फॅसिस्ट विचारसरणीच्या प्रचारकी वास्तूंचं फॅसिझमनंतर काय झालं?

फोटो स्रोत, Alamy
- Author, अॅलेक्स सकालीस
- Role, बीबीसी न्यूज
युरोपभरात अनेक वादग्रस्त जुन्या वास्तू अजूनही आहेत. अॅलेक्स सकालीस यांनी इटलीतल्या एका लहान शहराला भेट दिली, तिथे फॅसिझमचा वास्तुरचनेच्या रूपातील वारसा पुसट करून संदर्भासहित त्याकडे पाहण्याचा पर्याय स्वीकारण्यात आल्याचं त्यांना दिसलं.
इटलीच्या उत्तरेला असणारे बोल्झानो हे शहर इतर कोणत्याही डोंगराळ छोटेखानी शहरांसारखं आहे. तीव्र उतार असणारे डोंगर, किल्ले, कोठारं व चर्च यांची पखरण, आणि माथ्यावर द्राक्षाचे मळे- अशा रूपातील या शहरातील वळणदार लहानखुऱ्या रस्त्यांपाशी फिक्या रंगांमधील घरं आणि जुन्या खानावळी दिसतात.
पण शहराच्या पश्चिम कडेला असणारी टल्फेर नदी पार केल्यानंतर अचानक वेगळंच रूप समोर येतं. इथे मोठे व रुंद रस्ते आहेत, शांत चौकांभोवती साध्या, राखाडी इमारती आहेत. इथली वास्तुरचना एकरेषीय व एकसुरी आहे. त्यात प्रवेशद्वारापासशी उंच जागा, आयताकृती स्तंभ आणि धड कुठेच न जाणाऱ्या पुलांसारख्या वाटांवर विचित्रपणे उभारलेल्या कमानी- अशी इथली रचना आहे.
या उदासवाण्या वातावरणात दोन रचना विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या ठरतात. यातील पहिली रचना म्हणजे शहरातील टॅक्स ऑफीस. ही एक राखाडी विटांच्या बांधकामातील महाकाय इमारत आहे, त्यावर 57 पट्ट्यांमध्ये मोठमोठी उठावशिल्पं केलेली आहेत.
रोमवरील मोर्च्यापासून ते आफ्रिकेतील वासाहतिक मुलुखविजयापर्यंत इटालियन फॅसिझमच्या उदयाचं चित्रण त्यात करण्यात आलेलं आहे. इथे मध्यभागी घोड्यावर बसलेला मुसोलिनी दाखवला आहे, त्याचा उजवा हात रोमन पद्धतीच्या अभिवादनासाठी ताणलेल्या स्थितीत दिसतो. फॅसिस्ट प्रचारकी वास्तुरचनेचा हा एक लक्षणीय नमुना आहे. त्याकडे पाहून दरारा, घृणा आणि संभ्रम, अशा भावना निर्माण होतात.
दुसरी रचना आहे बोल्झानो विजय स्मारक. इथे पांढऱ्या संगमरवरी दगडाने लक्षवेधी कमान केलेली आहे, त्यातील स्तंभांवर जाड दांड्यांची कुऱ्हाड कोरलेली आहे, त्यातील दांड्यांचा गठ्ठा फॅसिस्ट चळवळीचं प्रतीक आहे. राखाडी इमारती आणि भोवतीची हिरवी झाडं यांच्यातून मृगजळासारखं हे स्मारक अचानक समोर येतं. त्यावर भुताटकीचं सावट असल्यासारखं भासतं.
तिथल्या कोरीव नक्षीपटावर लॅटिनमध्ये पुढील मजकूर आढळतो: "पितृभूमीच्या या सीमेवर आपण झेंडा रोवला. इथून पुढे आपण भाषा, कायदा व संस्कृती यांबाबत इतरांमध्ये जागृती केली."
1928 साली झालेल्या या बांधकामाभोवती आता उंच कुंपण घातलेलं आहे. टोकाच्या उजव्या गटांना एकत्र येण्यासाठी ही एक खूण ठरली आहे, तर अनेकदा हे स्मारक उडवून देण्याचेही प्रयत्न झाले आहेत. "खऱ्या अर्थाने पहिलं फॅसिस्ट स्मारक" असं या इमारतीचं वर्णन इतिहासकार जेफरी श्नॅप यांनी केलं होतं.

