दाऊद-सना: त्याने एक पाय आणि दोन्ही हात गमावले, पण तिने त्याच्याशीच लग्न केलं

दाऊद सिद्दिकी आणि सना
फोटो कॅप्शन, दाऊद सिद्दिकी आणि सना
    • Author, फुरकान इलाही आणि उमर दराज नांगियाना
    • Role, बीबीसी उर्दू, लाहोरहून

"घरच्यांना पटत नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं तू काय करशील? दाऊदला दोन्ही हात नाही, एक पाय नाही, तुझं कसं होईल?", सांगताना सना मुश्ताकचे डोळे भरून आले. लाहौरमध्ये राहणाऱ्या सनाचं नुकतंच दाऊदशी लग्न झालंय. डबडबलेल्या डोळ्यांनी ती पुढे सांगत होती, "तरीही मी म्हटलं, मी त्याची साथ सोडणार नाही. मग मी घरच्यांशी भांडून आले. ते मला म्हणायचे तू एकासाठी सगळ्यांना सोडतेय. मी त्यांना म्हटलं - मला फक्त तोच हवाय, बस."

काही महिन्यांपूर्वी दाऊद सिद्दिकीचा अपघात झाला होता. घरातच काम करताना त्याला विजेचा जबर धक्का बसला. या अपघातात दाऊद बचावला पण त्याला दोन्ही हात आणि एक पाय गमवावा लागला.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

याविषयी सांगताना दाऊद म्हणाला, "डॉक्टर म्हणाले, हात बसवता येईल. पण जीव वाचवायला हवा. आधी त्यांनी माझे हात कोपरापर्यंत कापले होते. पण नंतर पूर्ण खांद्यांपर्यंत कापले."

दाऊदला विजेचा धक्का बसल्याची बातमी ऐकून सना धावतच हॉस्पिटलमध्ये गेली.

दाऊद सागंतो, "मी स्वतःकडे बघायचो त्यावेळी विचारच करू शकत नव्हतो की ती माझ्या जवळ येईल."

सना सांगते, "त्याला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणलं. आठ तास झाले होते. डॉक्टर म्हणाले इतक्यात त्याला शुद्ध येणार नाही. त्याचं शरीर सुजलं होतं. डोळेही उघडत नव्हते. मग मी त्याच्या कानात त्याचं नाव घेतलं आणि त्याने एकदम डोळे उघडले," सांगताना सनाच्या डोळ्यात चमक येते. ती पुढे सांगत होती, "मी त्याला म्हटलं तू काळजी करू नकोस. मी तुझ्या सोबतच आहे. मी काही तुला सोडणार नाही."

दाऊद सिद्दिकी आणि सना
फोटो कॅप्शन, दाऊद सिद्दिकी आणि सना

सना त्याची साथ द्यायला तयार होती. पण दाऊद द्विधा मनस्थितीत होता.

तो सांगतो, "मला वाटायचं मी स्वतः तिला माझ्यासोबत राहायला सांगितलं तर हे तिचं आयुष्य बरबाद करण्यासारखं होईल. त्यामुळे मी हे तिच्यावरच सोडलं. मला वाटलं माझ्या नशिबात असेल तर ही मला मिळेलच."

सना म्हणते, "मी एक वचन दिलं, एक निर्णय घेतला तर ते मला पूर्ण करायला हवं. मला कुणाचीही पर्वा नाही. मी कुणाचाच विचार करत नाही. मी फक्त दाऊदचा विचार करते."

"मी त्याला म्हणते, मी आहे ना. खुदाने तुझे हात घेतले, पण माझ्या रुपाने तुला तुझे हात दिले आहेत. मी अशीच तुझी साथ देईन."

मात्र, आपल्याशी लग्न केल्यावर आपल्या आंघोळीपासून, कपडे घालणे, जेवू घालणे, नैसर्गिक विधी सगळं तिलाच करावं लागणार. हा विचार करून आपल्याशी लग्न म्हणजे सनाला त्रास दिल्यासारखं होईल, असं दाऊदला वाटायचं. या सगळ्या विचारांनी त्याचं काळीज पिळवटून निघायचं.

त्यामुळे त्याने शेवटी तिचं मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला.

दाऊद आणि सना

दाऊद सांगतो, "सना म्हणाली की मी तुझी साथ सोडणार नाही तेव्हा मला थोडा आनंद झाला होता. पण, जेव्हा तिने सांगितलं की घरातले ऐकत नाहीत तेव्हा मी तिला समजावलं की त्यांचं बरोबरच आहे. आपल्या मुलीचं वाईट व्हावं, असं कोणत्याच आई-वडिलांना वाटत नाही."

"डॉक्टरांनीही सांगितलं होतं की दाऊद वाचणार नाही. रोज म्हणायचे आज दाऊद नाही वाचणार. त्यामुळे माझ्या मामांनीही तिला समजावलं की बाळा इथे दाऊदच्या आयुष्याचं काय होईल, हेच सांगता येत नाही. तो जगेल की नाही, हेही सांगता येत नाही. तरीही तिने वाट बघितली. ती म्हणाली मला याच्याशीच लग्न करायचं आहे."

दाऊदला अपघात झाला त्याच्या काही महिन्यांपूर्वीच दोघे भेटले होते आणि काही महिन्यातच एकत्र राहण्याचं दोघांचं स्वप्न पूर्णपणे बदलून गेलं होतं.

