नासाने आपलं यान एका लघुग्रहावर आदळवलं, काय आहे 'डार्ट' मोहीम?

नासानं नुकतंच त्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे आणि एक यान एका लघुग्रहावर आदळवलं आहे.

फोटो स्रोत, NASA/JHU-APL

    • Author, ऋजुता लुकतुके
    • Role, बीबीसी मराठी

अवकाशातला एका लघुग्रह किंवा धूमकेतू पृथ्वीवर आदळणार आहे.. पण शास्त्रज्ञ त्याआधीच तो उडवून लावला.. ही कहाणी तुम्ही डीप इम्पॅक्ट, आर्मागेडन किंवा अलीकडचा डोंट लुक अप अशा हॉलिवूडपटांमध्ये पाहिली असेल.

पण ही केवळ एक फँटसी राहणार नाही, तर लवकरच अशी क्षमता माणसाकडे येऊ शकते. नासानं नुकतंच त्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे आणि एक यान एका लघुग्रहावर आदळवलं आहे.

'डार्ट' या नावानं ओळखली जाणारी ही मोहीम काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे? हे जाणून घेऊया,

हा तो क्षण आहे जेव्हा नासाचं डार्ट हे प्रोब अर्थात अंतराळयान डायमॉर्फसवर आदळलं. ही टक्कर झाली आणि अमेरिकेच्या मेरिलँडमधल्या जॉन हॉपकिन्स प्रयोगशाळेत जमलेल्या संशोधकांनी एकच जल्लोष केला.

डार्ट म्हणजे डबल अॅस्टरॉईड रिडिरेक्शन टेस्ट. ही एक अशी चाचणी आहे, जी यशस्वी झाली, तर भविष्यात एखाद्या लघुग्रहाशी होणारी टक्कर माणसाला टाळता येऊ शकते.

एखादा लघुग्रह कधी पृथ्वीच्या कक्षेत शिरला आणि गुरुत्वाकर्षणाच्या जोरामुळे तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता निर्माण झाली, तर पृथ्वीला वाचवण्यासाठी तो लघुग्रह एक तर नष्ट करायचा किंवा त्याची दिशा बदलायची असे दोन पर्याय माणसासमोर आहेत. त्यासाठीच नासानं ही डार्ट मोहीम आखली होती.

अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगासाठी डायमॉर्फस लघुग्रहाची निवड करण्यात आली होती. हा लघुग्रह पृथ्वीपासून तो 11 दशलक्ष किलोमीटरवर असून तो केवळ 160 मीटर लांबीचा आहे आणि खरं तर तो डिडिमस या दुसऱ्या एका लघुग्रहाचा चंद्र आहे.

डायमॉर्फस काही पृथ्वीवर धडकण्याची शक्यता नव्हती. पण भविष्यात इतर लघुग्रह पृथ्वीवर आदळणं टाळता येऊ शकतं का हे पाहण्यासाठी डार्ट मोहीम आखण्यात आली होती.

फोटो स्रोत, NASA/JHU-APL

फोटो कॅप्शन, डायमॉर्फस काही पृथ्वीवर धडकण्याची शक्यता नव्हती. पण भविष्यात इतर लघुग्रह पृथ्वीवर आदळणं टाळता येऊ शकतं का हे पाहण्यासाठी डार्ट मोहीम आखण्यात आली होती.

डायमॉर्फस काही पृथ्वीवर धडकण्याची शक्यता नव्हती. पण भविष्यात इतर लघुग्रह पृथ्वीवर आदळणं टाळता येऊ शकतं का हे पाहण्यासाठी डार्ट मोहीम आखण्यात आली होती.

तर डार्ट अंतराळयान डायमॉर्फसच्या डोक्याच्या बाजूला ताशी 20,000 किलोमीटर वेगाने आदळलं. या धक्क्यामुळे या लघुग्रहाची कक्षा रोज काही मिनिटांनी बदलेल आणि त्याचा वेगही काहीसा कमी होईल अशी अपेक्षा आहे.