फोटो स्रोत, Alamy
पण फॅसिस्ट प्रचारकी वास्तुरचनेचे हे दोन नमुने वादग्रस्त स्मारकांसंदर्भातील धाडसी कलात्मक प्रयोगांचे दाखले ठरले आहेत. वंशवादी, साम्राज्यवादी वा फॅसिस्ट अर्थछटा असणारी स्मारकं काढून टाकायची की ठेवायची, या संदर्भात वाद घालणाऱ्या समुदायांसाठी हे दाखले महत्त्वाचे ठरणारे आहेत.
पहिल्या महायुद्धापूर्वी बोल्झानो (किंवा जर्मनमध्ये बॉझेन- दोन्ही नावं अधिकृत आहेत) हे दक्षिण टायरोलमधील सर्वांत मोठं शहर होतं. ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्यातील डोंगररांगांमध्ये वसलेला दक्षिण टायरोल हा एक प्रांत होता.
या शहरात व प्रांतात मोठ्या संख्येने जर्मनभाषक लोक होते, पण 1919च्या शांतता परिषदेवेळी हे प्रदेश सुरक्षेच्या कारणास्तव इटलीला देण्यात आले. इटलीला दक्षिण टायरोलमुळे उत्तरेकडे आल्प्सच्या पर्वतरांगांची नैसर्गिक सीमा लाभणार होती, आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या ब्रेनर खिंडीवरही नियंत्रण मिळणार होतं.
मुख्यत्वे बिगरइटालियन लोकसंख्या असलेल्या या सीमेवरील शहरात मुसोलिनीच्या सत्ताकाळामध्ये मोठ्या प्रमाणात इटालियन प्रभाव वाढवण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं. ठिकाणांची नावं बदलण्यात आली, टायरोलियन सांस्कृतिक संस्था बंद करण्यात आल्या आणि या प्रांतातील 90 टक्के लोकांच्या जर्मन भाषेवर जवळपास बंदी असल्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली.
नदीकाठी एक मोठं औद्योगिक क्षेत्र उभारण्यात आलं आणि तिथल्या शहरात जाऊन स्थायिक होण्यासाठी हजारो इटालियन लोकांना प्रोत्साहन देण्यात आलं. या नवीन शहरात फॅसिस्टवादाची 'कीर्ती' सांगणारी अगणित स्मारकं व इमारती होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
युद्धानंतर इटालियन सरकारने दक्षिण टायरोलमधील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात स्वायत्तता देऊन फॅसिस्ट धोरणांची भरपाई करण्याचा प्रयत्न केला. इथल्या लोकांच्या सांस्कृतिक व भाषिक अधिकारांचा आदर राखला जाईल, सरकारी नोकऱ्या भाषेच्या आधारे प्रमाणानुसार दिल्या जातील आणि 90 टक्के कर महसूल याच प्रदेशात वापरला जाईल, असे नियम करण्यात आले.
परंतु, फॅसिस्ट स्मारकांचा अवकाश वादग्रस्त ठरत राहिला.
"जर्मन भाषकांच्या दृष्टीने या रचना म्हणजे फॅसिस्टवादी इटालियन प्रभाव वाढवण्याच्या प्रक्रियेची प्रतीकं होती. या प्रक्रियेने जर्मनांची संस्कृती व भाषा समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे ही स्मारकं पाडून टाकावीत, अशी या लोकांची इच्छा होती," असं बोल्झानो विद्यापीठात समकालीन इतिहासाचे प्राध्यापक असणारे आंद्रे डी मिशेल म्हणतात.
"आता बोल्झानोमध्ये इटालियन लोक बहुसंख्येने आहेत, पण भोवतीचा प्रांत मुख्यत्वे जर्मनभाषक आहे. अशा वेळी विजय स्मारक हे फॅसिस्टवादाचं प्रतीक न ठरता या प्रदेशातील इटालियन अस्मितेचं प्रतीक झालं आहे."
