लखीमपूर खिरीमध्ये पत्रकार रमण कश्यप यांचा मृत्यू नेमका कसा झाला?

- Author, दिलनवाझ पाशा
- Role, बीबीसी हिंदी
लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या 8 लोकांमध्ये स्थानिक पत्रकार रमण कश्यप यांचाही समावेश आहे. ते 35 वर्षांचे होते.
पेशाने शिक्षक असणाऱ्य़ा रमण कश्यप यांनी नुकतीच स्थानिक स्तरावर पत्रकारिता सुरू केली होती. ते शेतकऱ्यांच्या निदर्शनाच्या बातमीसाठी घटनास्थळी गेले होते. त्यामध्ये त्यांचा संदिग्ध स्थितीत मृत्यू झाला आहे.
लखीमपूर खिरीच्या रुग्णालयातील शवागारात त्यांचं पार्थिव मिळालं. त्यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांमध्ये वेगवेगळे दावे केले जात आहेत.
शवचिकित्सेमध्ये मृत्यू गोळीने किंवा दंडुक्याच्या मारामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या कुटुंबाला 45 लाख रुपयांची मदत दिली असून त्यांच्या पत्नीला नोकरी देण्याचे आश्वासन मिळाले आहे. रमण यांच्या कुटुंबाची प्रियंका गांधी, राहुल गांधी यांनी भेट घेतली आहे.
बीबीसीने त्यांच्या शवचिकित्सेचा अहवाल पाहिला. त्यामध्ये रमण यांच्या शरीरावर खरचटल्याच्या आणि ओढल्याच्या खुणा होत्या. चिकित्सा होण्यापूर्वी साधारण अर्धा दिवस आधी त्यांचा मृत्यू झाल्याचं त्या अहवालात म्हटलं आहे. त्यांच्या डोक्यावरही जखमेची खूण होती. या अहवालानुसार 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 वाजता रमण यांची शवचिकित्सा सुरू करण्यात आली. अत्याधिक रक्त वाहून गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे असं त्या अहवालात म्हटलं आहे.
बीबीसीने त्यांच्या शवाचे फोटो पाहिले, त्यात त्यांच्या शरीरावर फरपटल्याच्या खुणा दिसल्या आहेत.
कोणत्या स्थितीत झाला रमण कश्यप यांचा मृत्यू?
लखीमपूर खिरीच्या निघासन भागात राहाणाऱ्या रमण यांनी काही महिन्यांपूर्वीच स्थानिक पातळीवर पत्रकारिता सुरू केली होती. तिकुनिया येथील निदर्शनाच्या बातमीसाठी बारा वाजण्याच्या सुमारास इतर दोन पत्रकारांसह पोहोचले होते. बीबीसीने त्यांच्या फोनद्वारे रेकॉर्ड केलेले व्हीडिओ पाहिले, त्यामध्ये शेतकऱ्यांवर गाडी आदळण्याचा व्हीडिओ नाही.

गाडी शेतकऱ्यांवर आदळली तेव्हा ते आपल्या अगदी जवळ उभे होते असं स्थानिक पत्रकार योगेश सांगतात. योगेश म्हणाले, "मी माझे सहकारी पत्रकार सुरजित सिंह चानी यांच्याबरोबर उभा होतो, रमण आमच्यामागे होते. गाडी येताच सुरजित जखमी झाले. माझं सगळं लक्ष त्यांच्याकडे होते. नंतर मागे वळून पाहिलं तर रमण दिसले नाहीत."
योगेश सांगतात, सगळं इतकं वेगानं झालं की तिथं गोंधळ निर्माण झाला. रमण दिसेनासे झाल्यावर मी 03.08 वाजता त्यांना फोन केला तेव्हा कोणीही उचलला नाही. नंतर एका व्यक्तीने आपल्याला हा फोन मिळाला असून, त्यांच्याकडून हा फोन घेऊन जाऊ शकाल असं सांगितलं.
रमण यांच्या आणखी एका पत्रकार सहकाऱ्याने त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला मात्र ते सापडले नाहीत असं सांगितलं. बीबीसीने घटनेचे जे व्हीडिओ पाहिले त्यानुसार शेतकऱ्यांवर 03.01 वाजता गाड्या आदळल्या आहेत.

