ऋषी सुनक भारतीय की पाकिस्तानी वंशाचे? असा आहे सुनक कुटुंबाच्या वंशावळीचा इतिहास

लिझ ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यावर ऋषी सुनक नवे पंतप्रधान बनले. आता नवं प्रशासन स्थिरस्थावर होतंय, तोपर्यंत सुनक यांच्या अल्पसंख्याक पार्श्वभूमीची चर्चा रंगलीय.
ऋषी सुनक हे आशियाई वंशाचे आणि हिंदू धर्माचे पहिले व्यक्ती आहेत, जे ब्रिटनच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच पंतप्रधानपदी विराजमान झालेत.
सुनक कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे देखील नेते आहेत. तसं तर वांशिक पार्श्वभूमी असलेले बरेच नेते ब्रिटनच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आहेत. मात्र, पंतप्रधानपदी पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे.
वर्ण, वंश, वसाहतवाद आणि ब्रिटीश साम्राज्यवादाला मागे सारत भरतीय वंशाच्या या माणसाने 10 डाउनिंग स्ट्रीटवर आपलं बस्तान कसं बसवलं यामागेही एक रंजक गोष्ट आहे.
सुनक यांची कौटुंबिक पार्श्वभूमी
ब्रिटनच्या दक्षिणेकडील साउथॅम्प्टन शहरात राहणाऱ्या यशवीर आणि उषा सुनक यांना 1980 सालात एक पुत्ररत्न झालं. त्याचं नाव ऋषी असं ठेवण्यात आलं. यशवीर आणि उषा दोघेही पंजाबी कुटुंबातून असले तरी स्थलांतरित होते. ते ब्रिटिशांची वसाहत असलेल्या पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते.
ऋषी सुनक यांच्या आईचा जन्म टांगानिका इथं झाला होता. आज हे शहर टांझानियाचा भाग आहे. तर सुनक यांचे वडील केनियाच्या वसाहतीत जन्मले आणि तिथंच लहानाचे मोठे झाले.
सुनक यांच्या आजोबांचा जन्म ब्रिटिश भारतातील पंजाब प्रांतात झाला होता. त्यानंतर 1930 च्या दशकात सुनक यांचं कुटुंब भारतातून पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झालं.

फोटो स्रोत, @RISHISUNAK
मात्र, आफ्रिकन देशांना स्वातंत्र्य मिळू लागल्यावर बरेच भारतीय स्थलांतरित ब्रिटन मध्ये येऊ लागले.
सुनक यांच्या आत्मचरित्रात म्हटल्याप्रमाणे, 1960 च्या दशकात ब्रिटन मध्ये येण्यासाठी त्यांची आजी श्रक्षा यांनी स्वतःचे लग्नातले दागिने विकले आणि त्याचमुळे ते ब्रिटनमध्ये येऊ शकले.
बरेच भारतीय ब्रिटिश भारतातून स्थलांतर करून आफ्रिकेत गेले आणि त्यानंतर त्यांनी ब्रिटनचा रस्ता धरला. पण असं होण्यामागे नेमकं कारण काय होतं?
भारतीय लोक आफ्रिकेत राहायला गेले, कारण...
एमिली ग्लेंकलर या जागतिक इतिहासाच्या शिक्षिका आहेत. त्या सांगतात, 19 व्या शतकाच्या सुरुवातीला औद्योगिकीकरण झपाट्याने वाढलं होतं. आणि याच सोबत ब्रिटिश साम्राज्याची वाढही झपाट्याने होत होती. याच काळात गुलामगिरीची प्रथा संपुष्टात आली असल्याने कामगारांची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवत होती.
त्या पुढे सांगतात, "ही पोकळी भरून काढली भारतीयांनी. भारतीय कामगार स्वस्त दरात उपलब्ध होऊ लागलं होतं. त्यांना वाढत्या अर्थव्यवस्थांमध्ये रेल्वेमार्ग उभारण्यासाठीची छोटी मोठी कंत्राटं मिळू लागली. मात्र वेळेत कर्ज फेडता न आल्यामुळे हे लोक करारांमध्ये अडकायचे."
पुढं काळ सरला, गुलामगिरी संपुष्टात आली आणि भारतीय लोक भारताच्या दिशेने परतू लागले. यानंतर ब्रिटिशांनी दक्षिण आशियाई लोकांना आर्थिक संधी आणि सामाजिक दर्जाचं आश्वासन देऊन पूर्व आफ्रिकेत येण्याचं निमंत्रण दिलं.
ग्लेंकलर सांगतात, ब्रिटिशांच्या या वसाहतींमध्ये अत्यंत श्रेणीबद्ध रचना होती. सर्वात वर गोरे इंग्रज आणि खालच्या स्तरात आफ्रिकन काळे लोक होते. जी मधली जागा होती ती दक्षिण आशियाई समुदायाने व्यापली.

