रमांक 11 मध्ये बसायचं होतं.

या विमानात 11 प्रवाशांव्यतिरिक्त विमानकंपनीचे नऊ कर्मचारीसुद्धा होते. सात वाचून एकोणसाठी मिनिटांनी या 767 बोइंग विमानाला उड्डाणासाठी हिरवा झेंडा दाखवण्यात आला."

लहानपणी अता मोहम्मद खूप लाजराबुजरा व भिडस्त होता

अताचा जन्म 1 सप्टेंबर 1968 रोजी इजिप्तमधील कफ्र अल शेख इथे झाला. लहानपणी तो खूप लाजराबुजरा होता, असं त्याचे कुटुंबीय व मित्रमंडळी सांगतात.

टाइम या नियतकालिकाने 30 सप्टेंबर 2001 रोजी 'अताज् ओडेसी' या मथळ्याचा लेख छापला होता.

या लेखात जॉन क्लाउड लिहितात की, "लहानपणी अताला बुद्धिबळ खेळायला खूप आवडायचं, असं त्याचे वडील सांगतात. त्याला हिंसक खेळांबाबत तिरस्कार वाटत असे. अता पाच फूट सात इंच उंचीचा होता. तो इतका दुबळा होता की त्याचे वडीला त्याला 'बुलबुल' अशी हाक मारत असत."

"काहिरा विद्यापीठात वास्तुरचनेमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर तो पुढील शिक्षणासाठी जर्मनीतील हॅम्बर्ग इथे गेला. नव्वदीच्या दशकामध्ये अता त्याच्या विद्यापीठातून दीर्घ कालावधीसाठी गायब होत असल्याचं निदर्शनास आलं. हज यात्रेसाठी आपण सौदी अरेबियाला गेलो होतो, असं त्याने त्याच्या मित्रांना सांगितलं. तिथून परत आल्यावर त्याने दाढी वाढवायला सुरुवात केली."

जर्मन गुप्तचर सूत्रांच्या म्हणण्यानुसार, याच काळात अताचा संपर्क दहशतवादी कारवाया करणाऱ्या लोकांशी आला.

विमान चालवण्याचं प्रशिक्षण

"दीर्घ काळ बेपत्ता झाल्यानंतर परत आलेल्या अताने नवीन पासपोर्टसाठी अर्ज केला. वास्तविक त्याच्या आधीच्या पासपोर्टची मुदत संपलेली नव्हती. आपण आधी कुठे कुठे जाऊन आलो, याचा पुरावा नष्ट करण्यासाठी अतिरेकी लोक अनेकदा नवीन पासपोर्ट काढतात," असं टेरी मेकडॉरमेट यांनी 'परफेक्ट सोल्जर्स: हू दे वर, व्हाय दे डिड इट' या पुस्तकात लिहिलं आहे.

अता 3 जून 200 रोजी प्रागहून सहा महिन्यांचा टूरिस्ट व्हिसा घेऊन नेवार्कला गेला आणि महिन्याभराने त्याने इतर काही साथीदारांसह हाफमन एव्हिएशन इंटरनॅशनलमधून विमान चालवण्याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.

चार महिन्यांच्या या प्रशिक्षणासाठी त्या सर्वांनी मिळून हाफमनला सुमारे 40 हजार डॉलर भरले होते. अता व त्याचा साथीदार अल शेही या दोघांना 21 डिसेंबर 2000 रोजी वैमानिकाचा परवाना मिळाला.

"11 सप्टेंबरच्या दहा दिवस आधी अताच्या खात्यावर दोन वेळा पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते. सात सप्टेंबरला अता, त्याचा साथीदार अल शेही आणि आणखी एक व्यक्ती हॉलिवूडमधील ओएस्टर बारमध्ये व ग्रिल इथे गेले.

त्यांच्यातील फक्त अताच दारू पित नसे. त्याऐवजी त्याने कॅनबरी ज्यूस घेतला," असं जॉन क्लाउड यांनी 'टाइम' नियतकालिकात लिहिलं होतं.

फ्लाइट अटेंडंटने विमानाचं अपहरण झाल्याची माहिती फोनवरून दिली

एए-11 विमान आकाशात उडालं आणि पुढची काही मिनिटं या विमानाने बोस्टन एअररूट ट्रॅफिक कंट्रोलच्या नियमांचं पालन केलं.

पण आठ वाजून तेरा मिनिटांनी अता व त्याच्या साथीदारांनी विमानावर नियंत्रण मिळवल्यावर त्यांनी कंट्रोल-रूमच्या नियमांचं पालन करणं बंद केलं.

