लखीमपूर खिरी : ‘पैसे परत घ्या, पण आम्हाला न्याय द्या’ – ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, SHUBHAM KOUL/BBC
- Author, राघवेंद्र राव
- Role, बीबीसी प्रतिनिधी, लखीमपूर खिरीहून
गेल्यावर्षी 3 ऑक्टोबरच्या सकाळी 55 वर्षांचे नक्षत्र सिंह त्यांचं गाव नामदार पुरवापासून जवळपास 70 किलोमीटर अंतरावरील तिकुनियामध्ये शेतकरी आंदोलनातर्फे होणाऱ्या निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते.
निदर्शनांसाठी निघताना ते त्यांच्या कुटुंबीयांना म्हणाले होते की, शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीत तर जाऊ शकलो नाही, त्यामुळे तिकुनियाला जाऊन काही तासात परतेन.

फोटो स्रोत, SHUBHAM KOUL/BBC
नक्षत्र सिंह घरी परतले, पण जिवंत नाही.
त्या दिवशी लखीमपूर खिरीच्या तिकुनियामध्ये ज्या चार शेतकरी आणि एक पत्रकाराला थार जीपच्या खाली चिरडलं गेलं, त्यात नक्षत्र सिंह सुद्धा होते.
दोन कुटुंब, दु:ख एकसारखं
नक्षत्र सिंह यांचं कुटुंबं आजही वेदना सोसताना दिसतंय.
त्यांची पत्नी जसवंत कौर म्हणतात की, "ते पहिल्यांदाच शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते. ते केवळ पाहण्यासाठी गेले होते. ते लढाई करायला थोडेच गेले होते. आम्ही असा कधीच विचार केला नव्हता की, ते कधीच परतणार नाहीत. आम्ही हसत-खेळत पाठवलं होतं. तास-दोन तासात ते परततील, असंच वाटलं होतं."
त्याच दिवशी जैपरा गावातील भाजपचे कार्यकर्ते श्याम सुंदर निषादही त्यांच्या घरातून बनबीर पूरमध्ये दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमासाठी जातात. त्यांच्या कुटुंबालाही काही तासांनी कळलं की, तिकुनियामध्ये ते जखमी झालेत. त्या दिवशी घरातून निघताना श्याम सुंदर निषाद यांनी घरातल्यांचा शेवटचा निरोप घेतला.

फोटो स्रोत, SHUBHAM KOUL/BBC
श्याम सुंदर निषाद यांची आई फुलमती आजही त्या दिवसाची आठवण सांगतात, त्या अश्रू रोखू शकल्या नाहीत.
या दोन्ही कुटुंबांतील अंतर भले अधिक असेल, मात्र त्यांचं दु:ख एकसारखंच आहे. या दोन्ही कुटुंबाना प्रतिक्षा आहे ती न्यायाची.
'भीती तर आहेच'
या प्रकरणात केंद्र सरकारमध्ये गृहराज्यमंत्री आणि लखीमपूरचे खासदार अजय मिश्र टेनी यांचा मुलगा आशिष मिश्र हा मुख्य आरोपी आहे. जवळपास चार महिने तुरुंगात राहिल्यानंतर आशिष मिश्रला कोर्टानं जामीन दिला.
या गोष्टीनं नक्षत्र सिंह यांच्या कुटुंबाची काळजी वाढवलीय. त्यांना आता भीती वाटतेय.
त्यांचा आरोप आहे की, "हत्याप्रकरणात आशिष मिश्रला जामीन मिळालाय. त्याचे वडिलांच्या राजकीय प्रभावाचा हा परिणाम आहे."

फोटो स्रोत, SHUBHAM KOUL/BBC
या कुटुंबाच्या घराबाहेर उत्तर प्रदेश पोलिसांचा पहारा असतो. मात्र, न्याय मिळण्याची आशा कमी होत जातेय.
नक्षत्र सिंह यांचे पुत्र जगदीप सिंह म्हणतात की, "सरकारकडून कुठलीच अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही. सरकार आंधळं, बहिरं आणि मुकी झालं आहे. त्यांना ना पाहायचाय आणि ना ऐकायचंय."
नक्षत्र सिंह यांच्या पत्नी जसवंत कौर म्हणतात, "पाच महिने झाले. आतापर्यंत न्याय मिळाला नाही. न्याय मिळाला, मग त्यांना जामीन का मिळाला?"
'स्वतंत्र भारतातील जालियनवाला बाग हत्याकांड'
लखीमपूर खिरीमध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 23 फेब्रुवारीला होणार आहे. निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आहे.
19 फेब्रुवारीला लखीमपूर खिरीच्या जीआयसी मैदानात झालेल्या सभेत समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव म्हणाले, "जीपने शेतकऱ्यांना चिरडलं गेलं. शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. स्वतंत्र भारतातील जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी ही घटना आहे."

