'सेक्सबाबत तुमचा दृष्टिकोन आशावादी असेल तर लैंगिक आयुष्य होईल सुखकर'

नातेसंबंध

फोटो स्रोत, Deepak Sethi

    • Author, डेव्हिड रॉब्सन,
    • Role, बीबीसी वर्कलाईफ.
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

सेक्सविषयीची आपली मानसिकता कशी आहे, याचा परिणाम आपल्या शारीरिक संबंध हाताळण्यावर होऊ शकतो आणि नातेसंबंधांची गुणवत्ता त्याने मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असते.

'सेक्स अँड द सिटी' या मालिकेच्या एका संस्मरणीय भागात कॅरी तिच्या नवीन प्रियकराच्या पूर्णतः प्रेमात बुडाल्याचं कबूल करते. "सगळं एकदम ताजंतवानं वाटतं, सगळंच पहिल्यांदा होत असल्यासारखं, सगळंच फोरप्लेसारखं वाटतं," असं ती म्हणते.

"त्याने पहिल्यांदा किस घेतला ते तर जगात सगळ्यांत भारी होतं."

पण या नवीन प्रियकरासोबत प्रत्यक्ष शारीरिक जवळकीचा अनुभव दोनदा घेतल्यानंतर मात्र कॅरीची निराशा होते. "त्याला सोडून दे ना मग," समान्था कॅरीला सल्ला देते. या भागाचं शीर्षक 'ग्रेट सेक्स्पेक्टेश्नस' असं होतं.

न्यूझीलंडमधील ऑकलंड विद्यापीठात मानसशास्त्राच्या वरिष्ठ व्याख्यात्या असणाऱ्या मानसशास्त्रज्ञ जेसिका मॅक्सवेल यांचं या भागाच्या शीर्षकाकडे लक्ष वेधलं गेलं. "सेक्स तुलनेने लीलया पार पडायला हवा, असं त्या मालिकेतल्या पात्रांनी गृहित धरलं होतं आणि सेक्स धड नसेल तर नातंच संपुष्टात आणायची त्यांची तयारी होती," असं मॅक्सवेल म्हणतात.

खऱ्या आयुष्यातही अनेक लोक समान्थासारखेच वागतात, असं आपल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधल्यावर मॅक्सवेल यांना जाणवलं.

आपल्या मनातील धारणांचा आपल्या अल्पकालीन व दीर्घकालीन घनिष्ठ नातेसंबंधांवर कसा प्रभाव पडतो, हे तपासायला मॅक्सवेल यांनी सुरुवात केली.

एका बाजूला, 'लैंगिक वृद्धीची मानसिकता' असते- त्यात काहीएक प्रयत्नपूर्वक समाधान मिळवण्यावर विश्वास ठेवला जातो. तर दुसऱ्या बाजूला, 'लैंगिक सुखाबाबतची दैववादी मानसिकता' असते- लैंगिक जोडीदारांमध्ये नैसर्गिक अनुकूलता असेल तर त्यांना लैंगिक समाधान लाभतं अशी ही कल्पना आहे, त्यामुळे लैंगिक नातेसंबंधात काही कष्टपूर्वक करावं लागलं तर ते संबंध अपयशी होणं अपरिहार्य असल्याचं मानलं जातं.

मॅक्सवेल यांनी अनेक अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं निदर्शनास आलं की, लोकांच्या मानसिकतेचा ते लैंगिक समस्या कशा हाताळतात यांवर प्रभाव पडतो आणि त्याचा त्यांच्या नातेसंबंधांच्या गुणवत्तेवरही प्रचंड परिणाम होतो. त्यामुळे अधिक रचनात्मक स्वरूपाच्या 'सेक्स्पेक्टेशन्स' म्हणजे सेक्सविषयीच्या अपेक्षा निर्माण करता आल्या तर आपल्या सर्वांचं आयुष्य अधिक निरोगी व आनंददायी होईल, असं त्यांच्या संशोधनातून निष्पन्न झालं.

प्रेमाबाबत नशीबावर अवलंबून राहणं

जीवनाच्या अनेकविध क्षेत्रांवर मानसिकतेचा कोणता परिणाम होतो, हे तपासणाऱ्या वाढत्या संशोधन साहित्यामध्ये मॅक्सवेल यांच्या निष्कर्षांची भर पडली आहे.

