पुरुलियामध्ये असं काय घडलंय, ज्याची भाजप पालघर मॉब लिंचिंगशी तुलना करतेय?

फोटो स्रोत, SANJAY DAS
पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यात महाराष्ट्रातील पालघरसारखी घटना घडणार होती.
याठिकाणी मकर संक्रांतीच्या सोहळ्यासाठी गंगासागरला जाणाऱ्या तीन साधूंना मुलं अपहरण करणाऱ्या टोळीतील चोर असल्याच्या संशयावरून स्थानिकांनी मारहाण केली आणि त्यांचे कपडे फाडले गेले.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्यांना लोकांपासून वाचवलं. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आतापर्यंत या प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना 11 जानेवारीची आहे. पण शुक्रवारी (12 जानेवारी) सायंकाळी घटनेचा व्हिडिओ समोर आला.
काही लोकांनी या साधूंचे कपडे फाडले आणि त्यांना मारहाण करत असल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हीडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
भाजप वि. तृणमूल... राजकारण तापलं
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपनं राज्यातील ममता बॅनर्जी यांच्या सरकारला लक्ष्य केलं आहे.
तर टीएमसी नेते आणि मंत्री शशी पंजा म्हाले की, "गावकऱ्यांनी संशय आल्यानं साधूंना मारहाण केली होती. या प्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. पण भाजप या मुद्यावरून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे."
या प्रकरणी कोणीही पोलिसांत तक्रार दिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या साधूंनी तीन अल्पवयीन मुलींना रस्ता विचारला होता. पण भाषा समजली नसल्यानं त्या मुली ओरडत त्या ठिकाणाहून पळून गेल्या.
त्यानंतर स्थानिकांनी त्या साधूंना घेरलं आणि मारहाण करू लागले. काही वेळानं पोलिसांचं पथक त्याठिकाणी पोहोचलं आणि साधुंना त्या संतप्त जमावापासून वाचवून कासिपूर पोलिस ठाण्यात नेलं.
त्यानंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात त्यांची प्राथमिक तपासणी आणि चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडं असलेली कागदपत्रं योग्य असल्याचं समोर आलं.
पोलिस काय म्हणाले?
पुरुलियाचे पोलिस अधीक्षक अभिजित बॅनर्जी म्हणाले की, या प्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे.
आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असल्याचं ते म्हणाले. तसंच इतर आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी केली जात असल्याचंही ते म्हणाले.
एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "गंगासागरला जाणारे साधू रस्ता चुकले होते. त्यांनी एका ठिकाणी थांबून तीन मुलींना रस्ता विचारला. भाषा समजली नाही म्हणून मुली साधूंना पाहून घाबरल्या आणि ओरडत तिथून निघून गेल्या.
"त्यामुळं त्या मुलींबरोबर छेडछाड झाली असावी असं स्थानिकांना वाटलं. तसंच हे लोक मुलं चोरणाऱ्या टोळीतील असल्याचा संशयही आला. पोलिसांनी त्या तीन मुलींच्या आई वडिलांबरोबरही चर्चा केली. पण त्यांनी साधूंच्या विरोधात तक्रार केली नाही."

फोटो स्रोत, SANJAY DAS
पोलिसांनी नंतर त्या साधूंना सुरक्षितपणे गंगासागरच्या दिशेनं रवाना केल्याचं सांगितलं.
या घटनेचा कोणत्याही धार्मिक मुद्द्याशी काहीही संबंध नसून. या माध्यमातून कोणीही चिथावणी देऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांच्या वतीनं देण्यात आला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
भाजपचे म्हणणे काय?
प्रदेश भाजपनं एका ट्वीटमध्ये या घटनेनंतर ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल करत म्हटलं की, मुख्यमंत्र्यांना या घटनेनंतर लाज वाटायला हवी. राज्यात हिंदू साधुंबरोबर घडलेली ही घटना लज्जास्पद आहे.
दुसरीकडं पक्षाचे आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली.
एका ट्वीटमध्ये ते म्हणाले की, "पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये पालघरसारखा लिंचिंगचा प्रकार घडला. बंगालमध्ये हिंदू असणं गुन्हा आहे का? साधू मकर संक्रांतीच्या उत्सवासाठी गंगासागरला जात होते. आरोपींनी त्यांचे कपडे फाडले आणि त्यांना मारहाण केली."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"मारहाण करणारे सत्ताधारी तृणमूल कांग्रेसशी संलग्न आहेत. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये शाहजहां शेख यांसारख्या दहशतवाद्यांना संरक्षण दिलं जात आहे, पण साधुंना मारहाण केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये हिंदुंबरोबर अत्याचार केले जात आहेत," असा आरोपही त्यांनी केला.

फोटो स्रोत, ANI
पालघरच्या घटनेशी तुलना
महाराष्ट्रच्या पालघरमधील गडचिंचले गावात 16 एप्रिल 2020 ला दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची 500 पेक्षा अधिक लोकांनी मारहाण करून हत्या केली होती. त्यानंतर 21 एप्रिल 2020 ला हे प्रकरण सीआयडीकडं सोपवण्यात आलं.
ते साधू मुलं चोरणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या करण्यात आली होती. या टोळीतील सदस्य साधू, डॉक्टर किंवा पोलिसांच्या वेशात मुलं चोरी करायचे अशी अफवा पसरलेली होती.

फोटो स्रोत, Getty Images
तीन जण कारमध्ये सूरतला एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना ही घटना घडली होती. कासा पोलिस ठाण्यात पालघरमध्ये झालेल्या या घटनेप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या घटनेनंतर मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर राज्य सरकारनं कासा पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं होतं. तसंच सरकारनं 35 पेक्षा जास्त कॉन्स्टेबल आणि पोलिस कर्मचाऱ्यांची बदलीही केली होती.
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