ती प्रक्रिया टकरीबरोबर सुरू झाली असून, प्रत्यक्ष परिणाम येणाऱ्या सहा ते सात आठवड्यात समजू शकेल. इटालियन क्युबीसॅट हा कृत्रिम उपग्रह डार्ट प्रोबच्या टकरीनंतर नेमकं काय होतं याचाही अभ्यास करणार आहे.

विशेष म्हणजे डार्ट प्रोब डायमॉरफसवर आदळलं त्याचे फोटो खुद्द प्रोबवरच्या कॅमेरानेच टिपले आणि ते सगळ्यांना लाईव्ह पाहता आले.

युरोपीयन स्पेस एजंसी

फोटो स्रोत, HERA/ESA

आतापर्यंत सगळ्या गोष्टी नासाने केलेल्या नियोजनाप्रमाणे झाल्या आहेत. त्यामुळे उत्साहित झालेल्या नासाच्या ग्रहविज्ञान शाखेच्या संचालक डॉ. लोरी ग्लेझ बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "मानवजातीने एका नवीन पर्वात पाऊल ठेवलं आहे. आपण आता आणखी सक्षम झालो आहोत. बाहेरच्या जगातून एखादा लघुग्रह किंवा कुठलीही विनाशकारी गोष्ट आपल्या दिशेनं येणार असेल तर त्यापासून आपलं संरक्षण आपण करू शकतो हेच खूप आनंददायी आहे."

डार्ट मोहीम किती महत्त्वाची?

असं म्हणतात की, साठ लाख वर्षांपूर्वी एक लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यामुळे पृथ्वीवर एक मोठा खड्डा पडला आणि त्यातच इथल्या डायनासोर्सचा नायनाट झाला.

1908 साली रशियाच्या तुंगुस्कामध्ये मोठा अशनी पृथ्वीवर आदळला होता आणि दोन हजार चौरस किलोमीटरवरचं जंगल नष्ट झालं होतं. 2013 सालीही रशियात कोसळलेल्या अशनीमुळे अनेक इमारतींचं नुकसान झालं होतं.

140 मीटर लांबीचा लघुग्रह आदळण्याची शक्यता 20,000 वर्षातून एकदाच आहे.

फोटो स्रोत, NASA/JHU-APL

अशा घटना घडण्याची शक्यता केवढी आहे? नासाचं एक संशोधन सांगतं की, 25 मीटर लांबीचा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता शंभर वर्षांतून एकदाच आहे.

140 मीटर लांबीचा लघुग्रह आदळण्याची शक्यता 20,000 वर्षातून एकदाच आहे. आणि 10,000 मीटर लांबीचा लघुग्रह आदळण्याची शक्यता तर 100 किंवा 200 दशलक्ष वर्षातून एकदाच आहे. या घटना इतक्या विरळ असतानाही नासाचा डार्ट प्रयोग इतका महत्त्वाचा का मानला जातोय?

याविषयी बोलताना अंतराळ विज्ञानाचे अभ्यासक अभय देशपांडे, "एखादा अशनी किंवा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता दहा लाख वर्षांमध्ये एखादी आहे हे खरंच आहे. पण, ती वेळ कधीही येऊ शकते. म्हणजे आज येऊ शकते, एखाद्या वर्षाने येऊ शकते, किंवा आणखी दहा लाख वर्षांनी येऊ शकते. पण, पृथ्वीच्या वातावरणात असे अनेक भटके लघुग्रह असू शकतात.

"आणि त्यांच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. आपल्या हातात इतकंच आहे की, या लघुग्रहांचा अभ्यास करायचा. ते कधी पृथ्वीच्या जवळून जाऊ शकतात याचा अंदाज बांधायचा आणि त्यापूर्वीच एकतर त्यांना नष्ट करायचं किंवा त्यांची दिशा बदलायची. त्यादृष्टीने नासाचं हे संशोधन आणि डार्ट मोहीम खूपच महत्त्वाची आहे," अभय देशपांडे सांगतात.

फक्त नासाच नाही तर युरोपियन अंतराळ संस्थाही अशाच प्रकारचं संशोधन करते आहे, जे भविष्यात माणूसच नाही, तर पृथ्वीवरच्या प्रत्येकाचा जीव वाचवू शकतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)