'...आणि मी OnlyFansवर माझे अश्लील फोटो विकायला सुरुवात केली'

- Author, लोरा जोन्स
- Role, व्यापार प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
"मला स्वतःला नग्न व्हायची इच्छा बिलकुल नव्हती. मला स्वतःचे असे फोटो शेअर करायला आवडतात, असं मुळीच नाही. पण मला कोणत्याही परिस्थितीत पैसे मिळवणं गरजेचं होतं," असं मार्क सांगत होता...
एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कला सादर करणाऱ्या 32 वर्षीय मार्कला कोरोनामुळे आपली नोकरी गमावावी लागली.
मार्च 2020 मध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार सुरू झाला आणि सर्वत्र लॉकडाऊनचं सत्र सुरू झालं.
याच कालावधीत मार्कने त्याची नोकरी गमावली. आता काही महिन्यांपासून मार्क सोशल मीडियावर आपली अश्लील छायाचित्रं टाकून पैसे कमावत आहे.
"नोकरी गमावल्यानंतर मी मला दिसलेल्या प्रत्येक ठिकाणी अर्ज केला. सुपरमार्केटमध्ये नोकरी शोधली. नोकरीविषयक वेबसाईटवरसुद्धा अर्ज केले," मार्क सांगतो.
नंतर एका मित्राच्या सांगण्यावरून मार्कला 'ओन्लीफॅन्स' (OnlyFans) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविषयी समजलं.
या पेजचे फॉलोवर सबस्क्रिप्शन विकत घेऊ शकतात. सबस्क्रिप्शन घेतलेल्या लोकांना क्रिएटरचे फोटो, व्हीडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीम पाहता येऊ शकतात.
सबस्क्रायबर्सनी फॉलो केल्यानंतर त्यांनी भरलेल्या पैशातील 20 टक्के रक्कम कंपनी घेते. तर उर्वरित रक्कम 'क्रिएटरटला देण्यात येते.

फोटो स्रोत, MEGAN BARTON-HANSON
फक्त नग्न फोटो विकणं हा त्यांचा उद्देश नाही. पण बहुतांश लोक इथं याच गोष्टी करताना दिसतात.
मार्कने आपल्या खात्यात नग्नतेचा पुरस्कार करत नसल्याचं लिहिलं असलं तरी त्याच्याकडे याच गोष्टींची मागणी होते.
या प्लॅटफॉर्मचा वापर करून मार्कने गेल्या चार महिन्यात 1500 युरो इतकी रक्कम कमावली आहे. म्हणजेच जवळपास 1 लाख 28 हजार 500 रुपये.
यादरम्यान त्याने अश्लील मजकूर इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला.
मार्क सांगतो, "ओन्लीफॅन्सने माझं भाडं दिलं. जेवणाचे पैसे दिले. कारसाठी लागणारं पेट्रोल मला या रकमेतून मिळालं. माझ्या दैनंदिन गरजा मला या पैशातून भागवता आल्या."
पण यात दुसऱ्या बाजूला एक नकारात्मकतासुद्धा असल्याचं मार्क सांगतो.
सुरुवातीला आपलं पेज तयार करत असताना ऑनलाईन असलेल्या मित्रांकडून अनेक वेगवेगळे मेसेज येत असल्याचा अनुभव मार्कने घेतला.
मी माझी अब्रू विकत आहे, असं ते म्हणायचे. मी प्रत्येक व्यक्तीसोबत सेक्स करतो, त्याचे व्हीडिओ पोस्ट करतो, असं त्यांना वाटायचं. पण माझ्या पेजवर फक्त तेवढाच मजकूर नाही, असं मार्क सांगतो.
आपले उत्तेजक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला मार्क कधी कधी नकारही द्यायचा. नव्या खातेदारांकडून आपल्याला सक्तीने वागवलं जाईल, अशी भीतीही त्याला होती.
सध्याचा तरूण वर्ग सोशल मीडियावर सर्व काही शेअर करत आहे. फक्त एक पाऊल पुढे टाकायचं आणि तुम्ही पैसे कमावू लागता. सध्याच्या काळात नोकरी शोधणं जिकिरीचं बनलेलं असल्यामुळे तुम्हाला हा मार्ग सोपा वाटू शकतो, असं तो म्हणतो.