फोटो स्रोत, @RISHISUNAK
या दक्षिण आशियाई समुदायाने ब्रिटिश आणि आफ्रिकन यांच्यात मध्यस्थ्याची भूमिका पार पाडली. आशियाई लोक व्यावसायिक आणि प्रशासकीय भूमिकेत दिसायचे.
ग्लेंकलर सांगतात, "या काळात बरेच भारतीय पूर्व आफ्रिकेत स्थलांतरित झाले. कारण वांशिक व्यवस्थेमुळे आफ्रिकन वसाहतींमध्ये ज्या संधी निर्माण झाल्या होत्या त्याचा अंदाज बऱ्याच भारतीयांना आला होता. ही संधी मिळवण्यासाठी भारतीयांनी आफ्रिका गाठलं."
पुढे आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांच्या हातात सत्ता-संपत्ती येऊ लागली. उदाहरण म्हणून बघायचं झालंच तर 1920 मध्ये युगांडामध्ये बऱ्याच भारतीयांच्या हाती जमिनीची मालकी होती. त्यामुळे आफ्रिकन लोक आणि आशियाई वंशाच्या लोकांमध्ये सत्तासंपत्तीमध्ये असमनतेची दरी वाढू लागली.
आफ्रिकन देशांना स्वातंत्र्य
1960 आणि 70 च्या दशकात ब्रिटिश साम्राज्याची वसाहतींवरील पकड सैल होत गेली. बऱ्याच आफ्रिकन देशांना स्वातंत्र्य मिळू लागलं. देशाच्या सर्वोच्च पदांवर कृष्णवर्णीय आफ्रिकन नेत्यांची वर्णी लागली.
अशात भारतीयांनी सुद्धा या आफ्रिकन वसाहतींमधून काढता पाय घेतला.
एवढंच नाही तर 1972 मध्ये युगांडाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष इदी अमीन यांनी आशियाई वंशाच्या (मुख्यतः भारतीय) सर्व लोकांना हद्दपार करण्याचं आवाहन केलं. आणि भारतीयांना युगांडा सोडण्यासाठी 90 दिवसांचा अवधी देण्यात आला.
अशाच स्थलांतरितांपैकी भक्ती कंसारा एक होती. ती 14 वर्षांची असताना तिच्या 15 जणांच्या कुटुंबासह ती युगांडा सोडून ब्रिटनमध्ये पळून आली.

फोटो स्रोत, Getty Images
त्या बीबीसीशी बोलताना सांगतात, "माझे वडील आणि भाऊ त्या दिवशी बोलत होते की, आपल्याला आता आपलं सामान बांधून युगांडा सोडून जावं लागणार आहे. आपण इथं जास्त काळ थांबू शकत नाही."
"मला एवढंच आठवतंय की, माझी आई या गोष्टीने नाराज झाली होती. पण मी काही नाराज वैगरे नव्हते, उलट मी आनंदी होते."
"आम्ही लंडनला जाणार आहोत याच विचारात मी होते. पुढं काय घडणार आहे काय नाही याची कोणालाच कल्पना नव्हती."
"त्यानंतर आम्हाला घेऊन जाण्यासाठी दोन गाड्या आल्या. आणि सोबत लष्करातले लोक सुद्धा होते. त्यांनी आम्हाला एअरपोर्टपर्यंत नेलं. हे सगळं बघून काहीतरी चुकीचं घडलंय याचा अंदाज मला आलाच होता. कारण आम्हाला नेण्यासाठी एखाद्या लष्कराच्या व्यक्तीने का यावं? "
भक्ती कंसारा आणि तिचं कुटुंब ब्रिटनमध्ये निर्वासित म्हणून दाखल झाले.
ब्रिटनमधलं आयुष्य...
रेहा बीबीसीसाठी रिपोर्टर म्हणून काम करते. तिने युगांडातून निर्वासित झालेल्या लोकांवर एक डॉक्युमेन्ट्री तयार केलीय. ती सांगते की, हे निर्वासित ब्रिटनमध्ये येऊन चांगल्या प्रकारे स्थायिक होऊ शकले कारण त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती.
त्यांच्याकडे कौशल्य होती. आणि त्यांनी या कौशल्याचा वापर करून अगदी खालपासून सुरुवात केल्याचं रेहा सांगते.
सुनक यांचे आजोबा टांगानिकामध्ये कर अधिकारी होते. ते ब्रिटनमध्ये आल्यावर त्यांना ब्रिटनच्या कर प्राधिकरण इनलँड रेव्हेन्यूमध्ये नोकरी मिळाली.
सुनक यांचे आई वडील दोघेही वैद्यक क्षेत्राशी निगडित आहे. त्यांचे वडील राष्ट्रीय आरोग्य सेवेत फॅमिली डॉक्टर म्हणून काम करत होते. तर त्यांची आई स्वतःची फार्मसी चालवते.
ब्रिटनमध्ये आल्यावर या समुदायाची भरभराट होऊ लागली होती. आशियातून ब्रिटनमध्ये स्थलांतरित झालेले इतर समुदाय आणि आफ्रिकेच्या मार्गाने ब्रिटनमध्ये येऊन स्थायिक झालेल्या समुदायांमध्ये अद्यापही बराच फरक आपल्याला आढळतो.
सध्याच्या काळातले तथाकथित डायरेक्ट फ्लाइट मायग्रंट्स म्हणजेच थेट विमान पकडून ब्रिटन गाठलेले स्थलांतरितांचा मार्ग सुनक यांच्या पूर्वजांच्या मार्गाहून भिन्न आहे.
सुनक यांचे पूर्वज आधी आफ्रिकेत होते आणि मग ते ब्रिटनमध्ये आले तर भारतातून ब्रिटनमध्ये येऊन स्थायिक झालेले डायरेक्ट फ्लाइट मायग्रंट्स हे भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यावर 1947 नंतर आले.

