हार्दिक, भुवी, पृथ्वी संघाबाहेरच; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघाची घोषणा

हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार,

फोटो स्रोत, PAUL ELLIS

फोटो कॅप्शन, हार्दिक पंड्या

न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी तसंच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

कोरोनाविषयक नियमावली लक्षात घेऊन 20 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. चार खेळाडूंना स्टँडबाय म्हणून संधी देण्यात आली आहे.

हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, पृथ्वी शॉ यांना संघात स्थान मिळू शकलेलं नाही. हार्दिक आणि भुवनेश्वर या दोघांना दुखापतींनी सतावलं आहे.

लोकेश राहुल आणि वृद्धिमान साहा यांची संघात निवड झाली आहे मात्र त्यांचा सहभाग फिटनेस सिद्ध करण्यावर अवलंबून असेल. राहुलला अपेंडिक्सचा त्रास जाणवल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली तर साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

भारत-न्यूझीलंड फायनल 18 ते 22 जून या कालावधीत होणार आहे.

मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, हनुमा विहारी हे संघात परतले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हे तिघे दुखापतीमुळे खेळू शकले नव्हते.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघाचा भाग असलेल्या कुलदीप यादवला डच्चू देण्यात आला आहे.

अभिमन्यू इश्वरन, प्रसिध कृष्णा, अवेश खान आणि अर्झान नागवासवाला यांना स्टँडबाय म्हणून संधी मिळाली आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अभिमन्यू सातत्याने धावा करतो आहे.

U19 वर्ल्डकप, डोमेस्टिक क्रिकेट तसंच आयपीएल स्पर्धेत अवेश खानने वेग तसंच अचूकतेसह सर्वांना प्रभावित केलं आहे. प्रसिधने काही दिवसांपूर्वीच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वनडे पदार्पण केलं होतं.

गुजरातसाठी खेळणारा अर्झान हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. ट्रेंट बोल्ट आणि नील वॅगनर यांच्या गोलंदाजीचा मुकाबला करता येण्याच्या दृष्टीने अर्झानला संधी देण्यात आली आहे.

भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद शमी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल आणि वृद्धिमान साहा (फिटनेस सिद्ध केल्यास सहभागी)

स्टँडबाय-अभिमन्यू इश्वरन, अवेश खान, प्रसिध कृष्णा, अर्झान नागवासवाला

आयपीएलचं आयोजन करण्याची इंग्लिश काऊंटींची तयारी

अर्ध्यातून रद्द करण्यात आलेली इंडियन प्रिमियर लीग - IPL स्पर्धा भरवण्याची तयारी काही काऊंटींनी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडे दर्शवली आहे.

आयपीएलमधले काही खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मंगळवारी उरलेली IPL स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

उर्वरित सामने खेळवण्यासाठी नवीन जागेचा शोध घेण्यात येतोय का, हे बीसीसीआय (BCCI)ने स्पष्ट केलं नव्हतं.

पण आता वॉर्कविकशायर, सरे आणि मार्लिबोन क्रिकेट क्लब (लॉर्ड्स)ने आपल्याला यात रस असल्याचं म्हटल्याचं वृत्त क्रिकइन्फोने दिलंय.

यामध्ये आधी लँकेशायरचं नावंही घेतलं जात होतं, पण त्यांनी त्यांचं ओल्ड ट्रॅफर्ड मैदान देऊ केलं नसल्याचं समजतंय.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, "आम्ही बीसीसीआयसोबत टूर आणि इतर बाबींबद्दल बोलत असतो आणि यापुढेही ते करत राहू. पण ते आताच्या घडीला IPL भरवण्यासाठी दुसरी जागा शोधत आहेत का, याची आम्हाला काहीही कल्पना नाही."

IPL 2021 मधले 31 सामने शिल्लक आहेत. हे सामने पुन्हा आयोजित कराये झाले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचं भरगच्च वेळापत्रक सांभाळून ते करावं लागेल.

भारतासोबतची 5 टेस्ट मॅचची सिरीज संपवून इंग्लंडची टीम 14 सप्टेंबरला बांगलादेश आणि पाकिस्तानला जाणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये टी20 वर्ल्ड कप होणार आहे.

सप्टेंबरच्या अखेरीस युकेमध्ये उरलेले आयपीएल सामने भरवले तर इंग्लंड आणि भारताच्या टीम्स एकाच ठिकाणी असतील तर इतरही काही आंतरराष्ट्रीय खेळाडू द हंड्रेड स्पर्धेनंतर याच देशात असण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)