योगेश सांगतात, माझ्या मागे रमण उभे होते. गाड्या आल्यानंतर ते दिसले नाहीत.
कसं मिळालं रमण यांचं प्रेत?
तिकुनिया पोलिसांनी रमण यांचं प्रेत लखीमपुर खिरीच्या जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवलं होतं. तिकुनियाचे एसएचओ बालेंदू यांच्या मते पोलिसांनी जे जखमी सापडले त्यंना रुग्णालयात आणि मृतांना शवागारात पाठवलं.
विविध सुत्रांद्वारे बीबीसीला मिळालेल्या माहितीनुसार प्रेतांना 6 वाजण्याच्या सुमारास शवागारात पाठवलं गेलं. घटनेनंतर प्रेत मिळेपर्यंत रमण कश्यप यांच्याबरोबर काय घडलं हे स्पष्ट झालेलं नाही.

सुरजित चानी सांगतात, मला थोडसं लागलं बोतं. मी उभा होतो तिथं दोन लोक जखमीअवस्थेत पडले होते. मी त्यांना माझ्या गाडीतून त्यांना तिकुनिया रुग्णालयात नेलं. नंतर या घटनेत लोकांचे प्राण गेल्याचं आणि गाड्या जाळल्याचं समजलं. रमण कश्यपही बेपत्ता असल्याचं मला संध्याकाळी समजलं.
रमण बातमीसाठी गेल्याचं त्याच्या घरातील लोकांना माहिती होतं परंतु बेपत्ता असल्याचं माहिती नव्हतं. रमण यांचे लहान भाऊ पवन सांगतात, मी नैनितालवरुन परतत असताना ही घटना समजली. मी लगेच रमणला फोन केला मात्र लागला. त्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला पण मिळाली नाही.

रमण बेपत्ता झाल्याचं समजल्यावर त्यांच्या कुटुंबानं त्यांना शोधायला सुरुवात केली. मात्र घटनास्थळाचा पोलिसांनी ताबा घेतला होता तिथं कोणालाही जाऊ देण्यात येत नव्हतं.
रमण यांचे वडील राम दुलारे सांगतात की, त्यांनाही घटनास्थळी जाऊ दिलं गेलं नाही.
ते म्हणाले, मुलगा मिळेनासा झाल्यावर तो हॉस्पिटलमध्ये असावा असं वाटलं. रात्री उशिरापर्यंत त्याला शोधलं पण काही कळलं नाही.
तो बेपत्ता असल्याचं आणि त्याला शोधण्याची विनंती सोशल मीडियावर करण्यास सुरुवात केली होती.
रमण यांचा मृत्यू झाल्याचं कुटुंबाला कसं समजलं?
पवन यांच्या माहितीनुसार रात्री तीन वाजता त्यांना तिकुनिया ठाण्यातून पोलिसांचा फोन आला. मात्र ते उचलू शकले नाहीत. काही वेळाने त्यांच्या काकांना पोलिसांनी फोन केला आणि लखिमपूर खिरी शवागारात येण्यास सांगितलं.
पवन सांगतात, आम्ही सगळे सकाळी चार वाजण्याच्या सुमारास शवागारात गेलो. घटनेत मारल्या गेलेल्या भाजपा समर्थकांबरोबर रमण यांचं प्रेत तिथं ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या कपड्यांवरुन कुटुंबीयांनी ओळख पटवली.