फोटो स्रोत, Getty Images
1947 च्या वेळेस जे स्थलांतरित ब्रिटनमध्ये आले, त्यातले बहुतांश लोक मुस्लीम होते आणि त्यांच्याकडे चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी लागणारी भाषिक किंवा व्यावसायिक कौशल्यं नव्हती.
ब्रिटनचं वर्तमानपत्र द गार्डियनने म्हटलंय की यूकेत एक हिंदू असण्याचे काही फायदे आहेत. स्थलांतरितांपैकी जेवढे लोक हिंदू आहेत त्यापैकी दोन तृतीयांश लोक व्यवस्थापकीय किंवा इतर व्यावसायिक (डॉक्टर-इंजिनिअर) अशी कामं करतात.
पहिले ब्रिटिश भारतीय पंतप्रधान
सुनक यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यापासून कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार त्यांच्या पक्षाचं पुरोगामीत्व दाखवून द्यायला लागलेत. या पक्षाचे बेंजामिन डिझरायली 1847 मध्ये पंतप्रधान बनले. ते पहिले ज्यू पंतप्रधान होते. त्यानंतर 100 वर्षांनी म्हणजेच 1979 मध्ये मार्गारेट थॅचर पंतप्रधान झाल्या, त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान. आणि आता जवळपास अर्ध शतक लोटल्यानंतर सुनक या एका दक्षिण आशियाई वंशाच्या व्यक्तीला पंतप्रधानपदी बसवण्यात आलंय.
आता फक्त सुनकचं नाही तर वर्तमान आणि माजी गृहमंत्री, सुएला ब्रेव्हरमन आणि प्रिती पटेल यांसारख्या अनेक आशियाई वंशाच्या नेत्यांची कॅबिनेट मध्ये वर्णी लागली आहे. या दोघीही भारतीय वंशाच्या असून त्यांचा जन्म ब्रिटनमध्ये झालाय. तर त्यांचे पालक पूर्व आफ्रिकन स्थलांतरित आहेत.
या चर्चेत आणखी एका गोष्टीची भर घालताना काही लोक दिसतात ते म्हणजे ब्रिटनमधील हुजूर पक्षात असलेले भारतीय वंशाचे लोक हे पूर्व आफ्रिकेतून आले आहेत, असं त्यांचे म्हणणं आहे. रेहा पुढे संगते की यातून हेच दिसून येतं की ज्या समाजात ते वाढले आहेत त्या व्यवस्थेतील वर्गाधिष्ठित विचारसरणीची पाळंमुळं किती खोलवर रूजली आहेत.
अर्थात ऋषी सुनक पंतप्रधान होणं ब्रिटनसाठी महत्त्वाचा क्षण आहे.
तरीही, ब्रिटिश भारतीयांमध्ये सुनक यांच्या पंतप्रधान होण्यावरून मतभेद आहेत. काही जण त्यांच्या सर्वोच्चपदी बसण्यावरून आनंदी आहेत तर काहींना वाटतं की ते पूर्व आफ्रिकेतून आलेत त्यामुळे ते भारतीयांचं प्रतिनिधित्व करत नाहीत.
रेहा म्हणतात, "हे माझ्याविरोधातही वापरलं गेलं आहे. काही भारतीय लोक, त्यातही हिंदुत्ववादी विचारांचे लोक मला म्हणतात की मी भारतीय नाहीये कारण माझं कुटुंब फाळणीपूर्व काळात आधी केनियात गेलं आणि नंतर युगांडामध्ये गेलं. तेव्हा भारत नावाचा देशच नव्हता तर मी भारतीय कशी असेन असं त्यांचं म्हणणं आहे."
"हे सतत ऐकावं लागतं, भले ते उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून येवो किंवा डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कुठलेच नाही. तुम्ही स्वतःला भारतीय वंशाचे म्हणू शकत नाही. पण मला माझी ओळख पक्की माहीत आहे. मी एकच वेळेस ब्रिटिश, भारतीय, आफ्रिकन आहे," रेहा म्हणतात.
"कोण कुठून कसं यूकेत आलं याचं विच्छेदन केलं तर त्याने दक्षिण आशियाई समुदायचं नुकसान आहे. काही लोकांना आनंद आहे की सुनक भारतीय वंशाचे आहेत. शेवटी ते पहिले गहुवर्णीय, पहिले हिंदू पंतप्रधान आहेच ब्रिटनच्या इतिहासातले पहिले."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