सना सांगते, "आमच्या नात्याला एक वर्ष झालंय. आम्ही फोनवर बोलायचो. बाहेर जायचो. बाईकवरून फिरायचो. हळूहळू आमचं नातं घट्ट होत गेलं. त्याचंही माझ्यावर प्रेम आहे आणि मीही त्याच्यावर खूप प्रेम करते."

दाऊद सिद्दिकी
फोटो कॅप्शन, दाऊद सिद्दिकी

दाऊद सांगतो, "त्यावेळी आम्ही एकत्र जगण्यामरण्याची वचनं दिली होती. पण, त्यावेळी मी बरा होतो."

पुढे बोलताना दाऊदचा कंठ दाटून येतो. दाऊद म्हणतो, "धडधाकट माणूस स्वतःची सगळी कामं स्वतः करू शकतो. पण, जेव्हा इतर कुणी आपली कामं करून देतो, वॉशरूमला घेऊन जातो तेव्हा थोडं वाटतं की खुदाने माझ्यासोबत हे काय केलं."

"पण माझी पत्नी सना मला धीर देते. मला म्हणते, असा विचार करायचा नसतो. माझ्यासोबत असं काही होईल, याची मला कल्पनाही नव्हती."

सना म्हणते, "मला कधी-कधी आठवतं तो म्हणायचा मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन. आजही मी भावासोबत किंवा मामांसोबत बाहेर जाते तेव्हा तो मला म्हणतो की तू इतरांसोबत जाते, याचं मला वाईट वाटतं. मी त्याला म्हणते काही हरकत नाही. तू बरा झालास की मला बाहेर घेऊन जा. तेव्हा मी तुझ्यासोबतच बाहेर जाईल."

त्याला दुःख होणार नाही, तो सतत हसत राहील, याची सना सगळी काळजी घेते. ती म्हणते, "मी त्याला कधीच जाणवू देत नाही की मला काही वाईट वाटतंय. मी त्याच्यासोबत आनंदातच असते. त्याला सतत हसवते."

दाऊदचा अपघात झाल्यानंतर सनाच्या घरच्यांनी लग्नाला साफ नकार दिला होता. त्यांनी तिच्यासाठी दुसरा मुलगाही शोधला. पण, सनाने ठाम विरोध केला आणि घर सोडलं. जवळपास महिनाभर ती आपल्या मावशीकडे होती. त्यानंतर तिने दाऊदशी संपर्क केला.

दाऊद सिद्दिकी
फोटो कॅप्शन, दाऊद सिद्दिकी

सना सांगते, "मी त्याला म्हटलं आता काही म्हणायचं नाही. आता मी सगळं सोडून तुझ्यासाठी आले आहे. तरीही तो म्हणाला की माझी परिस्थिती कशी आहे, तू बघतेच आहेस. पण, मी त्याला म्हटलं तू कसाही असलास तरी मी तुझी साथ देईल. तो म्हणाला ठिक आहे आणि मग मी त्याच्याकडे आले. आमचं लग्न लावून दिलं आणि तेव्हापासून आम्ही सोबत राहतोय."

आता सनाच दाऊदची सगळी काळजी घेते. दोघंही आनंदात आहेत. पण, एका गोष्टीचा खेद वाटतो.

सनाचे घरचे अजूनही तिच्याशी बोलत नाहीत.

सना सांगते, "माझ्या वडिलांचा फोन आला होता. तेव्हा मी खूप खूश झाले. ते माझ्याशी बोलले. मी त्यांना म्हटलं दाऊदशी बोला तर त्यांनी फोन कट केला. मी दाऊदला म्हटलं काळजी करू नको, ते बोलतील. तो म्हणाला - तू आनंदी रहा. मी त्याला म्हटलं तू आनंदी रहा. मी सगळं नीट करेन. मी माझ्या वडिलांचं मन वळवेन."

आपण दाऊदची साथ का दिली हे सांगताना सना म्हणते, "मी म्हणते, माझा असा अपघात झाला असता तर माझ्या आई-वडिलांनी काय केलं असतं आणि त्यावेळी दाऊदने येऊन म्हटलं असतं की मी हिच्याशी लग्न करेन तर त्यांना किती आनंद झाला असता. मग आता मी दाऊदची साथ देतेय तर ते खुश का नाही. आपल्या मुलीने इतका चांगला निर्णय घेतला, याचा त्यांनाही आनंद व्हायला हवा होता. पण ते त्यांना पटत नाही."

सना
फोटो कॅप्शन, सना

दाऊदनेही आशा सोडलेली नाही. दोघांचंही भविष्य चांगलं व्हावं, यासाठी काहीतरी करावं, अशी त्याची इच्छा आहे.

दाऊद म्हणतो, "माझी पंतप्रधानांना विनंती आहे की मला कृत्रिम हात लावून द्यावे. काहीतरी कामधंदा सुरू करण्यासाठी मदत करावी. हिने जे करून दाखवलं त्यासाठी खूप मोठं मन लागतं. खून हिम्मत लागते. सगळेच हे करू शकत नाहीत. ती माझ्यासाठी स्वतःचं घर, कुटुंबीय सगळं सोडून आली आहे. त्यामुळे मला तर हेच वाटेल की तिच्या घरच्यांनी तिला पुन्हा स्वीकारावं."

सना म्हणते, "मला दाऊदला बरं झालेलं बघायचं आहे. एवढंच मला हवंय. त्याला कृत्रिम हात बसवावा, पाय बसवावा, तो माझ्या आसपास चालता-फिरता रहावा, बस, आणखी काही नकोय."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)