नोवाक जोकोविच : दम्याचा त्रास असूनही 24 व्या ग्रँड स्लॅमपर्यंत तो असा पोहोचला

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचनं यूएस ओपन 2023 जिंकून टेनिसच्या पुरुष एकेरीत चोविसावं ग्रँड स्लॅम विजेतेपद साजरं केलं. याबरोबरच जोकोविचनं ऑस्ट्रेलियाची महान टेनिसपटू मार्गारेट कोर्टच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
रविवारी, 10 सप्टेंबरला रात्री न्यूयॉर्कमध्ये झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोकोविचनं रशियाच्या दानिल मेदवेदेव्हवर 6-3, 7-6 (7/5), 6-3 अशी मात केली. ही लढाई 3 तास 17 मिनिटं चालली.
यूएस ओपनमध्ये जोकोविचचं हे चौथं विजेतेपद आहे. 2023 मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियन ओपन आणि फ्रेंच ओपनही जिंकलं होतं.
2021 मध्ये याच स्पर्धेत मेदवेदेवने जोकोविचचा पराभव केला होता, त्याचा बदलाच जोकोविचनं घेतल्याची भावना चाहते व्यक्त करत आहेत. 2022 मध्ये कोव्हीडची लस न घेतल्याने जोकोविचने या स्पर्धेत भाग घेतला नव्हता.
पण 2023 मध्ये न्यूयॉर्कमध्ये परतल्यावर त्यानं विक्रमी विजय साजरा केला.
लहानपणापासूनचं स्वप्न आणि संघर्ष
"मी सात वर्षांचा लहानगा होतो, तेव्हा सर्बियातल्या माझ्या घरातच वेगवेगळ्या वस्तूंपासून विम्बल्डनची ट्रॉफी तयार करायचो आणि विचार करायचो, एक दिवस मी इथे येईन. इथे सहाव्यांदा या ट्रॉफीसह उभं राहणं, अवर्णनीय आहे."
जोकोविचनं 2021 सालचं विम्बल्डन जिंकल्यावर सांगितलेला हा किस्सा त्याला विजयाची एवढी भूक का आहे हे दाखवतो.
जोकोविचच्या वाटचालीत संघर्ष, आर्थिक चणचण, पायाभूत सुविधांची कमतरता हे सगळं ओघाने आलंच. जे आहे त्यातून जोकोव्हिचने खेळायला सुरुवात केली. वाटेत प्रामुख्याने खाचखळगेच होते. व्यावसायिक टेनिसपटू होण्यासाठी गुणवत्ता अर्थातच लागते. त्याहूनही कामगिरीत सातत्य लागतं. अशक्य असा फिटनेस अंगी असावा लागतो.
चुकातून शिकण्याची सवय बाणवावी लागते. चांगला गुरू आवश्यक असतो. टेनिससारखा खर्चिक खेळ खेळण्यासाठी गुणग्राहक दाते लागतात. जगभर फिरत तिथलं वातावरण समजून घेत खेळण्याची तयारी लागते. हे सगळं जोकोविचच्या बाजूने होतं असं नाही. त्याने एकेक करत सगळ्या आघाड्या बळकट केल्या.
जोकोविचला दम्याचा त्रास होता. त्याने त्यासाठी उपचार सुरू केले. खेळताना हा त्रास बळावू नये यासाठी तज्ज्ञांनी जे सांगितलं ते केलं. एवढं सगळं करून झाल्यावर जोकोविच जेव्हा व्यावसायिक टेनिसपटू म्हणून आंतरराष्ट्रीय पटलावर अवतरला तेव्हा रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे अवलिया ग्रँड स्लॅम जेतेपदांवर मांड ठोकून बसले होते.

एकाकडे होती सुखावणारी शैली, नजाकतभरं पदलालित्य, पोतडीतल्या नेमक्या फटक्याने प्रतिस्पर्ध्याला अवाक करण्याची ताकद. दुसरा एखाद्या मशीनसारखा प्रतिस्पर्ध्यांना चिरडून टाकायचा. प्रचंड ताकद, कुठूनही पुनरागमन करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आणि भात्यातल्या अस्त्रांवरची अचूक पकड. या दोन अवलियांना ऐन भरात असताना जोकोविचने आवाज दिला. तसं करणारा जोकोविच पहिला आणि एकमेव वगैरे नव्हता.
फेडरर-नदाल ऐन भरात असताना अनेक चांगले खेळाडू टक्कर देत होते. अनेकांनी सद्दी मोडण्याचा कसोशीने प्रयत्न केला. काहींकडे ऊर्जा होती, काहींकडे फटके होते, काहींकडे फिटनेस होता. काहींकडे हे सगळं होतं. पण फेडरर-नदाल या दोघात तिसरा होण्याचं कठीण काम जोकोव्हिचने केलं.
शिडशिडीत बांधा, टोकदार नाक, गुणी मुलासारखे केस चोपून बसवलेले. गमत्या स्वभाव. या गुणवैशिष्ट्यांचा हा कार्यकर्ता त्रिकुटाचा तिसरा खांब होऊन खोलवर जाईल असं अनेकांना वाटलं नाही.
जोकोविच विसावं ग्रँड स्लॅम जेतेपद स्वीकारल्यानंतर यासंदर्भात बोलला- "फेडरर नदाल यांनी मला सर्वोत्तमाचा ध्यास दिला. त्यांनी माझ्यातल्या खेळाडूचा कस लागेल याची दक्षता घेतली. खडतर आव्हानाला भिडून जिंकणं मोलाचं ही शिकवण दिली. ते दोघे दिग्गज आहेत. त्यांनी मला खेळायला, जिंकायला प्रेरणा दिली. त्यांच्या विक्रमाची बरोबरी करताना मला अतिशय आनंद आणि समाधान आहे".