इथे सातत्याने झालेली तोडफोड आणि बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रयत्न यांमुळे विजय स्मारकाभोवती धातूचं मोठं प्रवेशद्वार उभारण्यात आलं, तर टॅक्स ऑफिसपाशी चोवीस तास सैनिकी पोलिसांचा पहारा असतो. या दोन इमारतींचा प्रतीकात्मक वापर करून वापर करून इटालियन टोकाचे उजवे गट आणि जर्मन भाषक उजवे गट यांचे परस्परविरोधी मोर्चे निघत असतात. हा संघर्ष सोडवण्यासाठी वेळोवेळी झालेले प्रयत्न समजुतीच्या तोडग्याविना वाया गेले.
फॅसिस्ट काळातील वास्तुरचनेच्या वारशाबाबत समस्यांना सामोरा जाणारा इटली हा एकमेव देश नाही. स्पेनमध्ये 'विस्मृतीच्या करारा'चा भाग म्हणून फ्रँको काळातील फॅसिस्ट स्मारकं 2007 सालापर्यंत बहुतांशाने अबाधित ठेवण्यात आली. त्यानंतर ऐतिहासिक स्मृती कायद्याद्वारे अशी स्मारकं पाडण्यासाठीची कायदेशीर चौकट उपलब्ध करून देण्यात आली.
2010 साली स्पॅनिश राष्ट्रीय संशोधन परिषदेच्या इमारतीवरील फ्रँकोचं गौरवीकरण करणारा कोरीव लेख काढून टाकण्यात आला, त्यानंतर तिथली पाटी बहुतांशाने कोरी ठेवण्यात आली आहे. दरम्यान, फेब्रुवारी 2021 मध्ये फ्रँकोचा सार्वजनिक ठिकाणचा शेवटचा पुतळा काढून टाकण्यात आला. या कृतीला व्हॉक्स या स्पेनमधील तिसऱ्या सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाने विरोध केला.

फोटो स्रोत, Alamy
पाडण्याच्या दृष्टीने खूप मोठ्या असणाऱ्या इमारतीही आव्हानकारक ठरतात. गिजोन विद्यापीठाची इमारत स्पेनमधील सर्वांत मोठी आहे. फ्रँको राजवटीच्या आरंभिक वर्षांमध्ये नव-हेरेरियन शैलीत या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं.
या इमारतीला 'विलक्षण वास्तुरचनात्मक मूल्य' आहे, असं सांगितलं जातं. परंतु, या प्रदेशातील डाव्या विचाराच्या नगर परिषदेने ही इमारत युनेस्कोच्या मान्यतेसाठी पाठवण्याचे वारंवार नकाराधिकार वापरून टाळले आहे. "फ्रँकोविचाराशी संबंधित इमारत जागतिक वारसा स्थळ होऊ शकत नाही", असं कारण नगर परिषदेने दिलं.
'व्हॅली ऑफ द फॉलन' हा फ्रँकोकाळाचा सर्वांत कुख्यात वास्तुरचनात्मक वारसा आहे. या महाकाय आवारात बॅसिलिका स्वरूपाची एक रचना आहे, एक गेस्ट हाऊस आहे, अनेक स्मारक आहेत, एक प्रचंड मोठा क्रॉस आहे आणि 30 हजारांहून अधिक लोकांचे अवशेष असणारी भव्य कबर आहे.
राष्ट्रीय सलोख्याचं स्मारक म्हणून फ्रँकोने हे बांधकाम केलं होतं आणि इथल्या चर्चजवळच्या दफनभूमीला पवित्र करण्याचा विधी 1960 साली तेवीसावे पोप जॉन यांच्या हस्ते पार पडला होता. पण ही रचना फ्रँकोविचाराचे उदात्तीकरण करणारी असून नाझी छळछावण्यांसारखी आहे, असे काही जण मानतात. 2019 साली फ्रँकोचे अवशेष काढून टाकण्यात आले आणि 2020 साली सरकारने हे स्थळ नागरी दफनभूमीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रस्ताव मांडला.
पण यासंबंधीची चर्चा बहुतांशाने केवळ दोन टोकांवरची राहिली आहे- रचना काढून टाकावी किंवा जतन करावी, अशी ही दोन टोकं आहेत; त्यात मध्यभूमीचा अवकाश फारसा नाही. स्पॅनिश यादवी युद्ध व फ्रँको राजवट यांच्या वादग्रस्त वारशामुळे या गुंतागुंतीच्या चर्चेत धृवीकरण होते.