फोटो स्रोत, Getty Images
पवन म्हणाले, भाऊ शवागारात पडला होता. त्याच्या शरीरातून रक्त वाहात होतं. पोलिसांनी त्यांना हॉस्पिटल ऐवजी थेट शवागारात पाठवलं. मृत्यू येईल इतक्या त्यांच्या शरीरावरील जखमा इतक्या मोठ्या नव्हत्या. डॉक्टरांना दाखवलं असतं तर ते वाचले असते.
प्रेताचे फोटो दाखवून पवन सांगतात, मी त्यांच्या शरीरावरील एकेक जखम पाहिली. मारल्याचं कोणतंही चिन्ह दिसत नव्हतं. रस्त्यावरुन फरपटल्याचे ओरखडे होते. त्यांच्या हाताला डांबर लागलं होतं. कारबरोबर फरपटत गेल्यामुळे लागली असती त्याप्रमाणे शरीराला अनेक ठिकाणी खडी लागलेली होती. गंभीर जखमा दिसत नव्हत्या.
रमण कश्यप यांना निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांनी मारलं, असं काही माध्यमांच्या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राम दुलारे सांगतात, माझ्या मुलाला मारहाण झाली असेल असं वाटत नाही. त्याला झालेल्या जखमा नीट पाहिल्या आहेत. त्याला गाडीने धडक दिली असेल आणि कोणाचंच त्याच्याकडे लक्ष गेलं नसेल असं मला वाटतं. तेव्हाच त्याला रुग्णालयात नेलं असतं तर तो वाचला असता.
पवन सांगतो, माझ्य़ा भावाबद्दल अफवा का पसरवल्या जात आहेत, हे माहिती नाही. तो पत्रकार होता. तो शेतकऱ्यांच्या किंवा गाडी आदळवणाऱ्यांच्या कोणाच्याही बाजूने नव्हता. तो त्याचं काम करत होता. त्याचा मृत्यू कोणत्या स्थितीत झाला याचा गांभिर्यानं तपास झाला पाहिजे. सर्व सत्य समोर आलं पाहिजे. माझा भाऊ कोणत्या स्थितीत सापडला आणि त्याला रुग्णालयात का नेलं नाही हे आम्हाला समजलं पाहिजे.
पवन विचारतो, घटनास्थळापासून एक किलोमीटरवर तिकुनिया सामुदायिक रुग्णालय आहे, वीस किलोमीटरवर निघासनचं रुग्णालय आहे. परंतु माझ्या भावाला रुग्णालयात न नेता त्याला थेट शवागारात नेलं. असं का केलं याचं उत्तर पाहिजे.
ज्या रुग्णवाहिकेतून रमणचे शव नेले तिचा चालक या कुटुंबाचा स्नेही आहे. परंतु त्यानेही त्याला ओळखले नाही.
पवन सांगतो, चालकानं आम्हाला सांगितलं, ते 6 वाजता शव घेऊन गेले आणि थेट शवागारात न्या, असं पोलिसांनी सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
या चालकानं बीबीसीशी बोलताना सांगितलं, घाईघाईत बॉडी रुग्णवाहिकेत घातली गेली आणि थेट शवागारात नेण्यास सांगितलं.
तिकुनिया ठाण्याचे एसएचओ बालेंदू यांच्याव निष्काळजी आरोप करुन पवन म्हणतात, पोलिसांनी आपलं काम नीट केलं असतं तर माझ्या भावाचा जीव वाचला असता.
पवन म्हणतात, रमेश नेहमी कंबरेला एक बॅग बांधत, त्यात त्यांचे दस्तावेज असत. त्यांचं शव मिळालं पण ती कागदपत्रांची बॅग सापडलेली नाही. मी माझ्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा बनवण्यासाठी संघर्ष करणार आहे.
एसएचओ बालेंदू बीबीसीला म्हणाले, रमण कोणत्या स्थितीत सापडले हे समजलेलं नाही. घटनेच्या सर्व गोष्टी जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तपासानंतरच काय झालंय ते समजेल. तो देह रमण यांचा आहे हे आम्हाला माहिती नव्हतं. सोशल मीडियाद्वारे एक पत्रकार बेपत्ता असल्याचं समजलं आणि तेव्हा त्यांच्या कुटुंबाशी ओळख पटवण्यासाठी आम्ही संपर्क केला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