फेडरर आणि नदाल हे दोन पहाड आणि समकालीन अनेक खेळाडूंना चीतपट करण्यासाठी जोकोविचने स्वत:ची जीवनशैली बदलून टाकली. त्याने आहारातून ग्लुटेन वजा केलं. ग्लुटेनची अलर्जी आहे हे लक्षात आल्यानंतर जोकोविचने ग्लुटेनचे सगळे पदार्थ त्यागले. ग्लुटेनचे पदार्थ शरीराला जे पुरवतात ते अन्य कोणते पदार्थ देतात याचा शोध घेऊन ते खायला सुरुवात केली. काही काळानंतर डेअरी उत्पादनंही सोडली. मग तर तो शुद्ध शाकाहारी झाला.
खेळातील चुका टिपून सुधारणा सांगतील, प्रतिस्पर्ध्यांच्या खेळातील उणेपण हेरतील, भौगोलिक गोष्टींचा अंदाज घेऊ शकतील अशी टीम तयार केली. दुखापतीच्या ससेमिऱ्यात अडकल्यानंतर लवकर पूर्वपदावर यायला मदत करतील असे फिजिओ, ट्रेनर गाठले. जिंकण्याच्या साधनेसाठी योग आणि ध्यानधारणा यांचा अंगीकार केला. मानसिकदृष्ट्या बळकट होण्यासाठी एका माजी टेनिसपटूला गाठलं.
या आणि तत्सम गोष्टी बाकी टेनिसपटूही करतात. पण जोकोविचने प्रत्यक्ष मॅचमध्ये जसा खेळतो तसं सरावात उतरवलं. सरावात तासनतास घाम गाळला. पाचव्या सेटपर्यंत जाणाऱ्या मुकाबल्यांसाठी शारीरिकदृष्ट्या फिट राहण्यासाठी जे आवश्यक ते केलं. करतच राहिला. फेडरर-नदाल-जोकोविचची सद्दी
फेडरर-नदाल या जोडगोळीत आगंतुक वाटणाऱ्या जोकोविचने याचं त्रिकुटात कधी रुपांतर केलं ते कळलंच नाही. फेडरर आणि नदाल दुखापतींमुळे थोडेसे बॅकफूटवर जात असताना जोकोविचने सर्वस्व पणाला लावलं. जोडगोळी सक्रिय झाल्यानंतरही जोकोविच बाजूला फेकला गेला नाही. बघता बघता फेडरर-नदाल-जोकोव्हिच अशी एक अदृश्य सद्दी तयार झाली.
2003 पासून काही फेडररच्या निवृत्तीपर्यंत ही सद्दी कायम राहिली. या सद्दीला अनेक धडका दिल्या जातात. सद्दी तुटणार असे काही वीर समोर येतात पण हे तिघं ग्रँड स्लॅम जेतेपदांवरची हुकूमत जराही सैल करत नाहीत.
पण जोकोविच ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या यादीत फेडरर आणि नदाल यांच्या बाजूला जाऊन बसला आहे. अप्राप्य वाटणाऱ्या मंडळींच्या पंक्तीला बसणं किती विलक्षण असेल! एरव्ही चिवटपणा हा फार ऐतिहासिक गुण मानला जात नाही. जोकोव्हिचच्या खेळाने, पवित्र्याने चिवटपणाला सद्गुणांच्या बाराखडीत नेलं आहे.

फोटो स्रोत, Shi Tang
कोव्हिडची साथ आली, तेव्हा जोकोविचलाही कोरोना विषाणूची लागण झाली. त्याने विषाणूलाही सराईतपणे हरवलं.
मोठं झाल्यावर माणसं मखरातल्यासारखं परीटघडीचं बोलतात पण जोकोविचचा वावर याला अपवाद असतो. पावसाच्या ब्रेकदरम्यान तो बॉलबॉयच्या डोक्यावर छत्री धरतो. त्याला एनर्जी ड्रिंक देतो. अनेक खेळाडूंच्या उत्तम नकला करतो. विम्बल्डन जिंकल्यावर गवत खातो. आजही जेतेपदानंतर बोलत असताना, एक चाहती 'लव्ह यू जोको' चीत्कारली तेव्हा थांबून 'आय लव्ह यू टू' असं तिच्या दिशेने बघून बोलला.
मॅच जिंकल्यावर त्याच्या टीमला भेटला. त्यानंतर कोर्टवर परतत येत असताना एका युवा चाहत्याने सेल्फीसाठी फोन समोर केला. त्याला सेल्फी घेण्यासाठी जे करायचं असतं ते करता येईना. भांबावून गेला असावा. जोकोविचे फोन हातात घेतला, स्वत:च सेल्फी काढून दिला आणि थँक्यू म्हणून खाली उतरला. जोकोविचकडे गांभीर्य नाही, तो दुसऱ्यांचा आदर करत नाही यातून नावडणाऱ्यांचाही एक गट आहे.
फेडरर-नदाल पेक्षा जास्त जेतेपदं नावावर झाली आहेत, अकादमी आणि फाऊंडेशन आहे. निखर्वात संपत्ती आहे. जगभर चाहता वर्ग पसरला आहे. आज जरी निवृत्त झाला तरी हरकत नाही असं भरलेपण आहे. पण तो म्हणाला, जिंकण्याचा प्रवास सुरूच राहील. आम्ही थांबणाऱ्यांपैकी नाही. सद्दी शब्दाला रद्दीचा नाद आहे. पण या त्रिकुटाची सद्दी हवीहवीशी आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