दरम्यान, जर्मनीमध्ये नाझीकाळातील कोणतीही वास्तुरचना सापडणं अवघड जातं. त्यातील बहुतांश रचना युद्धादरम्यान नष्ट झाल्या किंवा नंतर देशातून नाझी खुणा नष्ट करण्याच्या प्रक्रियेत त्या पाडल्या गेल्या. उरलेल्या फॅसिस्ट इमारतींवर स्वस्तिकं व इतर फॅसिस्ट प्रतीकं पुसून त्यांचा दुसऱ्या कामासाठी उपयोग करण्यात आला आहे.
बर्लिन ऑलम्पिक स्टेडियम हे याचं सर्वांत मोठं उदाहरण आहे. न्यूरेम्बर्गमध्ये 1935 साली झालेल्या परिषदेच्या सभागृहासारखी इतर ठिकाणं नाझी दस्तावेजीकरण केंद्रांसाठी निवडण्यात आली. तिथली स्मारकं हिटलरच्या वास्तुरचनाविषयक भ्रामक महत्त्वाकांक्षेचे अवशेष मानली जातात.
इटलीमध्ये रोमच्या ईयूआर जिल्ह्याची रचना मुसोलिनीच्या कल्पनेनुसार करण्यात आली होती. त्यात फॅसिस्टवादाचा वास्तुरचनेच्या पातळीवरील सोहळा दिसावा, अशी अपेक्षा होती. तिथल्या भीतीदायक
भूप्रदेशात एका महाकाय इमारत दिसते. या इमारतीच्या दर्शनी भागावर मुसोलनिच्या एका भाषणातील अवतरण नक्षीदारपणे कोरलेलं आहे. या भाषणात मुसोलिनीने इथिओपियावरील स्वारीची घोषणा केली होती. रोमच्या मध्यवर्ती भागाच्या थोडं उत्तरेला फोरो इटालिको क्रीडा संकुल आहे.
तिथल्या प्रवेशद्वारापाशी 17.5 मीटर उंचीचा एक शंकुस्तंभ आहे, त्यावर MUSSOLINI DUX असे शब्द कोरलेले आहेत. फोरो इटालिकोच्या आतल्या भागात मुसोलिनीचं ईश्वरी सम्राट म्हणून चित्रण करणारं 'द अपोथिओसिस ऑफ फॅसिझम' हे चित्र आहे. दोस्त राष्ट्रांनी हे चित्र खूपच बिभत्स असल्याच्या कारणावरून झाकलं होतं आणि 1996 साली इटालियन सरकारने ते पुन्हा बाहेर काढलं.
"इटलीमध्ये फॅसिस्ट स्मारकांबाबत कोणतेही प्रश्न न विचारता ही स्मारकं टिकवण्यात आली आहेत, यात वेगळी जोखीम आहे," असं इतिहासकार रूथ बेन-घिआट लिहितात. "स्मारकांकडे केवळ न-राजकीयीकरण झालेल्या सौंदर्यात्मक वस्तू म्हणून पाहिलं, तर कट्टर उजवे गट त्यातून कुरूप विचारसरणी जोपासू शकतात आणि बाकीचे सर्व लोकांना त्याची भुरळ पडून जाते."
वादग्रस्त स्थळं
बोल्झानोतील दोन्ही समुदायांमधल्या इतिहासकारांच्या व कलावंतांच्या एका गटाने 2014 एकत्र येऊन हा गुंतागुंतीचा व भावनिक वाद कसा सोडवायचा याबद्दल चर्चा केली. बोल्झानोतील सामाजिक गतिशीलतेमुळे या इमारती वादग्रस्त स्थळं ठरल्या आहेत, त्यामुळे त्याबाबत काही तोडगा शोधणं निकडीचं झालं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"ही स्मारकं नष्ट करणं किंवा ती आहेत तशी ठेवून देणं, असा दुहेरी पर्याय समोर होता," असं इनस्ब्रूक विद्यापीठातील समकालीन इतिहासाचे प्राध्यापक हॅन्स ओबेरमाइर म्हणतात. बोल्झेनोतील प्रश्नावर उपाय शोधण्याची जबाबदारी घेतलेल्या तज्ज्ञगटामधील ते एक सदस्य आहेत.