विल्यम आर्किन लिहितात त्यानुसार, "वैमानिकाला नामोहरम करण्यासाठी अताने चाकू आणि हिंसेचा आधार घेतला. आठ वाजून अठरा मिनिटांनी फ्लाइट अटेंडंट बेटी ओंग यांनी अमेरिकी एअरलाइन्स 'साउथ इस्टर्न रिझर्वेशन सेंटर'ला फोन करून अपहरण झाल्याची शंका बोलून

दाखवली. विमानाच्या मागच्या बाजूला जम्प सीटवर बसून आपण फोन करत असल्याचंही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं. बेटी यांचा हा फोन-कॉल 25 मिनिटं सुरू होता.

कॉकपीटमधून त्यांच्या संदेशाला काही प्रत्युत्तर मिळत नव्हतं आणि बिझनेस क्लासमध्ये 9-बी सीटवर बसलेल्या डॅनिएल लेविन यांच्यावर सुऱ्याने वार करण्यात आले आहेत, असं त्यांनी सांगितलं."

लेविन यांनी काही वर्षं इस्राएली सैन्यात काम केलं होतं. त्यांनी समोर बसलेल्या अपहरणकर्त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असावा, पण मागच्या बाजूला आणखी एक अपहरणकर्ता बसल्याचं त्यांना माहीत नव्हतं, असा तर्क नोंदवण्यात आला आहे.

त्या वेळी 10-बी सीटवर बसलेला एक माणूस कॉकपिटमध्ये गेल्याचंही ओंग यांनी सांगितलं. आठ वाजून सव्वीस मिनिटांनी विमानाने अचानक 100 अंशांचा कोन करून न्यू यॉर्क शहराच्या दिशेने मोहरा वळवला. फ्लाइट अटेंडंट ओंग यांनी कळवल्यानुसार, विमान खूप वर-खाली होत पुढे जाऊ लागलं.

8 वाजून 46 मिनिटांनी विमान नॉर्थ टॉवरला धडकलं

विल्यम आर्किन पुढे लिहितात, "या दरम्यान वैमानिकाच्या जागेवर बसलेल्या मोहम्मद अता याने विमानातील इंटरकॉम यंत्रणेद्वारे प्रवाशांशी बोलायचा प्रयत्न केला. पण त्याने चुकीचं बटण दाबलं. त्यामुळे त्याचा संदेश खाली कंट्रोल रूमला ऐकू गेला. ओंग सातत्याने कंट्रोल रूमला माहिती देत होत्या की, विमान वेगाने खालच्या बाजूने जातं आहे. दरम्यान, फर्स्ट क्लासमध्ये काहीतही वैद्यकीय तातडीची परिस्थिती निर्माण झाली असावी, त्यामुळे विमान खाली उतरवलं जात आहे, असा इतर प्रवाशांचा गैरसमज झाल्याचं दुसऱ्या फ्लाइट अटेंडंट स्विनी यांनी कंट्रोल रूमला कळवलं."

"फ्लाइट अटेंडंट स्विनी यांनी कळवलं की, विमान वेगाने खाली जातं आहे. मला पाणी दिसतंय. घरंही दिसतायंत. थोड्या वेळाने त्या म्हणाल्या, 'ओ माय गॉड, आम्ही खूपच खाली आलोय.' इतक्यात जोरात आवाज ऐकू आला आणि अमेरिकी ऑपरेशन सेंटरशी होणारा त्यांचा संपर्क तुटला."

"बरोब्बर आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी एए-11 हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरमधील 93 ते 99 या मजल्यांदरम्यान आदळलं. विमानातील सुमारे दहा हजार गॅलन जेट इंधन या मजल्यांवरच्या फ्रेड आल्गर व मार्श अँड मॅग्लेनेन या कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये पसरलं."

चहूबाजूला आगडोंब

त्या वेळी न्यू यॉर्क अग्निशमन दलाचे प्रमुख जोसेफ फायफर जवळ उभे होते. कालांतराने 'द ओन्ली प्लेन इन द स्काय'चे लेखक गॅरेट एम. ग्राफ यांना फायफर यांनी सांगितलं की, "मॅनहॅटनमध्ये उंच इमारतींमुळे विमानांचा आवाज ऐकू येत नाही. पण हे विमान नॉर्थ टॉवरला धडकलं तेव्हा एक मोठा स्फोट झाला. आम्ही सगळे वर पाहायला लागलो. विमान टॉवरला धडकल्याचं पाहून आम्हाला धक्काच बसला."

त्या वेळी न्यू यॉर्क पोलीस खात्यामध्ये काम करणारे सार्जन्ट माइक मॅकगवर्न यांनाही स्फोटाचा आवाज ऐकू आला.

त्यांनी रेडिओवर संदेश पाठवला, "आत्ताच एक 767 विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरला धडकलं आहे."