फोटो स्रोत, SHUBHAM KOUL/BBC
20 फेब्रुवारी रोजी भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा आयोजित करणार होती. मात्र, गोंधळ होण्याच्या शक्यतेमुळे सभा रद्द करण्यात आली.
भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या मते, प्रशासनाकडून काळजी व्यक्त करण्यात आली होती की, पंतप्रधानांच्या सभेवेळी शेतकरी आंदोलनाशी संबंधित लोक गोंधळ घालू शकतात आणि काळे झेंडे दाखवू शकतात. मग भाजपनं पंतप्रधानांची सभा व्हर्च्युअल सभेत बदलली.
लखीमपूर खिरीतले समाजवादी पक्षाचे नेते रामपाल सिंह यादव म्हणतात, "शेतकऱ्यांनी त्याच गोष्टीचा संताप आहे, नाराज आहेत, कारण त्यांना न्याय मिळत नाहीय. अजय मिश्र यांच्या मुलाला चार महिन्यात जामीन मिळतो. हे भेदभाव होतोय आणि शेतकऱ्यांना हे कळतंय."
'बाहेरून आलेले लोक या घटनेला जबाबदार'
लखीमपूर खिरीत झालेल्या घटनेचा उल्लेख विरोधक वारंवार उल्लेख करतात. तर दुसरीकडे भाजपच्या स्थानिक नेत्यांचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे.
लखीमपूर खिरीतले भाजपचे नेते आशु मिश्रा तीन ऑक्टोबरच्या घटनेबाबत सांगतात की, "ते लोक बाहेरचे होते. त्यांनी नियोजितपणे येऊन घटना घडवली. शासन-प्रशासनाचा कुठे ना कुठे हलगर्जीपणा आहे. अन्यथा, ही घटना घडलीच नसती."

फोटो स्रोत, SHUBHAM KOUL/BBC
जसवंत कौर म्हणतात की, "ज्यांच्या कुटुंबातील लोक मारले गेले, जखमी झाले, त्यांना विचारून पाहा की, ते शेतकरी होते की नाही ते."
'त्यांना आमचं दु:खच नाहीय'
या कुटुंबांचं असंही म्हणणं आहे की, केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे पाहिल्यास असं दिसतं की, त्यांना या घटनेचं काहीच दु:ख नाही.
जसवंत कौर म्हणाल्या की, "ज्यांना वेदना कळल्या, ते सगळे लोक आमच्या इथं आले. पण केंद्र सरकार आणि यूपी सरकार आमच्या इथं आले नाही. त्यांना दु:ख असतं, तर ते आले असते. ते आले असते, तर न्याय मिळण्याचा विश्वास वाटला असता."

फोटो स्रोत, SHUBHAM KOUL/BBC
त्याचवेळी श्याम सुंदर निषाद यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळाली, मात्र एका कौटुंबिक वादामुळे ते त्याचा वापर करू शकत नाही.
या कुटुंबाला माहित नाहीय, पुढे काय होईल. श्याम सुंदर निषाद यांचे भाऊ संजय निषाद म्हणतात की, "आता माहित नाही, न्याय मिळेल की नाही ते. आता आमचा भाऊ तर जिवंत येणार नाही."
तर नक्षत्र सिंह यांच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, "नुकसानभरपाई तर मिळाली, पण न्याय नाही."
जसवंत कौर म्हणतात की, "आम्हाला न्याय पाहिजे, भले तुम्ही आम्हाला दिलेले पैसे परत घ्या. आम्हाला न्यायाशिवाय काहीही नको."
लखीमपूर खिरीचा भाग उसाची शेती आणि गुळाच्या गोडव्यासाठी ओळखला जातो. मात्र, गेल्या वर्षी घडलेल्या घटनेनंतर इथल्या लोकांच्या मनात एकप्रकारची काळजी दिसते, भीती दिसते.

हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









