जर्मन निवडणूक : अँगेला मर्केल चौथ्यांदा विजयी, उजव्या पक्षांची संसदेत एंट्री

अँगेला मर्केल

फोटो स्रोत, Sean Gallup/GETTYIMAGES

फोटो कॅप्शन, अँगेला मर्केल

जर्मनीमध्ये रविवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अँगेला मर्केल यांच्या सीडीयू/सीएसयू आघाडीच्या बाजूनं मतदारांनी कौल दिला आहे.

त्यामुळे अँगेला मर्केल सलग चौथ्यांदा जर्मनीच्या चान्सलरपदी विराजमान होणार आहेत. गेल्या 70 वर्षात त्यांच्या पक्षाला यंदा पहिल्यांदाच घटलेल्या जनाधाराला सामोरं जावं लागलं आहे.

दरम्यान जर्मन संसद म्हणजेच बुंडेस्टागमध्ये त्यांचा पक्ष अजूनही सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्या पक्षाला यंदा 33 टक्के मतं मिळाली आहेत.

या निवडणुकीत एएफडी या राष्ट्रवादी आणि उजव्या विचारांच्या पक्षाला तिसरं स्थान मिळालं आहे. सर्वांसाठी ती आश्चर्याची बाब ठरली आहे. एएफडीला 12.6 टक्के मतं मिळाली आहेत.

मर्केल सरकारमध्ये सहयोगी पक्ष असलेला सोशल डेमोक्रेटीक पक्ष एसपीडीला 20.5 टक्के मतं मिळाली आहेत. या पक्षानं विरोक्षी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे.

मर्केल यांची आघाडी डळमळीत

अँगेला मर्केल

फोटो स्रोत, Getty Images

मार्टिन शूल्ज यांचं नेतृत्व लाभलेली सोशल डेमोक्रेटिक पार्टीनं दुसऱ्या विश्वयुध्दानंतर पहिल्यांदाच सर्वात सुमार कामगिरी केली आहे.

हे निकाल म्हणजे मर्केल यांच्यासोबत असलेल्या आघाडीचा अंत असल्याचं शूल्ज म्हंटलं आहे.

एसपीडीनं आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मर्केल यांच्यासमोर आव्हान वाढलं आहे. त्यांना नविन आघाडी स्थापन करण्यासाठी नव्या पक्षांच्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

उजव्या पक्षाचा संसदेत प्रवेश

एएफडीला सर्मथन मिळत असलं तरी त्याला जर्मन नागरिकांचा विरोधही तेवढाच आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एएफडीला सर्मथन मिळत असलं तरी जर्मन नागरिकांचा विरोधही तेवढाच आहे.

उजव्या राष्ट्रवादी विचारांच्या एएफडी पक्षानं या निवडणूकीत भरीव कामगिरी केली आहे.

सिरीया आणि इतर भागातून आलेल्या स्थलांतरित आणि निर्वासितांविषयी मर्केल यांच्या धोरणास या पक्षानं विरोध केला होता.

पक्षाचे नेते फ्रांक पेटरी यांनी या निकालाचं स्वागत केलं आहे. जर्मनीत आलेला हा राजकीय भूकंप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एएफडी पक्षाला मत देणाऱ्या लोकांच्या चिंतेचं आणि काळजीचं कारण आपण समजून घेऊ. त्यांचा विश्वास पुन्हा मिळविण्यासाठी काम करू असं मर्केल यांनी सांगितलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)