पोलीस प्रमुख इसपोसिटो यांनी हा संदेश ऐकल्यावर सार्जंट मॅकगवर्न यांना विचारलं, "ते 767 विमान असल्याचं तुम्हाला कसं कळलं?"

मॅकगवर्न म्हणाले, "मी आधी वैमानिक म्हणून काम केलेलं आहे."

एक्याऐंशीव्या मजल्यावर बसलेले बँक ऑफ अमेरिकेचे अधिकारी जीन पॉटर यांना इतक्या जोरात धक्का बसला की ते खुर्चीवरून खाली पडले. "सगळी इमारत भयंकर हलायला लागली आणि चहूकडे धूर पसरला होता," असं त्यांनी नंतर सांगितलं.

नव्वदाव्या मजल्यावरील पास कन्सल्टिंग ग्रुपमधील सल्लागार रिचर्ड एकन यांनी सांगितलं की, "मी डाव्या बाजूला पाहिलं, तर एक आशियाई माणूस माझ्या दिशेने धावत येत असल्याचं मला दिसलं. त्याला तळून काढलं असावं, असं वाटत होतं. त्याचे हात पसरलेले होते आणि त्याची कातडी सोलून निघाली होती. 'हेल्प मी, हेल्प मी' असं म्हणत तो माझ्या पायांशी पडला. तिथेच तो मरून गेला. माझा शर्ट रक्ताने ओथंबून गेल्याचं माझ्या लक्षात आलं."

दुसरं विमानही धडकलं

यानंतर 17 मिनिटं गेली, आणि नऊ वाजून तीन मिनिटांनी आणखी एक विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या साउथ टॉवरवर धडकलं. एक तास बेचाळीस मिनिटांमध्ये 110 मजल्यांच्या या दोन्ही इमारती भुईसपाट झाल्या.

आणखी एका विमानाने पॅन्टेगॉनच्या पश्चिमेकडील बाजूवर हल्ला केला. यामध्ये तिथल्या इमारतीचा एक भाग पडला.

युनायटेड एअरलाइन्सच्या फ्लाइट नंबर 93 चंही अपहरण करायचा प्रयत्न झाला, पण विमानातील प्रवाशांनी हा प्रयत्न हाणून पाडला. दहा वाजून तीन मिनिटांनी या विमानाचा पेन्सिल्वानियामध्ये अपघात झाला आणि त्यातले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले.

अंतराळातूनही धूर दिसत होता

त्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश फ्लोरिडात होते. त्यांना या घटनांची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी तत्काळ राजधानी वॉशिंग्टनमध्ये जायची इच्छा व्यक्त केली.

त्या वेळी व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित त्यांच्या सुरक्षाविषयक सल्लागार कोंडालिसा राइस यांनी बुश यांना आहेत तिथेच थांबण्याचा सल्ला दिला.

त्या वेळी अमेरिकेचे एक अंतराळवीर फ्रँक कुलबर्टसन हे अंतराळात होते. 11 सप्टेंबरला त्यांच्या देशात काय घडलंय, याची माहिती त्यांना नव्हती. त्यांनी जमिनीवर फ्लाइट सार्जंट स्टीव्ह हार्ट यांना संपर्क करून खाली सगळं ठीक आहे का असं विचारलं.

हार्ट म्हणाले, "पृथ्वीसाठी हा दिवस चांगला नाहीये."

त्या वेळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक कॅनडाच्या वरून जात होतं. कालांतराने कमांडर फ्रँक कुलबर्टन यांनी लिहिलं, "थोड्या वेळाने मी न्यू यॉर्क शहराच्या 400 किलोमीटर वरून जात असताना मी पाहिलं की, खालून काळा धूर वर येत होता. मी कॅमेरा झूम करून पाहिलं, तर मॅनहॅटनचा सगळा परिसर धुराने भरून गेलेला होता. माझ्या डोळ्यांसमोरच दुसरा टॉवर भुईसपाट झाला. माझ्या देशावर हल्ला होताना पाहणं खूपच भीतीदायक होतं."

"मी दुसऱ्या वेळी अमेरिकेच्या वरून जात होतो, तेव्हा मला अमेरिकेच्या हवाई हद्दीमध्ये शांतता पसरल्याचं दिसलं. सर्व विमानं जमिनीवर उतरवण्यात आली होती. एका विमानाचा अपवाद वगळता दुसरं कोणतंच विमान आकाशात नव्हतं."

ते एक विमान 'एअरफोर्स वन'चं होतं. त्यात अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बुश बसलेले होते. सल्लागारांचा सल्ला दुर्लक्षून ते वॉशिंग्टन डीसीच्या दिशेने निघाले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)