स्कॉटलंडमध्ये राहणारी 22 वर्षीय रिबेका(बदललेलं नाव)सुद्धा सध्या हेच करत आहे.
नोकरी गमावून हे प्रकार करणारा माझ्या मित्रांमध्ये मी एकटीच नाही, असं ती सांगते.
रिबेकाने आपली नोकरी एप्रिल महिन्यात गमावली होती. त्यानंतर ती ओनलीफॅन्सकडे वळाली.
गेल्या काही दिवसांत तिने आपले नग्न फोटो लोकांना विकले आहेत. नोकरी गमावल्यानंतर पैसे कमावण्यासाठी हा निर्णय घेणं भाग होतं, असं ती सांगते.
आई वडील घरी नसताना ती अर्धनग्न अवस्थेतील फोटो घरीच काढते.
आपल्या सबस्क्रायबर्सना हे फोटो विकून तिने शेकडो पाऊंड कमावले आहेत. तिचं सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी खातेदाराला दर महिन्याला साडेपाच युरो (जवळपास 475 रुपये) इतके पैसे द्यावे लागतात.
'हे धोकादायक ठरू शकतं'
रिबेका ऑनलाईन असण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. ती योग्य पद्धतीने याचं नियोजन करते.
"हा पैसे कमावण्याचा एक उत्तम मार्ग आहे, पण यामध्ये अनेक धोकेही आहेत," असं ती सांगते.
रिबेकाच्या मते, तुम्हाला याठिकाणी अतिशय खुलून वागावं लागतं. हे भावनात्मकदृष्ट्या कठीण काम आहे. हे धोकादायकही ठरू शकतं
ग्रेटर मँचेस्टरमध्ये राहणारी लेक्सी(बदललेलं नाव)सुद्धा ओनलीफॅन्सवर आहे.
ती सांगते, यात पैसे मिळत असले तरी ते कमावण्यासाठी खूपच जास्त श्रम करावे लागतात. फोटो काढणं, तयार होणं, सोशल मीडियावर आपली जाहीरातबाजी, खातेदार लोकांच्या विनंतीनुसार प्रतिसाद देणं या गोष्टी करत असताना खूप वेळ खर्ची घालावा लागतो.
36 वर्षीय लेक्सी एक पोल डान्सर आहे. तिचं काम बंद पडल्यानंतर ती ओनलीफॅन्स प्लॅटफॉर्मवर आली. पहिल्या महिन्यात तिने 1 हजार युरो (जवळपास 85 हजार 500) कमावले.
हे काम म्हणजे रोजंदारी करण्यासारखं आहे. इथं तुम्हाला कामाचं कमिशम मिळतं. काम केलं नाही तर तुम्हाला पैसेही मिळणार नाही.
सध्याच्या काळात हे प्लॅटफॉर्म दुधारी तलवारीप्रमाणे आहेत, असं तिचं मत आहे.
इथंसुद्धा जास्त लोक येऊ लागले आहेत. त्यामुळे ते स्वस्तातला मजकूर उपलब्ध करून देतात. आता इथल्या व्यवहारांतून फारशी मिळकत होत नाही. मजेसाठी या साईटवर तुम्ही अकाऊंट उघडणार असाल, तर असं करू नका. बऱ्याच लोकांना स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी या साईट्सची मदत होत आहे, असं ती सांगते.
शिवाय तिच्या मते, या प्लॅटफॉर्मवर अकाऊंट उघडण्याआधी लोकांनी काळजीपूर्वक विचार करावा. तुमचा मजकूर बनवत असताना तुमच्या मर्यादा तुम्हीच ठरवल्या पाहिजेत. तुम्ही बनवलेला मजकूर एकदा बाहेर पडला की त्यावर तुमचं नियंत्रण नसतं.
शिवाय आपल्या सबस्क्रायबरकडून मानसिक त्रास मिळण्याची शक्यता असते.
गोपनीयता हीच मार्क, रिबेका आणि लेक्सी या सर्वांसाठी महत्त्वाची बाब आहे. अशा ठिकाणी तुमची ओळख लपवून ठेवणं कठीण आहे. तुमचा मजकूर चोरीला जाऊ शकतो.