"पण तुम्ही स्मारकं काढलीत, तर पुरावा पुसण्यासारखं असतं आणि या वादाला चालना देणारे इतिहासाचे व अस्मितेचे व्यामिश्र स्तर हाताळणं टाळले जातात. तसंच, कोणतेही प्रश्न उपस्थित न करता ही स्मारकं तशीच टिकवली, तर त्यातून फॅसिस्ट कथनाचं सर्वसाधारीकरण होतं."
अखेरीस, या संदर्भात एक सर्जनशील उपाय सापडला. त्यामुळे शहरात ऐक्य साधलं गेलं आणि दोन समुदायांमधील तणावही निवळला. या स्मारकांना 'नव्याने संदर्भ देणं', त्याचवेळी त्यातील कलात्मकता व ऐतिहासिक महत्त्व टिकवणं, आणि असं करत असताना त्यातील फॅसिस्ट कथनाचा प्रतिकार करणं, हा यावरचा उपाय पुढे आला.
"स्वतःच्या इतिहासाशी प्रामाणिक संभाषण साधण्याची संधी या निमित्ताने शहराला मिळाली," असे ओबेमाइर सांगतात. "हे वाद गतकाळाबद्दल कमी आणि वर्तमानकाळाबद्दल जास्त असतात. आपण सध्या कोणत्या प्रकारच्या समाजाता आहोत? आपण गतकालीन विचारसरण्यांनी ग्रासलेला समाज आहोत की लोकशाहीवादी व बहुविधतावादी समाज आहोत; आपण सहभाग, सहिष्णूता व मानवतेचा आदर यांसारख्या मूल्यांवर श्रद्धा ठेवतो का?"
यातील विजय स्मारकाबाबत दोन्ही बाजूंनी तीव्र भावना व्यक्त होत होत्या. ही वास्तुरचना उघडपणे फॅसिस्ट विचारांना व्यक्त करते, त्यात दक्षिण टायरोलच्या वासाहतिकरणाचं उदात्तीकरणही आहे आणि लॅटिन सभ्यतेची कथित श्रेष्ठता लादण्याचा प्रयत्न आहे. पण विचारसरण्या व प्रतीकं यांच्या व्यामिश्र कथनातून पाहिलं, तर त्यात पहिल्या महायुद्धातील इटलीचा विजय साजरा करणारी खूणही दिसते आणि युद्धात जीव गमावलेल्या इटालियन सैनिकांचं ते स्मारकसुद्धा आहे.
या स्मारकाला मोठं ऐतिहासिक मूल्य आहे- कारण हे जगातील सर्वांत पहिलं ऐतिहासिक स्मारक आहे. तसंच त्यात कलात्मक गुणवत्ताही त्यात आहे- आधुनिक वास्तुरचनेच्या विकासामध्ये फ्रेंच आर्ट डेको व जर्मन बाउहाउस यांच्याइतकी महत्त्वाची भूमिका निभावण्याचं काम इटालियन रॅशनलिझमने केलं होतं, त्याचा ठळक दाखला या स्मारकातून मिळतो. तत्कालीन महत्त्वाचे इटालियन वास्तुरचनाकार व कलाकार या स्मारकाच्या कामात सहभागी झाले होते, त्यात मार्सेलो पिआसेन्तिनी व अडोल्फो विल्ड यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Città di Bolzano
या संदर्भातील पहिला हस्तक्षेप म्हणजे तिथल्या एका स्तंभावर एलईडी दिव्यांचा पट्टा बांधण्यात आला. त्यामुळे स्मारकाच्या कलात्मकतेला बाधा न पोचवता फॅसिस्ट कथनाला प्रतीकात्मक छेद देण्यात आला. तसंच इमारतीच्या तळघरातील दफनभूमीमध्ये एक संग्रहालय उभारण्यात आलं. या संग्रहालयात बोल्झानोच्या आधुनिक इतिहासातील उलथापालथीचं तपशीलवार चित्रण मांडण्यात आलं आणि वरील स्मारकाच्या निर्मितीचा संदर्भही नोंदवण्यात आला, शिवाय याबाबतच्या वादाचंही स्पष्टीकरण त्या संग्रहालयात केलेलं आहे.