यातील सर्वांत प्रसिद्ध अभ्यास स्टॅनफोर्ड विद्यापीठातील कॅरोल ड्वेक यांनी केला आहे. काही दशकं त्या यावर संशोधन करत आहेत. एकंदरित वृद्धिनिष्ठ मानसिकता (Growth Mindset) असलेले लोक नवीन आव्हानं घ्यायला उत्सुक असतात आणि धक्के पचवण्यातही ते जास्त सक्षम असतात, असं त्यांच्या संशोधनाचं सार आहे.

वृद्धिनिष्ठ मानसिकतेला चालना देण्याच्या प्रयत्नांना पूरक शैक्षणिक वातावरण मिळालं, तर विद्यार्थ्यांची एकंदर उपलब्धी वाढते आणि कष्टाळू मुलांना त्यांचं सामर्थ्य प्रत्यक्षात आणायला अधिक वाव मिळतो.

नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

ड्वेक यांच्या निष्कर्षांमधून स्फूर्ती घेऊन जगभरातील मानसशास्त्रज्ञांनी इतर अनेक घडामोडींमध्ये मानसिकतेची भूमिका कशी असते हे शोधायचा प्रयत्न केला आहे. आरोग्य व स्वास्थ्यविषयक वर्तन, कामाच्या ठिकाणी दिसणारी उत्कटता आणि प्रेमसंबंधांमधील क्षमता, याबाबतसुद्धा असे अभ्यास झाले आहेत.

आपली 'प्रेमसंबंधविषयक दैववादी मानसिकता' असेल तर, 'संभाव्य नातेसंबंधांमधील जोडीदार अनुकूल असेल किंवा नसेल' आणि 'सुरुवात चांगली झाली नाही तर ते नातं अपरिहार्यपणे फोल ठरतं,' अशा विधानांशी आपण सहमत होण्याची शक्यता जास्त असते.

शिवाय, पहिल्या भेटीतच प्रेमात पडणं शक्य असतं, यावरही तुमचा विश्वास बसू शकतो. तुमची 'प्रेमसंबंधविषयक वृद्धिनिष्ठ मानसिकता' असेल, तर अधिकाधिक ओळख होत गेल्यावर प्रेम वाढतं असा तुमचा दृष्टिकोन असू शकतो. त्यामुळे, 'आदर्श नातेसंबंध सरत्या काळागणिक विकसित होत जातात' आणि 'नातेसंबंधांमधील आव्हानं व अडथळे ते नातं अधिक दृढ करतात' अशी विधानं तुम्हाला पटण्याची शक्यता जास्त आहे.

या दोन धारणा मूलतः परस्परांना वगळणाऱ्याच आहेत असं नाही. आपल्याला त्यातील एखादी जास्त जवळची वाटत असेल, दुसरी थोडी कमी जवळची वाटत असेल, असंही शक्य असतं. पण या धारणांचा जोडप्यांच्या वर्तनावर मूलगामी प्रभाव पडतो, एवढं मात्र संशोधनातून निश्चितपणे समोर आलं आहे.

उदाहरणार्थ, दैववादी मानसिकतेवर जास्त भर असणारे लोक प्रेमसंबंधांच्या आरंभिक काळात चांगली कामगिरी करतात, पण खडतर काळ सुरू झाला की त्यांचा नातेसंबंधांमधील रस संपण्याची शक्यता असते.

'माझा जोडीदार आणि माझ्यात संघर्ष होत असेल, तर आम्ही एकमेकांना अनुरूप नाही, अशी धारणा यामागे असते,' असं डायलन सेल्टरमन सांगतात. अमेरिकेतील बाल्टिमोर येथे जॉन हॉपकिन्स विद्यापीठात ते सहायक प्राध्यापक आहेत.

नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

अलीकडच्या एका शोधनिबंधासाठी सेल्टरमन यांनी सुमारे पाचशे लोकांचं सर्वेक्षण केलं आणि त्यांना नातेसंबंधांमध्ये फसवणूक केलेल्या काळाविषयी प्रश्न विचारले. दैववादी मानसिकता असणारे लोक जोडीदाराने आपल्याकडे दुर्लक्ष केलं, इत्यादींसारख्या घटकांना दोष देण्याची शक्यता जास्त असते, असं त्यांच्या लक्षात आलं. गोष्टी बिघडत असल्याचं लक्षात आल्यावर त्यांना नातेसंबंधांमधील निष्ठा बाळगणं व्यर्थ वाटतं.