इथं तुम्ही टाकलेले फोटो किंवा व्हीडिओ सहजपणे कॉपी करून इतर ठिकाणी शेअर करता येतात.
याचा मजकूर बनवणाऱ्याच्या कमाईवर परिणाम तर होतोच, शिवाय बाहेरच्या जगात आपले नातेवाईक, मित्र किंवा कार्यालयातील सहकाऱ्यांसमोर आपली ओळख जगजाहीर होते.
या वर्षाच्या सुरुवातीला ओन्लीफॅन्सला आपल्या खातेदारांचा मजकूर बाहेर लिक होत असल्याचं आढळून आलं होतं. प्लॅटफॉर्मच्या गोपनीयतेच्या नियमांचं हे उल्लंघन आहे.
शिवाय, या प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलं अवैध खातं तयार करून स्वतःचा उत्तेजक मजकूर विकू शकत असल्याचं बीबीसीने केलेल्या एका तपासणीत आढळून आलं होतं.
त्यावेळी अशा खातेदारांचं अकाऊंट तातडीने बंद करण्यात येतं, असं स्पष्टीकरण ओनलीफॅन्सने दिलं होतं.
सध्या अनेकजण सोशल मीडियावर ओन्लीफॅन्ससारख्या प्लॅटफॉर्मवर खातं उघडत आहेत.
मार्च ते जुलै महिन्यात युकेमधील ओनलीफॅन्सवर मजकूर तयार करणाऱ्या खातेदारांची संख्या 42 टक्क्यांनी वाढून 95 हजारांवर गेली आहे.
युकेतलंच आणखी एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'अॅडमायरमी' (AdmireMe)च्या खातेदारांमध्येही लॉकडाऊननंतर घसघशीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ लिसेस्टरमध्ये क्रिमिनोलॉजीच्या प्राध्यापिका टीला सँडर्स यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
नव्या युझर्सचा धोका कमी करण्यासाठी या प्लॅटफॉर्मनी स्वतःमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. सबस्क्रायबर्सकडून येणारे मॅसेज रोखणं, आपलं खातं पूर्णपणे डिलीट करण्याची सुविधा मिळायला हवी, असं त्या म्हणतात.
खातेदारांच्या सुरक्षेसाठी यामध्ये तत्काळ सुधारणा करणं गरजेचं असल्याचं त्यांना वाटतं.
येत्या काळात युकेमध्ये आर्थिक मंदी येण्याची शक्यता असल्याने या प्लॅटफॉर्मवरील खातेदारांची संख्या वाढत जाईल. ऑनलाईन शरीरविक्रय पूर्वीपेक्षा जास्त वाढला आहे, असं त्यांना वाटतं.
ओन्लीफॅन्सच्या प्रवक्त्यांशीही बीबीसीने संवाद साधला.
बेकायदेशीर पायरसीविरुद्ध आपण लढत असून ओन्लीफॅन्स आपल्या खातेदारांचा मजकूर सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
प्लॅटफॉर्मवरून लिक झालेला मजकूर शोधण्यासाठी व तो डिलीट करण्यासाठी ओन्लीफॅन्सची एक टीम सातत्याने काम करते. चोरी झालेल्या मजकुरापैकी 75 टक्के मजकूर डिलीट करण्यात कंपनीला यश मिळालं आहे, असं त्यांनी सांगितलं.
खातं उघडताना सर्व अटी व शर्थी लोकांना सांगितल्या जातात. हा एक प्रौढ लोकांचा प्लॅटफॉर्म आहे, याची खातेदारांना कल्पना देण्यात येते, असं ते सांगतात.
या प्रकरणात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर देखरेख ठेवण्याची युकेच्या गृहखात्याचीही योजना आहे. ऑनलाईन मजकूर हाताळणीबाबत युके जगात सर्वात सुरक्षित ठिकाण असावं, असं सरकारचं धोरण आहे.
पण युके सरकारचा ऑनलाईन संरक्षण विधेयक कायदा 2022-23 पर्यंत लागू होणार नाही, असं लॉर्ड्स डेमोक्रसी अँड डिजिटल कमिटीच्या अध्यक्षांनी कळवलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








