You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पुण्यातल्या कोयता हल्ल्यावर राज ठाकरे म्हणतात, 'लेशपालचं कौतुक पण बघ्यांचं काय?'
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, पुणे
पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या पेरुगेटजवळ 27 जून रोजी भरदिवसा एक धक्कादायक घटना घडली. 21 वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधांमधून 20 वर्षीय तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. हे दोघंही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.
सदाशिव पेठेत काय झालं?
पीडित तरुणी ही पुण्यातील रहिवासी असून ती कर्वेनगर भागात राहते. ती कॉलेजमध्ये जात असताना शंतनू जाधव (21 वर्षं) याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे प्रेमसंबंध होते. पण शंतनू तिला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्यामुळे तिने त्याच्याशी संपर्क ठेवला नव्हता. या गोष्टीचा राग मनात धरुन शंतनूने तिला कोयत्याने मारहाण करुन जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला.
“मी कॉलेजला जात होते. तर तो मला दोन मिनिट बोल बोल असं म्हणत होता. पण मी थांबले नाही. त्यानंतर त्याने कोयत्याने वार केले. तो माझ्यामागे धावायला लागला. मग लोकांनी त्याला पकडलं. मारहाण केली. त्यांच्या तावडीतून सुटल्यावरही त्याने माझ्यावर वार केले. आम्ही काॅलेजमध्ये फ्रेंड्स होतो. पण मी त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं,” अशी माहिती पिडीत तरुणीने माध्यमांशी बोलताना दिली.
तिने पुढे सांगितलं की, “तो माझा मित्र होता. मी त्याला नाही म्हटलं म्हणून तो मला मारायची धमकी देत होता. तो कॉलेजजवळ येऊन फोन करायचा मला मारहाण करायचा. त्याला नाही म्हटलं तर पाठलाग करायचा. त्याची तक्रार त्याच्या घरच्यांकडे पण केली होती. घरच्यांना सांगितलं म्हणून त्याने आज माझ्यावर वार केला. मला जखम झाली आहे. डोक्यावर पण टाके पडले आहेत.”
पिडीत तरुणीच्या आईने सुद्धा या घटनेवर भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की शंतनू हा बऱ्याच दिवसांपासून तिला त्रास देत होता. त्याच्या घरच्यांनाही याबद्दल माहिती देण्यात आली होती.
“त्याने तिला फोनकरुन धमकीही दिली. तेव्हा मी त्याला सांगितलं की, तिला वारंवार धमकी द्यायची नाही. नाहीतर तुझी तक्रार करावी लागेल. त्याला या गोष्टीचा राग आला. त्याने तिचा पाठलाग केला. मी तिला आज कॉलेजमध्ये सोडून गेले. हा कुठून आला माहिती नाही. त्याने तिच्या मित्रावरही वार केले. आज तो होता म्हणून माझी मुलगी वाचली. नाहीतर काय झालं असतं माहिती नाही,” असं पिडीतेच्या आईने सांगितलं.
कोयता हल्ल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे.
ते म्हणतात, “काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं. दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.”
‘तिला रक्तबंबाळ अवस्थेत बघून एका दुकानदाराने तर शटर बंद केलं ’
सदाशिव पेठेतला हा प्रकार लेशपाल जवळगे या तरुणाने प्रत्यक्ष पाहिला. शंतनू त्या तरुणीकडे कोयता घेऊन मारायला धावून जात असताना लेशपाल तिच्या मदतीलाही धावला.
“मी सकाळी माझ्या अभ्यासिकेत जात होतो. मला आवाज आला. तो मुलगा तिच्यावर वार करत होता. तो तिच्या खांद्यावर लागला. ती ओरडत पळत होती. तो कोयता घेऊन तिच्यामागे धावत होता. लोक कोण जवळ आले तर त्यांच्यावरही तो कोयता उगारत होता.
मी त्याला पकडण्यासाठी त्याच्यामागे पळायला लागलो. त्या मुलीने बचावासाठी एका दुकानात शिरण्याचा प्रयत्न केला, तर त्याने शटर खाली घेतलं. तिला दुकानात येऊ दिलं नाही. तर ती घाबरुन दारात बसली. नंतर मी त्याला मागून धरलं. मग सगळे लोक आले. लोकांनी त्याला चोपही दिला,” असं लेशपालने सांगितलं.
क्लासेस, महाविद्यालयांमध्ये जाऊन जागृती करणार- पुणे पोलीस
या घटनेची माहिती देताना पुणे पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी सांगितलं की, “ती तरुणी पुण्यात एका इंस्टीट्यूटमध्ये शिक्षण घेत होती. तिची आरोपीसोबत ओळख झाली होती. तिच्या सांगण्यानुसार आरोपी तिला वारंवार शिवीगाळ करायचा.
त्यामुळे तिने त्याच्यासोबतचे संबंध बाजूला सारले. मनात राग धरुन त्याने हल्ला केला. मुलगी सुरक्षित आहे. तिच्यावर प्रथमोपचार झाले आहेत. कलम 307 खाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.”
दर्शना पवार हत्याकांडानंतर लगेचंच अशी घटना झाल्याने एकच खळबळ माजली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून कोणते पावलं उचलले जातील यावर उत्तर देताना संदीप सिंह गिल यांनी सांगितलं की, पोलीस प्रशासन सजग तर आहेच पण त्यासोबतीला जागृती निर्माण करण्याचा प्रयत्नही आम्ही करु.
“शाळा, कॉलेजेस, क्लासेसमध्ये जाऊन आम्ही समुपदेशन आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा घटना फक्त मुलींसाठीच घातक नाहीत तर मुलांच्या दृष्टीनेही विनाशकारी आहेत. रागातल्या एका पावलामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य बिघडू शकतं.
विद्यार्थांसाठी हा संदेश आहे की असे गुन्हेगारी प्रकार करु नयेत. यामुळे भविष्य खराब होतं. एकदा एफआयआर दाखल झाली की, गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला की भविष्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या अभ्यासावर लक्ष द्यावं. करिअर फोकस करावा. दुसऱ्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये,” असं पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी बीबीसी मराठी सोबत बोलताना सांगितलं.