वृद्धिनिष्ठ मानसिकतेवर भर देणारे लोक संघर्ष अधिक चांगल्या रितीने हाताळण्याची शक्यता असते, कारण यातून आपण वाट काढू शकतो असं त्यांना वाटतं. "संघर्षाच्या निमित्ताने आपल्याला एकमेकांविषयी अधिक जाणून घ्यायची आणि सकारात्मक दिशेने वाढण्याची संधी मिळते," असं सेल्टरमन सांगतात. फसवणुकीविषयीच्या त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना असं आढळलं की, हे लोक व्यभिचारासाठी त्यांच्या विद्यमान नातेसंबंधांत निर्माण झालेल्या दुराव्याला किंवा तत्सम समस्यांना दोषी धरण्याची शक्यता कमी असते.

सेक्ससाठी प्रयत्न करावे लागतात

या अभ्यासांमध्ये प्रेमसंबंधांवर शरीरसंबंधांपेक्षा अधिक लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. पण सेक्सविषयीची आपली मनोवृत्तीही तितकीच महत्त्वाची असावी, आणि त्याचे आपल्या नातेसंबंधांवर अनन्यसाधारण परिणाम होत असावेत, अशी शंका मॅक्सवेल यांना आली.

याबाबत शोध घेण्यासाठी त्यांनी 'लैंगिक दैववादी मानसिकता' आणि 'लैंगिक वृद्धिनिष्ठ मानसिकता' असे दोन समांतर निकषांचे संच तयार केले.

नातेसंबंध

फोटो स्रोत, Getty Images

प्रेमसंबंधविषयक मानसिकतेप्रमाणे लैंगिक दैववादी मानसिकतेमध्ये लैंगिक अनुरूपता तत्काळ जाणवते असं मानलं जातं आणि जोडीदाराच्या एकंदर अनुरूपतेवर भर दिला जातो.

'लैंगिक जोडीदार एकत्र राहणं अभिप्रेत असेल, तर सेक्स सोपा व आनंददायी होतो' आणि 'एखाद्या जोडप्याचं लैंगिक आयुष्य कितपत समाधानकारक असेल, हे त्यांच्या नातेसंबंधांच्या सुरुवातीलाच स्पष्ट झालेलं असतं' अशा विधानांवर त्यांची सहमती होण्याची शक्यता जास्त असते.

याउलट, लैंगिक वृद्धिनिष्ठ मानसिकतेमध्ये 'जोडीदारासाठी तडजोडी करणं हे चांगल्या लैंगिक नातेसंबंधांसाठी गरजेचं असतं' आणि 'जोडीदारासोबत लैंगिक मतभेद असले तर ते सोडवायला शिकणं हे लैंगिक संबंध समाधानकारक करण्यासाठी गरजेचं असतं' अशा विधानांशी सहमती राखली जाते.

मॅक्सवेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासांमधून हे स्पष्ट झालं की, लोकांच्या लैंगिकताविषयक मानसिकतेचा त्यांच्या लैंगिक समाधानावर प्रभाव पडतो आणि त्यांच्या एकंदर नात्याच्या गुणवत्तेवरही त्याचा परिणाम होतो. लैंगिक आयुष्याविषयी जोडप्यांमध्ये मतभिन्नता असते, तेव्हा लैंगिकतेसंबंधीची दैववादी मानसिकता विशेष कळीची ठरते.

"बेडरूममध्ये काय होतं यावरून ते एकंदर नात्याविषयी निवाडा करतात," असं मॅक्सवेल म्हणतात. लैंगिक वृद्धिनिष्ठ धारणांना अधिक प्रोत्साहन मिळालं, तर त्यातून मात्र बेडरूममध्ये आणि बेडरूमच्या बाहेरसुद्धा अधिक आनंदी जीवन निर्माण होण्याची शक्यता असते.

भिन्न मानसिकतांचा लोकांच्या दैनंदिन लैंगिक आयुष्यावर कोणता परिणाम होतो, हे मॅक्सवेल यांना शोधायचं होतं. त्यासाठी त्यांनी सर्वेक्षणात सहभागी लोकांना तीन आठवड्यांसाठी एक रोजनिशी लिहायला सांगितली. त्यातून लोकांची मानसिकता आणि त्यांच्या लैंगिक अनुभवांची एकंदर गुणवत्ता यांचा माग ठेवणं शक्य होणार होतं. "सेक्ससाठी प्रयत्न करावे लागतात, अशी धारणा ठेवणं लाभदायक ठरतं, असं आमच्या लक्षात आलं."