त्यानंतर उठावचित्रांच्या बाबतीत हस्तक्षेपाचं काम अरनॉल्ड होल्झनेश्त व मिशेल बर्नार्डी या दोन स्थानिक कलाकारांकडे आलं. त्यांना उघडपणे फॅसिस्ट कथन मांडणाऱ्या इमारतीला फॅसिस्टविरोधी स्मारकामध्ये रूपांतरित करायचं होतं. त्यांनी या इमारतीवर हॅना आर्न्ट यांचं 'आज्ञापालनाचा हक्क कोणालाही नाही' हे अवतरण जर्मन, इटालियन व लॅडिन (या प्रदेशातील तिसरी अधिकृत भाषा) या भाषांमध्ये लावलं. या इमारतीत सध्या शहराचं टॅक्स हाऊस आहे, हा संदर्भ लक्षात घेतला तर वरील अवतरण विशेष विद्रोही स्वरूपाचं ठरतं.
"ही स्मारकं मूळ स्थितीत ठेवल्याने त्यांच्या निर्मितीचा संदर्भ लक्षात घेऊन विचार करायला वाव मिळतो," असं डी मिशेल म्हणतात. आंतरसामुदायिक गटाचे ते सदस्य होते. "स्मारकं जतन केल्याने त्यांच्याविषयी आणि एकंदरच फॅसिझमविषयी संवाद होतो. फॅसिस्ट वास्तुरचनेचा ठोस नागरी परिणआम कसा होतो आणि त्यातील कलात्मक हस्तक्षेपाचे दूरगामी आयाम काय आहे, हे समजून घेणं यातून शक्य होतं. ही स्मारकं एखाद्या संग्रहालयात ठेवली तर त्यातून नागरी रचनेवर कोणता परिणाम साधलं जाणं मुळात अपेक्षित होतं हे समजून घेता येत नाही."
हे कलात्मक हस्तक्षेप अत्यंत यशस्वी ठरले, दोन्ही समुदायांमधील राजकारण्यांनी व नागरी समाज सदस्यांनी त्याची प्रशंसा केली. या संदर्भात अजून क्वचित प्रसंगी सामुदायिक तणाव निर्माण होतात, पण इमारतींबाबत वाद घातले जात नाहीत. तो प्रश्न आता संपुष्टात आला आहे. शहरात निघणारे कट्टरतावाद्यांचे मोर्चेही त्यातून निवळले.
"इटालियन कट्टर उजवे गट दर वर्षी इथल्या उठावचित्रांसमोर गोळा व्हायचे आणि फॅसिस्ट अभिवादन करायचे," असं ओबेरमाइर सांगतात.
"पण आता आर्न्ट यांचं अवतरण तिथे लावल्यावर, या गटांना मानखंडना झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्यांनी इथे येणं बंद केलं. तसंच जर्मनभाषक कट्टर उजवे गट या विजय स्मारकासमोर सभा घेऊन 'इटली आमचं कसं दमन करते' याबद्दल भाषणं करायचे, पण आता आम्ही त्यांचीही साधनं एका अर्थी नष्ट केल्यामुळे त्यांनासुद्धा ते बोलता येत नाही."
बोल्झानोतील वास्तुरचनात्मक स्थित्यंतराचं प्रारूप इटलीच्या इतर भागांमध्ये, आणि स्पेनसारख्या गुंतागुंतीचा व विभाजनवादी फॅसिस्ट वारसा लाभलेल्या देशांमध्येही यशस्वीरित्या वापरता येईल, अशी आशा ओबेरमाइर यांना वाटते. या प्रारूपाने युनायटेड किंगडम व अमेरिका इथल्या पुतळ्यांसंदर्भातील वादांवरही उपाय सुचवला आहे. "बोल्झानोतील सामाजिक संदर्भ निश्चितपणे महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक समुदायाने आपापल्या कलात्मक हस्तक्षेपाचा शोध घ्यायला हवा," असं ओबेरमाइर म्हणतात.
"पण आपण स्मारकं नष्ट करायला नकोत, त्याऐवजी त्यांच्या मूलगामी रूपांतर करावं, ही मूळ संकल्पना ताकदीची आहे. त्यामुळे लोकांना इतिहासावर, विचारसरणीच्या प्रश्नावर चिंतन करायला साधनं मिळतात आणि त्यांच्या भोवतीच्या वातावरणाची चिकित्सक तपासणीही करता येते. अखेरीस, याबाबतचा अंतिम शब्द स्मारकांचा नसून आपलाच असणार आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