लैंगिक मानसिकतांचा जोडप्यांच्या पालकत्वावरही प्रभाव पडतो का, याचासुद्धा तपास मॅक्सवेल यांनी केला. इथेही त्यांना असं आढळलं की, वृद्धिनिष्ठ धारणांमुळे संबंधित जोडप्याला अवघड काळातही अधिक समाधान मिळणं शक्य असतं.

लैंगिकतेतून मोकळ्या होणाऱ्या वाटा

एकमेकांशी जोडून घेण्यात अडचणी येणाऱ्या जोडप्यांसाठी हे संशोधन भविष्यात काही उपाय सुचवू शकतं का?

मानसिकतेमध्ये किमान तात्पुरता तरी बदल करणं शक्य असतं, असा काहीएक पुरावा मिळतो. अमेरिकेतील मिनेसोटा ड्यूलथ विद्यापीठामध्ये झालेल्या एका ताज्या अभ्यासामध्ये सहभागी व्यक्तींना काही (बनावट) बातम्या वाचायला देण्यात आल्या.

कष्टाने प्रेम फुलत जातं, या कल्पनेवर भर देणाऱ्या त्या बातम्या होत्या. आणि त्या मजकुराची रचना प्रेमसंबंधविषयक वृद्धिनिष्ठ मानसिकतेला प्राधान्य देणारी होती. त्यानंतर संबंधित प्रतिसादकांना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यभिचाराविषयीची त्यांची मतं विचारण्यात आली. कोणाशी थोडंसं गोडीगुलाबीने जवळीक बोलणं किंवा सायबरसेक्स किंवा थेट लैंगिक संबंध, इत्यादींबाबतचे त्यांचे दृष्टिकोन जोखण्यात आले. त्यातून असं आढळलं की, वृद्धिनिष्ठ मानसिकता असणारे लोक अधिक क्षमाशील दृष्टिकोन राखतात.

चॉकलेट

फोटो स्रोत, BBC food

वृद्धिनिष्ठ मानसिकतेविषयी लोकांना सजग केलं, तर त्यातून संबंधित जोडप्यांना अधिक मोकळेपणाने लैंगिकतेला सामोरं जाणाऱ्या वाटा शोधता येतील, अशी आशा मॅक्सवेल व्यक्त करतात. "ही कल्पना विविध मार्गांनी लोकांपर्यंत पोचायला हवी," असं त्या म्हणतात. आपल्याला कळलेली माहिती उपयोगात आणण्यासाठी जोडप्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असतं, असं त्या म्हणतात.

एका अभ्यासामध्ये सहभागी जोडप्यांना नातेसंबंधांमधील अडचणींबाबतचे चित्रपट दाखवण्यात आले आणि त्यातील मुद्दे आपल्या जीवनातही कसे लागू होऊ शकतात हे वर्णन करायला सांगण्यात आलं. या अतिशय साध्या पातळीवरच्या हस्तक्षेपातून तीन वर्षांच्या कालावधीमध्ये घटस्फोटाचा दर खाली आला, याकडे मॅक्सवेल लक्ष वेधतात. "जोडप्यांच्या नातेसंबंधांसंदर्भात नेहमी केल्या जाणाऱ्या उपचारांइतकाच हा प्रयोग परिणामकारक ठरला होता," असं त्या म्हणतात. हीच पद्धत वापरून आणि मानसिकतेवर विशेष लक्ष केंद्रित करून नातेसंबंधांविषयीच्या मोकळ्या वाटा शोधता येतात का, यावर अभ्यास करायची त्यांची इच्छा आहे.

एखाद्या चित्रपटातील पात्रांना त्यांची गरज मांडण्यात अपयश आलं, तर त्यामागे नियतिनिष्ठ मानसिकता कारणीभूत असेल का, असा प्रश्न अभ्यासातील सहभागी जोडप्यांना विचारता येईल. आणि या अडचणींमधून अधिक रचनात्मक पद्धतीने बाहेर पडण्यासाठी वृद्धिनिष्ठ मानसिकता कशी वापरायची, याबद्दल सूचना नोंदवणायला सांगता येईल.

असा प्रयोग केला गेला आणि तो परिणामकारक ठरतोय असं दिसलं, तर 'सेक्स अँड द सिटी'चे ते भाग पुन्हा नव्याने पाहायला हरकत नाही.

डेव्हिड रॉब्सन हे विज्ञानविषयक लेखन करतात. त्यांनी लिहिलेलं 'द एक्सपेक्टेशन इफेक्ट: हाऊ यूअर माइंडसेट कॅन ट्रान्सफॉर्म यूअर लाइफ' हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं आहे.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)